‘गुड न्यूज’ : या चित्रपटाला ‘विकी डोनर’, ‘बधाई हो’ बनायचं असलं तरी त्याचा तसा प्रौढ दृष्टिकोन, तशी संयत मांडणी नाही!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘गुड न्यूज’चं पोस्टर
  • Sat , 28 December 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie गुड न्यूज Good Newwz अक्षय कुमार Akshay Kumar कियारा अडवानी Kiara Advani करीना कपूर Kareena Kapoor दिलजित दोसांज Diljit Dosanjh

‘विकी डोनर’ (२०१२) आणि/किंवा ‘बधाई हो’ (२०१८) या ‘गुड न्यूज’मागील ठळक प्रेरणा असाव्यात. भारतीय सामाजिक भोवतालात टॅबू मानल्या जाणाऱ्या विषयाला विनोदाचं कोंदण घालत एक हलकाफुलका सामाजिक चित्रपट (हा एक नवीन चित्रपट प्रकार गेल्या काही वर्षांत निर्माण झाला आहे!) निर्माण करणे, हा आयुष्मान खुरानाचा फॉर्म्युला हल्ली अक्षय कुमारच्या फिल्मोग्राफीतही दिसून येतो. ‘गुड न्यूज’ साधारण त्याच वळणावर जाणारा आहे. तो अक्षय कुमारला त्याच्या जुन्या, विनोदी कलाकाराच्या भूमिकेत नेण्याचा प्रयत्न करणारा आहे. खोटं कशाला बोला, पण वेळोवेळी तो हे यशस्वीपणे साध्य करतोही. मात्र, चित्रपटाचं पोकळ कथानक आणि उथळ मांडणी यांमुळे सदर चित्रपट त्यामागील प्रेरणा असलेल्या चित्रपटांचं नाक कापणारा ठरतो, असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. 

‘गुड न्यूज’ कर्कश्श पार्श्वसंगीत (या संगीतास अग्रसंगीत का म्हटलं जाऊ नये असा प्रश्न पडतो), उथळ पंजाबी गाणी, तोंडी लावण्यापुरते विनोद आणि त्यांना सोबत करणारे सामाजिक संदेश अशा गुणविशेषणांनी नटलेला आहे. शिवाय इथला उथळपणा इथल्या पात्रांमध्येही निपजलेला आहे. दीप्ती (करीना कपूर) आणि वरुण बत्रा (अक्षय कुमार) या जोडप्याचं लग्न होऊन सात वर्षं होऊनही त्यांना मूल होत नसल्याने ते त्रस्त आहेत. साहजिकच संभोग या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत बरेचसे विनोद होतात.

आता इथूनच चित्रपटकर्त्यांची विषय मांडताना होत असलेली गफलत दिसून येते. कारण, त्यांना प्रश्न दिसतात, ते मांडायचे आहेत हेही दिसतं. मात्र, ते कसे मांडायचे हे कळत नाही, आणि ते मांडताना किमान संवेदनशीलता आणि तार्किक दृष्टिकोन दाखवायचा या गोष्टींचा त्यांना विसर पडतो. परिणामी केवळ सामाजिक, कौटुंबिक दडपणामुळे मुलं जन्माला घालायची का, असे प्रश्न इथे उपस्थित जरूर केले जातात. मात्र त्यांना लागलीच केराची टोपली दाखवली जाते आणि त्यांची जागा काही अपेक्षित, स्वाभाविक विनोद घेतात. साहजिकच समोरील पात्रांनी सेक्स म्हटलं की हसायचं, सेक्स पोजिशन्स म्हटलं की हसायचं अशी मानसिकता असलेल्या प्रेक्षकवर्गाला समोर ठेवून निर्माण केलेला हा चित्रपट असल्याने यात वावगं असं काहीच नाही. 

हे बत्रा कुटुंब जोशी नामक डॉक्टर दांपत्याला (आदिल हुसेन-टिस्का चोप्रा) भेटून इन व्हिटो फर्टिलायजेशन ऊर्फ ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाद्वारे अपत्यप्राप्तीच्या शक्यता पडताळू लागतं. जवळपास तासाभरानंतर चित्रपट मूळ मुद्द्याकडे येतो, तो म्हणजे आणखी एक बत्रा कुटुंब, हनी (दिलजित दोसांज) आणि मोनिका बत्रादेखील (कियारा अडवानी) याच समस्येमुळे याच डॉक्टरकडे उपचार घेत असतात. अपेक्षित ती घटना घडते आणि एकाच्या शुक्राणूंमुळे दुसऱ्याच्या पत्नीला गर्भधारणा होते.

इथली बहुतांशी विनोद्युत्पत्ती ही हनी आणि मोनिकाच्या (हिंदी चित्रपटकर्त्यांच्या दृष्टीने) टिपिकल पंजाबी आणि काहीशा मागास राहणीमानातून निर्माण होतो. कारण, बॉलिवुडमधील चित्रपटकर्त्यांच्या दृष्टीने एखाद्या व्यक्तीच्या पंजाबी असण्याचे काही ठरावीक संकेत/नियम असतात. सदर चित्रपटात ते अलिखित नियम पाळूनच हे पंजाबी जोडपं नि त्याचे इतर नातलग उभे केले जातात. उथळ पात्रं इथल्या पोकळ कथानकाचा एक अविभाज्य भाग बनतात. पोकळ यासाठी की सव्वा दोन तास लांबी असलेला चित्रपट मध्यवर्ती विषयाला केवळ हलकासा स्पर्श करतो. इतर वेळ या दोन्ही जोडप्यांतील द्वंद्व आणि दीप्ती-वरुण या मुंबईतील उच्चभ्रू पंजाबी जोडप्याने हनी-मोनिका या चंदिगडमधील जोडप्याची निंदानालस्ती करण्याची दृश्यं दिसत राहतात. उदाहरणार्थ, या दोघांचे चुकीचे इंग्रजी उच्चार इथे विनोदनिर्मितीचं एक साधन बनतात. 

गैरसमजातून निर्माण झालेले विनोदी प्रसंग आणि अक्षय कुमार हे नक्कीच एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. कारण, अक्षय कुमार हा एक उत्तम विनोदी अभिनेता आहे यात शंकाच नाही. ‘गुड न्यूज’मध्येही वेळोवेळी याची झलक दिसत असते. चित्रपटातील अर्धाअधिक भाग दिलजित आणि कियारा समोर येताच त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे हावभाव याची ग्वाही देण्यास पुरेसे आहेत. मात्र चित्रपटकर्त्यांचा काहीसा बेजबाबदार आणि असंवेदनशील दृष्टिकोन, रटाळ कथानक या गोष्टींपुढे अक्षय कुमार आणि इतरही कलाकारांचे प्रयत्न अयशस्वी ठरतात. कपूरचं पात्र एके ठिकाणी ‘गर्भपात म्हणजे खून आहे’ अशा अर्थाचं वाक्य म्हणतं. आणखी एका ठिकाणी ही दोन्ही जोडपी मूल दत्तक का घेत नाहीत, हा प्रश्न ‘अपना खून तो अपना खून होता हैं ना जी’ या तद्दन फिल्मी संवादाच्या निमित्तानं बाजूला पडतो. 

मुळात चित्रपटकर्त्यांचा दृष्टिकोनही गोंधळलेला आहे. एक म्हणजे विनोद आणि गंभीर छटांमध्ये समतोल इथं नाही. दुसरं म्हणजे चित्रपट शेवटाकडे जाताना अचानक नको तितका गंभीर होतो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे सदर चित्रपटाला ‘विकी डोनर’/‘बधाई हो’ बनायचं असलं तरी तसा प्रौढ दृष्टिकोन, तशी संयत मांडणी इथे अस्तित्वात नाही. इथलं पार्श्वसंगीत आणि गाणी या संयततेच्या अभावाची उत्तम उदाहरणं आहेत. अधिक संयत हाताळणीने चित्रपटाला किमान सहन करण्यालायक बनवलं असतं. 

राज मेहता दिग्दर्शित ‘गुड न्यूज’ म्हणजे या वर्षातील शेवटची ‘बॅड न्यूज’ आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख