कासव : सुमित्रा भावे यांचा हा सिनेमा एक अप्रतिम मास्टरपीस आहे! एकदा पहाच!!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
कबीर उषा लक्ष्मण बोबडे
  • ‘कासव’चं पोस्टर
  • Fri , 03 April 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie कासव Kaasav सुमित्रा भावे Sumitra Bhave सुनील सुकथनकर Sunil Sukthankar इरावती हर्षे Iravati Harshe आलोक राजवाडे Alok Rajwade

१.

अनेक मित्रांकडून ‘कासव’ या सिनेमाविषयी ऐकलं होतं. त्यामुळे कधी एकदा बघतो, असं झालं होतं. ‘सुमित्रा भावे यांचा हा सिनेमा एक अप्रतिम मास्टरपीस आहे, एकदा पहाच, असा एक मित्र म्हणाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सिनेमा पहायचा योग आला. काही दिवसांपूर्वी सुमित्रा भावे यांच्याकडेच सिनेमा पाहिला. माणसाच्या जीवनात मनाला फार महत्त्व असून भावे यांनी मन, मनाचे खेळ, मानवी मनाची विकृती, मनाचा भ्रम, मनोभंग, माणसामाणसातील गैरसमज, मानसिक दुःख यांचा या सिनेमांमधून शोध घेतला आहे.

या सिनेमा एक ‘उदास आनंद’, एकटेपणाची अनुभूती देऊन गेला. काही गोष्टी जशा मनाच्या कप्प्यात रुतून बसतात, तसं या  चित्रपटांबद्दलही झालं. कुठल्यातरी मानसिक गुंत्यामध्ये त्रस्त झालेला मानवेन्द्र (आलोक राजवाडे) आणि असाच काहीसा आजार पूर्वी अनुभवलेली जानकी (इरावती हर्षे), अशा दोन जीवांची ही गोष्ट आहे. 

माणसाच्या मनाच्या एकटेपणाचा नेमका शोध या सिनेमात पाहायला मिळतो. हा सिनेमा केवळ मानवेंद्र-जानकीच्या मनाने जोडलेल्या नात्यांची गोष्टच प्रेक्षकांना सांगत नाही, तर स्वतःच्या नैराश्यात खोल बुडालेलो असताना पुन्हा काठावर येण्यासाठी, हा सिनेमा अपरंपार ऊर्जा देऊन जातो. उदासीनतेवर मात करत जगण्याचा अर्थ, त्यातलं चैतन्य समजावून सांगतो, जगण्याची उमेद देतो. स्वत:चा, स्वतःच्या जगण्याच्या जाणिवांचा शोध घेणारा, त्याचा विचार करायला लावणारा हा सिनेमा आहे. ‘लहर समंदर रे’ म्हणत मानवी नैराश्यावर हा सिनेमा बोलतो. माणसाच्या मनाला ग्रासणारं नैराश्य, मनाच्या गुंतागुंतीचं चलनवलन (सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही!) हे या सिनेमाचं कथासूत्र आहे. 

मानव नावाचा एक उच्च मध्यमवर्गीय तरुण. तो डिस्टर्ब आहे. त्याला त्याच्या जगण्याचा आणि जिवंत असण्याचा अर्थच कळत नाही. तो दु:खी, अस्वस्थ आहे. पण त्याला त्या दु:खाचं मूळ, नैराश्येची नेमकी कारणं ठाऊक नाहीत. त्याने सर्वांसोबत अगदी स्वतःच्या आई-वडिलांसोबत असलेलं नातं तोडलंय. त्याला एकटेपणा हवाय. त्याला मरण हवंय, पण तेही त्याला मिळत नाही. निराशेच्या आवर्तात घेरल्या गेलेल्या मानवने मनगटाची नस कापून आत्महत्येचा प्रयत्नही केलेला आहे. त्यासाठी त्याला वाचण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र तो इस्पितळातून पळून जातो. जानकी (इरावती हर्षे) त्याला रस्त्याच्या कडेला पडलेला बघते. ती स्वतः अशा मनोवस्थेतून गेलेली असते. त्यामुळे मानवची ओळखही नसताना ती त्याला आपला ड्रायव्हर यदु (किशोर कदम)च्या मदतीनं आपल्यासोबत घेऊन जाते. जानकीच्या आयुष्याचा काही काळ नैराश्याचा छायेत गेलेला असतो. जसं आता मानवला होत आहे, तसंच आधी जानकीला व्हायचं. बहुतेकदा तिला येणाऱ्या भीतीच्या झटक्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अजूनही घ्यावा लागतो. आजारातून बरं झाल्यानंतरही त्याच्या खुणा अजूनही तिच्या मनावर आहेत. पण आपलं मन वेळीच ओळखल्यानं, स्वतःला सावरल्यानं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं तिने बऱ्यापैकी स्वतःला सावरलं आहे. आता तिच्या नैराश्येचा बऱ्यापैकी निचरा झाला असून ती नॉर्मल जीवन जगत असते.

जानकी अमेरिकेतला संसार सोडून, नवरा व मुलगा यांच्यापासून एकटी दूर, भारतात राहत असते.  सध्या एका प्रकल्पासाठी ‘ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचं संवर्धन’ या कार्यक्रमात कोकणात कार्यरत दत्ताभाऊ (मोहन आगाशे) यांना मदत करत असते.

मानववर घरी आणल्यावर डॉक्टरांकडून उपचार केले जातात. मात्र तो चालता-बोलता झाल्यानंतरही काहीच बोलत नाही. हळूहळू त्याची नेमकी काय अडचण आहे, हे जानकीच्या लक्षात येतं. आणि ती त्याच्याशी वेळोवेळी संवाद साधते. त्यातून ती त्याच्या मनात सुरू असलेल्या गैरसमजुतीला, गोंधळाला, चुकीच्या विचारांना दूर करण्याचा प्रयत्न करते.

जेव्हा काहीसं गूढ, अगम्य, तळ शोधता येत नसलेलं, रहस्यमय असलेलं मानवी मन आजारी पडतं; तेव्हा मनाचा फार गोंधळ होतो, घुसमट होते, जगणं नको वाटतं. आपण हळूहळू संपत चालल्याची जाणीव होऊन नैराश्य दाटून येतं. एक अनामिक भीतीचा डोंगर मनात उभा राहतो. काहीच करावंसं वाटत नाही, त्यावेळेस माणसाला औषधोपचाराबरोबरच मायेच्या माणसांच्या सहवासाची गरज असते. आजूबाजूच्या मायेच्या माणसांनी गोंजारलं, दोन मायेचे शब्द बोलले तर मनाला हिरवी पालवी फुटते. मन सावरू शकतं. 

मानवच्या मनाचा थांग जानकी शोधण्याचा प्रयत्न करते. सुरुवातीला तिचे प्रयत्न व्यर्थ जातात.  मात्र नंतर तिला समजतं की, मानवला सावरण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. मानव दिशाहीन जगणं जगत असताना त्याला अनाहूतपणे भेटणारी माणसं, त्याला त्याच्या कोषातून, नैराश्यतेतून खेचून बाहेर काढण्याची जीवाची पराकाष्ठा करतात. त्यातून मानव स्वतःला हळूहळू सापडत जातो.

सिनेमाची कथा मानव आणि जानकी यांच्या भोवताली फिरते. या दोघांचे मनोव्यापार तपशिलानं आले आहेत. मानवचं अत्यंत अस्थिर असणं आणि अशा स्थितीतून गेलेल्या जानकीचं त्या अनुभवातून आलेलं शहाणपण असा विरोधाभास सातत्यानं समोर येत राहतो. या मनोव्यापाराला ऑलिव्ह रिडले कासवांच्या अनोख्या जीवनक्रमाची जोड येते. कासवांच्या जगण्याचे संदर्भ आणि छोटे-मोठे तपशील देत कथा उलगडत जाते. 

मानवच्या वहीमधील कवितांमधून एक उदास स्वर उमटतो. तो त्याचा अस्वस्थ मनोव्यापार सूचित करतो. त्या कविता भूतकाळातील जगणं सांगतात. मानवविषयीचे भूतकाळातील सगळे संदर्भ, तपशील त्यांच्या सावत्र आईकडून कळतात. काही प्रसंगात दिसणारी मानवची आई हेदेखील महत्त्वाचं पात्र आहे. यातून कथावस्तूची मांडणी, पात्ररेखन आणि त्यांची एकमेकांशी असलेली सरमिसळ किती ताकतीनं दिग्दर्शिकेनं उभी केली आहे, याचा प्रत्यय येतो.

२.

एका प्रसंगात जानकी आलोकला म्हणते, “आयुष्य पाण्यात काढलेली कासवीण अंडी घालण्यासाठी मात्र किनाऱ्यावर वाळूत येते आणि अंड्यांमधून पिल्लं बाहेर यायच्या आत परत पाण्यात निघूनही जाते. नुकतीच जन्माला आलेली ती अनेक पिल्लं मग लडबडत, पाय मारत एकमेकांबरोबर तरीही एकेकटीच समुद्राच्या दिशेनं प्रवास करतात. समुद्रात राहतात. मात्र, त्या कासवाला आपलं पिल्लू कुठलं ते कळत नाही, मग प्रत्येक पिल्लाला स्वतःचं पिल्लू समजते...”

हा प्रसंग पाहून असं वाटतं की, जानकीला आपल्या हरवलेल्या पिल्लाची भेट झाली, तर मानवला त्याची आई भेटली.

दुसरा एक प्रसंग-

मानव - माणसं अशी का असतात? 

जानकी - कशी?

मानव - दुष्ट आणि दुःखी

जानकी - अशी कुठं असतात माणसं? तू कुठे दुष्ट आहेस? 

मानव - मग मी असा का वागतो?

जानकी - तू दुःखी असशील, पण दुष्ट नाही!

मानव - पण का? दुःखी का?

जानकी - मला जे समजतंय ते सांगू का तुला?

मानव - सांगा ना 

जानकी - आपण माणसं एकाच वेळी प्रेम करतो, म्हणजे, कुणाशी तरी स्वतःला बांधून घेतो. आणि त्याच वेळी स्वतंत्रदेखील राहायला बघतो, म्हणजे एकटा होऊ बघतो. स्वतःला सोडवून घेतो. खरं तर बांधलेपणात स्वातंत्र्य असू शकतं. आणि स्वतंत्र असण्यात अडकलेपण… गोंधळच सगळा! या दोन्हीचा नेमका तोल सापडला नाही की, आपण दुःखी होतो…

तिसरा एक प्रसंग- 

सूर्यास्ताची वेळ असते. मानव समुद्रावर बसून मोठ्यांदा गाणं म्हणत असतो. त्याच्या पायाशी लाट पोहोचते. लाट परत गेल्यावर तो ओल्यात पाय उमटवतो. परत लाट येते. ती लाट परत जाते, तेव्हा तो जवळची एक काठी घेऊन काही रेखाटने करतो. लाट येते. पुसलं जातं. जानकी त्याच्यापाशी जाऊन म्हणते- ‘‘किती नशीबवान आपण की, हे बघायला आपले डोळे आहेत. आपण आहोत. आपल्याला डोळे असतात. कान असतात. तरी आपल्याला ऐकायला, बघायला शिकावं लागतं.’’

मानव नुसता ऐकतोय. जानकी हळूहळू गायला लागते. मानवही आता त्यात सूर लावतो.

सिनेमातील असे काही प्रसंग प्रेक्षकांना जगण्याची विशाल आणि व्यापक अनुभूती देऊन जातात. 

कोकणातल्या समुद्राच्या शांत ठिकाणी हा सिनेमा घडतो. कोकणातलं गाव असल्यानं दशावतारी नाटक मंडळी आणि त्यातला अश्वत्थाम्याचा सूचक संदर्भही येतो. यात बाबल्याच्या तोंडी एक वाक्य आहे – ‘अश्वस्थामा...  जखमेवर तेल मागत हिंडत असतो तो अस्वस्थमा… दुःख म्हणजे मरणच की!’ हा अश्वस्थामा हे मानवसाठी वापरलेलं प्रतीक आहे. एकटेपणा अधोरेखित करण्यासाठी, एकटेपणाच्या सूचकतेसाठी, मनाच्या रुद्र आणि शांत स्वभावासाठी समुद्र पूर्ण चित्रपटात आपल्याला दिसतो. चित्रपटात दिसणारा समुद्र हा मानवेन्द्रच्या मनातला आहे. तर स्थितप्रज्ञतेसाठी कासवाचा वापर केला आहे. विपरीत-प्रतिकूल परिस्थिती असेल तेव्हा कासव स्वतःला आक्रसून घेतं, आपल्याच कोशात जातं. समुद्रात राहणारं कासव इथं प्रतीकरूपानं समोर येतं. नैराश्यात गेलेली व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याला घाबरून स्वत:चं अवयव कवचाच्या आत सामावून घेणाऱ्या कासवाप्रमाणे वागते, ही माणूस आणि कासव याची समांतर मांडणी लाजबाब आहे. कासव हा नॉन व्हायलेंट प्राणी असून, त्याच्या जगण्याचे बारीक-सारीक तपशील सिनेमात येतात. यावरून दिग्दर्शकाच्या निरीक्षण शक्तीचा, चित्रपटविषयाच्या अभ्यासू वृत्तीचा प्रत्यय येतो. 

आलोक राजवाडे आणि इरावती हर्षे या दोघांनीही उत्तम अभिनय केला आहे. आलोकने एक दु:खी, जगण्याचा अर्थ माहीत नसलेला, जगण्याला कंटाळलेल्या, अलिप्ततावादी, स्वतःच्या कोषात असलेल्या मानवची भूमिका उत्तम साकारली आहे. केवळ बाहेरून नाही, तर आतूनही तो विस्कटलेला आहे, त्याचं जगणं विस्कटलेलं आहे, हे त्याच्या अभिनयातून जाणवतं. इरावती हर्षे यांनी या सिनेमात जानकीची भूमिका सहजतेनं साकारली आहे. जानकीचा भूमिका त्यांच्यासाठीच लिहिली गेली होती की काय, असं वाटतं. त्यांच्या अभिनयातील समजुतीचा स्वर लक्षात राहतो.

किशोर कदम यांच्या डोळ्यातील कोरडा अभिनय उत्तम आहे!  सर्वसाधारण माणसाचा मानसिक आजार असलेल्या माणसाकडे कोरड्या नजरेनं बघण्याचा त्यांचा अभिनय भन्नाट आहे! जीव ओतणं म्हणजे काय ते किशोर कदमांकडून शिकण्यासारखं आहे. मोहन आगाशे यांनी रंगवलेला दत्ताभाऊ सहज वाटतो. त्यांच्या अभिनयातील सहजपणा ही त्या पात्राची गरज होती आणि ती आगाशे पूर्ण करतात. निरागस परशूचा अभिनय भावतो. ‘एकावेळी एकच करूचा... भजी खाऊची तर भजी खाऊची... चाय पिची तर चाय प्यायची आणि दोन्ही एकदम कोंबल तर ठसका लागतोलो...’ हा परशुच्या तोंडचा संवाद केवळ मानवलाच नाही तर प्रेक्षकांनादेखील शहाणं करतो. त्याची कोवळ्या वयातील पोक्त समज माणसाच्या मानसिक गुंत्याचं उत्तर आहे. 

धनंजय कुलकर्णी यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी फारच सुंदर झालीय. कोकण आणि तेथील समुद्राची अफलातून सफर त्यांनी घडवून आणली आहे. कॅमेऱ्याच्या फ्रेम्समध्ये न मावणारा अथांग समुद्र त्यांनी चितारलाय. त्यांची प्रत्येक फ्रेम अर्थपूर्ण आहे. 

साकेत कानेटकरचं संगीत आणि पार्श्वसंगीत साजेसं आहे. ‘लहर समंदर’ आणि ‘अपने रंग में’ ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. गाण्यांचा आशय सिनेमाच्या आशयाला एकदम पूरक आहेत. 

३.

‘कासव’ची मांडणी फारच सुरेख पद्धतीनं झाली आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांनी तरल मनाच्या वेदनेचा हुंकार अतिशय सहजगत्या पडद्यावर मांडला आहे. भावे यांनीच या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद लेखन केलं आहे. त्यामुळे त्यांना जे चित्रपटाच्या माध्यमातून सांगायचं होतं, ते थेट पोहोचतं. भावे यांना काय म्हणायचं असतं ते पक्क ठरलेलं असतं आणि जे सांगायचं ते कसं सांगायचं, त्याचीदेखील उत्तम जाण असल्यामुळे आणि त्याच्या सोबतीला जगण्याचा आशय असल्यानं त्यांनी अगदी सहजपणे या चित्रपटात माणसाचं मन, त्याचा मनोव्यापार आणि मानसिक संघर्ष मांडला आहे. दिग्दर्शिकेच्या संवेदनशीलतेला आणि त्यांनी उभ्या केलेल्या पात्रांना धर्म, जात-पात, भाषा कुठलंही काटेरी कुंपण मर्यादा घालत नाही, हे विशेष!

चांगली कथा तीच, ज्या कथेतून एकही पात्र वा एखादा प्रसंग काढून टाकला तर आकलनावर परिणाम होतो. त्यामुळे ‘कासव’मधील एखादं पात्र काढून टाकलं किंवा एखाद्या प्रसंगाला कात्री लावली तर कथेवर परिणाम होऊन दिग्दर्शिकेला काय म्हणायचं, याचा प्रेक्षकांना नीटसा अर्थबोध होणार नाही. भावे यांच्या सिनेमाच्या कथानकाला बहुपेडी पदर असतो. त्यामुळे त्यांचा सिनेमा एकदा पाहून कळलेच असं नाही. त्याचा पुन्हा पुन्हा आस्वाद घेतला तर आपल्याला त्यातील गुंतागुंतीच्या जाणिवा स्पष्ट होतात, सूक्ष्म कंगोरे लक्षात येतात. घट्ट विणीची बहुपदरी कथा हे त्यांच्या ‘कासव’चं वैशिष्ट्य आहे! सिनेमा ही structural art असली तरी त्यांच्या चित्रपटकथेतील पात्ररेखन, संवाद, प्रसंग फार चोखंदळपणे केलेले असतात. त्यामुळे त्यांच्या चित्रपटाची कथा कृत्रिम वाटत नाही. 

पारंपरिक विषयापेक्षा वेगळ्या विषयावरचे सिनेमे करणाऱ्या भावे यांचा हा सिनेमा महत्त्वाचा आहे.  जगण्याचा आशय असलेला, स्वतःचा शोध घेणारा, जगण्याचं समृद्ध भान देणाऱ्या त्यांचा इतर सिनेमांप्रमाणेच हाही External conflict पेक्षा internal conflict मांडतो. यात नायक-खलनायक असा संघर्ष नाही, तर आत्मिक संघर्ष आहे. आणि नेमकी हीच गोष्ट भावे यांचं वेगळेपण अधोरेखित करते. 

भोवताली झपाट्यानं होणारं संदेशववहन, सोशल मीडिया यात होणाऱ्या बदलांमुळे समाजजीवन अतिशय गुंतागुंतीचं झालं आहे. माणसाचं अस्थिर, बेचैन मन आणि ते दुरुस्त करण्यासाठी करायचे उपाय यांची अत्यंत तरल अशी मांडणी या सिनेमात येते. 

हा चित्रपट नैराश्येच्या गर्दीत हरवलेल्या माणसाच्या मनाची ठसठस समजून घेण्याची, एक माणूसपणाची व्यापक दृष्टी देऊन प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती जागी करून तुमच्यातील संवेदनशील स्वतःच दुःख गोंजारण्यात लावायची की, इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी वापरायची, हा प्रश्न विचारतो. कलावंत हा कोणत्या तरी कालखंडाचा आणि भोवतालच्या परिस्थितीच्या घटक असतो. त्या परिस्थितीत आणि कालखंडात तो बांधला जाऊन जगत असतो आणि त्या त्या घटकांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. त्या परिणामांचा सर्जनशील शोध तो आपल्या कलावस्तूतून घेत असतो. त्यामुळेच गंभीर आशयाचा ‘कासव’ हा सिनेमा वैश्विक जाणीवेचा आणि सार्वकालिक वाटतो. माणसाच्या माणसाशी जोडलेलं असण्याच्या सार्वकालिक भावनेपर्यंत आपल्याला नेतो.  हा सिनेमा जगण्याचं अजब रसायन असून जगण्यातील दुभंलेपणा, मानसिक दुबळेपणा, बिचारेपणा व्यक्त करतो. मानवी जीवन, सागर आणि कासव यांचं गूढ नातं चित्रपटात दाखवलं आहे.

हा सिनेमा अत्यंत शांतपणे, सावकाश आपल्याला नैराश्याची, मनाच्या असहाय्यतेची, विकलांगतेची हळवी कथा सांगतो. माणसाच्या विस्कटलेल्या, दुभंगलेल्या मनावर उपायही सांगतो. 

जीवन जगण्याचं गमक, जगण्याची कला यासारखे पैलू सिनेमातून उलगडण्यात आले आहेत. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. एकटेपणाचे वेगवेगळे पैलू दाखवणारी माणसं, सजीव-निर्जीव पात्रं या सिनेमात आहेत. पण त्यांच्यातून वाहणारं समान सूत्र आपल्याला या चिरंतन भावनेकडे बघण्याचा एक सक्षम, विशाल दृष्टिकोन देऊन जातं. व्यवहारी दुनियेत आयुष्य जगता जगता सख्यत्व, माणुसकी, परस्पर सहकार्य या मूल्यांनी एकमेकांना जोडली गेलेली माणसं एकटेपणाची, माणूसपणाची सामूहिक गोष्ट चितारतात. माणूस, माणसाचं मन, भावनिक समस्या यांचं दर्शन घडवतात. भिन्न स्तरीय लोक नियतीनं एकमेकांशी जोडली जाऊन त्यांचं एकाकीपण मांडतात.

४.

मानव हा दु:खी-निराश झालेला, जगावर कावलेला कोवळा तरुण आहे. तो एकटा आहे.  जानकीचा मदतनीस यदु एकटा आहे. नाही म्हणायला, यदु मनाने एकटा नसला तरी त्याला आपल्या पत्नीपासून दूर राहावं लागतं. अनाथ असूनही दुसऱ्यांना माया लावणारा, जीव लावणारा परशु,  दशावतारी नाटकात काम करणारा बाबल्या,  काळातील स्थित्यंतरं पाहून त्यामागची कारणं व परिणाम समजून घेणारे आणि कासव संवर्धनाचे काम करणारे, कासवांना जपणं म्हणजे विश्व जपणं अशी श्रद्धा असणारे ज्येष्ठ दत्ताभाऊ... ही सगळी पात्रं एकेकटी आयुष्यं जगतात. एकटेपणातून वाट्याला येणारं जगण्यातलं नैराश्य अधोरेखित करण्यासाठी मुद्दाम अशी पात्रांची निर्मिती केली असेल, असं वाटतं.

सिनेमाच्या शेवटच्या प्रसंगात नायिका - जानकी तिच्या घटस्फोटाच्या केससाठी अचानक अमेरिकेला जाते. जाताना तिची मानवशी भेट होत नाही. म्हणून ती मानवसाठी चिठ्ठी ठेवून जाते. सोबत चार्जर आणि मानवच्या आईने दिलेले पैसे ठेवून जाते. चिठ्ठीत लिहिलेलं असतं, “माझ्याशी संपर्कात राहायचं असेल तर मोबाईल चार्ज कर, त्यासाठी चार्जर ठेवला. हे पैसे ठेवले, ते तुझ्या आईने दिलेले पैसे आहेत... तुझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण कर… त्यासाठी तुला पैशांची गरज असेल तर मला सांग, मी देईल... काही मदत लागली तर यदु आणि बबलू यांना सांग.’’

यातील अनिर्णायकता महत्त्वाची आहे. पुढे मानव स्वतःला सावरतो का? तो जानकीशी संपर्क ठेवतो का? याची उकल चित्रपटात नाही. ही अनिर्णायकता प्रेक्षकांच्या सर्जनशीलतेला उत्तेजन देते.

दिग्दर्शक आपल्या दोन्ही मुख्य पात्रांशी (protagonist) तादात्म्य पावतात. त्यामुळे केवळ एकाच पॉइंट ऑफ व्ह्यूने चित्रपटाचं कथानक जातं, असं वाटतं. माणसं जशी माणूसवेल्हाळ असतात, तशी माणूस घाणीदेखील असतात… चांगली असतात, तशी वाईटही असतात. माणसं कायम चांगलीच वागतात, असं नाही. जानकीच्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू कधीच कुठल्या प्रसंगातून दिसत नाही.. मानवच्या स्वभावातील स्थित्यंतर उत्तम पद्धतीनं मांडलं आहे.

बाकी, ‘कासव’ या नावाप्रमाणेच सिनेमाला एक सुरेख, संथ लय आहे. काही प्रसंगात मस्त कॉमेडी जमून आली आहे. मात्र कॉमेडीच्या नादात चित्रपटाच्या आशयाला कुठेही गळती लागत नाही. वैफल्यासारख्या मानसिक आजाराला या सिनेमातून ताकदीनं आणि संवेदनशीलतेनं भिडण्याचा प्रयत्न आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान प्रेक्षकांपर्यंत सहज सोप्या भाषेत पोहोचवण्याचं काम, सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर यांनी केलं आहे.

.............................................................................................................................................

लेखक कबीर उषा लक्ष्मण बोबडे दृक-श्राव्य माध्यमात काम करतात.

kabirbobade09@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख