जगप्रसिद्ध चित्रकार सतीश गुजरालांचं २६ मार्च रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झालं. करोनाच्या नादात सारं जगच भयग्रस्त अवस्थेत जगत आहे. एवढ्या भयाच्या वावटळीतही गुजरालांचं निधन बोल्डमध्ये प्रिंट होऊन मनावर खोलवर रुतलंच. दृश्यकलेतील त्यांचं योगदान केवळ भारतापुरतंच सीमित नव्हतं, तर ते सातासमुद्रापार पोचलेलं आहे. जगातील अनेक आर्ट गॅलरीजमध्ये सजलेलं आहे.
गुजरालांच्या कुटुंबाचं भारताच्या राजकारणात आदरानं नाव घेतलं जातं. त्यांचे वडील अवतार नारायण गुजराल व्यवसायानं वकील होते. त्यांच्यावर लाला लजपत राय यांचा व त्यांच्या आर्य समाजी विचारांचा गहिरा प्रभाव होता. (सतीश गुजरालांचं संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लाला लजपत रायांचं मोठ्ठं पेंटिंग आहे. त्याचं कनेक्शन हे असं आहे.) अनेक वर्षं ते आर्य समाजाचे कट्टर अनुयायीही राहिले. त्यानंतर गांधींच्या विचारातून ते गांधीवादाकडे झुकले. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सतीश गुजराल यांचे मोठे बंधू इंद्रकुमार गुजराल हेही राजकारणात सक्रीय होते. अनेकदा ते कॅबिनेट मंत्री होते, आणि काही काळ भारताचं पंतप्रधानपदही त्यांनी भूषवलं. ते भारतीय राजकारणात नेमस्त राजकारणी म्हणून ओळखले जात.
अशा राजकीय पार्श्वभूमीच्या घराण्यात जन्म घेऊनही सतीशजींच्या हाती मात्र ब्रश आला आणि त्यांनी त्यातून कितीतरी अजरामर ड्रॉइंग्ज, पेंटिंग्ज, बिल्डिंग डिझाइन्स, म्युरल्स आणि स्कल्प्टर्सची निर्मिती केली. हा सगळा प्रवास सतीशजींनी त्यांच्या ‘A BRUSH WITH LIFE’ या आत्मचरित्रात रेखाटला आहे.
वोही चष्म-ए-बाक था,
जिसे सब सराब समझें
वोही ख्वाब मोतबीर थे
जो खयाल तक ना पहुँचे।
फैज़ अहमद फैज़ यांचा हा शेर सतीश गुजरालांच्या आत्मचरित्राच्या सुरुवातीलाच उदधृत केलेला आहे आणि तो त्यांच्या एकूण कलाप्रवासाकडे डोळसपणे बघण्यास बाध्य करतो. सतीश गुजरालांचा जन्म २५ डिसेंबर १९२५ ला झेलम (आता पाकिस्तान) मध्ये झाला. सतीशजींनी वयाच्या आठव्या वर्षी एका अपघातात आपली श्रवणशक्ती गमावली आणि एका पायाचं दुखणंही तेव्हापासून त्यांच्या मागे लागलं. तत्पूर्वी त्यांना फक्त उर्दू आणि पंजाबी भाषेचं ज्ञान होतं आणि त्याच भाषा त्यांच्या बोलीभाषेचाही भाग होत्या. अपघातानंतर गुदरलेल्या प्रसंगाचं फार हृदयद्रावक वर्णन त्यांनी केलं आहे- “अचानक एका पहाटे ते त्यांच्या ओळखीच्या आवाजाचे ध्वनी, कावळ्याची काव काव, चिमण्यांचा चिवचिवाट, अंगणातला हॅंडपंपचा आवाज, नोकरांची धांदल यापैकी काही म्हणजे काही ऐकू शकत नव्हतो.” काहीतरी मोलाचं गमावल्याची त्या अजाण वयातही लख्ख जाणीव झाली होती आणि त्यांच्या जगांत फक्त शांततेता सूर लागलेला होता. या शांततेनं त्यांना कॅनव्हॉसवर व्यक्त व्हायला शिकवलं.
डावीकडे पं. नेहरू आणि उजवीकडे लाला लजपत राय यांचं पेटिंग. मध्यभागी गुजराल यांचं सेल्फ पोर्ट्रेट
सतीशजींना सुरुवातीला दिल्लीतील मुकबधिरांच्या शाळेत पाठवण्यात आलं, परंतु तिथं त्यांचं मन फार रमलं नाही. ते तिथून परत लाहोरला गेले. मग वडिलांनी त्यांना लाहोरच्या मेयो आर्ट स्कूलमध्ये पाठवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांना त्यांचे मोठे भाऊ इंदरजी यांनीही प्रोत्साहित केलं. त्या स्कूलच्या प्रिन्सिपल्सच्या यादीत जॉन लोकवर्ड किपलिंग (रुडयार्ड किपलिंग हा त्यांचाच मुलगा) यांचं नाव आणि त्यांचं कर्तृत्व सतीशजींच्या वडिलांना प्रभावित करण्यास पुरेसं होतं. मेयो स्कुलमध्ये पेंटिंग्ज, ड्रॉइंग्ज, स्क्लप्चर्स व म्युरल्स असं सतीशजींना शिकता येईल, असं त्यांना वाटलं होतं. दृश्यकलेच्या या मार्गावर सुरुवातीला सतीशजींना जबरदस्तीनं जाण्यास भाग पाडलं गेलं होतं आणि तोच त्यांच्या आयुष्याचा मोठा अॅसेट बनला. याचं पूर्ण श्रेय ते त्यांच्या दूरगामी विचार करणाऱ्या वडिलांना आणि त्यांना त्या मार्गाकडे वळवण्यासाठी कारणीभूत झालेल्या मोठ्या भावाला देत असत.
(मेयोमध्ये त्यांची मैत्री इंदरजीत या सहाध्यायीशी झाली. इंदरजीत स्वतः ही उत्तम पेंटर होते. हेच इंदरजीत म्हणजे अमृता-इमरोज या प्रसिद्ध जोडींमधील इमरोज.) सतीशजी आणि इंदरजी दोघंही त्या वेळी लाहोरमध्येच शिकण्यासाठी होते. इंदरजींचं हॉस्टेल त्यांच्या हॉस्टेलपासून फार तर अर्धा किमी अंतरावर होतं. मेयोमधील जेवण फारच वाईट असायचं म्हणून ते रोज जेवणासाठी इंदरजींच्या हॉस्टेलवर जेवायला जायचे. या निमित्ताने दोघं भाऊ भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या खूप जवळ आले.
इंदरजींवर तेव्हा डाव्या विचारांचा खूप प्रभाव होता आणि त्यामुळे त्यांच्या मित्रमंडळीत समाजवादी विचारवंतांचा समावेश असायचा. त्यांत अनेक लेखक, शायर असणाऱ्या विशेषतः उर्दू साहित्यिकांचाही समावेश असायचा. त्यांत प्रामुख्याने सतीशजी उल्लेख करतात ते फैज़ अहमद फैज़, अली सरदार जाफरी आणि कृष्णचंदर यांचा. त्यांच्याशी चर्चा करणं सतीशजींना शक्य व्हायचं नाही, परंतु त्यांच्या सहवासानं सतीशजींना समृद्ध वाटायचं. सतीशजींना उर्दू भाषेचं प्रेमही होतं आणि तोपर्यंत त्यांना पंजाबी व्यतिरिक्त ज्ञात असणारी उर्दू हीच भाषा होती. सतीशजींवर या तिघांचा आणि त्यांच्या साहित्यकृतींचा आयुष्यभर प्रभाव राहिला.
नंतर कितीतरी वर्षांनी जुल्फिकार अली भुट्टो यांनी जेव्हा सतीशजींना फैज़ यांच्या घरांत सतीशजींच्या पेंटिंग्ज लावलेल्या आहेत, हे सांगितलं, तेव्हा त्यांना फार कृतकृत्य वाटलं होतं. मेयोच्या वर्षांनी सतीशजींमधला कलावंत खऱ्या अर्थानं जन्माला घातला. दृश्यकलेतील कितीतरी परिमाणांना त्यांना स्पर्श करता आला. परंतु क्राफ्ट्समन होण्याव्यतिरिक्त आपली काही प्रगती तिथं झाली नाही अशी सतीशजींची धारणा होती. त्याच सुमारास मॉडर्न आर्टच्या पायोनियर समजल्या जाणाऱ्या अमृता शेरगील यांचं लाहोरमध्ये आगमन झालं. अमृताचं वय तेव्हा पंचविशीच्या आसपास होतं आणि त्याच काळात त्यांच्या पेंटिंग्जचं पहिलं प्रदर्शन लाहोरमध्ये झालं होतं. अमृता शेरगिल यांचं शिक्षण युरोपमधील पॅरिस आणि फ्लॅरेन्ससारख्या शहरांत झालं होतं आणि त्यांना पाश्चात्य कलावंतांचं काम माहीत होतं. अशा वेगवेगळ्या कारणांनी सतीशजींना कलेतील नवनवीन क्षितिजं खुणावू लागली. मेयोनं क्राफ्ट्समन बनवण्याव्यतिरिक्त काही केलं नाही, अशी सतीशजींची धारणा होती, परंतु दृश्यकलेतील कितीतरी माध्यमांचा शोध त्यांना मेयोत शिक्षण घेताना लागला, हेही तितकंच खरं.
मेयोचं शिक्षण संपल्यानंतर सतीशजींना शांतिनिकेतनमधील कलाभवन पुढच्या शिक्षणासाठी खुणावत होतं. त्यांच्यावर त्या वयात रवींद्रनाथ टागोरांचा व त्यांच्या कलाविचारांचा खूप प्रभाव होता. परंतु त्यांचे मित्र प्रशार आणि रूप कृष्णा यांनी त्यांना शांतिनिकेतनला जाण्यापासून परावृत्त केलं आणि कलावंत म्हणून होणाऱ्या सर्वसमावेशक जडणघडणीसाठी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टस् कसं योग्य आहे, हे समजावून सांगितलं. तसंही त्यांच्या अपंगत्वामुळे शांतिनिकेतनमध्ये जाण्याबाबतच्या निर्णयासाठी त्यांच्या मनात साशंकता होतीच.
जे.जे. मध्ये जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांच्या आईने पुन्हा वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली की, स्थानिक भाषा येत नसताना किंवा मुळात संवादाचीच समस्या असताना दुसऱ्या प्रदेशात, शहरांत टिकाव लागणं शक्य होणार नाही. शिवाय त्यांच्या एका पायाचीही समस्या होतीच. पण सतीशजींच्या जिद्दीपुढे आईने मान तुकवली आणि तिनेच त्यातून मार्गही शोधून काढला. गुजराल कुटुंबियांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचा भाऊ जे.जे.मध्ये शिकत होता. त्याचं नाव होतं प्राणनाथ मागो. तो मुंबईत सतीशजींची काळजी घेणार होता.
इंदरजींना मुंबई हे सर्वार्थानं सतीशजींसाठी, त्यांच्या कलात्म आणि सामाजिक जडणघडणीसाठी योग्य शहर वाटत होतं. त्याच सुमारास इंदरजींचे अनेक उर्दू साहित्यिक मित्रही - कृष्णचंदर, राजिंदर सिंग बेदी, साहिर लुधियानवी आणि अली सरदार जाफरी – हिंदी सिनेसृष्टीमध्ये नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आले होते. सतीशजीही त्या वेळी उर्दूमध्ये शायरी करायचे. तेव्हा त्यांच्या सहवासात सतीशजींची दृश्यकलेसोबतच लिखाणाचीही प्रतिभा अधिक जाणीवपूर्वक बहरेल, असंही इंदरजींना वाटायचं.
डावीकडे Painted wood relief mural, उजवीकडे burnt wood series
जे.जे.मध्ये सतीशजींचा म्युरल्स शिकण्याकडे अधिक ओढा होता. म्युरल्स हे अभिव्यक्तीचं अधिक सशक्त माध्यम आहे, असं त्यांना वाटायचं आणि मुळात असणाऱ्या अपंगत्वामुळे तर त्यांना तशा आर्ट फॉर्म्सचा शोध घेणं अधिक गरजेचं वाटायचं. तेव्हा म्युरल्सच्या माध्यमातून आपल्याला अधिक चांगल्या तऱ्हेनं अभिव्यक्त होता येईल असा त्यांना स्वतःबाबत वेगळा विश्वास वाटायचा. म्युरल्ससोबतच स्कल्प्टर्स, स्केचेस आणि पेंटिंग्जच्या विविध परिभाषाही जे.जे.मध्ये शिकायच्या होत्याच. या सगळ्याचा विचार करता जे.जे. ही त्यांच्यासाठी अतिशय योग्य संस्था होती, हे कालांतरानं सिद्ध झालं.
त्या वेळी मुंबई कलावर्तुळातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वं के.के. हेब्बर, शिवेक्स चावडा, एन. एस. बेंद्रे असे अग्रगण्य लोक जे.जे.शी निगडित होते. गोपाळ देऊस्कर व जे. लालकाका असे शिक्षक होते. प्राणनाथ मागो, हरीक्रिशन लाल, लक्ष्मण पै, एस. एच. रझा, जहांगीर सबावाला, एफ.एन. सुझा ही सगळी अंतिम वर्षात होती आणि पुढे या सगळ्यांनी कलाविश्वात स्वतःचं असं वेगळं स्थान निर्माण केलं. सतीशजींसोबत सहाध्यायी होते व्ही. एस. गायतोंडे, त्यांना प्रेमानं ‘गाय’ असं म्हटलं जायचं. मेयोपेक्षा जे.जे.चं वातावरण सतीशजींना कलेच्या संदर्भात आक्रमक आणि अधिक आश्वासक वाटायचं.
जे.जे.मध्ये फारच कमी मुलांना पंजाबी किंवा उर्दू भाषेचं ज्ञान होतं. जे.जे.मध्ये इंग्लिश भाषा ही अधिक व्यवहाराची भाषा होती. सतीशजींना संवाद साधण्यासाठी ही बाब त्रासदायक व्हायला लागली होती. हा अडथळा आहे हे जाणवून त्यांनी स्वत: प्रयत्न करून तो दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक इंग्लिशवर प्रभुत्व मिळवलं. इंग्लिश भाषेचा ध्वनी न ऐकताही ते अनेक प्रयत्नांनी काही महिन्यांतच या भाषेत संभाषण करायला लागले आणि लिहिण्या-वाचण्यातही त्यांनी प्राविण्य मिळवलं.
जे.जे.चं शिक्षण संपवून सतीशजी पुन्हा १९४६ मध्ये लाहोरला परतले आणि तिथेच त्यांनी आर्ट स्टुडिओ सुरू केला. त्याच सुमारास भारत-पाकिस्तान फाळणीचं वारं वाहू लागलं होतं. तणाव वाढत होता. फाळणीच्या जखमांनी परिस्थिती फारच विदारक होत गेली आणि गुजराल कुटुंबियांना पाकिस्तानमधून सर्वस्व गमावून भारतात स्थलांतरित व्हावं लागलं. फाळणीच्या या दारुण अनुभवातून जाताना सतीशजींनी ‘पार्टीशन सिरीज १९४९-५४’ ही पेंटिंग सिरीज केली. त्याबाबत ते म्हणायचे, “I didn’t paint partition, I painted my own sufferings.”
सतीशजींसोबत मेयोमध्ये चार्ल्स फाबरी हे स्कल्प्टर्समध्ये नावाजलेले कलावंत होते. त्यांनी सतीशजींच्या पेंटिंग्ज बघून त्यांना मेक्सिकोच्या म्युरल आर्टबद्दल सांगितलं आणि तिथं म्युरल्सबाबतचं शिक्षण घ्यावं असं सुचवलं. तेव्हापासून सतीशजींच्या मनात तिथं शिकण्याची इच्छा झाली. त्यावेळी पॅरिससारख्या महत्त्वाच्या जागतिक कला केंद्रात जाऊन कला शिक्षण घेण्याची प्रथा असताना, सतीशजींनी मेक्सिकोसारख्या ठिकाणी जायची वेगळी वाट चोखाळली.
१९५२ला मेक्सिको सरकारतर्फे पेंटिंग्ज शिकण्याबाबतची स्कॉलरशिप जाहीर झाली, तेव्हा त्यांनी अर्ज केला. चार्ल्स फाबरी यांनी ताबडतोब शिफारसपत्र दिलं आणि सतीशजींनी फॉर्म भरला, परंतु महत्त्वाचा मुद्दा होता, तो इंग्लिशमध्ये मुलाखत देण्याचा. इंदरजी आणि त्यांचे चुलत भाऊ विजय गुजराल यांनी इंग्लिशमधील काही संभाव्य प्रश्न काढून त्यांची तयारी करून घेतली. प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवशी त्यांच्यासोबत होते रामकुमार (विख्यात चित्रकार). त्यामुळे अनेकांना सतीशजींची निवड होईल याची खात्री नव्हती. थोर मेक्सिकन कवी ऑक्टोव्हियो पाझ यांनी त्यांची शेवटच्या राउंडमध्ये शिफारस केली आणि त्यांची निवड झाली. ऑक्टोव्हियो पाझ यांना कालांतरानं साहित्यातील सर्वोच्च नोबेल प्राईझ मिळालं. अनेक निमित्तानं पुढेही ऑक्टव्हियो पाझ आणि सतीशजी एकमेकांच्या संपर्कात राहिले.
मेक्सिकोमधील पुढची काही वर्षं म्युरल्सच नव्हे तर दृश्यकलेतील पाश्चात्यांचा व्यापक दृष्टिकोन समजून देणारी होती. सतीशजींनी तिथं सुप्रसिद्ध मेक्सिकन पेंटर दिएगो रिव्हेरा यांच्यासोबत अॅप्रेन्टिसशिप केली आणि त्यांना मेक्सिकोमधील Teatro de los Insurgentes या थिएटरचं म्युरल करताना त्यांना साहाय्यही केलं. तसेच डेव्हिड सिक्वेरासारख्या म्युरल्समधील मोठ्या कलावंतासोबत काम केलं. मेक्सिकोनं त्यांना स्थानिक परंपरा आणि आपली अंतर्गत उमलून येणारी कला यांचा सुंदर मिलाफ करण्याचा महत्त्वाचा धडा शिकवला.
भारतात परतल्यावर सतीशजींच्या पहिल्या पेंटिंग्जच्या प्रदर्शनाला इंदिरा गांधी यांनी भेट दिली होती आणि त्यातील पेंटिंग्ज इंदिराजींना विलक्षण आवडली होती. ती पेंटिंग्ज पंडित नेहरूंनी बघावीत म्हणून प्रदर्शन बघण्याचा त्यांनी आग्रह केला, परंतु पंडितजी त्या काळात दिल्लीत नव्हते. सतीशजींनी त्यांच्यासाठी तीन मूर्ती भवन (पंडितजींचं निवासस्थान) इथं ‘one-evening, one-man exhibition for one man’ असं केलं. इंदिराजींनी पंडित नेहरूंचं पोर्ट्रेट करण्याचा सतीशजींना आग्रह केला. सतीशजींना तो त्यांचा सर्वोच्च सन्मान वाटला, परंतु पोर्ट्रेटसाठी पंडितजी सीटिंग द्यायला तयार नव्हते. पूर्वी फक्त प्रसिद्ध अमेरिकन-ब्रिटिश स्कल्प्टर जेकॉब एपस्टाईन यांच्यासाठी त्यांनी अपवाद केला होता. पोर्ट्रेटच्या निमित्तानं इंदरजी आणि सतीशजी त्या कुटुंबियांच्या जवळ गेले आणि त्यांचे घरगुती संबंध प्रस्थापित झाले. या सगळ्या एपिसोडनंतर सतीशजींनी इंदिराजींचंही पोर्ट्रेट करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या दोघांचीही पोर्ट्रेटस अलाहाबादच्या नेहरू कुटुंबियांच्या ‘आनंद भवन’ या घरांत लावलेली आहेत. कृष्ण मेनन, त्यांचे वडील आणि सेल्फ पोर्ट्रेट अशी त्यांनी केलेली अनेक पोर्ट्रेट्स नावाजली गेली.
सतीशजीनी दृश्यकलेतील विविध माध्यमांचा मुक्तहस्ते वापर केला आणि दृश्यकलेतील अनेक क्षितिजांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. अवकाश (space) आणि पृष्ठभाग (surfaces) यांचं वेड सतीशजींना म्युरल्स करताना उपयोगी पडायचं. दिल्लीच्या ओबेरॉय हॉटेलचं म्युरल करतानाही त्यांनी या बाबींचा वापर केला. चंदिगढ विद्यापीचं म्युरल करताना त्यांनी काही अनकॉन्व्हेंशनल मटेरिअलचा वापर केला. गांधीभवनचं म्युरल करताना ‘पार्टीशन सिरीज’मधल्या पेंटिंग्जच्या पॅटर्नचा अवलंब केला. सरदार गुरुचरण सिंग, भारतातील मोठे पॉटर्स आणि सिरॅमिकमध्ये काम करणारे कलावंत, त्यांच्याकडूनही सतीशजी शिकले आणि आपल्या कामात सिरॅमिक्सचा वापर केला.
१९६८ला पेरूमधील राजधानी लिमा येथे सतीशजींना वर्ल्ड क्राफ्ट्स मीटसाठी आमंत्रण होतं. त्या निमित्तानं म्युरल मेकिंग आणि स्कल्प्टर्समधील नवीन क्राफ्ट्स शिकण्यासाठी त्यांनी स्कॅन्डेनेव्हियन देशांसोबतच स्पेन, ब्राझील, अर्जेंटिना, मेक्सिको या देशांना भेटी दिल्या आणि कलेच्या नवनवीन तंत्रांचा ऐवज घेऊनच भारतात परतले. इंग्रजीसोबत पुढे ते स्पॅनिश भाषाही शिकले. सतीशजींनी सिरॅमिक्स, मेटल, बर्न्ट वूड, लेदर आणि पेपर कोलाज अशा विविध माध्यमांचा म्युरल्स व इतर दृश्यकलांमध्ये वापर केला आणि म्युरल्सच्या सौंदर्यात भर घातली. बर्न्ट वूड सिरीज आणि कॉपरचे स्कल्प्टर्स हे त्यांचे विशेष राहिले.
बेल्जियम वकालत
सतीशजींनी हे सगळं करता करता इमारती डिझाईन करण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठीचं (आर्किटेक्चर)चं कुठलंही शिक्षण त्यांनी घेतलेलं नव्हतं किंवा कधी कुठल्या व्यावसायिक आर्किटेक्टकडे कामही केलं नव्हतं. त्यामुळे त्यांच्या इमारती डिझाईन करण्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली, कारण आर्किटेक्चर ही दृश्यकलांतील भावनांना आवाहन देऊन, त्यावर तग धरू शकणारी कला नाही, अशी एक धारणा त्यामागे होती. इमारत डिझाईन करण्यासाठी विशिष्ट तांत्रिक बाजू समजून घेण्याची आणि नियोजनाची आवश्यकता असते.
सतीशजींनी पूर्वी वूड सिरॅमिक्स, मेटल आणि स्टोन इ. माध्यमातून म्युरल्सची निर्मिती केली होती आणि त्यातून त्यांना अवकाश व पुनर्निर्मितीबाबतची कल्पना होती. त्यातून म्युरल्ससारखाच एखादा प्रयत्न इमारत डिझाइन्सबाबतीतही करून पाहावा असं त्यांच्या मनात आलं. सुदैवानं तशी संधी त्यांना लवकरच मिळाली.
प्रसिद्ध उद्योगपती बी. के. मोदी यांनी सतीशजींना त्यांचं फार्म हाऊस डिझाईन करण्याची संधी दिली. त्यानंतर मोदी यांचं दिल्लीतील घरही सतीशजींनी डिझाईन केलं. त्यानंतर त्यांना दिल्लीतील बेल्जियम वकालत डिझाईन करण्याची संधी मिळाली. ते त्यांचं सर्वांत महत्त्वाचं काम मानलं जातं. त्यांनी डिझाईन केलेल्या याच बेल्जियम वकालतीचा समावेश इंटरनॅशनल आर्किटेक्ट्स फर्मने निवड केलेल्या विसाव्या शतकातील जगातील एक हजार इमारतींमध्ये झाला आहे. पुढे युनेस्कोची इमारत, गोवा विद्यापीठ व सौदीतील रॉयल फॅमिलीचं समर हाऊस डिझाईन करण्याची संधी मिळाली. सतीशजींनी ओबेरॉय, आयटीसी व ताज ग्रुपच्या अनेक हॉटेल्सचं डिझाईनही केलं. त्यांची अनेक म्युरल्स व स्कल्प्टर्स जगभरातील अनेक इमारतींचं सौंदर्य वाढवत आहेत.
सतीशजींनी दृश्यकलेतील तत्त्वनिष्ठा प्राणपणानं जपली व त्यातील विविध माध्यमांचे (मटेरिअल) प्रयोगही केले. इतक्या विविध आणि व्यापक पद्धतीनं दृश्यकलेत काम करणारे सतीशजी मोजक्या कलावंतांपैकी होते. त्यांच्या कामात पारंपरिक भारतातील मंदिरांच्या मिनिएचर स्कल्प्टर्सचा जसा समावेश होता, तसाच अत्याधुनिक ग्राफिक डिझाइनिंग्जचाही अंतर्भाव होता. सतीशजी स्वतः साहित्याचे उत्तम जाणकार होते, उत्तम लेखक होते.
शारीरिक अपंगत्वावर मात करून कलाविश्वात त्यांनी स्वतःचं असं आगळं स्थान निर्माण केलं. श्रवणशक्तीमधील अधुरेपण दृश्यकलेतील विविध प्रकाशझोतांनी भरून काढलं. ते अनेक अर्थांनी दृश्यकलेतील अनभिषिक्त सम्राट होते. ते स्वतःच्या अटी व शर्तींवरचं आयुष्य जगले. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांत भारत सरकारचा पद्मविभूषण, लिओनार्दो दा विंची, बेल्जियम सरकारचा ऑर्डर ऑफ क्राऊन आणि मेक्सिको सरकारचा लाईफ टाइम अचिव्हमेंट यांचा समावेश आहे.
त्यांचा कला-ध्यास व जीवन प्रवास पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे.
.............................................................................................................................................
लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.
anjaliambekar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vinita Bhumkar Iyer
Sat , 04 April 2020
अंजली तुझे लिखाण मला कायमच भावते किती सुंदर कंगोरे वेचले आहेस या लेखात तू कि त्यामुळे फक्त माहिती दिली आहेस असे वाटत नाही इमरोज माझा खूप आवडीचा पण नुसता इमरोज नाहीतर सर्व रंगाचे फटकारे या माणसाच्या आयुष्यात पाहिलेस तू हृदय किती भावनास्पर्शी आहे सतीश गुजराल यांचे हे अलौकिक रित्या दाखवून दिलेस चांगल्या व्यक्तीची ओळख करून दिल्याबद्दल मनापासून आभार तुझे व अभिनंदन तुझीच विनिता