‘थप्पड’ : एका नात्याच्या अंताची आणि स्वतःच्या अवकाशाचा शोध घेऊ पाहणाऱ्या स्त्रीची कथा 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘थप्पड’चं एक पोस्टर
  • Sat , 29 February 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie थप्पड THAPPAD तापसी पन्नू Taapsee Pannu अनुभव सिन्हा Anubhav Sinha

‘थप्पड’च्या सुरुवातीला येणाऱ्या सीक्वेन्समध्ये इथल्या सर्व मध्यवर्ती पात्रांचा, त्यांच्या स्वभावविशेषांचा परिचय करून दिला जातो. या सीक्वेन्सच्या पार्श्वभूमीवर जॅझ सुरू असताना समोर स्त्री-पुरुष नातेसंबंध उलगडत जातात. इथल्या सहा जोड्यांमध्ये घडणारी संभाषणं, ही या ना त्या प्रकारे मध्यवर्ती कथानकाला आणि चित्रपट मांडू पाहत असलेल्या मुद्द्याला पूरक ठरणारी आहेत. पती-पत्नीच्या दोन जोड्यांतील संवाद, प्रियकर-प्रेयसीतील संवाद, एकल मातृत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आई नि पौगंडावस्थेतील मुलीतील संभाषण, शिवीगाळ करणारा पती आणि पडत्या फळाची आज्ञा मानणारी पत्नी, तसेच विवाहबाह्य संबंधांत असणाऱ्या प्रियकर-प्रेयसीत घडणारा संवाद, अशी अगदी भिन्न तऱ्हेची संभाषणं दिसतात. साहजिकच स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि कौटुंबिक हिंसाचार हे केंद्रस्थानी असलेले मुद्दे आहेत. 

अमृता (तापसी पन्नू) आणि तिचा पती विक्रम (पावैल गुलाटी) हे इथल्या कथेच्या केंद्रस्थानी आहेत. अमृता ही एक गृहिणी आहे, तर विक्रम कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असणारा एक उच्चपदस्थ कर्मचारी आहे. लवकरच त्याची बदली होणार असल्याने ते दोघे लंडनमध्ये स्थलांतरित होण्याच्या तयारीत असतात. लंडनच्या कार्यालयातील मुख्याधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाल्याची पार्टीदेखील सुरू असते. मात्र, या पार्टी दरम्यान घडतं असं की, त्याच्या व्यावसायिक आयुष्यात काही समस्या निर्माण होतात, ज्याची परिणीती त्याने अमृताच्या कानाखाली लगावण्यात होते. अमृता घडलेली गोष्ट मनाला लावून घेत घर सोडून जाते, आणि नंतर घटस्फोटाची मागणी करते. तिचं हे वागणं तिचा पती, तिचे आई-वडील, तिची सासू या सर्वांनाच अतर्क्य आणि अतिशयोक्तीपूर्ण वाटतं. ही फारच सामान्य बाब आहे, असंही तिला समजावण्याचा प्रयत्न होतो. मात्र, तापसी आणि चित्रपट (जे पोस्टरवरही दिसतं) या दोन्हींचा प्रश्न साधा असतो, ‘बस इतनी सी बात?’ त्यामुळे इतरांच्या दृष्टीनं सामान्य असलेली ही घटना पुढे वाढून ठेवलेल्या सर्व घडामोडींचं उत्प्रेरक ठरते. 

विक्रमने अमृताच्या कानाखाली लगावणं, हे तसं एक तात्कालिक कारण आहे. कारण, कुठलीही गोष्ट कितीही उत्स्फूर्त वाटत असली तरी त्यामागे असुप्त पातळीवर काहीतरी कार्यकारणभाव दडलेला असतो. सुरुवातीच्या दृश्यांत दिसतं, त्याप्रमाणे वरवर पाहता त्यांचं आयुष्य सुरळीत सुरू असलं तरी अमृताच्या मनात स्वतःची नृत्यातील संभाव्य कारकीर्द मागे पडल्याची खंत असते. ती तिच्या छोटेखानी आयुष्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असली तरीही विक्रमची पुरुषी मानसिकता, स्वतःच्याच विश्वात मग्न असणं आणि तिचा विचार न करणं या तिला मनोमन खटकत असणाऱ्या गोष्टी पडद्यावर दिसत राहतात. (पुढेही झालेल्या कृतीबाबत बोलताना त्याचा भर माफी मागण्यावर न राहता तो किती त्रस्त होता, तो हे सगळं तिच्यासाठीच तर करतो यावर असतो. साहजिकच तो स्वतःच्या पलीकडे जाऊन त्यांचा विचार करत नसतो.) हे त्याच्या संवादांतून, त्या दोघांच्या डोळ्यांच्या हालचालींतून, हावभावांतून दिसत राहतं. त्यामुळे तिच्या अतर्क्य भासणाऱ्या कृतीमागे या भावभावना दडलेल्या असतात. 

कौटुंबिक हिंसाचार आणि स्त्री-पुरुषांतील गुंतागुंतीचे नातेसंबंध या दोन्ही संकल्पना इथं दृश्य पातळीवर समोर येत राहतात. तेही इथल्या घडामोडींचं उत्प्रेरक ठरणाऱ्या घटनेच्या बऱ्याच आधीपासून. सुमन (गीतिका विद्या) या त्यांच्या घरातील मोलकरणीचा तिला शिवीगाळ आणि मारहाण करणारा नवरा अगदी सुरुवातीपासूनच दिसतो. पुढे जाऊन तिची वकील म्हणून समोर येणारी नेत्रा (माया सराव) आणि तिच्या पतीतील (अगदी छोट्याशा भूमिकेत आपली छाप सोडणारा मानव कौल) नातेसंबंध असोत, वा अमृताचा भाऊ आणि त्याच्या प्रेयसीतील नातं अशी इथल्या सर्वच नात्यांतील क्लिष्टता समोर मांडली जाते. इथल्या स्त्रियांना गृहीत तरी धरलं जातं, किंवा मग त्यांच्याकडे दुर्लक्ष तरी केलं जातं. अगदी संवेदनशील प्राध्यापक असलेल्या अमृताच्या पित्याकडूनही (कुमुद मिश्रा) त्याची पत्नी, संध्याकडे (रत्ना पाठक शाह) झालेल्या दुर्लक्षाबाबत ती बोलून दाखवते. 

हे सारं कुठून येतं, तर एका विशिष्ट तऱ्हेच्या पितृसत्ताक सामाजिक-कौटुंबिक व्यवस्थेत वाढलेल्या स्त्री-पुरुषांच्या कृतीतून. स्त्रिया यासाठी की त्यांच्यावरही अमुक एका तऱ्हेचं वागणं म्हणजे आदर्श भारतीय स्त्रीत्व अशा तऱ्हेचे संस्कार घडलेले असतात. त्यामुळे इथली इतर स्त्री पात्रंदेखील अमृता कशी चुकते आहे, तिने कसं समजून घ्यायला हवं याबाबत तिला सुनावतात. एके ठिकाणी तिला सल्ला देत असताना तिची वकील म्हणते, “ऑल मॅरेजेस आर अ डील. अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पीपल.”

‘थप्पड’मध्ये नोआ बॉमबाख लिखित-दिग्दर्शित ‘मॅरेज स्टोरी’च्या (२०१९) छटा जाणवण्यामागे इथल्या पात्रांमधील वाढती दरी आणि त्यांच्या नात्याचा अंत जितका कारणीभूत आहे, तितकाच इथला कायदेशीर प्रक्रियेचा उलगडादेखील. ‘मॅरेज स्टोरी’प्रमाणेच इथेही कुणा एकाची बाजू घेण्याचा किंवा पुरुषांना पूर्णतः नकारात्मक छटांत रंगवण्याचा प्रयत्न केला जात नाही. अमृता हे पात्र एके ठिकाणी म्हणतं त्यानुसार ‘थोडी थोडी सब की गलती हैं’ हे इथं मांडलं जातं. 

‘थप्पड’मध्ये कमी-अधिक फरकाने पडद्यावर दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अशा दोन्ही स्तरांवर काम करणाऱ्या प्रत्येकाचंच कसब दिसून येतं. ‘मुल्क’ (२०१८), ‘आर्टिकल १५’साठी (२०१९) प्रसिद्ध असलेल्या लेखक-दिग्दर्शक अनुभव सिन्हापासून ते इथल्या तऱ्हेतऱ्हेच्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपर्यंत, आणि त्यांचं चित्रीकरण करणाऱ्या सौमिक मुखर्जीपर्यंत सर्वच लोकांचं त्या त्या विभागातील प्रभावी काम इथे दिसतं.

सिन्हा आणि इथली मध्यवर्ती भूमिका साकारणारी तापसी पन्नू हे ‘उल्लेखनीय’ या विशेषणाच्या पलीकडे जाणारी कामगिरी करतात. हे दोघंही इथल्या मुख्य पात्रामध्ये आणि या पात्राच्या सभोवतालामध्ये घडणारे बदल प्रभावीपणे समोर मांडतात. घडलेल्या घटनेनंतर इथल्या प्रमुख पात्रात धुमसणारा राग आणि अस्वस्थता ही एक आंतरिक भावना असली तरी तिची शारीरिकताही तितकीच महत्त्वाची आहे. पन्नूच्या कामगिरीतून या भावनांना एक भौतिक रूप प्राप्त होतं.

दिग्दर्शक सिन्हा, छायाचित्रकार मुखर्जी हे इथल्या भावनांना प्राप्त झालेलं भौतिक रूप ज्या पद्धतीने टिपतात ते महत्त्वाचं ठरतं. पात्रात घडणारे बदल इथल्या रंगसंगतीतील बदलांतून, पात्रांच्या कपड्यांच्या रंगातील बदलांतून सूचित केले जातात. आधी उल्लेख केल्याप्रमाणे इथल्या अस्वस्थतेच्या भावनेला भौतिक रूप प्राप्त करून दिलं जातं. 

मंगेश धाकडेचं पार्श्वसंगीत हे इथल्या पात्रांचा वैयक्तिक, आंतरिक अवकाश आणि सभोवतालाची निर्मिती अशा दोन्ही पातळ्यांवर पूरक ठरतं. गिटार, सॅक्सोफोन, फ्ल्यूट या वाद्यांची त्याची अरेंजमेंट सुरेख आणि श्रवणीय आहे. मुख्य म्हणजे ती वेळोवेळी चित्रपटातल्या अस्वस्थतेत भर घालणारी आहे, इथल्या विषण्णतेच्या भावनेला अधिक तीक्ष्ण बनवणारा आहे. केवळ संगीतच नव्हे, तर त्याच्या अभावाचा, अंगावर येणाऱ्या शांततेचा इथे केलेला वापरही महत्त्वाचा ठरणारा आहे. हेच अनुराग सैकियाच्या संगीताबाबत. शकील आझमी आणि सना मोइदुटी यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीतांची तितकीच संयत अशी मांडणी इथे केली जाते. ज्याचा परिणाम म्हणजे इथल्या स्तब्धतेत बाधा न घालणारी अलवार गीतं कानावर पडतात. 

अमृता या इथल्या प्रमुख पात्राच्या दोन भिन्न मानसिक, भावनिक अवस्था टिपल्या जातात. विक्रमकडून कानाखाली मारल्या जाण्यापूर्वीची आपल्या पोकळ, तरीही समाधानी भासणाऱ्या आयुष्यात रममाण असणारी अमृता घरातील कामं करतानाचा एक सविस्तर मॉन्टाज दिसतो. सकाळी लवकर उठून, घरातील कामं उरकून, छतावरील झाडांना पाणी घालत, कॉफी करून आणि शेवटी विक्रमला उठवून तो ऑफिसला जाईपर्यंत ती स्थिर अशी दिसत नाही. नंतर मात्र या कामांतील अर्थहीनता तिच्या लक्षात येणं, ती नीरस भावनेनं वावरत राहणं आणि शेवटी आपल्या माहेरी परतणं यादरम्यान तिच्यात घडणारे बदल पुन्हा अशाच तऱ्हेच्या मॉन्टाजमधून समोर मांडले जातात. या सीक्वेन्सेसची रचना दिग्दर्शक सिन्हाच्या दिवसेंदिवस अधिकाधिक प्रभावी आणि प्रौढ होत जाणाऱ्या दिग्दर्शकीय कौशल्यांचा पुरावा आहे. ती निघून गेल्यानंतर चित्रपटाच्या शेवटाकडे घरातील वाळलेल्या झाडांचा एक शॉटदेखील एकूण कथनाच्या दृष्टीनं किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात येऊ शकेल. 

चित्रपटाच्या शेवटी कुमुद मिश्राचं पात्र जी कविता म्हणतं, त्यात एक ओळ आहे. ती साधारण अशी ‘... ताकि तेरा एक आसमान हो, और मेरा भी एक आसमान हो…’ त्या अर्थी ‘थप्पड’ ही जितकी एका नात्याच्या अंताची गोष्ट आहे, तितकीच स्वतःच्या अवकाशाचा शोध घेऊ पाहणाऱ्या स्त्रीची कथा आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Sat , 29 February 2020

नेमकं आणि सजग परीक्षण!


Bhagyashree Bhagwat

Sat , 29 February 2020

नेमकं आणि सजग परीक्षण!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख