अजूनकाही
८ जानेवारी रोजी ज्येष्ठ अमेरिकन अभिनेत्री व गायिका मेरील स्ट्रिप यांना त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘गोल्डन ग्लोब्ज जीवनगौरव अॅवार्ड’ देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मेरीलने जेमतेम सात मिनिटांचे भाषण केले.पण ते जगभरच्या प्रसारमाध्यमांचा विषय बनले. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव न घेता त्यांच्यावर या भाषणात मेरीलने सडकून टीका केली, असे देशी-विदेशी-प्रादेशिक सर्वच प्रसारमाध्यमांमधील बातम्यांमध्ये म्हटले होते. मेरीलने ट्रम्प यांच्याविषयी ब्र उच्चारण्याचे धाडस दाखवले, ते एका वार्ताहराची बाजू घेऊन...प्रसारमाध्यमांविषयीच्या विश्वासातून. मेरील यांच्या या छोट्याशा भाषणातून बॉलिवुडमधील एका निर्भय कलाकाराचे दर्शन घडतेच, पण त्यापेक्षाही उच्चार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीची त्यांची तळमळही दिसून येते. त्यांच्या मूळ भाषणाचा जशाचा तसा अनुवाद...
.............................................................................................................................................
मी आपले सर्वांचे आभार मानते. खूप खूप, अगदी मनापासून आभार मानते. आपण सर्वजण खाली बसून घ्या. तुम्हा सर्वांबद्दल माझ्या मनात आपुलकीची भावना आहे. आजचं माझं भाषण मी वाचूनच दाखवणार आहे म्हणून मला माफ करावं, पण मागच्या आठवड्यातच खूप मोठ्यानं बोलल्यामुळे आणि विलाप केल्यामुळे माझा आवाज पार बसला आहे. त्यातच वर्षाच्या सुरुवातीला माझ्या जीवाचा खूप संतापही झाला होता.
हॉलिवुड फॉरिन प्रेस, मी तुमचे आभार मानते. आत्ताच प्रथितयश अभिनेते आणि गायक ह्यू लॉरी बोलून गेले, त्याच धर्तीवर मीही म्हणते की, आत्ता या क्षणी अमेरिकन समाजातील सर्वाधिक टीकेची राळ आपल्यावर... या दालनात उपस्थित असलेल्या लोकांवरच उडवली जाते आहे. विचार करा याबद्दल. इथं हॉलिवुड आहे, परदेशी लोक आहेत आणि प्रेसही आहे. पण आपण आहोत तरी कोण? हॉलिवुड....हॉलिवूड ज्याला म्हणतात, ते आहे तरी काय? वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या लोकांचा समूहच तर आहे हा.
न्यू जर्सीत माझा जन्म झाला, तिथंच मी लहानाची मोठी झाले. तिथल्या सरकारी शाळेनं मला घडवलं. व्हायोला डेव्हिस ही अभिनेत्री साऊथ कॅरोलिनातल्या शेतमजुराच्या झोपडीत जन्माला आली आणि लॉन्ग आयलंड मधल्या सेंट्रल फॉल्स या भागात लहानाची मोठी झाली. ब्रुकलीनमधल्या सारा पॉल्सनला तिच्या आईनं एकहाती वाढवलं. ओहिओमधली सारा जेसिका पार्कर ही सात-आठ भावंडांतली एक म्हणून लहानाची मोठी झाली. अॅमी अॅडम्सचा जन्म इटलीत झाला.
नटाली पोर्टमनचा जन्म जेरूसलेममध्ये झाला. कुठे आहेत या सर्वांचे जन्माचे दाखले? सौंदर्यवती रूथ नेगा इथियोपियात जन्माला आली आणि माझ्या माहितीनुसार आयर्लंडमध्ये लहानाची मोठी झाली. असं असूनही आज तिला इथं नामांकन मिळालं आहे, ते व्हर्जिनिया राज्यातल्या एका लहानशा शहरातून आलेल्या मुलीची भूमिका तिनं केली आहे म्हणून. रायन गोस्लिंग हा गुणी अभिनेता कॅनडात जन्मला. देव पटेलचा जन्म केनियात झाला, त्याचं पुढील जीवन लंडनमध्ये गेलं. आज या ठिकाणी त्याचं नामांकन झालंय ते तास्मानियात राहून तिथंच लहानाचा मोठा झालेल्या भारतीयाच्या भूमिकेसाठी...
हॉलिवुडमध्ये बाहेरच्या आणि परदेशी लोकांची नुसती गर्दी झाली आहे. त्या सर्वांना तुम्ही हाकलून लावलंत तर तुम्ही फक्त फुटबॉल आणि मार्शल आर्ट्स एवढ्याच गोष्टी बघू शकाल. बरं, रूढार्थानं त्या दोन्हींना कला असंही म्हणता येणार नाही. हे बोलण्यासाठी मला फार वेळ लागणार नाही तरी पण मी सांगते की, परकायाप्रवेश करणं हे अभिनेत्याचं कामच असतं. वेगवेगळ्या लोकांच्या मनात प्रवेश करून तो त्यांच्या भावभावना प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. हा हेतू साध्य करणाऱ्या ताकदीच्या पुष्कळच भूमिका या वर्षी सादर झाल्या आहेत. खरोखर श्वास रोखून धरायला लावेल असं उत्कट काम केलं आहे बऱ्याच लोकांनी.
या वर्षी कुणीतरी असं एक काम केलं त्यामुळे मी अगदी अवाक् झाले. त्या कृतीनं माझ्या काळजात आपली नखं रोवली. ती कृती काही चांगली कृती नव्हती. चांगलं म्हणण्यासारखं त्या कृतीत काहीही नव्हतं. परंतु ती कृती परिणामकारक होती आणि आपला निशाणा तिनं अगदी अचूक साधला. ती कृती ज्या श्रोतृवर्गासाठी होती, त्या श्रोतृवर्गानं लगेच हसून आपलं दाताड दाखवलं. आपल्या देशातील सर्वांत आदरणीय स्थानावर ज्या व्यक्तीला बसायला आपण सांगितलं आहे, त्या व्यक्तीनं एका अपंग वार्ताहराची नक्कल करून त्याची खिल्ली उडवली. त्या वार्ताहरापाशी त्या व्यक्तीएवढ्या ना सुविधा होत्या, सत्ता होती की, पलटवार करण्याची क्षमता होती. तो प्रकार मी पाहिला तेव्हा माझं काळीज शतशः विदीर्ण झालं. अजूनही माझ्या डोक्यातून ते दृश्य जात नाहीये, कारण ते चित्रपटातलं नव्हतं. ते तर प्रत्यक्ष जीवन होतं.
एखादी शक्तिशाली व्यक्ती दुसऱ्याचा अपमान करण्याच्या प्रेरणेचं प्रदर्शन सार्वजनिक व्यासपीठावरून करते, तेव्हा ते प्रदर्शन जनसामान्यांच्या जीवनात झिरपत जातं. त्यामुळे इतर लोकांनाही तसंच वागण्याची जणू संमतीच मिळते. अनादरामुळे अनादरालाच निमंत्रण मिळतं. एक हिंसा दुसऱ्या हिंसेला प्रवृत्त करते. जेव्हा शक्तिमान लोक दुसऱ्यांवर कुरघोडी करण्यासाठी आपल्या स्थानाचा गैरवापर करतात, तेव्हा आपण सगळेच हरतो.
हा प्रसंग मला वृत्तपत्रमाध्यमाकडे घेऊन गेला. सत्तेवर अंकुश ठेवण्यासाठी, प्रत्येक अपकृत्याबद्दल सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी तत्त्वनिष्ठ वृत्तपत्र- माध्यमाची आपल्याला गरज आहे. म्हणूनच तर आपल्या राष्ट्रसंस्थापकांनी राज्यघटनेतच वृत्तपत्रमाध्यमाला आणि त्याच्या स्वातंत्र्याला पवित्र वेदीचा दर्जा दिला आहे. म्हणूनच संपन्न अशा हॉलिवूड फॉरिन प्रेसला आणि कलाकार वर्गातील सर्वांना मी विनंती करते की, वार्ताहरांना संरक्षण देण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला पाठिंबा देण्यात आपण माझी साथ द्यावी. कारण यापुढे आपल्याला त्यांची गरज भासणार आहे. आणि सत्याचे जतन करण्यासाठी त्यांना आपली गरज भासणार आहे.
आणखी एक गोष्ट. एकदा मी कसल्यातरी गोष्टीबद्दल कुरकूर करत सेटवर उभी होते. आम्हाला जेवणाच्या सुट्टीतही काम करावं लागणार होतं, की पुष्कळ तास काम करावं लागणार होतं... असलंच काहीतरी होतं ते. तेव्हा टॉमी ली जोन्स मला म्हणाला, “मेरील, अभिनेत्री असणं हेच केवढं मोठं भाग्य आहे असं नाही का वाटत तुला?’’ होय, होय, नक्कीच आहे. दुसऱ्याशी सहानुभूतीनं वागण्याचा अधिकार आणि त्यातून येणारी जबाबदारी यांची आपण एकमेकांना आठवण करून द्यायला हवी. आज या ठिकाणी ज्या भूमिकांचा हॉलिवुड सन्मान करणार आहे, त्याबद्दलही आपल्याला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे.
स्टार वॉर्स या मालिकेतील व्यक्तिरेखा प्रिन्सेस लिया हिनं जाता जाता मला एकदा सांगितलं होतं, “तुझं हे भग्न हृदय घे आणि त्याचं रूपांतर कलेत कर.’’ पुन्हा एकदा सर्वांचे आभार...
.............................................................................................................................................
मराठी अनुवाद - सविता दामले. या प्रसिद्ध अनुवादिका आहेत.
savitadamle@rediffmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment