सागर सरहदी : जीवनात इतके चढउतार अनुभवूनही हा माणूस आजही वटवृक्षासारखा उभा आहे!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
नितिन साळुंखे
  • सागर सरहदी आणि त्यांच्या कभी कभी, बाजार, चौसर या चित्रपटांची पोस्टर्स
  • Sat , 21 December 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie सागर सरहदी Sagar Sarhadi कभी कभी kabhi kabhi बाजार ‌Bazaar चौसर Chausar दिवाना कहो ना प्यार है Kaho Naa Pyaar Hai नुरी Noorie चांदनी Chandni सिलसिला Silsila

२८-२९ डिसेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या ‘इंटरनॅशनल कल्चरल आर्टिफॅक्ट फिल्म फेस्टिव्हल’मध्ये लेखक-दिग्दर्शक सागर सरहदी यांना प्रसिद्ध हिंदी लेखक असगर वजाहत यांच्या हस्ते ‘जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने सागर सरहदी यांचे जीवन व कलात्मक योगदान यांचा आढावा घेणारा हा लेख...

.............................................................................................................................................

सागर सरहदी हे अनेक सुपरहिट सिनेमांचे लेखक. रोमँटिक सिनेमाचे बादशहा असलेल्या यश चोपडा यांच्या टीममधील एक महत्त्वाचे सर्जनशील सदस्य आणि ‘बाजार’ या कलात्मकदृष्ट्या उत्कृष्ट आणि व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असलेल्या आणि क्लासिक चित्रपटात गणना केल्या जाणाऱ्या सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते. असे असले तरी त्यांच्याबद्दल मात्र आपल्याला सरळधोपट कल्पना रंगवता येणार नाही. सिनेमाच्या भपकेबाज दुनियेत ते आपल्याला सापडणार नाहीत. ‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘कहो ना प्यार है’, ‘नूरी’, ‘दिवाना’सारख्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या अनेकानेक चित्रपटांच्या कथा-पटकथा-संवाद लिहिणारे ८६ वर्षे वयाचे सागर सरहदी यांचं घर जुहूसारख्या ठिकाणी किंवा एखाद्या उचभ्रू पॉश एरियात शोधूनही सापडत नाही. अशा ठिकाणी रमणारं हे व्यक्तिमत्त्व नाही. त्यांच्याशी ‘रूबरू’ व्हायचं असेल तर तुम्हाला जावं लागेल मुंबईतील सायनजवळील कोळीवाड्याकडे. कारण त्यांना सर्वसामान्य माणसांत राहायला आवडतं. त्यांच्या सुखदुःखाशी समरस होण्यातच त्यांच्या कलात्मक प्रेरणा आहेत.

कोळीवाड्यात तुम्ही पोहोचलात की, म्हाडाच्या एका साध्याशा अपार्टमेंटमधील तळमजल्यावर दोन खोल्यांच्या एका फ्लॅटमध्ये पांढरा शुभ्र कुर्ता आणि चौकड्याची लुंगी पेहनलेले सागर सरहदी तुम्हाला भेटतील. पांढरी शुभ्र मिशी, दोन दिवसांची वाढलेली दाढी आणि समुद्रफेसासारखे पांढरेशुभ्र केस. तुम्ही त्यांच्या फ्लॅटमध्ये गेलात तर आत जाता क्षणी तुम्ही अवाक व्हाल, पुस्तकांची संख्या पाहून आणि एक ओझरती नजर फिरवल्यावर पुस्तकांचे प्रकार पाहून. कादंबरीपासून ते नाटक, एकांकिका, कवितांपर्यंत, मानसशास्त्रापासून ते तत्त्वज्ञानापर्यंत. काचेच्या आड कपाटात व्यवस्थितपणे लावलेली अनेक प्रकारची असंख्य पुस्तके. बैठकीच्या खोलीत किमान आवश्यक तेवढेच फर्निचर. दोन जुन्या खुर्च्या आणि एक टेबल. भिंतीवर सरहदी यांचा गाजलेला चित्रपट ‘बाजार’च्या पोस्टरची एक फ्रेम. आणखी एक पोस्टर त्यांच्या ‘लोरी’ या चित्रपटाचे. समोरच्या भिंतीवर त्यांचा अजून प्रदर्शित व्हायचा आहे, त्या ‘चौसर’ चित्रपटाचे एक पोस्टर. पोस्टरवर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अमृता सुभाष यांच्या प्रतिमा. पण चित्रपट २००४ पासून तयार होऊन डबाबंद. वितरकाच्या प्रतीक्षेत. 

घरात असंख्य पुस्तकांशिवाय  चित्रपट आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक पुरस्कार, पदके, फिल्मफेअरच्या बाहुल्या यांची लाकडी शेल्फमध्ये भाऊगर्दीच उसळलीय. रोज येणारी अनेक वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचे अंक. त्यातील कात्रणे काढून झाल्यावर जुनी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांचा व्यवस्थितपणे बांधलेला एक गठ्ठा पाठवणीची वाट बघत एका कोपऱ्यात शेजारी निमूटपणे बसलाय. शेजारच्या खोलीत एक छोटा बेड आणि उर्दू, हिंदी आणि इंग्रजीतील शब्दशः हजारो पुस्तके सागवानी लाकडाच्या कपाटात व्यवस्थितपणे लावलेली आहेत. जणू तुम्ही घरात नाही, लायब्ररीत आहात.

सागर सरहदी हे केवळ सुपरहिट सिनेमांचे सर्जकच नाहीत, तर ते उर्दू आणि हिंदीतील एक सिद्धहस्त कथाकार आणि नाटककारसुद्धा आहेत. खरं तर ते मूळचे नाटककारच, पण दोन वेळच्या जगण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सिनेमाकडे वळलेले आणि तिथेसुद्धा लेखक-दिग्दर्शक म्हणून न मिटणारा असा कालातीत शिक्का उमटवलेले असे कलावंत.

सागर सरहदी यांचा जीवनप्रवास मोठ्या स्थित्यंतरांचा आणि अनेक रोमांचक वळणांचा आहे. आत्ता पाकिस्तानात असलेल्या अबोटाबाद जवळच्या बाफ्फा नावाच्या छोट्या शहरात राहणाऱ्या वाढत्या वयाच्या गंगासागर तलवार नावाच्या या मुलाला चित्रपट बघण्याचा नादच होता. एकदा ‘हीर-रांझा’ दुसऱ्या वेळी बघून घरी परतत असताना थोरल्या भावानं हटकलं आणि विचारलं, ‘तू तो सिनेमा दुसऱ्यांदा बघायला पैसे वाया का घालवलेस?’ त्या मुलाकडं त्यावेळी याचं उत्तर नव्हतं. सिनेमाची ही आवड एक दिवस त्याला सिनेमा लिहिण्याकडं आणि दिग्दर्शित करण्यापर्यंत घेऊन जाईल, याची त्यावेळी त्याला जाणीवही नव्हती. १९३३मध्ये तेव्हाच्या फाळणीपूर्व ब्रिटिश अंमलाखालील भारताच्या नॉर्थ ईस्ट फ्रंटीयर (इशान्य सरहद्द प्रदेश) भागात या गंगासागर तलवारचा जन्म झाला. त्या सरहद्द भागाशी स्वतःची ओळख, नाळ जपण्यासाठी पुढे त्यांनी  स्वतःचे नाव सागर सरहदी, असे बदलले.   

भारत पाक फाळणीनंतर सुरू झालेल्या भयानक दंगलीत कसा तरी जीव वाचवून त्यांचे कुटुंब रिफ्युजी (विस्थापित) बनून दिल्लीला पोहोचले. तिथं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सरहदी पुढील शिक्षणासाठी मुंबईला त्यांच्या भावाकडे आले. त्याने तिथं कपड्याचं दुकान सुरू केलं होतं. तिथे त्यांनी खालसा कॉलेजात प्रवेश घेतला. तिथं गुलज़ार त्यांना सीनिअर होते. सरहदी मुलाखतीत सांगतात- ‘गुलज़ार नजाकतदार उर्दू बोलायचे आणि सतत मीर आणि गालिब यांचा संदर्भ द्यायचे. त्यांचे शेर ऐकवायचे. माझं वाचन खूप कमी आहे असं मला तेव्हा तीव्रतेनं जाणवलं.’ सरहदी यांनी मग वाचनाला सुरुवात केली. वाचताना त्यांना असं लक्षात आलं की, इंग्रजी भाषा आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जगातलं उत्तमोत्तम साहित्य तर इंग्रजीतच आहे. मग इंग्रजीवर प्रभुत्व मिळावं यासाठी सरहदी यांनी शेवटच्या वर्षासाठी सेंट झेवियर्स कॉलेजात जाणं पसंत केलं. पण जगण्याची भ्रांत आणि वणवण यामुळे ते पुढे शिकू शकले नाहीत. कॉलेज सुटलं, पण जीवनाच्या पाठशाळेत मात्र त्यांचं शिक्षण अहोरात्र चालू होतं.

फाळणीचे किती भयंकर परिणाम झाले, याचं सरहदी हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे. प्रतिष्ठित, यशस्वी आणि वैभवशाली आयुष्य जगलेल्या त्यांच्या वडिलांची तर जणू जीवनेच्छाच फाळणीनंतर संपून गेली. सरहदी एके ठिकाणी म्हणतात की, तुम्ही एखादा डेरेदार वृक्ष उपटून तो भलतीकडंच कुठंतरी जमिनीत खुपसला तर तो सुकतच जाणार, तसं त्यांचं झालं. वडील गेल्यावर सरहदी यांच्या भावावर सगळी जबाबदारी आली. त्याचं उत्पन्नही तसं जेमतेमच होतं. सरहदी मग एका शैक्षणिक संस्थेत शिकवण्याचं काम करायला लागले. पण तिथं मोबदला अगदीच कमी होता. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करण्याचाही विचार केला. पण पहिल्याच दिवशी पाठीमागे घेताना त्यांची टॅक्सी खांबाला धडकली. मग त्यांनी एका टायपिंग इन्स्टिट्यूटमध्ये अर्धवेळ काम सुरू केलं. तिथं त्यांचं तसं बरं चाललं होतं. पण ते कायम आणि नेहमीच इंग्रजी ‘ई’ या अक्षराऐवजी ‘आर’ हे अक्षर टाईप करायचे. अनेकदा त्यामुळं शब्दाचा अर्थच पूर्णपणे बदलून जाई. सतत वाचन, चिंतन-मनन  करणाऱ्या, पुस्तकांच्या दुनियेत रमणाऱ्या आणि त्यासाठी फूटपाथ धुंडाळणाऱ्या सरहदी यांना शेवटी टायपिस्टच्या त्या कामावरून काढून टाकण्यात आलं. 

पैशासाठी जगणं नको तर जगायला जेवढा आवश्यक तेवढा पैसा मिळाला तरी पुरे, असं या मनस्वी कलावंताला वाटतं. ते म्हणतात की,  त्या काळी वणवण भटकतांना मी विचार करायचो की, आपण फक्त लिहू शकतो आणि लिहिण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात कोणतीच तडजोड नको. त्यांची लिहिण्याची आवड एक दिवस त्यांना ग्रँट रोडवरच्या रेड फ्लॅग हॉलकडे घेऊन गेली. तिथं प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएशनचं ऑफिस होतं. प्रत्येक रविवारी तेथे साहित्यविषयक चर्चा व्हायच्या. थोर उर्दू साहित्यिक राजिंदर सिंग बेदी, इस्मत चुगताई, के. ए. अब्बास, अली सरदार जाफरी, कैफी आझमी यांच्यासारखे अनेक साहित्यिक तिथं कथा, साहित्याचं वाचन करायचे.

सरहदी सांगतात, या सर्वांच्या उंच ऊबदार पोषक छायेत मला राहायला मिळालं, हे माझं भाग्य आहे. लिखाणातले बारकावे तर त्यांनी मला सांगितलेच, पण त्यांनी मला हे शिकवलं की, इतरांच्या वेदनांविषयी आपल्याला सहअनुभूतीची पूर्ण जाणीव नसेल तर आपलं अस्तित्व व्यर्थ आहे. तो काळ इप्टाचा होता. इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशनच्या सांस्कृतिक चळवळीत अनेक दिग्गज लेखक कलावंत सक्रिय होते. कलेसाठी कला नको तर जीवनासाठी कला असावी, जीवन बदलण्यासाठी तिची बांधिलकी असावी. कलावंताची नाळ शेतकरी आणि सर्वहारावर्गाशी जोडणार्‍या ख्वाजा अहमद अब्बासपासून ते साहिर लुधियानवीसारख्या महान लेखक कलावंतांचा सहवास त्यांना लाभला.

म्हणून सरहदी एवढे यश मिळवूनही सिनेमाच्या बाजारू दुनियेत कधीच वाहत गेले नाहीत. लेखणीत दम आहे म्हणून त्यांनी तिला पैसे, मानमरातब मिळवण्यासाठी वापरले नाही. भौतिक सुख साधने त्यांना क्षुल्लक वाटतात. ते सतत एक अस्वस्थता घेऊन जगतात. कलावंताची सर्जनशील अस्वस्थता. आजही वयोवृध्द अवस्थेत त्यांची ती अस्वस्थता तसूभरही कमी झालेली नाही. हे आजच्या फिल्ममेकर्सना बोध घेण्यासारखं आहे. जीवनात इतके चढउतार अनुभवून हा माणूस आजही वटवृक्षासारखा उभा आहे. असा वटवृक्ष ज्याच्या सावलीत अनेक नवसर्जक विसावून, नवी प्रेरणा घेऊन कलेच्या प्रांतात भरारी घेऊ शकतात. 

उर्दू लेखकाला जगण्याइतके पैसे मिळत नाहीत, हे व्यवहारातलं वास्तव लक्षात आल्यावर त्यांनी वेगळा विचार करायला सुरुवात केली. आणि दीर्घ संघर्षानंतर १९७० साली त्यांना पहिली संधी मिळाली. ‘पत्नी’ या चित्रपटाच्या लेखनाचं काम त्यांना मिळालं. कपिल कुमार यांच्या साथीनं १९७१ मध्ये बासू भट्टाचार्य यांच्या ‘अनुभव’ चित्रपटाचे संवाद लिहिले. यानंतर १९७२ मध्ये ‘सवेरा’ आणि १९७४ मध्ये ‘आलिंगन’ हे दोन कमी बजेटचे चित्रपट केले. मुंबईतील तेजपाल ऑडिटोरियममध्ये ‘मिर्झा साहिबान’ हे सरहदी यांचं नाटक होतं. त्यांचं नेटकं दिग्दर्शन आणि तिखट संवाद यांनी प्रभावित झालेल्या प्रेक्षकांमध्ये एक होते, यश चोप्रा. त्यांनी विचारलं, ‘तुम्ही माझ्यासाठी चित्रपटाची कथा लिहाल काय?’ आणि मग १९७६ सालच्या ‘कभी कभी’ चित्रपटानं इतिहास घडवला.

त्याच्या यशानंतर सरहदी यांच्याकडे चित्रपटाच्या कथेसाठी निर्मात्यांची रांग लागली. पण त्यांनी नम्रपणे सर्वांना नकार दिला. त्यांना टाईपकास्ट व्हायचे नव्हते. पैसे मिळतात म्हणून त्याच त्याच प्रकारच्या रोमॅंटिक कथांचा रतीब टाकायचा नव्हता. त्यांना जगण्यासाठी आवश्यक तेवढाच पैसा हवा होता. मूलतः वाचन आणि लिखाण करण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त वेळ हवा होता. त्याच काळात त्यांनी यश चोप्रांना यशाच्या शिखरावर नेलेल्या ‘नूरी’ (१९७९), ‘सिलसिला’ (१९८१) आणि ‘चांदनी’ (१९८९) या चित्रपटांचं लेखन केलं.

पैसा, प्रसिद्धी, पुरस्कार भरभरून मिळत असतानाही व्यावसायिक चित्रपटांत सरहदी यांना समाधान मात्र मिळत नव्हतं. एक दिवस वर्तमानपत्रातील एका छोट्या मथळ्यावर त्यांची नजर पडली. हैदराबाद येथील लहान मुलींचं पैशासाठी प्रौढ अरबांशी लग्न लावून दिलं जात असल्याबद्दलची ती बातमी होती. स्त्री स्वातंत्र्याचे कडवे पुरस्कर्ते असलेले सरहदी ती बातमी वाचून प्रचंड अस्वस्थ झाले. याच्या मुळाशी जायचं, असं त्यांनी ठरवलं. ते हैदराबादला गेले. तेथील पत्रकार, लेखक आणि या फसव्या लग्नांच्या बाजाराची माहिती ज्यांना आहे, अशा लोकांना भेटले. गरीब घरातल्या मुली खोट्या लग्नाच्या सापळ्यात कशा अडकवल्या जातात आणि नंतर त्यांना भोगून झाल्यावर त्यांचा कंटाळा आला म्हणून त्यांचे तथाकथित नवरे या मुलींना कसं वाऱ्यावर सोडून देतात, हे त्यांनी शोधून काढलं. अशा एका गरीब मुस्लीम युवतीच्या लग्नाला ते हजरही राहिले. प्रौढपणा संपत आलेल्या एका जरठ पुरुषाशी तिचा विवाह लावून दिला गेला. हे सगळं पाहून ते वेदनेनं पिळवटून गेले. जेव्हा त्यांच्याकडे पुरेशी माहिती जमली, तेव्हा सुरू झाली एका अद्वितीय चित्रपटाच्या जन्माची कहाणी – ‘बाजार!’

मुंबईतील त्यांच्या मित्रांना त्यांनी या चित्रपटाची कथा ऐकवली. त्या सर्वांना वाटत होतं की, हा चित्रपट चालणार नाही! व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरणार! त्यांनी सरहदी यांना समजावलं. हा धोका पत्करू नये असा सल्ला दिला, पण सरहदी ठाम होते. ते अजिबात डगमगले नाहीत. त्यांनी स्वतः जवळचे सर्व पैसे जमवले. कमी पडतात म्हणून मित्रांकडून काही रक्कम उभी केली आणि तो पैसा चित्रपटाच्या निर्मितीत गुंतवला. त्या गरीब मुस्लीम मुलींच्या पिळवणुकीची कथा आणि व्यथा जगासमोर मांडण्यासाठी त्यांच्याकडे हा एकच मार्ग होता. नसिरुद्दीन शाह, भरत कपूर, फारुख शेख आणि स्मिता पाटील, सुप्रिया पाठक असे कसलेले संवेदनशील कलाकार घेतले. गंमत म्हणजे यातील काही कलाकारांकडून तर त्यांनी उधारीवर काम करून घेतलं. म्हणजे सिनेमा रिलीज झाल्यावर त्यांना मानधन दिलं. साल होतं १९८२. सरहदी यांनी अनेक हिट चित्रपटांचं लेखन केलेलं असलं तरी दिग्दर्शन करण्याचा तो त्यांचा पहिला अनुभव होता. त्यात त्यांनी सर्वांवरच छाप पाडली. त्यांच्या अफाट वाचनामुळं आणि स्वतः मुळातून माहिती घेऊन त्यावर दीर्घ विचार केलेला असल्यानं ते प्रसंग त्यांच्या मानसपटलावर आधी उमटायचे आणि मग त्यानुसार ते चित्रीकरण करून घ्यायचे.

या चित्रपटातील गीतांसाठी सरहदी आणि संगीतकार खय्याम यांनी एक वेगळाच प्रयोग केला. अवीट गोडी असलेली ही गाणी कशी निर्माण झाली असतील, याचा तपशील रंजक आहे. मिर्झा शौख यांच्या, ‘जहर-ए-इश्क’ या दोनशे वर्षे जुन्या पुस्तकातून ‘देख लो आज हमको जी भर के’ हे गीत घेण्यात आलं. ‘दिखायी दिये यूं के बेखुद किया’ हे मीर तकी मीर यांचं, तर ‘फिर छिडी रात, बात फुलों की’ हे काव्य तर तेलंगणा मुक्ती संग्रामात प्रत्यक्ष भाग घेतलेल्या शायर मखदुम मोहिनुद्दीन यांचं आहे. खय्याम यांच्या मखमली चालींनी या गीतांवर जादू केली. ही गाणी म्हणजे अप्रतिम संगीताचा अनमोल ठेवा आहेत. एव्हढे असले तरी  सुरुवातीला 'बाजार' साठी वितरकच मिळेना. पण जेंव्हा तो प्रदर्शित झाला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. सरहदी यांना पाकिस्तानातून येणाऱ्या फोन कॉल्सचं आणि भेटायला येणाऱ्या लोकांचं प्रमाण अचानक अतोनात वाढलं. या चित्रपटानं पाकिस्तानी जनमानसही हलून गेलं. तिथं तर स्त्रिया आणि मुलींच्या अशा शोषणाला अंतच नव्हता.

विशेष म्हणजे इतक्या रोमॅंटिक सिनेमांच्या कथा आणि मनात उतरणारे संवाद लिहिणार्‍या सागर सरहदी यांनी कधीच विवाह केला नाही. ते म्हणतात- “मी तरुण होतो तेव्हा आर्थिक स्थितीमुळे लग्न करणं मला परवडत नव्हतं आणि जेव्हा माझं जरा बरं चालायला लागलं, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, विवाहसंस्थेच्या चौकटीत आता मी बसू शकत नाही. काही स्त्रिया माझ्या आयुष्यात आल्या. त्यांनी खूप भरभरून मला प्रेम दिलं. मी त्यांचा खूप सन्मान करतो. पण त्यांना मुलाबाळांसह स्थिर आयुष्य जगायचं होतं. मग त्या आल्या तशाच माझ्या आयुष्यातून निघूनही गेल्या. मात्र मी एकाही स्त्रीला जा म्हटलं नाही.”

कला आणि आदर्शवाद यांच्यासाठी एकाकीपणा ही सरहदी यांनी मोजलेली फार मोठी किंमत आहे. ते सतत वाचनात गढलेले असतात किंवा त्यांना सुचलेल्या कथेबद्दलच्या नवीन कल्पना त्यांच्या डायरीत नोंदवून ठेवण्यात गर्क असतात. दिग्दर्शक असलेल्या पुतण्या रमेश तलवार यांच्या अंधेरी येथील ऑफिसमध्ये ते रोज जातात. त्यासाठी त्यांना तीन वेळा लोकल बदलावी लागते. ते रोज पायी चालतात किंवा बसने प्रवास करतात. कारण त्यांना सामान्य माणसाच्या जगण्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो.

शाहरुख खानला ‘दीवाना’मधून आणि हृतिक रोशनला ‘कहो ना प्यार है’मधून ज्या लेखकानं सुपरस्टार बनवलं, त्याला आज संपूर्ण चित्रपटसृष्टीच जणू विसरून गेली आहे. “काही नवीन लोकांव्यतिरिक्त कोणीही मी जिवंत आहे का मेलोय, याची साधी चौकशीसुद्धा करायला येत नाही,” असे ते हसत हसत चेहर्‍यावर विषादाची कोणतीही छटा न आणता सहजपणे  सांगतात.

चांगला चित्रपट, त्यांच्याशी बोलताना सतत त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडतात. त्यांच्या मते चांगला चित्रपट म्हणजे सामाजिक वास्तव मांडणारा आशयघन असा चित्रपट जो जीवनाचे सर्व रंग चितारतो. जो संगीताच्या पातळीवर दर्शकला नवी अनुभूती देतो. असा चित्रपट आजही त्यांच्या मनात तरळत असतो. वास्तव कितीही नकारात्मक असले. चित्रपटनिर्मितीची कोणतीच साधने आज त्यांच्या हातात नसली. त्यांच्या शैलीला झाकोळून टाकणार्‍या अनेक बाजारू चित्रपटांचा रोज रतीब पडत असला तरी सागर सरहदी यांनी या वयोवृद्ध अवस्थेतही आशा सोडलेली नाही. ते एकटे एकाकी जगतात. स्वयंपाक करणारी एक कामवाली मुलगी दुपारी येऊन दोन्ही वेळचे जेवण बनवून जाते. दुपारी उरलेले जेवण ते रात्री जेवतात. मध्यरात्रीपर्यंत सिनेमा निर्मितीवर चिंतन-मनन-वाचन करतात आणि अनंत स्वप्नं उशाशी घेऊन झोपी जातात.

झगमगाटी, भपकेबाज आणि काहीशा बेदर्दी अशा सिनेक्षेत्रातला असा हा सर्जनशील सागर काय म्हणतो, “आपण एका रंगहीन जगात जगत आहोत. पण जर आपण आशा सोडून दिली, तर आपण जगण्याची आणि काम करण्याची इच्छाही गमावून बसू!”

.............................................................................................................................................

नीतिन साळुंखे

salunkheneetin@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......