अजूनकाही
‘शुभमंगल ज्यादा सावधान’मध्ये अनेकदा नवे-जुने चित्रपट आणि चित्रपटांतील दृश्यांचे संदर्भ येत राहतात. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे बहुतेक लोक चित्रपट पाहत मोठे होत असतात. चित्रपटांतून अनेक तऱ्हेच्या प्रतिमा, संकल्पना आपल्यावर बिंबवल्या जातात. त्यामुळे समाजाच्या नैतिक-अनैतिकतेच्या, प्रेमाच्या संकल्पना या चित्रपटांच्या रूपातील संदर्भ-व्यवस्थेवर आधारित असतात. ‘शुभमंगल ज्यादा सावधान’चा लेखक-दिग्दर्शक हितेश केवल्य हा याच दृश्य संदर्भांना हाताशी घेत आणि वेळ पडल्यास त्यावर ताशेरे ओढत इथली कथा मांडतो.
सुरुवातीच्याच दृश्यात कार्तिक सिंग (आयुष्मान खुराना) हे पात्र कथन करत असतं. लहानपणी त्याच्या मागे धावत असलेल्या लोकांपासून पळत असताना तोही मोठा होऊन अमिताभ बच्चनमध्ये रूपांतरीत व्हावा, असं त्याला वाटत असतं. वर्षांमागून वर्षं जातात, मात्र असं कधीही घडत नाही. आता बच्चन बनणं ही संकल्पना इथे येते ती त्याच्यासारखं ‘अँग्री यंग मॅन’ बनणं या अर्थाने. त्यामुळेच लहानपणी कार्तिकला त्याचा बाप मारत असतो, तेव्हा टीव्हीवर बच्चनच्या ‘कालिया’मधील (१९८१) फाइट सीन सुरू असतो. कार्तिकला स्वतःच्या लढाया लढता येत नसताना बच्चन न्यायासाठी लढत असतो. ‘कालिया कभी भी निहत्ते पर वार नहीं कर सकता’ असे संवाद म्हणत असतो. कार्तिकला मात्र हे कधीच जमत नाही. लहानपणीदेखील नाही, आणि मोठेपणीही.
स्वतःची लैंगिकता, लैंगिक जीवन ही एक वैयक्तिक बाब असते. मात्र, भारतीय समाजव्यवस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून कुटुंब ही संकल्पना ‘स्व’ला दाबून टाकत आलेली आहे. हे अर्थातच सरसकटीकरण करणारं विधान असलं तरी एका विस्तृत दृष्टिकोनातून पाहिल्यास भारतीय समाजातील एका मोठ्या वर्गाला हे लागू पडेल. कार्तिक आणि अमन त्रिपाठी (जितेंद्र कुमार) या जोडप्याला नेमकी हीच समस्या भेडसावत असते. कार्तिक पुढे जाऊन म्हणतो, तसं आपल्या लैंगिकतेबाबत आणि आपल्या निर्णयांबाबत कुटुंबाला सांगणं हा त्याच्या/त्यांच्या आयुष्यातील अमिताभ बच्चन बनण्याचा क्षण असू शकतो. अमन आणि त्याचं कुटुंब हे इथल्या कथेच्या केंद्रस्थानी आहे, तर कार्तिक हा त्याचा प्रियकर इथलं आणखी एक मध्यवर्ती पात्र. कार्तिक या कथेचा भाग असला तरी शेवटी ही कथा आहे ती अमन आणि त्याच्या कुटुंबांची. साहजिकच इथे बच्चन बनण्याची गरज असते ती अमनने.
भारतीय संदर्भांत कुटुंब ही संकल्पना जशी गुंतागुंतीची आहे, तशीच इथली समस्यादेखील. कार्तिक आणि अमन किंवा त्याच्यासारखी इतर जोडपी पळून जाऊ शकतात का, तर हो. कुटुंबाविरुद्ध बंड पुकारू शकतात का, तर हो. मात्र, इथे स्वीकृती हा खरा मुद्दा आहे. ‘जो हमें परिवार से लडनी पडती हैं, वो सब से खतरनाक होती हैं’ - हे त्याचे शब्द हा मुद्दा अधिक समर्पकपणे पोचवतात. स्वतःपासून, कुटुंबापासून, प्रेम ही नैसर्गिक भावना समजून न घेणाऱ्या समाजापासून सर्वांपासून किती काळ पळत राहणार, हा इथे उपस्थित झालेला प्रश्न असतो. इथे क्लिष्टता येते ती याच द्वंद्व मनःस्थितीमुळे.
चित्रपटकर्ते त्रिपाठी कुटुंबाचं सविस्तर चित्र समोर उभं करतात. सुनैना आणि शंकर त्रिपाठी (नीना गुप्ता-गजराज राव) हे अमनचे आई-वडील, चमन (मनुरिशी चढ्ढा) आणि चंपा (सुनीता राजवर) हे काका-काकू आणि रजनी (मानवी गागरू) ही चुलत बहीण असं एकत्र कुटुंब इथे दिसतं. या सर्व पात्रांचे विशिष्ट स्वभावविशेष, त्यांच्या वैयक्तिक समस्या, आपापसातील हेवेदावे यासोबतच एक कुटुंब म्हणून असलेल्या समस्या असं सगळं काही अगदी तपशीलवार मांडलं जातं. हे करत असताना चित्रपट आणि समाजातील ठराविक रूढी, संकल्पना आणि ठोकळेबाज पात्रांना छेद दिला जातो. चिन्ह-व्यवस्था, संदर्भ-व्यवस्था यातील संकल्पना अगदी उलट पद्धतीने समोर आणल्या जातात. लग्नात मुलाऐवजी मुलगी घोड्यावर स्वार होऊन त्याच्या घरी वरात घेऊन जाते. पुढे जाऊन एका पात्राचं अविवाहित असणं समारंभपूर्वक साजरं केलं जातं. अनेक ठिकाणी स्त्री-पुरुषांच्या पारंपरिक प्रतिमा, त्यांची कामं यांची अदलाबदल केली जाते. हे सारं महत्त्वाचं का ठरतं, तर जशी प्रेम किंवा संभोग ही काही फक्त आणि फक्त दोन स्त्री-पुरुषांनी करण्याची गोष्ट नाही, अगदी त्याच पद्धतीने परंपरागत चालत आलेल्या बाबी बरोबर असतीलच असं नाही. त्या एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या समूहावर अन्यायकारक ठरणाऱ्या असू शकतात. यासाठीच इथे हेतूपुरस्सर केलेल्या या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
चित्रपटाची रचना अशी आहे की, प्रत्येक भावनिक, गंभीर दृश्यानंतर विनोद यायलाच हवा, असं चित्रपटकर्त्यांना वाटतं असं दिसतं. ही रचना काही प्रमाणात इथल्या गंभीर मुद्द्याची तीव्रता कमी करते. चित्रपटाच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचा विचार करता हा अधिक व्यावहारिक प्रकार असला तरी तो काही प्रमाणात इथल्या गंभीर जागांवर नकारात्मक परिणाम करतो. तरीसुद्धा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ मनोरंजक ठरतो. हे अर्थातच इथले कलाकार, त्यांची कमी अधिक फरकाने तपशीलवार लिहिलेली पात्रं आणि चतुराईने लिहिलेली विनोदी दृश्यं यांच्या एकत्रित परिणामामुळे घडतं.
आयुष्मानचं पात्र एके ठिकाणी म्हणतं की, भारतीय चित्रपटांनी, साहित्याने आपल्याला रोमिओ आणि ज्युलिएट, लैला आणि मजनू यांच्यासारख्याच अजरामर कथा असलेली समलैंगिक जोडपी कधी दिलीच नाहीत. (इथे पात्राला/चित्रपटकर्त्यांना दीपा मेहताच्या ‘फायर’पासून ते गेल्यावर्षी आलेल्या ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’पर्यंतच्या अपवादांचा विसर पडतो, हा भाग वेगळा.) त्यामुळेच इथे ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ (१९९५) चित्रपटाचा, ‘शोले’तील ‘ये दोस्ती...’ या गाण्याचा, ‘आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ’ गोपालदास नीरज यांच्या ओळींचा अशा बऱ्याच गोष्टींचा इथल्या जोडप्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. सांस्कृतिक, सामाजिक रूढी आणि प्रतीकांसोबतच या दृश्यसंस्कृतीतून आलेल्या प्रतीकांचा आणि त्यांच्या परिणामांचा विचार इथे केला जातो. बॉलिवुड आणि पॉप कल्चर आपल्या सामाजिक चौकटीत किती महत्त्वाची भूमिका बजावतं हे इथे दिसतं.
‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या अर्थी महत्त्वाचा ठरतो की, तो समलैंगिक प्रेम या संकल्पनेला अधिक सुस्पष्ट आणि व्यापक प्रकारे समोर आणतो. तो सदोष असला तरी रंजक आहे. तो त्यानेच मांडलेल्या आपले सिनेमे आणि आपला समाज यांच्यातील परस्परसंबंधांचा विचार करत मोठ्या कल्पकतेनं आपला मुद्दा मांडू पाहतो. त्यासाठीही तो कौतुकास्पद ठरतो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment