अजूनकाही
“रोमँटिक म्युझिक यूज्वली सजेस्ट्स ग्रेट एक्सप्रेशन अँड फ्रीडम, सोअरिंग इलेक्शन्स अँड प्लंजिंग ग्लूम. म्युझिक कॅन कन्वे ऑर इन्डयूस अॅन इमेन्स रेंज ऑफ फीलींग्ज... इंडियन म्युझिक इज अॅन इंटलेक्च्युअल मॅथमॅटिकल प्रोसेस ऑफ द मोस्ट एक्ट्रॉऑडिनरी कॉम्पलेक्सिटीव.”
जागतिक र्कीर्तीचे व्हायोलिन सम्राट येहुदी मेन्युहीन यांचे हे निरीक्षण आहे. रोमँटिक संगीतातून अनिर्बंध स्वातंत्र्याची अनुभूती होते असे ते म्हणतात. कधी अवकाशाकडे झेप घेणारी आनंदाची लहर, तर कधी निराशेच्या गर्तेत लोटणारे दुःख… संगीतातून भावभावनांचे अनेकविध कल्लोळ प्रकट होतात.
मेन्युहीन यांच्या मते भारतीय संगीत ही एक आत्यंतिक गुंतागुंतीची गणिती प्रक्रिया आहे. १९५२ साली पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या निमंत्रणावरून मेन्युहीन प्रथम भारतात आले होते. दिल्लीत एका खाजगी बैठकीत त्यांनी रविशंकराचे सतारवादन ऐकले. तबल्यावर चतुरलाल होते. समोर कोणताही ‘स्कोअर’ लिहिलेला नसताना तीन तास एखादा संगीतकार केवळ मंत्रमुग्ध करणारे संगीत निर्माण करू शकतो, यावर त्यांचा विश्वासच बसेना. त्यावरूनच त्यांचे भारतीय संगीताविषयीचे वरील मत झाले. त्या प्रसंगापासून वर्तमान युगातील रविशंकरनामक यशोगाथा सुरू झाली.
७ एप्रिल ही रविशंकरांची जन्मतारीख. यंदाचे वर्ष हे त्यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. ‘युनायटेड नेशन्स’च्या आमसभेसमोर शांतिमंत्र आपल्या गायनातून सादर करणाऱ्या एम.एस. सुब्बलक्ष्मी या ‘भारतरत्न’ किताब पटकावणाऱ्या पहिल्या कलाकार. १५ ऑगस्ट १९४७ रोजी नवस्वतंत्र भारताचे आपल्या सनईच्या पवित्र सुरांनी स्वागत करणारे बिस्मिला खान हे दुसरे आणि भारतीय संगीताची पताका अवघ्या विश्वात फडकावणारे रविशंकर हे तिसरे कलाकार! १९९०च्या दशकात जपानच्या सरकारने दोन भारतीय कलाकारांना आपला सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला होता. रविशंकर आणि सत्यजित राय. त्यानंतर त्यांना ‘भारतरत्न’ प्रदान करून भारत सरकारने आपली अब्रू राखली.
सर्व अर्थाने टोलेजंग असे व्यक्तिमत्त्व लाभलेले रविशंकर म्हणजे परिपूर्ण व चतुरस्त्र संगीतकार होते. पारंपरिक गुरु-शिष्य परंपरनेनुसार मेहरच्या अल्लाउद्दीन बाबांच्या कडक शिस्तीत ते शिकले. शेकडो रागरागिण्यांवर त्यांनी प्रभुत्व मिळवले. देशातील अव्वल सतारवादकांत त्यांची गणना होऊ लागली. त्यानंतर केवळ युरोप आणि अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण विश्वात भारतीय संगीताची मान त्यांच्यामुळे उंचावली. आज शेकडो वादक आणि गायक हे परदेशात जाऊन मानमरातब प्रतिष्ठा आणि पैसा मिळवत आहेत, त्यामागे रविशंकरांचे १९६०च्या दशकापासूनचे अथक परिश्रम आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या संगीताला ‘ग्लॅमर’ मिळवून देणारे ते पहिले कलाकार. त्यांच्यामुळे आपण भारतीय संगीताकडे आकर्षिलो गेलो असे मला सांगणारे इटालियन जानी रिकिझिसारखे किमान डझनभर श्वेतवर्णीय संगीतकार युरोपात भेटले.
रविशंकरांनी ज्या ज्या क्षेत्राला स्पर्श केला, त्याचे सोने केले. त्यांनी ‘सिहेन्द्रमध्यम’, ‘अभोगी’, ‘जनसंमोहिनी’सारखे दाक्षिणात्य संगीतातले राग हिंदुस्थानी वाद्यसंगीताच्या कक्षेत आणले. ‘तिलकश्यामं’, ‘बैरागी भैरव’, ‘नटभैरव’, ‘चारुकंस’, ‘जोगेश्वरी’ वगैरे रागांची निर्मिती केली. त्यांच्यातील रचनाकार सदैव जागा आणि दक्ष असे.
चित्रपट संगीताच्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी केवळ स्तिमित करणारी आहे. १९५०च्या पूर्वी ‘धरती के लाल’ आणि ‘नीचानगर’ या ‘इप्टां’च्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. सत्यजित राय यांच्या ‘पाथेर पांचाली’, ‘अपराजितो’ आणि ‘अपूर संसार’ या अजरामर चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत तर केवळ अविस्मरणीय होते. ‘अनुराधा’ चित्रपटासाठी त्यांनी रचलेल्या ‘जाने कैसे सपने में’, ‘कैसे दिन बीते’, ‘हाय रे वो दिन क्यों ना आये’ या गीतांच्या चाली गानरसिकांना आजही भुरळ घालतात. ‘गोदान’मधील ‘पिपराके पतवासरीख डोले मनवा’ किंवा गुलजारच्या ‘मीरा’मधील ‘बाला मैं बैरागन’ या लोकधुनांवर आधारलेल्या गीतांची गोडी तर अवीटच आहे. अवघ्या जगतात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर’ पुरस्कार पटकावणाऱ्या ‘चार्ली’ आणि रिचर्ड अॅटेनबराचा ‘गांधी’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही रविशंकरांचेच. इतकी चौफर कामगिरी एक कलाकार करू शकतो, यावर विश्वास ठेवणे कठीण जाते!
सतारवादक या नात्याने त्यांचे विश्वभ्रमण १९६०च्या दशकात सुरू झाले. एकीकडे महेश योगी यांचे अध्यात्म आणि दुसरीकडे रविशंकरांची सतार यांचे वेड पाश्चात्य जगतात पसरू लागले. इतके की तरुणांच्या गळ्यातले ताईत असणारे ‘बीटल्स’ त्यांचे शिष्य बनले. शेकडो हिप्पी त्यांचे चाहते बनले. रविशंकरांच्या यशाची कमान गगनाकडे भरारी घेत राहिली. या सर्व यशामागे त्यांचे अपरंपार कष्ट होते आणि प्रचंड धडपडही होती. त्यांचे बालपण, त्यांच्या ‘स्ट्रगल’चा काळ आणि त्यांची तेव्हा कदर करणारे लोक यांना ते विसरले नाहीत.
रविशंकरांची कौटुंबिक पार्श्वभूमी फार वेगळ्या प्रकारची होती. त्यांचे मोठे बंधू उदय शंकर हे नर्तक होते, इतपतच सर्वांना माहीत असावे. पण आपले आयुष्य, आपले कुटुंब, आपली पत्नी, आपला घटस्फोट या सर्व खाजगी समजल्या जाणाऱ्या बाबींविषयी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे. त्यांचे मूळ नाव ‘रवीन्द्र शंकर चौधरी’ असे होते. मुळात त्यांचे आडनाव ‘चटोपाध्याय’ असे होते. परंतु ब्रिटिशांना ते उच्चारणे कठीण जात असे, म्हणून ‘चटोपाध्याय’चे चौधरी झाले. आणि नंतर त्यातील ‘चौधरी’ही गळून पडले. त्यांचे वडील श्याम शंकर हे संस्कृत पंडित तर होतेच. परंतु त्याशिवाय ते कायदेतज्ज्ञही होते. कलकत्ता विद्यापिठाची ‘एम. ए.’ पदवी आणि लंडनच्या मिड्रल टेम्पलंची ‘बार अॅट लॉ’ पदवीही त्यांनी घेतली होती. गौतम बुद्धावर आणि ‘विट अँड विस्डम ऑफ इंडिया’ अशी पुस्तकेही त्यांनी लिहिली होती. रविशंकरांना मात्र पित्याचा सहवास आणि प्रेम फारसे लाभले नाही. रविशंकर रवीन्द्रनाथांना भेटायला आणि त्यांच्या पाया पडायला गेले होते, त्या वेळी ‘वडिलांसारखा मोठा हो’ असा आशीर्वाद त्यांना गुरुदेव टागोरांनी दिला होता.
त्यांचे यशस्वी उत्तरायुष्य पाहता लहानपणी त्यांना हादरवणाऱ्या घटना घडल्या असतील यावर विश्वास बसणार नाही. वडिलांपासून त्यांना दूर रहावे लागले. त्यांचे शालेय शिक्षण पॅरिसमध्ये झाले आणि उदयशंकरांबरोबर १९३२ सालीच ते प्रथम अमेरिकेला गेले होते. म्हणजे पाश्चात्य जीवनशैली आणि वातावरण यांच्याशी त्यांचा लहानपणापूनच घनिष्ठ परिचय होता.
रविशंकरांच्या वडिलांची लंडनमध्ये एका खटल्यासाठी कार्यरत असताना हत्या झाली. त्यांना केवढा मानसिक आघात सहन करावा लागला असेल याची कल्पनाही करवत नाही. वडिलांची हत्या झाली, तेव्हा रविशंकर आपल्या भावाच्या नृत्य मंडळीबरोबर पूर्वेकडील देशांच्या दौऱ्यावर होते. ते हिंदुस्थानात परतले. पुन्हा युरोपच्या दौऱ्यावर जायचे होते. त्यावेळी मुख्य संगीतकार या नात्याने अल्लाऊद्दीन बाबा दौऱ्यावर असणार होते. आईने रविशंकरांना अलाऊद्दीन बाबांच्या पदरात सोपवले. त्यावेळी बाबा म्हणाले. “हे माते! तू रत्नगर्भा आहेस. तुझ्या पोटी भगवान शंकराने जन्म घेतला आहे. आतापावेतो अली अकबर हा माझा एक मुलगा होता. आता रोबूच्या रूपाने त्याला मोठा भाऊ मिळाला आहे.”
अलाऊद्दीन बाबांच्या छत्राखाली पुढली दहा वर्षे रविशंकरांनी काढली. सख्त तालीम आणि त्यांचा दांडगा अभ्यास यांच्या मुशीतून रविशंकर घडले. रविशंकरांच्या वादनात ध्रुपद धमाराचे गांभीर्य आणि भव्यता असे. त्यांच्याकडून एखादा राग ऐकणे म्हणजे परिपूर्णतेचा अनुभव घेणे. मंद्र सहकारापासून सुरू होणारी आलापी म्हणजे रागाच्या डोहात आकंठ अवगाहन असे. मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या प्रांगणात जानेवारी महिन्याच्या सुखद थंडीत ‘जान फेस्ट’ची सांगता त्यांच्या सतारवादनाने होत असे. प्रजासत्ताक दिनाचे अनोख्या रीतीने स्वागत करण्याची रसिकांना संधी मिळत असे. कारण रविशंकरांचे वादन रात्री एक वाजता सुरू होऊन सकाळी साडेसात वाजता संपत असे. कोवळी उन्हे अंगावर घेऊनच ते ‘भैरवी’ने अथवा स्वरचित ‘परमेश्वरी’ने कार्यक्रम संपवत. ‘सोहिनी’, ‘ललित’, ‘भैरव’, ‘भटियार’ अशा रागांची तिथे रेलचेल असे.
रविशंकराचे वास्तव्य युरोप/अमेरिकेत वाढत गेले, तसतसे त्यांच्याविरुद्ध ‘आपले संगीत यांनी बिघडवले’ अशी हेतुपुरस्सर कुजबूज सुरू झाली. मग छबिदास हायस्कूल, विलेपार्ले म्युझिक सर्कल, सबर्बन म्युझिक सर्कल अशा परंपराप्रिय श्रोतुवर्गापुढे ते रात्री नऊपासून पहाटे पाचपर्यंत अस्सल आणि शंभर नंबरी रागदारी संगीत सादर करून श्रोत्यांची मनपसंत दाद मिळवत ते अक्षरशः जीव तोडून वाजवत. रागदारी संगीतातील परमोच्च आनंद श्रोत्यांपर्यत पोचवणाऱ्या या खऱ्याखुऱ्या दिग्गजाची स्मृती त्याच्या संगीताच्या रूपाने कायम जिवंत राहील.
............................................................................................................................................................
लेखक अमरेन्द्र धनेश्वर ग्वाल्हेर घराण्याचे गायक/संगीत अभ्यासक आहेत.
amardhan@gmail.com
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment