अजूनकाही
स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी हौतात्म्य पत्करलं, अशा हुतात्म्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची कथा मध्यवर्ती असलेला ‘शहीद भाई कोतवाल’ हा भाईंच्या जीवनपट सिनेमातून उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. सिनेमाच्या कथानकात विठ्ठल कोतवाल यांच्या ‘आझाद दस्ता’ या क्रांतिकारक गटाचा लढा दाखवला आहे. विठ्ठल कोतवाल यांचं टोपणनाव ‘भाई’ होतं, म्हणून सिनेमाला ‘शहीद भाई कोतवाल’ असं नाव देण्यात आलं आहे.
राष्ट्रीय स्तरावर १९४२ साली ब्रिटिश सरकारच्या विरोधात भारतभर आंदोलन सुरू झाली होती. त्यात अनेक क्रांतिकारकांच्या संघटना होत्या. या संघटनांचं संपूर्ण स्वातंत्र्याचं स्वप्न होतं. पण एकीकडे सरंमजाम व्यवस्था, तर दुसरीकडे साम्राज्यवादी ब्रिटिश राज्यकर्ते अशा दोन्ही प्रवृत्तींना टक्कर देण्याचं काम करणाऱ्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावले होते. अशाच एका क्रांतिकारकांच्या गटाची ही कथा आहे. पण सिनेमातल्या विसंगती ठळक दिसून येतात. त्यामुळे सिनेमा नेमका कुठल्या काळाचं चित्रण करतो, असा प्रश्नही पडतो.
सिनेमाचं कथानक स्वातंत्र्यलढ्याच्या काळाला पडद्यावर उभं करू पाहतं. भाईंच्या जन्मापासून ते हौतात्म्य पत्करण्यापर्यताचा लढा दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. मात्र सिनेमातली पात्रं आणि संवाद यातून कुठेही तत्कालीन व्यवस्थेचं चित्र निर्माण झालेले दिसत नाही. म्हणजे एका दृश्यात इंग्रज अधिकारी त्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्यासोबत मराठीत बोलतो. पुढे तो अधिकारी पोलिसांच्या एका तुकडीला इंग्रजी भाषेतून सूचना देतो. कहर म्हणजे हे सैन्य मराठी भाषिक आहे. अधिकाऱ्यांच्या तोंडून येणाऱ्या शब्दाच्या उच्चारामुळे तर संवाद अवास्तवच वाटू लागतात.
सिनेमात येणारी पात्रं एकाच वेळी वेगवेगळ्या बोलीभाषा बोलू लागतात, तेव्हा त्यांच्यातला संवाद कृत्रिम वाटू लागतो. सिनेमात अशा छोटछोट्या बाबीमुळे निर्माण झालेलं पडद्यावरचं चित्रण अपूर्ण वाटत राहतं. परिणामी सिनेमातल्या शहिदांच्या लढ्यापेक्षा छोट्या, पण नकारात्मक परिणाम घडवून आणणाऱ्या गोष्टीकडे सहज लक्ष जातं.
एडिटिंगच्या बाबतीतही वेगळी स्थिती नाही. जोडलेली दृश्यं असबंधरित्या जोडली गेली आहेत. दोन दृश्यांतील घटनांचा संदर्भ त्यामुळे लवकर लागत नाही. एकदा भाई कोतवाल सोबतच्या क्रांतिकारकांना म्हणतात, “आपलं धान्य संपलं आहे. आता आपल्यातल्या प्रत्येकाला भूमिगत राहता येणं शक्य नाही. त्यामुळे काही जण परत घरी जा.” या संवादानंतर त्यांचे सहकारी ‘नाही’ असं उत्तर देतात. या आणि अशा बऱ्याच दृश्यातील एडिटिंगमध्ये झालेला घोळ मात्र पडद्यावर दिसून येतो.
पूर्वार्ध भाई कोतवाल यांच्या बालपणापासून सुरू होतो. कौटुंबिक वातावरण, शिक्षण आणि विवाह यांच्यावर भर देणाऱ्या पूर्वार्धात संथपणा नाही, मात्र कमी वेळात अधिक काहीतरी दाखवण्याच्या घाईमुळे तो तुकड्यांत विखुरला गेला आहे. उत्तरार्ध सरळसोट आहे. त्यात फार वळणं नाहीत आणि कशाची घाईदेखील दिसत नाही. पण दृश्यात्मक पातळीवर लयबद्ध नसलेल्या अनेक घडामोडी इथंही सतत घडत राहतात.
आशुतोष पत्की याने भाई कोतवालांची भूमिका साकारली आहे. तो या सिनेमात केंद्रस्थानी दिसतो. पण तरीही त्याच्या हावभावात सारखेपणा दिसून येतोच. म्हणजे क्रांतिकारक भाई आणि पत्नीशी प्रेमाने बोलणारे भाई सारखेच हावभाव घेऊन संवाद करतात. त्यामुळे ही विसंगती लपत नाही. कमलेश सावंत यांना गोमाजीच्या भूमिकेचं आव्हान पेललं नाही असंच म्हणावं लागेल. ऋतुजा बागवे आणि अरूण नलावडे यांनी मात्र आपल्या भूमिकांना साजेसा अभिनय केला आहे. त्यामुळे अभिनय हाही या सिनेमाची कच्ची बाजू ठरतो.
कॅमेराची हाताळणी क्लिष्ट पद्धतीने केली आहे. सिनेमाचा काळ स्वातंत्र्यपूर्वीचा आहे, हे जणू विसरून अनेक दृश्यं टिपली गेली आहेत. परिणामी बऱ्याचदा प्रसंगांमध्ये अशा वस्तू दिसून येतात, ज्यांचा त्या काळाशी अजिबात संबंध नव्हता. थोडक्यात, हा सिनेमा दिग्दर्शन, एडिटिंग आणि संवाद या पातळ्यांवर निराश करतो.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment