बॉम्बशेल : ‘मी टू’ चळवळीनंतर आलेला हा सिनेमा महत्त्वाचा ठरतो.
कला-संस्कृती - इंग्रजी सिनेमा
माधवी वागेश्वरी
  • ‘बॉम्बशेल’ची पोस्टर्स
  • Sat , 18 January 2020
  • कला-संस्कृती इंग्रजी सिनेमा बॉम्बशेल BOMBSHELL निकोल किडमन Nicole Kidman

जवळपास साठीला आलेला, गलेलठ्ठ असा, वॉकर घेऊन चालणारा रॉजर म्हणतो, ‘फिरून दाखव’.

मग ती बाहुलीसारखी हलकी गिरकी घेऊन दाखवते.

आता रॉजर म्हणतो,  ‘ड्रेस वरती घे, मला तुझे पाय बघायचे आहेत.’

मग ती ड्रेस वरती घेऊ लागते.

रॉजर म्हणतच राहतो,  ‘आणखी वर, आणखी वर’.

कारण रॉजरचं म्हणणं आहे, ‘its visual medium’.

बातमीची निवेदक होण्यासाठी ही ऑडिशन आहे आणि तीही कुठे, तर अमेरिकेतील जगप्रसिद्ध फॉक्स न्यूजसाठी. 

हा प्रसंग आहे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘बॉम्बशेल’ या सिनेमातील.

‘बॉम्बशेल’ ही २०१९ ची १०८ मिनिटांची अमेरिकन बायोग्राफीकल ड्रामा फिल्म आहे. जे रोच ( Jay Roach) यांनी ही फिल्म दिग्दर्शित केली आहे. चार्ल्स रेन्डोल्फ (Charles Randolph) यांनी ही फिल्म लिहिली आहे. ऑस्कर पुरस्कार विजेत्या चार्लीज थेरोन, निकोल किडमन आणि ऑस्करसाठी नामांकन मिळवलेली अभिनेत्री मार्गोट रॉबी या तिघींच्या यात मुख्य भूमिका आहेत. जगप्रसिद्ध फॉक्स न्यूजचा सीईओ असलेल्या रॉजर एल्सवर त्या न्यूज नेटवर्कमध्ये काम करत असलेल्या कितीतरी बायकांनी (ज्या समोर आल्या अशा जवळपास २३) लैंगिक गैरवर्तनाचा आरोप लावला होता, या घटनेमुळे पूर्ण अमेरिका हादरली होती. याबद्दलची ही फिल्म आहे.

ही फिल्म अमेरिकेमध्ये १३ डिसेंबर २०१९ रोजी रिलीज झाली आणि आपल्याकडे ३ जानेवारी २०२०ला. रॉजर एल्सचा मृत्यू झाल्यावर या फिल्मवर काम सुरू झालं. सर्वच कलाकारांच्या अभिनयासाठी ही फिल्म ‘पाहावी’च अशी आहे. मानाच्या गोल्डन ग्लोब आणि बाफ्टा पुरस्कारासाठी या फिल्मला नामांकन मिळालेलं आहे.

मेगन केली (चार्लीज थेरोन), ग्रेशन (निकोल किडमन) आणि कायला (मार्गोट रॉबी) या फॉक्स न्यूज नेटवर्कमध्ये काम करणाऱ्या बायकांची ही गोष्ट आहे. फॉक्स न्यूजची प्रचंड प्रसिद्ध असलेली न्यूज अँकर मेगन २०१५च्या रिपब्लिकन डिबेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी बायकांचा केलेला अपमान यावर थेट प्रश्न विचारते आणि एकच एक गहजब होतो, इथून ही फिल्म सुरू होते. परंतु ज्या मीडियाच्या जोरावर किंवा ताकदीवर मेगन हे करते, तो लोकशाहीचा चौथा खांब काही मजबूत नाही. तोही राजकीय व्यक्तींइतकाच नैतिकदृष्ट्या खिळखिळा आहे, याची प्रकर्षाने जाणीव तिला ग्रेशनमुळे होती.

आधी सर्वच अर्थाने वापरून झालेली आणि आता जवळपास चाळीशीत आलेली ग्रेशन (निकोल किडमन) रॉजर सांगतो त्याप्रमाणे ऐकत नाही. टीव्हीवर ती विना मेकअप जाते, तेव्हा तिच्या चाळीशीवर, मेनॉपोझवर सगळ्यासमोर हीन बोलून तो तिचा अपमान करतो आणि पुढे तिला सरळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो. ‘Someone has to speak up, someone has to get mad’ या न्यायाने तीही शांत बसत नाही. रॉजरवर ‘Sexual harassment’चा आरोप लावते. सुरुवातीला नेहमीप्रमाणे कोणीही तिला साथ देत नाही. रॉजरला सगळ्या बाजूने मदत आहे. दरम्यान तरुण कायलाचं रॉजरकडून लैंगिक शोषण सुरूच आहे. पण नंतर परिस्थिती कशी बदलत जाते, हे पडद्यावर पाहणे उचित ठरेल.

‘मी टू’ चळवळीनंतर आलेला हा सिनेमा महत्त्वाचा ठरतो. कामाच्या ठिकाणी बायकांचे केले जाणारे लैंगिक शोषण, येता-जाता त्यांच्यावर सेक्सियेस्ट कोमेंट्स पास करणे, या गोष्टी राजरोसपणे सुरू असतात. विशेष म्हणजे ही गोष्ट नॉर्मल समजली जाते. बायकादेखील कामाच्या ठिकाणी नुसतं कामच नाही, तर आपण सेक्सी दिसलं पाहिजे यासाठी प्रयत्न करत राहतात. त्यासाठी महागड्या कॉस्मेटिक सर्जरीज केल्या जातात. सिनेमांमध्ये चेहऱ्यावरच्या सुरकुत्या दिसू नयेत म्हणून आपले सुपरस्टार लाखो-करोडो रुपये मोजत असतात. मासिकाच्या पहिल्या पानावर येणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो कायम फोटोशॉप केलेले असतात. कारण बारीक पाय आणि मांड्या, किंचितही केस नसलेले बगल आणि गोरी चामडी हे बाईनं सुंदर दिसण्याचे पुरुषाने ठरवलेले निकष आहेत.

बाई निवेदक असेल तर तिच्या ड्रेसचा पुढचा गळा मोठा हवा, हलकं क्लीव्हेज दिसायलाच हवं तिच्या समोरच्या टेबलावर काहीही सामान नको, तो टेबल खालूनही मोकळा हवा तिचा ड्रेस मांडीपर्यंत आखूड हवाच आणि हो long shot हवाच, कारण हे visual medium आहे, असं रॉजर सिनेमात ठणकावून सांगतो.

सांगायच्या आहेत बातम्या, पण सगळं काही विकायला ठेवलं आहे – सेक्स, राजकीय उमेदवार, सगळी जनता आणि सत्य. सगळं विकायला काढलं आहे.

आपण ‘विश्वास’ कशावर ठेवतो हा आणि हाच कळीचा मुद्दा या सिनेमात होऊन जातो. जगतानाही तो असतोच. कशाच्या बाजूने उभे रहायचे? आपण कशाच्या बाजूने उभे राहणार आणि कधी? वेळ निघून जाण्याची वाट बघणार की कुठलीतरी ठाम भूमिका घेणार आणि त्याची किंमत चुकवण्याची देखील तयार ठेवणार का? असे कितीतरी प्रश्न या सिनेमामुळे निर्माण होतात.

आपल्यापेक्षा वेगळा विचार करणाऱ्या माणसाला आपण कसं वागवतो, हातात सत्ता असल्यावर आपण आपल्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या माणसांचं काय करतो या वरून आपली माणूस म्हणून पात्रता ठरत असते. या सिनेमात रॉजर त्याच्या विरुद्ध गेलेल्या बायकांचं काय करतो, ते पाहून बायकांविषयी किती तिरस्कार आणि अनादर सगळीकडे झिरपत राहिलेला आहे, हे लक्षात येतं.

न्यूज प्रोग्रामला जशी गती असते, तशीच या सिनेमाची गती आणि रचना आहे. सतत आवाज आणि हालचालांनी भरलेले आणि भारलेले न्यूज डेस्क आणि मोक्याच्या प्रसंगांच्या वेळी ‘फेड इन’ होणारे सिनेमाचे ‘थीम म्युझिक’ अंगावर काटा आणते. विशेषतः ट्रेलरमध्ये दाखवलेला प्रसंग- ज्यात त्या तिघीही लिफ्ट आहेत, तो प्रसंग सिनेमात येतो, तेव्हा अक्षरश: धडधडू लागते.

मी काम करते, मला करिअरच करायचं आहे आणि यासाठी जर मला काही मागितले गेले आणि मग मी दिलं तर लोक मला काय म्हणतील हे आणि हेच विचार सगळ्या पातळ्यांवर काम करणाऱ्या बायकांच्या मनात खाली-वर होत असतात. “फॉक्स न्यूज नेटवर्कमध्ये प्राईम टाईम कशाच्या जोरावर मला मिळाला असेल असं तुला वाटतं.” असे जेव्हा मेगन एका प्रसंगात म्हणते, तेव्हा या शिवाय दुसरा पर्यायच पुरुष ठेवत नाहीत, हेच ती अप्रत्यक्षपणे म्हणत असते.

विशेष म्हणजे हे सगळे करून आपण बायकांना पुढे आणले, त्यांना काम करू दिले त्यांचे काहीच नुकसान आपण केलेले नाही असे रॉजरचं स्पष्ट म्हणणे होते. 

या सिनेमाच्या अगदी सुरुवातीला मेगन, फॉक्स न्यूजची ‘टूर गाईड’ देते, ती अगदी लक्षपूर्वक  ऐकण्यासारखी आहे आणि सिनेमा संपल्यावरही बायकांच्या ग्राफिक इमेजेस वर येणारे गाणेदेखील चुकवू नये असे.

.............................................................................................................................................

लेखिका माधवी वागेश्वरी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. 

madhavi.wageshwari@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Sanjay Pawar

Tue , 21 January 2020

माधवी वागेश्वरी या क्षेत्रात काम करत असूनही त्यांचे भाष्य नेहमीच वाचावे असे असते.अत्यंत तटस्थपणे त्या सर्व बाजू मांडतात.तथाकथित सिनेपरिक्षकांसारखी त्या ना कुठली पोज घेत ना ज्ञान पाजळत की हेटाळणी करत.एखाद्या अभ्यासकाप्रमाणे त्या लिहितात.अभिनंदन.


Sanjay Pawar

Tue , 21 January 2020

असे चित्रपट भारतात बनत नाहीत.मी टू चळवळीला बदनाम व हास्यास्पद ठरविण्यात भारतीय जनतेसह भारतीय माध्यमांनीही मोठा हातभार लावलाय.तनुश्री दत्ताला शंभर प्रश्न विचारणाऱ्यांनी नाना पाटेकरला एकही प्रश्न विचारला नाही.आपले पोलिस जात,धर्म,लिंग भेदभावात किती माहिर आहोत ते पाहतोच.अमेरिकेत ते इतक्या प्रमाणात चालू आहे तर भारतातला बाजार किती गरम असेल याचा अंदाज येऊ शकतो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख