‘बिबट्या’ : पितृसत्ताक व्यवस्थेला वेशीवर टांगणारा लघुपट
कला-संस्कृती - चलत्-चित्र
राहुल पैठणकर
  • ‘बिबट्या’चं पोस्टर
  • Sat , 21 December 2019
  • कला-संस्कृती चलत्-चित्र बिबट्या BibtyaThe Leopard गार्गी कुलकर्णी Gargi Kulkarni नागराज मंजुळे Nagraj Manjule

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील राष्ट्रीय फिल्म संग्रलायात नागराज मंजुळे (निर्माते) व गार्गी कुलकर्णी दिग्दर्शित ‘बिबट्या’ लघुपट पाहिला. लघुपटातील पात्रांची निवड, आशय आणि संवाद प्रचंड ताकदीचे आहेत. या लघुपटाची सुरुवात गावात बिबट्या घुसलाय आणि काय प्रकारे संपुर्ण गाव घाबरलयं यापासून होते. सुरुवातीच्या या दृश्यापासूनच प्रेक्षक म्हणून मनात अनेक प्रश्नाचं काहूर माजायला सुरुवात होते. जसे बिबट्ययामुळे जिवितहानी तर होणार नाही ना? का बिबट्याच मारला जाईन? बिबटे जंगलातून गाव-शहरांकडे का यायला लागलेत? गावं, शहरं, रस्ते आणि उद्योग जंगलांवर आक्रमण तर करत नाहीयेत ना? जंगलं का तोडली जातायत? असे अनेक प्रश्न लघुपट पाहताना समोर यायला लागतात.

आज गाव- शहरांत घुसलेले अनेक बिबटे संपवले जातायत. उदाहरण म्हणून अवनी वाघिणीचा किस्सा सांगता येईल. त्यामुळे बिबट्याची संख्या कमी होत चाललीय. अशाने बिबट्यासारख्या प्राणांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. अशा अनेक प्रश्नावर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या एकाच वेळेस हा लघुपट भाष्य करतो. परंतु मी एवढ्या मुद्यापुरतच या लघुपटाकडे न पाहता लिंगभाव परिप्रेक्ष्यातून (जेंडर पर्सपेक्टिव) लघुपट समजावून घ्यायचा प्रयत्न करतोय. 

हा लघुपट पितृसत्तेवर मार्मिकपणे भाष्य करतो. मी समाजशास्त्र विषयाचा विद्यार्थी आहे. समाजशास्त्र ज्ञानशाखा आपल्याला सामान्यज्ञानाच्या पल्याड पाहायला, विचार करायला शिकवत असते आणि चिकित्सक व विमर्शात्मक दृष्टी देते. या दृष्टीने समाजव्यवस्थेकडे जेव्हा पाहतो, तेव्हा पितृसत्तेने, जातीव्यवस्थेने व लिंगभाव विषमतेने ग्रासलेल्या समाजाचे भयावह चित्र डोळ्यासमोर उभे राहते. या व्यवस्थेत मानवप्राणी (स्त्री, पुरुष, थर्डजेंडर किंवा पर्यायी लैंगिकता म्हणजेच LGBTQI समूह) नैसर्गिक व मानवनिर्मित विविधता असलेल्या घटकाद्वारे (जात, वर्ग व लिंगभाव, त्वचेचा रंग, भाषा इत्यादी) एकमेकांत विषमता निर्माण करतो, त्यात श्रेष्ठ-कनिष्ठता आणतो आणि मग गौर वर्णीय - काळी त्वचा असलेल्याला दुय्यम लेखते, सवर्ण - अवर्णला कमी लेखतो. पुरुषवर्ग - स्त्री आणि थर्ड जेंडरला दुय्यम लेखतो.

या पितृसत्ताक व्यवस्थेत पुरुषाला विशेषाधिकार (Previleged) मिळत असतात. संपूर्ण समाज व्यवस्था, खाजगी व सार्वजनिक ठिकाणे, बस स्टँड, चावडी, चौक इत्यादी अवकाशांचे या व्यवस्थेने पद्धतशीरपणे ‘पितृसत्ताकीकरण’ केलंय. म्हणून पुरुष रात्री पहाटे कुठेही जाऊ शकतो, त्याला हवं तो ते परिधान करतो. स्त्री ने काय परिधान करावे यावर नियंत्रण ठेवतो, तिच्या शरीराला आपली मालकी समजतो, तिने कसं हसावं, हसू नये अशा अनेक गोष्टी ठरवत असतो, किंबहुना लादतोच. याच पितृसत्ताक व्यवस्थेची स्त्रीदेखील वाहक असते. ही व्यवस्था हुशारीने यात काही स्त्रियांना शिताफीने सहभागी करून घेते. जरी या स्त्रिया शरीराने स्त्री देहाच्या असल्यातरी भाषा मात्र पुरुषी बोलतात. म्हणून घरात आईच मुलीला म्हणते, “मुलीच्या जातीनं एवढ्या जोरानं हसू नये” किंवा लघुपटातील शाळेतील शिक्षिकेला मुलींनी लेगिन घालून शाळेत आलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं वाटतं. 

मग पितृसत्ताक व्यवस्थेने प्रभावित पुरुष अशाच स्त्रियांचा उपयोग करून वंशाच्या दिव्यासाठी (मुलगा) तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याने गर्भात मुली मारतात. त्यावेळेस आपल्याला सासू, नणंद याच सुनेच्या वैरी वाटतात. थोडक्यात ‘स्त्री हीच स्त्रीची वैरी’ वाटायला लागते, परंतु त्यामागील पितृसत्ताक व्यवस्था आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. ही व्यवस्था पुरुषांना व काही प्रमाणात स्त्रियांना privileged देत असते. त्याचप्रमाणे दोघांचं शोषणदेखील करते. तरीही पुरुष या व्यवस्थेच्या लाभदायी गटात असतात. म्हणून घरात मार स्त्री खाताना दिसते, ज्याचं चित्रण लघुपटामध्येही चपखलपणे आलंय. कधी कधी मार फक्त पुरुषांकडूनच नाहीतर सासूकडूनही स्त्रीला मिळतो.

परंतु याच व्यवस्थेची दुसरी बाजू पाहिली तर आपल्याला हेही लक्षात येते की, ही व्यवस्था पदोपदी स्त्रियांचं दुय्यमत्व अधोरेखित करते. तू मुलगी आहेस, तुला काही कळत नाही, पुरुषांमध्ये बोलू नकोस, एवढ्या मोठ्याने नको हसू, हे नको करू, ते नको करू असे सांगत असते आणि स्त्रियांचं ‘माणूसपण’ हिरावून घेते. तसेच पुरुषांचेदेखील शोषण करते व पुरुषांचेही ‘माणूसपण’ हिरावत असते. जसे - तू मुलगा आहेस, मुलींसारखा काय रडतो आहेस, you are a complan boy, मर्द को दर्द नहीं होता!

या आणि अशा कित्येकतरी कथा, गाणी, म्हणी व चित्रपटांतून सतत सो कॉल्ड मर्दानगीच्या संकल्पना सतत बिंबवत असते. म्हणूनच तर अनेक चित्रपटांचा नायक पुरुषच असतो आणि मग बुलेट, ट्रॅकटर आणि पिस्तूल चालवणारी आर्ची (सैराट) व्यवस्थेला डायजस्ट होत नाही. हेच काय पण अनेक पुरुषांना साधं मुलगी किंवा महिलेने ओव्हरटेक केलेलं सहन होत नाही. 

परंतु अशामुळे पुरुषदेखील स्त्रीप्रमाणे ‘माणूस’ म्हणून वाढत नाहीत. पितृसत्ताक व्यवस्था या दोघांची मानवीयता संकुचित करत असते. पितृसत्ताक व्यवस्था बहुतांश पुरुषांमधला हळवेपणा, तर बहुतांश स्त्रियांमधील धैर्य व हिंमत काढून घेत असते. 

स्त्रीवादी अभ्यासक सिमॉन दि बुव्हा म्हणतात की, “स्त्री जन्मास येत नाही ती घडवली जाते.” तसेच पुरुषदेखील जन्मास येत नाहीत, तोही घडवला जातो. स्त्री-पुरुषाला घडवण्याचं काम सामाजीकरण करते. याची सुरुवात जन्माच्या अगोदरपासून होते. उदा. जन्मास येणारं बाळ कोणत्या लिंगाच आहे, त्यानुसार त्याचा जन्म होऊ द्यायचा की नाही? झाला तर त्याचं नाव काय असेंन? जन्मास आल्या आल्या आपण त्याला जात, धर्माची आणि लिंगभावाची लेबल चिकटवतो आणि शिक्के मारतो. आणि त्यानुसार त्या बाळाची वाढ जातीय, धर्मीय व लिंगभावाधारीत करत असतो.

अनेक अभ्यासकांनी या वाढीला ‘जातीय सामाजीकरण’ संबोधले तर, स्त्रीवाद्यांनी याला ‘लिंगभावीकरण’ म्हटले. अशा प्रकारच्या सामाजिकरणात पर्यायी लैंगिकता असणारा समूह म्हणजेच LGBTQIचा कृतीच्या पातळीवर सोडा परंतु विचाराच्या पातळीवरदेखील आपण ‘डिसक्रिमीनेशन’ करतो. कारण कोणत्याही मग ते कुटुंब कितीही प्रोग्रेसिव्ह असेल तरीही त्या कुटुंबात आपल्याला गे मुलगा किंवा लेस्बीयन मुलगी झाली तर तिचं / त्याचं आपण पालक म्हणून कसं पालन पोषण करणार याविषयीची चर्चा होत असेन का, हा प्रश्नच आहे. म्हणजे किमान चर्चेची जागा तरी या विषयाने व्यापली आहे का? हा लघुपट मात्र या सर्व पितृसत्ताक सामाजिक मान्यतांना प्रश्न करतो. आणि चर्चेसाठी काही प्रश्न ठेवतो

स्त्रीवादी असेही म्हणतात की, जे जे खाजगी  ते ते राजकीय! 

ते म्हणतात की, तुमच्या खाजगी तुमच्या जगण्याला राजकीय संदर्भ असतात. म्हणून पुरुष घरात मारतोय म्हणून हा आमचा किंवा तुमचा खाजगी प्रश्न नसतोच. हे यातून समोर येते अशा प्रकारच्या मांडणीत स्त्रीवादी अभ्यासक आणि स्त्रीवादी चळवलींनी केलेला हस्तक्षेप महत्त्वाचा आहे. म्हणजेच ज्याला खाजगी (कुटुंब) अवकाश म्हटल जातंय, तेही स्त्रियांना असुरक्षित आहे. कारण घराघरातून अनेक पातळीवरच्या हिंसेला कमी अधिक फरकाने प्रत्येक स्त्रिला आयुष्यात कधीतरी सामोरे जावे लागते.

म्हणजेच स्त्रिया सार्वजनिक ठिकाणी अनओळखी पुरुषाकडून जेवढ्या असुरक्षित आहेत, तेवढ्याच किंवा त्यापेक्षा अधिक त्या ओळखीतल्या पुरुषाकडून घरात (खाजगी) असुरक्षित असतात. बऱ्याचदा ओळखीच्या पुरुषाकडून स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होताना दिसतात.  इम्तियाज अलीच्या ‘हायवे’ चित्रपटात यावर काही प्रमाणात भाष्य केलंय.

पितृसत्ताक बिबट्याधारक रूप आपल्याला सर्वत्र दिसते हे रूप इतकं भयावह आहे की, कधी कधी बिबट्या कमी हिंसक वाटायला लागतो उदाहरण म्हणून ‘निर्भया केस’ आणि काल परवाची ‘हैदराबादमधील कौर्य’ आपण पाहू शकतो. अशा अनेक निर्भया भारतात पितृसत्ताक पुरुषी बिबट्याच्या शिकार होत असतात.

हेच या लघुपटात खूप छान पद्धतीने बिबट्याचा रूपकात्मक वापर करून मांडण्यात आलंय. लघुपटातील बिबट्याची आणि त्या लहान मुलीची भेदरलेली नजर मला सारखीच असुरक्षित वाटते. म्हणूनच लघुपटातील स्त्रीला समाजापेक्षा पिंजरा व जंगल अधिक सुरक्षित वाटते. या दृश्याच्या वेळी पुरुषांमधील संवाद ऐकले तर स्त्री कशी पुरुषांकरिता वापरण्यासाठीची ‘वस्तू’ आहे, हेच समोर येते. हे आजचं समाज वास्तव आहे. ते प्रखरपणे लघुपटातुन पुढे आलंय.

खरं तर समाजमान्य नियम असा आहे की, ज्यापासून आपणास त्रास, धोका आहे किंवा भीती वाटते त्यांस आपण कोंडून ठेवतो आणि हे खरं असेल तर मग स्त्रियांना भीती पुरुषांपासून आहे, तर सातच्या आत घरात पुरुषच हवेत. पण पितृसत्ताक व्यवस्था स्त्रियांना नियंत्रित करते.  आणि  स्त्रिया ‘सातच्या आत घरात’ असल्या पाहिजेत असे बंधनकारक करतो.  आणि त्या जर सातच्या आत घरात नसतील तर स्त्रीवर पितृसत्ताक व्यवस्था हल्ला चडवते.

थोडक्यात हा लघुपट पितृसत्ताक व्यवस्थेला वेशीवर टांगतो. हा लघुपट विषमाताधारीत व्यवस्थांच्या अंताचा एक धागा बनो आणि नजीकच्या काळात बिबट्या लघुपट अप्रतुत व कालबाह्य ठरो आणि संविधानाला अपेक्षित समाज निर्माण होवो.

.............................................................................................................................................

लेखक राहुल पैठणकर श्री शिवाजी मराठा सोसायटीचे विधी महाविद्यालय, पुणे इथे सहायक प्राध्यापक आहेत.

rahul.paithankar21@gmail.com  

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख