अजूनकाही
या सिनेमाद्वारे माणसं नातेसंबंधात कसा आव आणून जगतात, याची गोष्ट दिग्दर्शकाने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
पूर्वी (रिंकू राजगुरू) ही मुक्तपणे जगणारी मुलगी असते. तिचं कुटुंब काही वर्षांपूर्वी साताऱ्यातून पुण्यात स्थलांतरित झालेलं. कुटुंबात तिचे आई-वडील, भाऊ आणि आजी असते. पूर्वीचं लग्न लावून देणं ही या कुटुंबाला मोठी जबाबदारी वाटत असते. त्यामुळे तिच्या लग्नासाठी स्थळ शोधणं सुरू असतं. पूर्वीला मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे आयुष्य जगायचं असतं. स्वतःच्या पायावर उभं राहून मेकअप आर्टिस्ट व्हायचं असतं. त्यामुळे तिला पाहायला आलेल्या लग्नाळु मुलांना ती विविध सोंगं घेऊन नकार देत असते. प्रसंगी घरातून पळूनही जाते.
एक दिवस अचानक तिची भेट डॉ. नीलशी (चिन्मय उदगीरकर) होते. त्यांच्या भेटी योगायोगानं होत राहतात. पुढे योगायोगानं दोघांच्या कुटुंबांची जवळची ओळख आहे, असं समजतं. त्यातून चिन्मय आणि पूर्वी लग्न करायचं ठरवतात. पण अचानक एक अपघात घडतो आणि सिनेमा वेगळ्या वळणानं पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहतो. मात्र कथानकाची गाडी मध्येच अडकते.
यात दाखवलेले योगायोग इतके मोघम आहेत की, त्यांची कल्पना करणंदेखील अंगावर येतं. सिनेमा सुरू होतो अन पहिल्याच दृश्यात पूर्वी पळत येते आणि नीलच्या दुचाकीवर बसते. या प्रसंगात त्यांची एकमेकांशी ओळख नसते. पण ती कुठून आणि का पळत येते, याच्या मागचं कारण सिनेमा संपेपर्यत कळत नाही. निव्वळ पात्रांची ओळख व्हावी म्हणून घेतलेलं हे दृश्य संपूर्ण सिनेमात गोंधळ निर्माण करतं. पुढे त्यांच्या भेटी इतक्या योगायोगानं होतात की, कुठेही उल्लेख न येता नीलच्या घराचा पत्ता पूर्वीला मिळतो. एवढंच नाही तर तो काम करत असलेल्या हॉस्पिटलचा पत्तासुद्धा तिला समजतो.
पूर्वी आणि नीलच्या घरच्यांची नेमकीच ओळख होते. त्यानंतरच्या दृश्यात पूर्वीचे आई-वडील रस्त्याने चालत असतात. पुन्हा योगायोगानं त्याच रस्त्यावर नील त्यांना चारचाकीमध्ये दिसतो. योगायोगांचा कहर तर तेव्हा होतो, जेव्हा पूर्वीच्या मित्राचा अपघात होतो आणि त्याला योगायोगानं नील जिथं काम करत असतो, तिथंच अॅडमिट केलं जातं. त्यामुळे सिनेमाच्या कथेत येणारी रहस्यमय वळणं सिनेमाच्या पटकथेचा पोकळ डोंगर पडद्यावर उभा करत राहतात.
सिनेमातला मुख्य पात्रांचा अभिनय हा भरकटलेला आहे. त्यात पात्रांना साजेसा ना अभिनय आहे, ना त्याची किमान पातळीवरची अभिनय शैली! पात्रांच्या संवादाचे उच्चार एकाच वेळी वेगवेगळ्या बोली भाषेतले आहेत. रिंकू अजूनही आर्चीच्या भूमिकेतून बाहेर आलेली नाही. एका ठिकाणी तिचे दारू प्यायल्यानंतरचे संवाद त्याची तीव्र जाणीव करून देतात. भाषेचा लहेजा वेगवेगळ्या स्तरावर जात नाही. चिन्मयची भूमिका डॉक्टरची आहे. पूर्वार्धात त्याने चांगला प्रयत्न केला आहे, मात्र त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि विनोद निर्मिती करण्याचा प्रयत्न करणारे संवाद यात तोचतोचपणा जाणवत राहतो. उर्वरित कलाकारांचा पडद्यावरचा वेळ कमी आहे, परिणामी त्यांचा फार परिणाम होत नाही.
एडिटिंगमध्ये काही दृश्य तुकड्यात जोडण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र त्यातली दरी दिसून येते. त्यामुळे पहिल्या दृश्याचा दुसऱ्या दृश्याशी संबंध दिसत नाही. याचाच परिणाम म्हणजे पटकथेत मोठी वळणं घेऊन निर्माण केलेली रहस्यं छाप सोडून जात नाहीत. त्यामुळे उत्सुकता वाढत जाण्याऐवजी त्या वळणांचा कंटाळाच यायला लागतो.
प्रत्येक दृश्यात वाजत राहणारं संगीत सिनेमाला पूरक ठरत नाही. गाण्यांच्या बाबतीत तर सिनेमा पूर्णतः अपेक्षाभंग करतो. एका दृश्यात हिंदीतल्या ‘मिले हो तुम हमको बडे नशिबोसे’ या गाण्याची धुन वाजत राहते. पुढे कहर म्हणजे हे पूर्ण गाणं जशास तसं मराठीत गायलं गेलं आहे. मात्र त्यापुढे जाऊन सृजनात्मक पातळीवर सिनेमाचा खुजेपणा समोर येतो. थोडक्यात सिनेमाच्या सर्वच बाजूंवर ‘सजावटी’चा निरुत्साही साज चढवलेला दिसतो. त्यातल्या विरोधाभासाने वैताग येतो.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment