अजूनकाही
अक्षरांचं वळण अच्युत पालवांच्या आयुष्यात वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षीच आलं. तेव्हा ते लालबागच्या शाळेत बोर्डावर सुविचार लिहीत असत. परंतु तेच वळण त्यांना सुलेखनाच्या (कॅलिग्राफी)च्या मार्गावर नेमकं जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये जी.डी. आर्टचं शिक्षण घेत असताना घेऊन गेलं. त्यानंतर पालवांच्या ध्यानीमनी आणि स्वप्नी फक्त अक्षरंच वसायला लागली!
असा हा अक्षरमय प्रवास यंदा ४० वर्षांचा होतोय आणि सोबतच या बहुमुल्य, बहुआयामी अक्षरांचे धनी सुलेखनकार अच्युत पालव हेही येत्या २७ जानेवारीला त्यांच्या वयाची ६० वर्षं पूर्ण करत आहेत. ही दोन्ही निमित्त साधून या समग्र अक्षरकलेचा रेट्रोस्पेक्टिव्ह अर्थातच ‘अक्षरघन’ हा लेटेरोस्पेक्टिव्ह (Reviving, Reviewing, Rewriting) शब्दबद्ध होऊन प्रकाशित होतोय. त्याचं प्रकाशन प्रसिद्ध व्यंगचित्रकार व राजकीय नेते राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या याच समग्र अक्षर कलाकिर्दीचा मागोवा घेणारं प्रदर्शनही २१ जानेवारी ते २७ जानेवारी २०२० या कालावधीत जहांगीर आर्ट गॅलरीत भरत आहे.
अच्युत पालवांच्या सुलेखन प्रवासाचा धांडोळा घ्यायचा म्हटलं तर थेट त्यांच्या शालेय आयुष्यातच डोकावं लागेल. कारण वयाच्या बाराव्या-तेराव्या वर्षांपासून ते शाळेतील फळ्यावर अक्षरं गिरवताहेत. तेव्हापासूनच खरं तर अक्षरं हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाले आहेत. अच्युत पालव ठिकठिकाणी अनेक स्वरूपातील, भाषेतील अक्षरांना शोधताहेत आणि अक्षरं ही त्यांचा असाच मागोवा घेताना दिसतात. लालबागच्या शाळेत सुरू झालेला हा प्रवास पुढे पालवांना जे. जे. स्कूल ऑफ आर्टला घेऊन गेला आणि कलेतील अभिव्यक्तीची अनेक दालनं त्यांच्यासाठी उघडली. प्रसिद्ध सुलेखनतज्ज्ञ र.कृ. जोशी हे त्यांना मार्गदर्शक म्हणून लाभले आणि पालवांना अक्षरांकडे व विविध भाषांतील लिप्यांकडे जाणारी अनवट वाट सापडली.
त्यांचा पुढचा प्रवास नेमका आणि अक्षरमय झाला. जे.जे.तील त्यांचं औपचारिक शिक्षण संपतानाच मोडी भाषेतील लिपीचा अभ्यास करण्यासाठीची अभ्यासवृत्ती मिळाली. त्यानंतर मोडीसोबतच विविध भाषांतील लिपींचा त्यांनी अभ्यास केला. अनेक भाषांतील सुलेखनकारांसोबत काम ही केलं. त्यांना प्रसिद्ध जर्मन कॅलिग्राफर प्रा. Werner Schneider यांचंही मोलाचं मार्गदर्शन लाभलं.
आत्तापर्यंत अच्युत पालवांनी केलेल्या कामाची २६हून अधिक प्रदर्शनं झाली. मॉस्को, बर्लिन या युरोपिअन शहरांतील म्युझिअममध्येही त्यांच्या कलाकृती ठेवलेल्या आहेत. आशा भोसले, गुलज़ार, अनिल अंबानी, सोनिया गांधी, जॅकी श्रॉफ अशा अनेक मान्यवरांकडे अच्युत पालव यांनी केलेल्या कलाकृती आहेत.
मोडी लिपी तसंच ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत रामदास यांच्या अभंगांवर आधारित अभिनव सुलेखनपद्धती वापरून त्यांनी दैनंदिनींची निर्मिती केली. सुलेखनावरची विविध आशयाची पुस्तकं प्रकाशित केली. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठं त्यांनी केली आहेत. त्यात ख्यातनाम कवी, दिग्दर्शक व लेखक गुलज़ारांच्या पुस्तकांचाही समावेश आहे.
कॅलिग्राफीची ओळख करून देणाऱ्या ‘काना मात्रा वेलांटी’ या महत्त्वाच्या पुस्तकाची निर्मिती त्यांनी केली आहे. कॅलिग्राफीचा अभ्यास आणि कला यांचा मेळ साधणारी अनेक पुस्तकंही त्यांनी लिहिली. केवळ इतकंच नव्हे तर जाहिरात, फॅशन्स, फर्निचर, इंटेरियर आणि इंटरनेट या विविध माध्यमांतूनही कॅलिग्राफीचा व्यावसायिक स्वरूपाचा वापर होऊ शकतो, हे त्यांनी त्यांच्या कलाकृतीतून दाखवून दिलं.
‘जन गण मन’ या राष्ट्रगीतावरही सुलेखन आणि संगीत अशा साथीनं ‘एक मुल्क, एक आवाज, अनेक लिखावट...’ अशा वेगळ्याच कलाकृतीची निर्मिती त्यांनी केली. सुलेखनाच्या साहाय्यानं भाषीय आणि विविध धर्मीय मेळ साधण्यासाठी अरेबिक कॅलिग्राफर सलवा रसूल यांच्यासोबत ‘ईश्वर अल्ला तेरो नाम…’ हे प्रदर्शनही केलं. फक्त कॅलिग्राफेर्सच नव्हे, तर अनेक आर्ट फॉर्म्स विशेषतः संगीत, वादक आणि नृत्यांगना यांच्या सोबत कॅलिग्राफीचं फ्युजनही साधलं.
सुलेखनाचा वापर करून, त्यांत नवनवीन प्रयोग करून स्वतःची कलानिर्मिती करण्यासोबतच सुलेखन ही कला सर्वसामान्यांपर्यंत पोचावी यासाठी त्यांनी केलेलं योगदान मोलाचं आहे. त्यासाठी त्यांनी अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफीची स्थापना करून त्यामार्फत कॅलिग्राफीचे कोर्सेस डिझाईन केले. कॅलिफेस्टसारखे उपक्रम सुरू करून अनेक नवीन कॅलिग्राफर्सच्या कलेला उत्तेजन देण्याचा उपक्रम सुरु केला. भारतातील पहिल्या महिला कॅलिग्राफर्सचं ‘आदिशक्ती... अक्षरशक्ती’ या प्रदर्शनाची आखणी केली. अम्ब्रेला पेंटिंग्जच्या माध्यमातून अनेक नव्या लहान-थोर कॅलिग्राफर्सना एकत्र आणून एका नवीन उपक्रमांत सहभागी केलेलं आहे.
अच्युत पालवांना सुलेखनाची ही चळवळ अशीच सुरू ठेवायची आहे आणि सर्वव्यापी करायची आहे. ही अक्षर चळवळ वाढवण्यासाठी ते भारतात काश्मीर ते कन्याकुमारी आणि परदेशांत थेट कॅलिफोर्निया व्हाया सिंगापूर, साऊथ कोरिया असाही सातत्यानं प्रवास करत असतात. शेवटी ‘स्काय इज द लिमिट’ असंच त्यांचं अक्षरांशी असलेलं असीम नातं आहे.
भारतातील बहुविध भाषा, लिप्या यातील मूळ स्वरूपाचा, डिझाईन्सचा, आकाराचा सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करून, त्यांत अनेकविध प्रयोग करून ते सुलेखनाच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचं त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे. आपल्या भाषेची आणि अक्षरांची ही प्राचीन, अर्वाचीन संस्कृती टिकवण्या-वाढवण्यासोबतच त्यातल्या मूळ सौंदर्याचीही कॅलिग्राफीच्या वापरानं अभिवृद्धी झाली आहे.
अच्युत पालवांचं आणि अक्षरांचं चाळीस वर्षांचं सहजीवन मोजक्या शब्दांमध्ये मांडण्यासारखं नाही. आपल्याकडे विविध निमित्तं असतात, कधी कुठला सण, कधी कशाचं सेलिब्रेशन तर कधी काही घटना, सोशल मीडियावरून प्रतिक्रियांचा पाऊस पडलेला असतो. आपण त्यातून फॉरवर्ड होत असतो, तेव्हाच व्हॉट्सअॅपची चिमणी चिवचिवते आणि त्यावर अच्युत पालवांची अक्षरं स्वतःच्या ओळखीनं उगवलेली दिसतात. ते वाचून घटनेचा आशय, त्यातला आनंद, त्याचं गांभीर्य अलगद आपल्या मनाच्या तळाशी येऊन पोचतं.
अशा फक्त त्यांच्या अक्षर हेच पॅशन आणि अक्षर हेच ऑब्सेशन असलेल्या आयुष्याला आपण सगळे कुर्निसात करूच शकतो. त्यासाठीची ही संधी, तूर्तास एवढंच आणि इतकंच. त्यांच्याच शब्दांत -
तीच अक्षरं
जी ‘क्षर ‘होत नाहीत,
तीच तुमच्यापर्यंत
घेऊन आलोय…
.............................................................................................................................................
लेखिका अंजली अंबेकर चित्रपट समीक्षक, साहित्य अभ्यासक आहेत.
anjaliambekar@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment