धुरळा : राजकारणाला मध्यवर्ती ठेवून रचलेला कौटुंबिक सत्तासंघर्ष आणि नातेसंबंधांतला भावनिक गुंता
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘धुरळा’चं पोस्टर
  • Sat , 04 January 2020
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie धुरळा Dhurla Sameer Vidwans Kshitij Patwardhan Ankush Chaudhari Sai Tamhankar Siddharth Jadhav Sonali Kulkarni Amey Wagh Prasad Oak Priyadarshan Jadhav Umesh Kamat Alka Kubal-Athalye

आंबेगावचे सरपंच अण्णासाहेबांचं निधन होतं आणि पुढील सरपंच कोण होणार असा पेच निर्माण होतो. अण्णासाहेबांच्या मागे पत्नी ज्योतीआक्का (अलका कुबल) आणि तीन मुलं नवनाथ (अंकुश चौधरी), हनुमंत (सिद्धार्थ जाधव), निलेश (अमेय वाघ) असतात. नवनाथ गावाच्या राजकारणात, हनुमंत उद्योग क्षेत्रात तर निलेश हॉटेल व्यवसायात असतो. तिघांपैकी दोघांची लग्नं झालेली असतात. नवनाथची पत्नी हर्षदा (सई ताम्हणकर), तर हनुमंतची पत्नी मोनिका (सोनाली कुलकर्णी) या दोघी गृहिणी असतात. हरीश गाढवे (प्रसाद ओक) ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. अनेक कुरापती करूनही त्याला यश येत नाही. मात्र अण्णासाहेबांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पेचामुळे अण्णाच्या कुटुंबातूनच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तीन पॅनल तयार होतात. गुण्यागोविंदानं राहणारं कुटुंब राजकारणापायी एका दिवसात फुटतं आणि शेवटी राजकारण्याच्या धुरळ्यात एकमेकांच्या विरोध उभं राहतं.

सिनेमा इथून पुढे प्रत्येक टप्यावर राजकारणातल्या व्यवहारवादाला अधोरेखित करत राहतो. परिणामी ‘पॉलिटिकल ड्रामा’ आणि त्यात होणारी ओढाताण प्रभावीपणे मांडली गेली आहे.

ग्रामपंचायतीच्या राजकारणाला मध्यवर्ती ठेवून रचलेला कौटुंबिक सत्तासंघर्ष आणि नातेसंबंधांतला भावनिक गुंता यात गुंतवून ठेवणारं कथानक वास्तवाच्या जवळ जात राहतं. राजकीय डावपेच हा सिनेमाचा गाभा आहे.

सिनेमा एकाच कुटुंबाभोवती फिरतो आणि गावगाड्यातल्या राजकारणाची ओळख करून देतो. राजकारणाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील प्रत्येकाची राजकीय महत्त्वाकांक्षा एका घटनेनंतर उफाळून यायला लागते. तेव्हा एकमेकांविरुद्ध केला जाणाऱ्या प्रचारापासून ते राजकारणातील डावपेचापर्यंतचा हा घटनाक्रम चांगला जुळून आला आहे.

स्त्री-पुरुषांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा एकाच वेळी भिन्न प्रकारे प्रेक्षकांसमोर येतात. पुरुषसत्ताक राजकीय व्यवस्थेतही स्त्रियांच्या पदरी येणारं दुय्यम स्थान दिग्दर्शकानं अचूक रेखाटलं आहे. त्यावरचं भाष्य म्हणजे प्रवृत्तीत साम्य असेल आणि हाती सत्ता असेल तर स्त्रियादेखील वर्चस्ववादी भूमिका घ्यायला लागतात. यादृष्टीनं मोनिका हे पात्र समर्पक ठरतं. तर दुसरीकडे हनुमंत हा पुरुष भावनिक पातळीवर हतबल झालेला दाखवलेला आहे. दोन्हीत असलेलं साम्य आणि विरोधाभास कथानकाला परिणामकारक ठरवतात.

दूध डेअरी, लघुउद्योग, पाणी प्रश्न, महिला बचत गट यासारख्या घटकांचा उपयोग कथानकाच्या अनुषंगाने करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले आहेत. मर्यादितपणे जातवास्तवावर केलेलं भाष्य असेल किंवा पुढारी पाळत असलेल्या अंधश्रद्धांवर टाकलेला प्रकाश असेल, यासारख्या प्रसंगांमुळे सिनेमाचा उभा-आडवा विस्तार लक्षात येतो. संवाद या सिनेमाचा तगडा आधार आहे. एका दृश्यात परिस्थितीसमोर झुकलेला हनुमंत म्हणतो, ‘अक्कल असण्यात समाधान नाही. त्यापेक्षा बेक्कल असण्यात समाधान असतं.’ याचप्रमाणे राजकारणामुळे कुटुंबात निर्माण झालेल्या दरीला अधोरेखित करताना एका ठिकाणी हर्षदा मोनिकाला म्हणते, ‘राजकारण रक्तात असणं हे क्वॉलिफिकेशन नाही, तर ती एक जबाबदारी आहे.’

विनोदी संवाद आणि हळूहळू उलगडत जाणारी नाजूक अशी गोष्ट अनेक वळणं घेत शेवटाकडे जाते. अर्थात त्याचा उपयोग चित्रण मनोरंजक आणि रहस्यमय पद्धतीनं रंगवण्यासाठी दिग्दर्शकानं अत्यंत खुबीनं केला आहे.

कॅमेऱ्याचा सफाईदारपणे केलेला वापर आकर्षक दृश्यरचनेला कारणीभूत ठरतो. प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, अमेय वाघ यांनी आपल्या भूमिकांना चांगला न्याय दिला आहे. अलका कुबल यांच्या अभिनयातला चढउतार आणि देहबोली यामध्ये मात्र अंतर जाणवत राहतं. बाकी छोट्या व्यक्तिरेखांसाठी घेतलेली पात्रंही प्रभावी आहे.

‘आनंदी गोपाळ’ या सिनेमाचं दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्या शैलीची वेगळी झलक या सिनेमातून पाहायला मिळते. यंदाच्या पहिल्याच सिनेमात समीर विद्वांस आणि क्षितिज पटवर्धन या दिग्दर्शक-लेखक जोडीने समकालीन राजकीय क्षेत्राला मध्यवर्ती ठेवून उडावलेला ‘धुरळा’ राजकीय संस्कृतीचं स्थान अधिक ठळक करतो, मर्यादित अर्थानं सामाजिक पातळीवर घडणाऱ्या राजकीय जागृतीचा प्रयोग ठरतो.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख