‘झुंड’ : प्रयोग म्हणून हे नाटक प्रभाव टाकतं, परिणाम साधतं, जिथं पोहचायला हवं ती उंची पार करतं. 
कला-संस्कृती - नौटंकी
स्वनील दीपक जाधव
  • ‘झुंड’ या नाटकाचे पोस्टर
  • Mon , 10 February 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti नौटंकी Nautanki झुंड Jhund समर खडस Samar Khadas

‘झुंड’ हे नाटक बघण्याची दोन प्रमुख कारणं होती. एक, समर खडस या नावाविषयी असणारं कुतूहल अन् त्याभोवतीचं वलय. दुसरं, किरण माने या आवडत्या नटाचा अभिनय.

समर खडस यांनी वर्तमानातील दाहक अशा विषयाला वाचा फोडली आहे. त्यांनी निर्भिडपणे नाटकाच्या माध्यमातून एक विषय मांडला आहे. ते आपल्यालाही व्यक्त होण्याचा विश्वास देतात. सध्याच्या बघेगिरीत त्यांनी ही कोंडी समर्थपणे फोडली आहे. ‘ते’ आपल्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपलेत आणि आपण झोपेचं सोंग घेऊन अभिव्यक्त होणं कलावंतांवर सोपवलंय. नेमक्या त्याच अतिरेकी दबावतंत्राला उत्तर म्हणून घेतलेली ही भूमिका आहे.

आजच्या अस्थिर आणि अराजकाच्या वेळी व्यवस्थेचा टोकदार शब्दांत निषेध करताना समर खडस यांनी मराठी नाटकाची परिभाषा, चौकट, आखाडे मोडलेत. अलीकडच्या काळात मराठी रंगभूमीवर प्रयोगांचा साचलेपणा आला होता, ती काही प्रमाणात मोडकळीस आली होती..

असं म्हणता ना की, कलावंताने भूमिका घ्यायची असते. आजूबाजूच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असमतोलाविषयी व्यक्त व्हायचं असतं. आपल्या जाणिवा अधिक प्रखर कराच्या असतात. तेच या नाटकानं केलंय. नाटक हेच व्यक्त होण्याचं माध्यम का, तर ते सतत जिवंत असतं आणि ‘लोकांशी’ दीर्घ संवाद साधत राहतं.

आज आपल्यावर सतत पाळत ठेवली जातेय. आपलं बोलणं सतत कोणीतरी चोरून ऐकतंय. आपलं उठणंबसणं, खानपान, राहणं, एकमेकांत मिसळणं, आपण काय वाचतोय वा लिहितोय याच्या नोंदी ठेवल्या जाताएत. आपल्याकडून सोयीचं लिहून घेण्याचा अट्टहास आहे. आपण काय खावं हेही एक जमात ठरवू पाहत आहे.

आपल्याला मिंधे होण्यास भाग पाडताना ते आपल्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत. संपवणारी एक व्यवस्था निर्माण केली जात आहे. ते सगळेच ‘झुंड’ या गटात मोडतात.

लेखक समर खडस या नाटकातून वृत्तपत्र जगातले भलेबुरे व्यवहार मांडतात. पण नाटक संपादकीय चर्चेच्या केबिनमधून बाहेर पडून हमरस्त्यावरील प्रश्नांना बांधिल राहतं, भिडत राहतं. नाटकातील ठसन आणि दशावतारे यांना निफ्टीच्या घसरणीवरील अग्रलेखापेक्षा झारखंडमधील बीफ बाळगणाऱ्या तरुणाचा मॉब लिंचिंगने बळी घेतला जातो, ही बातमी महत्त्वाची वाटते. पण ती घटना महाराष्ट्रातील नाही म्हणून संपादक तिला महत्त्व न देता साईड लाइन करायला लावतो. याचा ठसन, दशावतारे, तुमाने विरोध करतात. असल्या गळपेची मॅनेजमेंटी धोरणाला फाट्यावर मारतात. कळसुत्री बाहुल्यांचा समाचार घेतात. चहाच्या वेळी संपादकाची चेष्टा करतात.

त्यातून ठसन हा मुसलमान असल्याचा त्याच्याच एका सहकारी पत्रकारास धक्का बसतो. त्याला आपली नोकरी वाचवण्यासाठी दुहेरी कसरत करावी लागते.

तो आपली बाजू नेहमीच सेफ करत राहतो. पुढे ठसनला ठरवून टार्गेट केलं जातं. त्यावर ऑफिसमध्ये गोमांस खाल्ल्याचे आरोप ठेवले जातात. पण त्या दिवशी त्याने वांग्याची भाजी खाल्लेली असते. पण मॅनेजमेंट आपली जरब बसवण्यासाठी आरोप करते. आपले शाकाहार करण्याचे नियम अधिक दृढ करण्याचा तो डाव असतो. ज्याचा सामना ठसन अनेक उदाहरणे देऊन करतो आणि गोमांस खाण्यात काहीच गैर नाही हे पटवून देतो. यासाठी ठसन ऋग्वेद, मनुस्मृती, वैदिक काळ यातील दाखले देतो.

बाकीचे दोन सहकारी नोकरीसाठी हतबल असताना दशावतारे ठसनसोबत उभा राहतो. संपादकाला जाब विचारतो. ठसनचं राजीनामा देणं दशावतारेला आपली हार वाटत राहतं. त्याला व्यवस्थेने ठसनचा बळी घेतलाय आणि आपण काहीच करू शकलो नाही, याच प्रचंड दुःख होत राहतं. आपणही याच झुंडीचा भाग झालो आहोत की काय असं वाटत राहतं. दशावतारे तुकोबांच्या विचारांचा पाईक आहे. तो त्यांना ‘बोल्ड रिअॅलिस्ट कवी’ मानतो. भैरप्पांच्या ‘पर्व’चे दाखले देतो.

ठसन हा मुळातच निर्भीड पत्रकार आहे. तो असल्या आरोपांना जुमानत नाही. त्याची विचार बैठक पक्की आहे आणि त्याचा जागतिक साहित्याचा व्यासंग आहे. पाश त्याचा आवडता कवी आहे. तो व्यवस्थेला पुरून उरतो.

ठसनमध्ये समर खडस यांचा आक्रमकपणा आणि विद्वता दिसत राहते. वृत्तपत्र जगातून ते तावूनसुलाखून निघालेले आहेत. तिथल्या झुंडशाहीचा त्यांनाही अनुभव असावा. ठसन असणारा अक्षय कोठारी माझ्या माहितीप्रमाणे शफाअत खान मास्तरांचा लाडका शिष्य असावा. त्याचा ठसन खराखुरा वाटतो. तो आपल्या भूमिकेला मेहनतीने मोठी करतो. अस्खलित, त्याच्या आवाजातली कविता म्हणतो.

किरण माने यांचा ‘उलटसुलट’नंतर दमदार अभिनय या नाटकात पाहायला मिळतो. आपण पट्टीचे नट आहोत, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केलंय. माझ्या माहितीप्रमाणे ते दुबेजींचे विद्यार्थी आहेत.

प्रदिप मुळ्येंचे नेपथ्थ आणि दिग्दर्शन कमाल आहे!

प्रयोग म्हणून हे नाटक प्रभाव टाकतं, परिणाम साधतं, जिथं पोहचायला हवं ती उंची पार करतं. ही ठिणगी मला बदलाची नांदी वाटते.

............................................................................................................................................................

हेही पहा, वाचा

‘झुंड’ : आतून-बाहेरून खरवडणारं नाटक आहे, म्हणून ते (तिकीट काढून) पहावे! - संजय पवार

https://www.aksharnama.com/client/article_detail/4004
............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख