‘ला मिझरेबल’ : हिंसा, अन्याय, चीड, अपमान यांनी ज्यांची मनं भरली आहेत, पण पोटं मात्र खपाटीला गेली आहेत, अशा लहान मुलांचा सिनेमा!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
माधवी वागेश्वरी
  • ‘ला मिझरेबल’चं पोस्टर
  • Sat , 04 January 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र ला मिझरेबल Les Misérables व्हिक्टर ह्युगो Victor Hugo लाड्ज ले Ladj Ly

Remember this, my friends

There are no such things as bad herbs or bad men

There are only BAD CULTIVATORS

हे ‘ला मिझरेबल’ या व्हिक्टर ह्युगो यांच्या जगप्रसिद्ध फ्रेंच कादंबरीचं सार आजच्या काळाला अनुसरून सांगणारी अत्यंत महत्त्वाची फिल्म म्हणजे ‘ला मिझरेबल’. ही २०१९ची फ्रेंच फिल्म आहे. लाड्ज ले यांची ही पहिलीच फिल्म आहे. याच नावाची जी शॉर्ट फिल्म त्यांनी केली होती, त्यावर आधरित केलेली ही फिचर फिल्म आहे. मागच्या वर्षीच्या (२०१९) कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या फिल्मचा वर्ल्ड प्रीमियर झाला होता. ९२व्या ऑस्कर पुरस्काराच्या (जे आता फेब्रुवारीत जाहीर होतील!) ‘फॉरेन लँग्वेज कॅटेगिरीसाठी’ फ्रान्सतर्फे ही फिल्म पाठवण्यात आली आहे आणि या फिल्मला नामाकंनदेखील मिळालं आहे.

२००५च्या पॅरिसच्या उपनगरांमध्ये जे दंगे झाले, त्याची पार्श्वभूमी या सिनेमाला आहे. अँटी ब्रिगेड क्राईमच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांभोवती ही फिल्म फिरते. २०१८ साल हे फ्रेंचवासियांसाठी फार फार मोलाचं ठरलं. या वर्षी फ्रान्सनं क्रोएशियावर ४-२ अशी मात करत फुटबॉल वर्ल्डकप मिळवला. सिनेमा सुरू होतो, तेव्हा फ्रान्स जिंकल्याचा जल्लोष पॅरिसच्या रस्त्यांवर सुरू असतो. या आनंदात सगळे सामील असतात. त्याला वर्ण, धर्म, रंग, परकीय, स्वकीय असा भेदाचा कुठलाही दुर्गंध नाही.

वसाहतवादाच्या काळात कितीतरी देश युरोपीय लोकांच्या सत्तेखाली होते. काळ पुढे सरकला, तसा वसाहतींनी आपलं आपलं स्वातंत्र्य मिळवलं. कुठे रक्तपात झाला, कोणी अहिंसेचा मार्ग स्वीकारला, मार्ग कुठलाही असला तरी स्वातंत्र्य मिळवलं. बाहेरून आलेल्या लोकांना ‘देशप्रेमा’च्या नावाखाली का होईना कसंतरी घालवून देता येतंच, पण घरभेदी लोकांचं काय करायचं असतं, याचं उत्तर अटकेपार झेंडे लावणारे पेशवे आणि शूरवीर राजपुतानादेखील देऊ शकले नाहीत. जिथं कुंपणच शेत खातं, तिथं बुद्धी कुंठीत होऊन जाते. देशांच्या अंतर्गत असलेली धुसफूस, भिन्न समूहांमध्ये धर्म, रंग यावरून होणारे दंगेधोपे आजही सुरू आहेत. सत्ता टिकवण्यासाठी सरकारच या सगळ्याला खतपाणी घालत राहतं, हे तर आता ‘ओपन सिक्रेट’ आहे. भिन्न समूहांमध्ये वंश, वर्ण, धर्म यावरून होणाऱ्या दंगलींना अगदी बलाढ्य अमेरिकाही अपवाद नाही. अगदी कोणीही या विळख्यातून सुटलेलं नाही- ना युरोपीय देश, ना तिसऱ्या जगातले देश. हा सिनेमा या अंतर्गत दंग्यावर, त्याच्या अनुषंगानं पोलिसांवर, तयार होणाऱ्या हिंसेवर गांभीर्यानं भाष्य करतो  

पूर्व पॅरिसमध्ये असलेला Montfermeil हा जिल्हा दंगलीसाठी प्रसिद्ध असतो. सिनेमाची गोष्ट इथेच घडते. जगप्रसिद्ध ‘ला मिझरेबल’ या कादंबरीची गोष्टदेखील इथेच घडते.

स्ट्रीट क्राईम युनिटमध्ये नुकताच जॉईन झालेला स्टीफन, त्याच युनिटमधील दुसरा अधिकारी ग्वाडा आणि त्या युनिटचा हेड असलेला ख्रिस हे गस्त घालण्यासाठी जातात आणि त्यातून पुढे सिनेमा  घडत जातो. अनुभवी ख्रिस १०० टक्के दंगे करण्याऱ्या लोकांशी, त्यांच्या हेडशी वरवरचे मैत्रीचे संबध ठेवून असतो. दंगे होऊ शकतात, याची बातमी लगेच कळावी यासाठी त्यानं आपले खबरे तिथं तयार केलेले असतात. तो अत्यंत अहंकारी आणि उतावळ्या स्वभावाचा असतो. कायदा पाळण्याचा त्याचा अट्टाहास इतका आहे की, ‘आय अॅम द लॉ’ असं ते समोरच्याला म्हणतो.

ग्वाडा हा हिंसक समजल्या जाणाऱ्याच कम्युनिटीचा. शिकून सवरून पोलीस झालेला. कम्युनिटी कशी काम करते याची पाळंमुळं माहिती असलेला. शांत स्वभावाच्या, समजूतदार स्टीफनचा डिव्होर्स होत असतो. त्याच्या मुलाची कस्टडी त्याच्या बायकोकडे जाणार असते. मुलाला भेटता यावं म्हणून त्यानं ही पॅरिसची पोस्टिंग मागून घेतलेली असते.

सत्ताचा माज, तो माज सतत दाखवणारी घाबरट माणसं स्टीफनच्या नजरेतून सिनेमाभर दिसत राहतात. उपनगरात आलेल्या एका सर्कशीतला एका सिंहाचा बछडा एक निग्रो मुलगा पळवतो आणि या छोट्या घटनेतून या सिनेमात हिंसा जी आक्राळविक्राळ रूप धारण करते, त्याने छाती दडपून जाते. वाऱ्याच्या झुळकीनं वादळ तयार व्हावं असं काहीतरी ते आहे. त्याला इतके पापुद्रे आहेत की, किती उकलत जावं कळत नाही.

विशेष म्हणजे ही हिंसा पोलीस/कायदा/सरकार /सत्ता विरुद्ध सतत अन्याय, चीड, अपमान यांनी ज्यांची मनं भरली आहेत, पण पोटं मात्र कायम खपाटीला गेलेली आहेत, अशा लहान मुलांचा आहे.

जो लहान मुलगा सिंहाचा बछडा पळवतो, तो त्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना कसा तरी सापडतो. त्याला ते त्या सर्कशीच्या मालकाकडे घेऊन जातात आणि म्हणतात की, ‘उगीच आता वाद घालत बसू नकोस, तुला तुझं सिंहाचं पिल्लू मिळालं आहे.’ तो मालक ‘हो हो’ म्हणत हळूच बोलता बोलता त्या लहान निग्रो मुलाला थेट एका सिंहाच्या पिंजऱ्यात घेऊन जातो. त्याचं दार चक्क बंद करतो. इकडे पोलीस आरडाओरडा करायला लागतात. तो लहानगा थरथरू लागतो. सिंह गर्जना करत असतो आणि तो सर्कशीचा मालक अशीच अद्दल घडली पाहिजे, या थाटात उभा असतो. हा प्रसंग अंगावर काटा आणतो. हिंसेची बीजं कशी रुजत जातात ते सांगतो.

आपण आजूबाजूला काय तयार करत आहोत, याचा सतत फेरविचार करण्याची किती गरज आहे, हेच हा सिनेमा सुचवतो. इतकी अस्वस्थता, इतकी अशांतता यांचा उगम आपल्या सगळ्यांमधून झाला आहे. व्हिक्टर ह्युगो यांनी आपल्या ‘ला मिझरेबल’ या कांदबरीतून ‘प्रेम आणि करुणा’ यांचा संदेश दिला, ही फिल्मदेखील तोच संदेश अधोरेखित करते.

सिनेमा सुरू होतो, तेव्हा फ्रान्सनं जिंकलेल्या वर्ल्ड कपच्या जल्लोषाचं दाखवलेलं डॉक्युमेंटरी फुटेज किती महत्त्वाचं होतं हे पुन्हा लक्षात येतं. जो सिनेमा संपला तरी डोक्यात सुरू राहतो, तो थोर असतोच. विविध वंश, वर्ण, रंग यांनी एकरूप झालेल्या फ्रेंच संघानं यश मिळवलं होतं. तो देशप्रेमाचा नव्हे तर माणुसकीचा विजय होता. हे सतत स्मरणात ठेवावं लागेल. येणाऱ्या आणि तयार होणाऱ्या पिढीसाठी हे खूप महत्त्वाचं असणार आहे.

.............................................................................................................................................

लेखिका माधवी वागेश्वरी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. 

madhavi.wageshwari@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख