अजूनकाही
शशी, राफिया, कायरा, अंजना, दामिनी, उमंग अशा बऱ्याच जणी मला भेटल्या. कधी सिनेमाच्या पडद्यावर, तर कधी मोबाइलच्या स्क्रिनवर. आपापल्या कथेत या सगळ्यांची मध्यवर्ती भूमिका आहे (राफिया वगळता). बाईचं आयुष्य अनेक अंगांनी, अर्थांनी या व्यक्तिरेखा आपल्यासमोर मांडतात. सध्या अॅमेझॉन प्राइमवरील ‘Four More Shots Please!’ या वेबसीरिजबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. या चर्चेतूनच मला या सगळ्या एकत्रच आठवल्या.
शशी आपल्याला भेटते ‘इंग्लिशविंग्लिश’ या सिनेमात आणि कायरा ‘डिअर जिंदगी’मध्ये. ‘जिंदगी गुलजार है’मधील नायिकेची आई राफिया, तर ‘Four More Shots Please!’मध्ये दामिनी, अंजना, उमंग आणि सिद्धी या चार नायिका आहेत. ही सीरिज आणि यातल्या बायकांबद्दलचं माझं रीडिंग मला ‘डिअर जिंदगी’ पाहिल्यानंतरही मांडावंसं वाटलं होतं. पण, सिनेमा फारच उशिरा पाहिला होता. पण, बऱ्यापैकी त्याच पद्धतीने बाईचं चित्रण यात दिसलं म्हणून हा विषय पुन्हा एकदा मनात घोटाळू लागला.
‘Four More Shots Please!’च्या नायिकांचं जगणं हे अनेक (बहुतांश म्हणायला हवं खरं तर) बायकांचं फँटसीमधलं लाईफ आहे. मलाही आवडेल आयुष्याचा काही भाग या पद्धतीनं जगायला. भरपूर पैसा, तो येत राहण्यातलं सातत्य, दक्षिण मुंबईत कुटुंबापासून स्वतंत्र राहणं, मैत्रिणींसोबत धमाला शॉट्सवर शॉट्स मारायचे, एखाद वेळेस गोव्याला फिरायला जायचं त्यांच्यासोबत, कधीतरी परदेशातही... आणि सतत सेक्स.
खरंच हे फँटसी लाईफ असू शकतं अनेक बायकांसाठी! या सीरिजच्या पहिल्या भागात तर याखेरीज फारसं काहीच घडत नाही. त्या मानाने दुसऱ्या सीझनमध्ये कथेला अनेक कंगोरे आहेत आणि म्हणूनच दुसरा सीझन विचार करायला भाग पाडतो. यातल्या तिघीजणी स्वतंत्र दृष्टिकोन, व्यक्तिमत्त्व असलेल्या आहेत आणि चौथीला हळूहळू ते गवसतंय. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जपणाऱ्या, भरपूर पैसा कमावणाऱ्या या बायका पर्सनल आयुष्यात मात्र फारच वेगळ्या आहेत. त्यांचे अनेक निर्णय प्रॅक्टिकल वाटतच नाहीत. उलट काहीही प्रश्न उभा राहिला की, एकच ब्रीदवाक्य - ‘Four More Shots Please!’.
मज्जानू लाईफ!
मला यातला खटकलेला भाग - पुरुष आणि सेक्स.
बाईला पुरुषाची गरज नाही वगैरे भोंगळपणा मला पटत नाही. उलट बेडमध्ये भन्नाट पार्टनर सापडला तर त्यासारखं सुख नाही. बाईच्या सेक्स्युअल फँटसी पूर्ण व्हायलाच हव्यात, तिला ऑरगॅझम मिळायलाच हवा. तसं झालं नाही तर येणारं फ्रस्टेशन भयंकर असू शकतं. अर्थात, ते लग्नातून मिळत नसेल तर बाईनं इतर विचार करणंही योग्यच. लग्न झालं नसेल तरी तिने तिच्या आवडत्या पार्टनरसोबत हे सुख मिळवायला हवं, किंबहुना हवंच.
पण, फँटसी म्हणजे पॉलिगॅमी असा इतका साधासोपा अर्थ का काढतो आपण सतत? यातल्या नायिका इतक्या सहजपणे वेगवेगळ्या जोडीदारांसोबत सेक्स करतात की, ते एका पॉइंटला कृत्रिम वाटू लागतं. दामिनी एका सीनमध्ये तिच्या त्यावेळच्या बॉयफ्रेंडला सांगते गर्भ आठ आठवड्याचा आहे आणि आपण सहा आठवड्यांपूर्वी भेटलो. त्यामुळे हे तुझं बाळ नाही. बरं त्या आधी एकदा याच्याशीच ब्रेकअप झाला होता. बाळाच्या बापाशीसुद्धा एकदा ब्रेकअप होऊन तो परत आला होता. हे काही अफेअर नव्हतं. फक्त कॅज्युअल रिलेशन होतं. त्या आधी एक-दोन वेळा कोणी एक मित्र फक्त सेक्स करण्यापुरता रात्री हिच्या घरी आला होता. बाळाच्या बापाला ती आपण को-पॅरेंटिंग करू असं सांगते. म्हणजे काय करायचं नेमकं?
अंजनाचा घटस्फोट झाला. मग वयाने बराच लहान असलेला एक सहकारी तिच्या आयुष्यात येतो. त्याच्यासोबत अत्यंत विचारी पद्धतीने ब्रेक ऑफ केल्यानंतर महिनाभरात ती नव्या कंपनीतल्या सहकाऱ्यासोबत हॉटेल रूममध्ये पोहोचलेली असते. अर्थात त्याच्याकडे त्या पद्धतीने पाहणं आधीपासूनच असतं.
सिद्धी दक्षिण मुंबईतल्या श्रीमंत घरातील. काही दिवसांपूर्वी भेटलेल्या सडाफटिंग बॉयफ्रेंडच्या उपनगरातल्या घरात एसी नाही अशा ठिकाणीही सेक्स करायला तयार होते (एसी हा तिच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे). नंतर नंतर हा सेक्स रटाळ आहे असं वाटत असूनही जात राहते. ज्यासोबत आयुष्यात पहिल्यांदा सेक्स केला, तो मुलगा परत येऊन मागणी घालतो, तेव्हा त्याला नाही म्हणते. तिला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहेच. पण त्या सीनमध्ये आपल्याला वाटत राहतं, हिला कळलंय का नेमकं हिला काय हवंय ते?
या सीरिजमध्ये बऱ्याचदा ‘मॉडर्न फॅमिली’ असा उल्लेख येतो?
‘मॉडर्न’ किंवा ‘आधुनिक’ म्हणजे काय नेमकं?
आपल्याला काय हवंय हे नेमकं माहीत नसणं?
सतत दारू पिणं, सिगारेट ओढणं, आयुष्यातल्या प्रत्येक पुरुषासोबत सेक्स करणं?
की कितीही फटके बसले तरी पुन्हा पुरुषाची गरज भासणं?
या स्त्रिया इतक्या ‘आधुनिक’ असतील तर त्यांना सतत पुरुषांची गरज का आहे?
‘डिअर जिंदगी’मध्येही मला हाच मुद्दा पटला नव्हता. कायरा अत्यंत फ्रस्टेट होऊन गोव्याला घरी परत जाते. करिअरसोबतच तिला बॉयफ्रेंड प्रकरणही गंडलंय. गोव्यात ती मानसिक उपचार घेते. हा डॉक्टर तिला पुन्हा एकदा ‘स्व’ची ओळख करून देतो. तिच्यासोबत आपणही हळूहळू शिकत जातो की, स्वत:वर प्रेम करायला हवं, भूतकाळातल्या गोष्टींना सोडून द्यायला हवं. आपल्यामध्ये काहीतरी खास आहे, ते जपलं पाहिजे. दरम्यान कायरा एका गायकाच्या प्रेमात पडते. हेही प्रकरण फसतं. त्यातूनही ती बाहेर पडते. पण कायरा पुन्हा या डॉक्टरच्या प्रेमात पडते. डॉक्टर डोक्याचा असल्याने तो अर्थातच तिला त्यातला फोलपणा समजावून सांगतो.
ती एक छान डॉक्युमेंटरी बनवते. आपल्याला वाटतं तिने स्वत:ला शोधलं वगैरे.
पण... पण...
पण, सिनेमाच्या शेवटच्या फ्रेममध्ये एक नवाच पुरुष तिच्या आयुष्यात येतो.
नवरा, बॉयफ्रेंड वगैरे आयुष्यात महत्त्वाचे असतातच, त्याबद्दल दुमत नाही. पण, मी आजवर पाहिलेल्या बायकांचं वागणं मला या नायिकांपेक्षा वेगळं वाटतं. फसलेलं लग्न, सेक्स्युअल लाईफ, प्रेमप्रकरणं वगैरे वगैरेनंतर बायका सतत तेच तेच करत बसत नाहीत. एका पॉइंटनंतर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही पुरुषापेक्षा त्यांना स्वत:चं मोल अधिक वाटतं. या प्रकारच्या नात्यातला पुरुष नसतानाही त्या बायका आनंदानं जगतात. सतत कोणा पुरुषाचा शोध घेणं थांबवतात आणि स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी अंतरंगात डोकावतात.
चांगलं करिअर केलेल्या, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या बायका आयुष्यात एका टप्प्यानंतर भावनिक, मानसिक गुंतवणूक करणं बंद करतात. बायका या बाबतीत काहीशा ‘श्रूड’ असतात असं म्हटलं तरी चालेल. बाई आयुष्यभर मैत्रीण असू शकते, गर्लफ्रेंड नाही. ती त्यातून बाहेर पडते. बाई अत्यंत प्रॅक्टिकल विचार करू शकते.
आधुनिक होणं म्हणजे स्वत:ला स्वतंत्र करणं.
म्हणूनच, या सारख्या पुरुषामुळे दु:खी होणाऱ्या बायका मला माझ्या जगातल्या वाटल्याच नाहीत.
याउलट शशी आणि राफिया. शशी तर जामच आवडली मला. सिनेमाच्या शेवटच्या सीनमध्ये ती विमानात पुन्हा हिंदी पेपरच मागते. कारण शशी हिंदी वाचणारी, बोलणारी आहे. नवऱ्याच्या प्रेशरमुळे ती इंग्रजी शिकली तरी तिने तिच्यातलं मूळ एलिमेंट बदलू दिलं नाही. क्लासमधल्या मित्राला तिने इतकं सुंदर समजावलंय... भाषेचा अडसर न ठेवता. रोज साडी नेसणाऱ्या, साध्या सुध्या या अबला नारीला नवरा नावाच्या पुरुषाची गरज आहे म्हणून ती या नव्याने बहरू पाहणाऱ्या नात्यापासून लांब पळते, असं कुठेही वाटत नाही. शशीला आयुष्यात काय हवंय, हे तिला पक्कं ठाऊक आहे.
‘जिंदगी गुलजार है’मधली राफिया तीन मुलींना एकटी वाढवते, शिकवते. नवऱ्याने दुसरं लग्न केलंय. राफिया ज्या पद्धतीने शांतपणे नवऱ्याला, नातेवाईकांना उत्तरं देते, त्याची कमाल वाटते. कुठेही मोठेपणा नाही, चिडचीड नाही. शांत, मृदू स्वरात पण पॉइंट असा की, समोरचा माणूस पुढे बोलूच शकणार नाही. तिच्या आत्मविश्वासानं भारावून जायला होतं.
दुर्दैवानं अत्यंत खंबीर आणि कणखर अशा या बायकांना आपण सिनेमासारख्या माध्यमांमध्ये नेहमीच अत्यंत साध्या, गरीब स्वभावाच्या अशाच दाखवतो. म्हणजे शशी नेहमी सुती साड्या नेसणारीच असणार. शशी कधीही निव्वळ गंमत म्हणून टल्ली होणार नाही, मैत्रिणींसोबत चार दिवस फिरायला जाणार नाही. ती सिनेमाच्या शेवटी आपल्यातला कणखरपणा दाखवणार. आणि याउलट फॅशनेबल कपडे घालणारी, दारू पिणारी, सिगारेट ओढणारी स्त्री सिनेमाच्या शेवटी गिल्टमध्ये जाणार.
स्वत:मधला सेक्स अपिल माहीत असणारी, मैत्रिणींसोबत दारू पिणारी, मौजमजा करणारी मॉडर्न स्त्री डोक्याने ‘सुलझीहुई’ असू शकते. ती प्रत्येक पुरुषाकडे फक्त ‘नर’ म्हणून बघत नसेल, तिचे जीवाभावाचे मित्र असतील, ती ठाम निर्णय घेऊ शकत असेल... नव्हे, अशी स्त्री असते!
माध्यमांमध्ये नसेल, प्रत्यक्ष आयुष्यात अशाच बायका हल्ली अधिक दिसतात!
.............................................................................................................................................
लेखिका अमिता दरेकर मुक्त पत्रकार आहेत.
darekar.amita@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment