अजूनकाही
कालच्या १२ जानेवारीला कुमार गंधर्व यांच्या निधनाला २५ वर्षं पूर्ण झाली. कुमार गंधर्व यांना भारतीय शास्त्रीय संगीतातला ‘अदभुत चमत्कार’ समजलं जातं. ते का, याची झलक या संकलित लेखातून पाहायला मिळू शकेल. इंटरनेटवर कुमार गंधर्वांनी गायलेले अनेक राग, गाणी आहेत. त्यातील निवडक दहा घेऊन आणि दहा मान्यवर लेखक-गायकांनी कुमार गंधर्व यांच्याविषयी लिहिलेल्या लेखातील निवडक दहा अवतरणे घेऊन कुमार गंधर्वांचं प्रातिनिधिक दर्शन घडवण्याचा हा प्रयत्न ‘अक्षरनामा’च्या वाचकांना आवडावा.
............................................................................................................................................................
कुमार गंधर्व मोक्षानुकूनल भावस्थिती स्वत: अनुभवतात आणि त्या तऱ्हेची श्रोत्यांची मनोभूमी निर्माण करू शकतात. त्याकरिता स्वररचनेचा आणि शब्दार्थाचा मेळ त्यांच्या कवितेत साधलेला असतो. नृत्य आणि संगीताची प्रधानदेवता म्हणजे श्रीनरनारी-नटेश्वर होय. या नटेश्वराच्या नृत्याची आपण गायकभक्त म्हणून साथ करत आहोत अशाच भक्तिभावानं त्यांनी आपल्या जिचा गायल्या आहेत. ईशस्तवन, शंकराराधना, सरस्वतिस्तवन, गुरुभजन, संगीतमहिमा, ऋतुवर्णन, शृंगार, विरहिणीची व्यथा, शामसुंदराची बासरी इत्यादी त्यांच्या कविता स्वररचना व शब्दार्थ यांचा सुसंवाद साधत आहेत, याचं भान रसिकांना झाल्याशिवाय राहात नाही.
- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
............................................................................................................................................................
‘कुमार गंधर्वांचं गाणं’ असा शब्दप्रयोग ज्या वेळी वापरला जातो, त्या वेळी मला आरती प्रभूंची एक ओळ आठवते. त्यांनी एके ठिकाणी लिहिलं आहे, ‘तो न गातो, ऐकतो तो सूर आपुला आतला.’ कुमार गंधर्व गायला लागला की, असं वाटतं की, हा गातो ते आत चाललेलं गाणं आहे. ते स्वत:च ऐकता ऐकता जे काही सूर बाहेर पडतात, त्यांचं गाणं तयार होतंय. ही वीणा, कुमार जन्माला आला त्या वेळी सुरू झालेली आहे. ही अशा प्रकारची आजतागायत चाललेली अक्षय वीणा आहे. ही मैफल आज चालूच आहे. जसा आपण एखादा पिंजरा उघडावा आणि आतला पक्षी बाहेर पडावा, तसं कुमार आ करतात आणि त्यातून गाणं बाहेर पडतं. ही गाण्यातील नैसर्गिकता आहे, हा सहजोदभव गंगोत्रीसारखा आहे. एखाद्या झऱ्यासारखं आलेलं असं हे गाणं अत्यंत दुर्मीळ, दुष्प्राप्य अशा प्रकारचं आहे.
- पु.ल.देशपांडे
............................................................................................................................................................
‘संगीतसृष्टीतील अदभुत चमत्कार’ या शब्दांत सुप्रसिद्ध संगीतज्ञ आणि रसिकवर्य श्री. गोविंदराव टेंबे यांनी कुमार गंधर्वांचं यथोचित वर्णन केल्यानंतर कुमारांविषयी काही सांगावयाचं शिल्लक राहिलं आहे, असं मला वाटत नाही. श्री. गोविंदराव टेंबे हे स्वत: एक थोर कलावंत आहेत. हिंदुस्थानातील अनेक मोठमोठे गवयी त्यांनी प्रत्यक्ष ऐकले आहेत. एकापेक्षा एक वरचढ अशा महान कलावंतांच्या गायकीचा त्यांनी ठाव घेतला आहे आणि हे सर्व रसिकतेच्या भावनेनं करत असताना त्यांनी आपली चिकित्सक बुद्धी कायम ठेवली आहे. अशा एका नामवंत चिकित्सकानं संगीतसृष्टीतील हा अदभुत चमत्कार ‘बिनशर्त’ मान्य केल्यानंतर माझ्यासारख्या भावनाप्रधान रसिकानं कुमार गंधर्वांच्या गायनकलेचं अंतरंग रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणं हे वस्तुत: फार मोठं धाडस आहे.
– रामूभैय्या दाते
............................................................................................................................................................
तंबोऱ्याच्या तारा संथ लयीत झंकारल्या. दालनात लहरी पसरत राहिल्या. हलक्या हलक्या विरत पुन्हा उमटत राहिल्या. मंद गुणगुण झाली आणि कुमारांच्या गळ्यातून स्वरांनी हलकी गत धरली. डाव्या हाताच्या हेलकाव्याचं आवर्तन झालं.
श्रुती एकाग्र होऊ लागल्या आणि एकतानतेमधून पहाटेच्या झिलमिलत्या स्वप्नासारखं रागाचं मुख चमकलं.
“अहाहा-” हात परजून अण्णांनी सफाईदार दाद दिली. माना हलल्या. लोचदार तानेसरशी डावा हात उंचावला आणि उजव्या हाताची थाप मात्रा घेऊन बैठकीवर पडली. समेचा खटका झाला. भारलेल्या चितवृत्तींना जाग आली. नवीनतेचा स्पर्श दालनातल्या वस्तू-वस्तूंत दिसू लागला. कोपऱ्यात चपखल ठेवलेल्या काचेच्या केसमधली शिवपार्वतीची मूर्ती चिन्मय भासू लागली. विलंबितांत भावकोमल आलापांनी रागाची बैठक सजवली. त्याच लयीत बैठकीला तंद्री लागली.
– श्री.दा.पानवलकर
............................................................................................................................................................
कुमारांची स्वर लावण्याची हातोटीच अशी होती, की त्यांना कधीही त्रास होत नसे. ते सहजरीत्या वरच्या ऋषभ गंधारावर उभे राहू शकत होते आणि मध्यम, पंचम पण व्यवस्थित लावायचे. तार सप्तकाच्या पंचमावर असे जाऊन पोचायचे- एखादी बंदुकीची गोळी लांबून नेम धरून सोडावी व अचूक लागावी - तसे त्यांच्या पंचमाला जाऊन भिडण्यानं, आनंदानं अंगावर काटा उभा राहायचा. आणि मला एकदम धन्य धन्य वाटायचं. कुमारांसारख्या इतक्या उच्च प्रतीच्या कलाकाराची धर्मपत्नी झाल्याचा मला फार आनंद वाटायाचा- अभिमान वाटायचा.
– वसुंधरा कोमकली
............................................................................................................................................................
कुमारजींच्या स्वराला जिथं विजेसारखी धार आहे, तिथं तिला आकाशाची ओढ आहे. त्या ताना स्तिमित करतात आणि त्या वेळचं हातांचं नर्तन जोष आणतं. जिथं त्यांचा आवाज कोमल आहे तिथं त्याला जाईच्या वेलीच्या नाजूक तणाव्यांची झालर आहे; आणि त्या वेळच्या बोटांच्या नर्तनाला जललहरींचं मार्दव आहे. कुमारांचं गाणं म्हणजे शब्दांचं ‘शब्दपण’ कसं असतं ते सांगणारं आहे. स्वरवलयांनी शब्द नादमय करून त्यात रस भरावा, तर तो त्यांनीच. अशा सर्व शक्तीमुळे कुमारांचं गाणं हा एक शक्तिसौष्ठवाचा सहजाविष्कार वाटल्याशिवाय राहत नाही.
– इंदिरा संत
............................................................................................................................................................
रागाच्या व्यक्तित्वालाही (रागत्वाला) कुमारजींनी वेगवेगळ्या दिशेनं पाहिलं. जशी एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या दिशेनं घेतलेली छायाचित्रं असावीत. हेही सृजनच आहे. द्रुत गतीत गायली जाणारी रचना मध्य लयीत वेगळ्या गायकीच्या अंदाजानं गाणं हेही सृजनच आहे. आडा चौतालातली रचना तीनतालात गाणं इथंही ते एलिमेंट आहे. पारंपरिक संगीतात जेव्हा तुम्ही क्रिएटिव्ह होण्याचा ‘प्रयत्न’ करता, त्या वेळी दुसऱ्या परंपरेचा, दुसऱ्या स्कूलचा अभ्यास करताना एकाच वेळी तुम्ही नवीनही शिकत असता आणि परंपरेच्या अभ्यासामुळे ऑर्थोडॉक्सही होत जाता. परंपरेला दिलेली मान्यता आणि निर्मितीचा स्रोत हे दोन्ही एकाच वेळी घडत असतं. असं आपलं संगीत आहे आणि असेच कुमार गंधर्व होते… कुमारजी मैफली जितके अप्रतिम गायचे, त्याहून अधिक चांगले शिकवायचे. एकूण लोकधून आणि राग यांचं मर्म समजून त्याचा जो गाभा त्यांना गवसला आणि रचनांमधून तो त्यांनी स्वत: ज्याप्रकारे प्रस्तुत केला, ते त्यांचं खरं श्रेष्ठत्व होय.
– मुकुल शिवपुत्र (कुमार गंधर्वांचा त्यांच्या सारखाच विलक्षण गायक मुलगा)
............................................................................................................................................................
…साधारण १९६२-६३च्या सुमारासच. त्या वेळेला मी त्यांचा ‘संजारी’ आणि ‘बागेश्री’ ऐकला. आपल्यापैकी अनेकांनी तो ऐकला असणारच. ते ऐकून तर मी त्यांचा वेडा भक्त झालो. इतका, की त्यानंतर मला दुसऱ्या कोणाचं गाणं ऐकणं कठीण वाटू लागलं. अनेक वर्षं ही माझी अवस्था होती. अतिशय चांगल्या चांगल्या गवयांची गाणीसुद्धा मला त्यापुढे अगदी रसहीन वाटायला लागली. इतका मी कुमार गंधर्वांचा, कुमार गंधर्वांच्या गायनाचा भक्त झालो.
- श्रीराम लागू
............................................................................................................................................................
…जिनियस लोकांचा एक स्वत:चा इलाका असतो. आणि कुमारचा अधिकार नाही, असं कोण म्हणेल? ही वॉज अ जीनियस, ही वॉज टॅलेंटेड प्रॉम द व्हेरी बिगिनिंग. पण नंतर रागरागिण्यांची तालीम आणि आतील भावना यांनी जे केलं त्याची प्रशंसा न करून चालणारच नाही. त्याचे गुण तुम्हाला स्वीकारायला हवेत आणि अजूनही तो जे गातो आहे, त्याची तुलनाच होणार नाही. एक स्वतंत्र प्रकारचं त्याचं गाणं आणि स्वत:चा एक क्लास आहे, रॅकॉर्ड ऐका, त्याची विविध संतांची भजनं अप्रतिम!
- पं. रविशंकर
............................................................................................................................................................
कुमार गंधर्वांच्या गायकीत नाट्य अंगचंच आहे. पुढच्या ‘जागी’ आधी वळणं अशक्य. प्रत्येक स्वर उत्स्फूर्त. प्रत्येक नवी तान, नवी हरकत हे गळा झोकून केलेलं साहस. वरचा स्वर भरपूर आक्रमक आणि खुला. क्षणोक्षण नवे अनपेक्षित अनुभव घेत-घेत जाणारा हा जिद्दी नायक, नाट्यसंगीताला नवं रूप देण्याची ताकद याच्या गायकीत नक्कीच आहे.
– विजय तेंडुलकर
............................................................................................................................................................
या लेखातील सर्व अवतरणे ‘कालजयी कुमार गंधर्व’ या कलापिनी कोमकली व रेखा इनामदार-साने यांनी संपादित केलेल्या आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून घेतली आहेत.
editor@aksharnama.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment