हा सिनेमा अधिक-उणेच्या वाटेवरचा ‘उणे’ अधिक असलेला ‘प्रवास’ आहे!  
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘प्रवास’ची पोस्टर्स
  • Sat , 15 February 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie प्रवास PRAWAAS अशोक सराफ Ashok Saraf पद्मिनी कोल्हापुरे Padmini Kolhapure

आयुष्यात वेगवेगळ्या टप्यावर प्रत्येकाकडे कुठल्या ना कुठल्या जबाबदाऱ्या येतात. या जबाबदाऱ्यांचं ओझं हळूहळू इतकं वाढत जातं की, काही माणसं जगणं विसरून जातात. त्यांना सतत चिंता करण्याची सवय लागते. आजच्यापेक्षा उद्याचा दिवस कसा असेल याची चिंता. अशाच एका व्यक्तीची कथा ‘प्रवास’ या सिनेमात पाहायला मिळते.

नायक अभिजात (अशोक सराफ) मुंबईत पत्नी लता (पद्मिनी कोल्हापूरे) यांच्यासोबत राहत असतात. त्यांचा एकुलता एक मुलगा दिलीप (शशांक उदापूरकर) परदेशात नोकरीसाठी गेलेला असतो. अभिजात-लता यांना एकेमकांशिवाय कुणाचा आधार नसतो. त्यामुळे या साठीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या दाम्पत्याला अधूनमधून एकटं वाटायला लागतं. कधी आजारी पडणं, तर कधी नको तितकं निराश होणं, अशा त्रासाला त्यांना सामोरं जावं लागतं. आणि हा त्यांच्या आयुष्याचा प्रवास या सिनेमाचा गाभा आहे.

पण हा सिनेमा दिग्दर्शनात निराश करतो. दिग्दर्शकानं निर्माण केलेली दृश्यं कृत्रिम वाटतात. काही वेळा तर दोन दृश्यांत संबंध नसताना उगीचच संबंध दाखवला जातो. अभिजात एकटेपणाला कंटाळून शेवटी मुंबईतील गरजूंसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देतात. त्या रुग्णवाहिकेचे स्वतः चालक होतात. ज्या ज्या गरजूंना ते मदत करतात, त्यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध जुळतात. मात्र पुढे हळूहळू सिनेमा बॉलिवुडच्या वळणावर जातो आणि अतार्किक दृश्याची मांडणी करत राहतो.

अशाच एका दृश्यात झोपडपट्टीतल्या गुलाब नावाच्या एका गरीब मुलाला अभिजात मदत करतात. गुलाबकडे शंभर रुपयेसुद्धा नसतात असं दाखवलं आहे. पुढे हा गुलाब अभिजात यांना उत्तर भारतात भेटायला जातो. तिथं तो कसा गेला? का गेला? याचं उत्तर मिळत नाही.  

सिनेमाची लयबद्धता सातत्यानं खंडित होत राहते. याचं मुख्य कारण म्हणजे दृश्यांची रचना. छोटं-छोट्या दृश्यांनी त्यात गोंधळ निर्माण केला आहे. कॅमेऱ्याची हाताळणी सफाईदार असली तरी त्यातली दृश्यं परिणाम साधत नाहीत.

अभिजात एका शास्त्रीय संगीतच्या गुरुजीला भेटायला जातात. त्या वेळचे संवाद आणि दृश्यं खूपच छोटे आणि तुकड्यातले आहेत. असा प्रकार संपूर्ण सिनेमात घडत राहतो. यामुळे सिनेमाचं समग्र चित्र उभं राहत नाही आणि कथानक नेमकं काय सांगू पाहतंय, त्याबाबत संभ्रम निर्माण होतो. 

सिनेमातला अभिनय मात्र छाप पाडतो. अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांनी प्रचंड ताकदीनं आपल्या भूमिका केल्या आहेत. अशोक सराफ यांनी दीर्घ काळानंतर मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिका केली आहे. आपल्या भूमिकेला त्यांनी पूर्ण न्याय दिला आहे. पद्मिनी कोल्हापूरे हे एकेकाळचं हिंदीतलं मोठं नाव. त्यांचा संवादाचा लहेजा मात्र टिकून राहत नाही. हावभावात फार फरक पडत नाही. मात्र तरीही त्यांनी भूमिकेचं आव्हान बखूबी पेललं आहे.

सिनेमाचे दिग्दर्शक आणि दिलीपची भूमिका स्वीकारलेले शशांक उदापूरकर यांनी दोन्ही पातळ्यावर निराश केलं आहे, असंच म्हणावं लागेल. त्यांची अभिनयाच्या बाबतीतली कृत्रिमता, रटाळ संवाद शैली आणि ठरलेले हावभाव निरस करतात. त्यात भर म्हणजे परदेशात राहतोय, असं दाखवण्यासाठी फोनवर बोलताना प्रत्येक वाक्यानंतर ‘ओह डॅड’ म्हणायची सवय तर कंटाळा आणते.

संगीताची बाजू मात्र परिणामकारक आहे. पार्श्वसंगीतचा वापर जागोजागी केला असल्यानं संगीताचा परिणाम टिकून राहतो.

सिनेमाचा पूर्वार्ध कथानकाला साजेसा आहे. त्याची मांडणी तुकड्यात असूनदेखील कथानकावरची पकड कमी होत नाही. अगदी सुरुवातीला पार्श्वभूमीला एक कथानक सुरू होतं. त्याचा वापर पूर्वार्धात चांगला केला आहे. उत्तरार्धात देखील त्याचपद्धतीनं कथानक सुरू राहतं. मात्र त्याचा परस्परसंबंध जुळून येत नाही. पुढे कथानकात येणारी वळणं फारशी अनपेक्षित ठरत नाहीत. श्रेयस तळपदे या सिनेमात एका सिनेमातल्या नायकाची भूमिका करतो, हे या सिनेमातलं सर्वांत निरस दृश्य आहे. कारण हा अनावश्यक रचलेला भाग आहे.

थोडक्यात हा सिनेमा अशा अधिक-उणेच्या वाटेवरचा ‘उणे’ अधिक असलेला ‘प्रवास’ आहे!  

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......