‘पंगा’ : अलिखित सामाजिक नीतीनियमांशी आणि स्वतःशीही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘पंगा’चं पोस्टर
  • Sat , 25 January 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie पंगा Panga अश्विनी अय्यर तिवारी Ashwiny Iyer Tiwari कंगना रणौट Kangana Ranaut जस्सी गिल Jassie Gill रिचा चढ्ढा Richa Chadha नीना गुप्ता Neena Gupta

अश्विनी अय्यर तिवारी-नितेश तिवारी दाम्पत्याच्या अलीकडील तिन्ही चित्रपटांमध्ये खेळ, स्पर्धा हे महत्त्वाचे घटक राहिलेले आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ (२०१६) सर्वस्वी कुस्तीवर आधारित होता, आणि ‘छिछोरे’मध्ये (२०१९) महाविद्यालयीन स्पर्धा हा कथानकाचा एक महत्त्वाचा घटक होता. आता अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’मधील नाट्यनिर्मिती ही एका मध्यमवर्गीय गृहिणीच्या कबड्डीच्या खेळातील पुनरागमनाच्या तयारीतून आणि त्यानिमित्ताने घडणाऱ्या घडामोडींतून निर्माण होते. 

चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा जया निगम (कंगना रणौट) ही भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असणारी तिशीतील गृहिणी म्हणून समोर येते. मात्र तिचा पती, प्रशांत (जस्सी गिल) त्यांच्या मुलाला, आदित्यला (याग्य भसीन) सांगतो, त्याप्रमाणे तिचा भूतकाळ काहीसा वेगळा असतो. राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीची खेळाडू असलेली जया लग्न करते. तिच्या कबड्डी खेळण्यास प्रोत्साहन आणि आधार देणाऱ्या प्रशांतशी तिचं लग्न झालेलं असल्याने एरवी दिसतं तसं संघर्षकथेचं उपकथानक इथं नाही. बाळंतपणानंतर मात्र मुलाच्या नाजूक प्रकृती आणि आजारामुळे तिला आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याच्या स्वप्नावर नि एकुणातच कबड्डी खेळण्यावर पाणी सोडावं लागलेलं असतं. मात्र आता हेच दोघं तिला पुनरागमनासाठी प्रवृत्त आणि प्रोत्साहित करतात. आधी केवळ मुलाच्या हट्टाखातर सुरू झालेला कबड्डीचा सराव तिला पुन्हा कबड्डीकडे वळण्यास प्रवृत्त करतो. 

‘पंगा’मध्ये अनेक महत्त्वाची दृश्यं स्वयंपाकघरामध्ये घडताना दिसतात. जया पुन्हा कबड्डी खेळण्याबाबत बोलते, त्यानंतरच्या प्रसंगात ती स्वयंपाकघरात नि तिची आई (नीना गुप्ता), आदित्य आणि प्रशांत हॉलमध्ये असतात. तिची आई तिच्या या निर्णयाबाबत नापसंती दर्शवत असताना ती स्वयंपाकघरामधूनच त्याला उत्तर देत असते. आणखी एका प्रसंगात तिच्या पुनरागमनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरणारा एक निर्णय स्वयंपाकघराध्येच घेतला जातो. ज्याच्या पुढच्याच दृश्यचौकटीत ती, प्रशांत आणि आदित्य स्वयंपाकघरामध्ये एकमेकांना मिठी मारतात. याखेरीज याआधी आणि नंतरही गाण्यांमध्ये ती किंवा प्रशांत किचनमध्ये असल्याच्या दृश्यचौकटी दिसतात.

रूढ अर्थानं बोलायचं झाल्यास, स्वयंपाकघर हे कुठल्याही मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतं. इथं जयाची गोष्टच मुळी एकेकाळी तिला तिची स्वप्नं नि तिचं कुटुंब या दोन्हींपैकी एकाची निवड करावी लागणं आणि आताचे तिचे स्वप्नपूर्तीचे प्रयत्न, याबाबतची असल्यानं या दृश्यांना एकुणातच महत्त्व प्राप्त होतं. आशयाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या संकल्पना या दृश्यांतून समर्पकपणे पोचवल्या जातात. 

यापूर्वी अमित शर्मा दिग्दर्शित ‘बधाई हो’मध्येही (योगायोग असा की, या चित्रपटात आणि त्यातील अशा दृश्यांतही नीना गुप्ता आहे!) मध्यमवर्गीय गृहिणी आणि स्वयंपाकघर यांचा परस्परसंबंध अधोरेखित करणारी, अगदीच सूक्ष्म निरीक्षण नोंदवणारी दृश्यं दिसली होती. ‘पंगा’ही अशा सूक्ष्म निरीक्षणांनी समृद्ध आहे. रेल्वेत इंजिनियर असलेला प्रशांत आणि रेल्वे विभागासाठी खेळणारी जया पहिल्यांदा रेल्वे कँटिनमध्ये भेटलेले असतात. कथानकासोबतच जया या पात्राच्या दृष्टीनं महत्त्वाचे असलेले प्रसंग जसे स्वयंपाकघरात घडतात, तसे प्रशांतच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रसंग रेल्वे यार्डमध्ये घडतात. घर सांभाळून काम करणारी स्त्री नि काम करून घर सांभाळणारा पुरुष, अशा दोन्ही बाबी इथं दिसतात. 

स्पोर्ट्स-ड्रामा या प्रकाराच्या पलीकडे जाणारा आणखी एक चित्रपट, अनुराग कश्यपच्या ‘मुक्काबाज’चं (२०१७) छायाचित्रण करणारा जय पटेल ‘पंगा’ला दृश्य पातळीवर वेधक बनवतो. अय्यर तिवारीच्या आधीच्या दिग्दर्शकीय कामात घडतं, त्याच धर्तीवर इथल्या नाट्याला आणि पात्रांना पूरक असे विनोद इथं येतात. याग्य भसीन, जस्सी गिल, रिचा चढ्ढा यांच्या पात्रांच्या संवादांच्या माध्यमातून इथं विनोद्युत्पत्ती होते. अश्विनी अय्यर तिवारी आणि निखिल मेहरोत्रा यांचं लेखन असलेला ‘पंगा’ स्पोर्ट्स-ड्रामा चित्रपट प्रकारातील आणि एकूणच चित्रपट या प्रकारातील पारंपरिक मार्ग निवडणारा असला तरी ही बाब काही सदर चित्रपटाची उणीव ठरत नाही. आधी उल्लेख केल्याप्रमाणे खेळाला एक साधन म्हणून वापरत काहीसं वैयक्तिक, कौटुंबिक आणि अधिक विस्तृत दृष्टिकोनातून पाहायचं झाल्यास सामजिक चित्र रेखाटणं आणि नाट्य निर्माण करणं हा इथला उद्देश आहे. 

चित्रपटाची टॅगलाईन आहे ‘जो सपने देखते हैं वो पंगा लेते हैं’. ही गोष्ट अशीच ‘पंगा’ घेणाऱ्या व्यक्तीची आहे. हा लढा जितका अलिखित सामाजिक नीतीनियमांशी आहे, तितकाच स्वतःशी आहे. उदाहरणार्थ, एके ठिकाणी कंगनाचं पात्र म्हणतं “माँ के कोई सपने नहीं होते और अगर फिर भी मैं सपने देखती हूँ तो मैं सेल्फिश हूँ”. ‘पंगा’चा मुद्दाच मुळी असा आहे की, एखाद्या स्त्रीचं मातृत्व, तिचं कुटुंब तिच्या इच्छांच्या, स्वप्नांच्या आड येता कामा नये. तिची स्वतःची काही स्वप्नं असतील तर ती पाहिल्यामुळे ती स्वार्थी ठरू नये. आणि अश्विनी अय्यर तिवारी नेहमीच्या कौशल्यपूर्ण कामगिरीच्या माध्यमातून हा मुद्दा पोचवण्यात यशस्वी होते. हा चित्रपट जितका त्याच्या आशयासाठी महत्त्वाचा आहे, तितकाच तिच्या दिग्दर्शकीय कौशल्यांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. कारण काहीही झालं तरी शेवटी ती पारंपरिक कथनाच्या चौकटीत राहून अपारंपरिक चित्रपट देते आहे. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख