‘दबंग ३’ : हा सलमान खानच्या प्रतिमेला आणि आधीच्या चित्रपटांना विचारात घेऊन निर्माण केलेला चित्रपट आहे!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘दबंग ३’चं पोस्टर
  • Sat , 21 December 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie दबंग ३ Dabangg 3 सलमान खान Salman Khan सोनाक्षी सिन्हा Sonakshi Sinha प्रभू देवा Prabhu Deva

भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुतांशी मुख्य प्रवाहातील चित्रपट सध्या सामाजिकतेच्या अट्टाहासाने ग्रासलेले दिसतात. ज्यामुळे कथानक समोर मांडताना तद्दन फिल्मी मार्ग निवडणारे चित्रपटही समाज प्रबोधन करत, संदेश देताना दिसतात. चित्रपटांमध्ये ढोबळ संदेशांपेक्षा प्रभावी कलात्मक नि दृकश्राव्य मांडणीवर लक्ष केंद्रित केल्यास चित्रपट अधिक सहन करण्यालायक होतील हे या चित्रपटकर्त्यांनी एव्हाना लक्षात घ्यायला हवं. यापूर्वी रोहित शेट्टीच्या चित्रपटविश्वातील ‘सिम्बा’ने (२०१८) हे केलं होतं, आणि आता ‘दबंग ३’मध्येही अधूनमधून उपदेश केला जातो. 

अर्थात असं घडतं म्हणून इतर वेळ ‘दबंग ३’ रंजक नाही, असं म्हणणं त्यावर अन्यायकारक ठरेल. कारण, तो सदोष असला तरी बऱ्यापैकी रंजकही आहे. याचं कारण म्हणजे दिग्दर्शक प्रभुदेवा आणि अभिनेता-सहलेखक सलमान खान हे बहुतांशी वेळा यशस्वी ठरेल असं एक उत्पादन निर्माण करत असतात. गेल्या काही वेळा ‘भारत’ (२०१९), ‘रेस ३’बाबत (२०१८) त्याचं हे गणित बिघडलं असलं तरी इथं मात्र सलमान खानच्या ‘लार्जर दन लाइफ’ प्रतिमेला साजेसा चित्रपट निर्माण करणं साध्य झालेलं आहे. असं करताना चित्रपटाच्या निर्मात्यांना त्याच्या अतिरंजित असण्याचं भान असल्याने फायदा झाला आहे. परिणामी आपल्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र वावर असणारा, सगळीकडे वेळेत पोचणारा, खलपात्रांची धुलाई करणारा नायक दिसतो, नि कॅमेरा त्याच्याकडे एका विस्मयकारक नजरेनं पाहतो. अर्थात हे पात्र जेव्हा ‘हम मासेस और क्लासेस दोनों को खुश करते हैं’ अशा अर्थाचं वाक्य म्हणतं. असो, त्यात जरा अधिकच आत्मविश्वास असणं, हा या पात्राचा स्वभावगुण असूच शकतो. 

चित्रपटाला सुरुवात होते तेव्हा चुलबुल पांडे (सलमान खान) मानव तस्करीला आळा घालतो, नि बऱ्याचशा स्त्रियांची सुटका करतो. हे झालं की, चित्रपट लागलीच समाज प्रबोधनाच्या वाटेवर चालू लागतो. हे रॅकेट चालवणाऱ्या स्त्रीला स्त्रियांसोबत असा दुर्व्यवहार करणारी ती म्हणजे स्त्रीच नाही, असं म्हणत तिच्या कानाखाली लगावली जाते. पुढेही अधूनमधून असं घडत राहतं. इतर वेळी मात्र चुलबुल पांडे त्याच्या नावाला शोभेलशा हरकती करत आपले कनिष्ठ सहकारी, भाऊ मख्खन चंद पांडे (अरबाज खान) यांच्यापासून ते खलभूमिकेतील पात्रांपर्यंत सर्वांशीच थट्टामस्करी करत स्वतःभोवतीचं रंजक असण्याचं वलय कायम राखतो. 

बल्ली सिंगच्या (सुदीप) रूपात त्याच्यासमोर एक तितकाच फिल्मी नि साचेबद्ध खलनायक उभा ठाकतो. चित्रपटाचा अर्धा भाग हा चुलबुलच्या पूर्वायुष्यातील एका घटनेशी बल्लीच्या असलेल्या संबंधाच्या चित्रणाने व्यापला जातो. नायकाचं पूर्वायुष्य रेखाटलं गेलं, त्याची प्रेमकथा दिसली तरी इथे कथानकात वा मांडणीत तार्किकता आणि भावनिक नाट्य या दोन्ही गोष्टींचा लवलेश दिसत नाही. त्यामुळे चित्रपट आणि त्यातील नायक प्रेक्षकांना केवळ मारधाड दृश्यांतून मिळणाऱ्या आनंदावर स्वार झाल्याचं दिसतं. अर्थात पहिल्या बाबीला चित्रपटाच्या अतिरंजिततेच्या भानाचा विचार करता फारसं महत्त्व राहत नाही. भावनिक नाट्याचा अभाव मात्र समोरच्या पात्रांना चित्रपटाच्या अडीच तासाच्या लांबीभर भावनिक गुंतवणूक नसताना का पाहत रहावं हा प्रश्न पडू शकतो. चित्रपट त्याच्या मांडणीबाबत प्रभुदेवाच्या ‘रावडी राठोड’च्या (२०१२) वळणावर जाणारा आहे. मूर्खपणातून निर्माण झालेले तितकेच अतर्क्य तरीही बऱ्याच अंशी परिणामकारक विनोद हे इथले समान घटक. याखेरीज इथली मध्यवर्ती कथानकं, उपकथानकं बऱ्याच नव्या जुन्या चित्रपटांतील घटकांपासून प्रेरणा घेणारी आहेत.  

सलमान खानच्या जुन्या चित्रपटांचे, त्यांतील गाण्यांचे संदर्भ इथे वेळोवेळी दिसत राहतात. शाहरुखवर विनोद करत सलमान-शाहरुखमध्ये नव्याने प्रस्थापित झालेल्या मैत्रीपूर्ण संबंध दाखवले जातात. एका आयटम साँगमध्ये स्वतः प्रभुदेवा हजेरी लावतो नि नृत्याचे असफल प्रयत्न करणाऱ्या सलमानसोबत पाय थिरकवतो. ‘यू कर के’ नामक गाण्याच्या रूपात मात्र नायकाच्या स्त्रीदाक्षिण्य दाखवण्याच्या आणि चित्रपटाच्या स्त्री सबलीकरणाच्या प्रयत्नांवर पाणी फिरतं. विरोधाभास हा बॉलिवुडच्या नसानसांत भरलेला आहे. त्यामुळेच आयटम साँगचा समावेश असलेला चित्रपट स्त्री सबलीकरणाचे धडे देऊ शकतो. 

‘दबंग ३’ हा सलमान खानच्या प्रतिमेला आणि आधीच्या चित्रपटांना विचारात घेऊन निर्माण केलेला चित्रपट आहे. तो अगदी मोजूनमापून प्रेक्षकांना आवडतील अशा घटकांचा समावेश करतो. त्याच्या चाहत्यांना खुश करतीलशा गोष्टी तितक्याच चकचकीत मांडणीच्या रूपात समोर येतात. चित्रपटात सगळे इथल्या फिल्मी मांडणीला साजेसं काम करतात. मधल्या काळात पुरुषांच्या सौंदर्यप्रसाधनांची जाहिरातही केली जाते. चित्रपटांतील दृश्यांत उत्पादनांच्या जाहिराती समाविष्ट करण्याच्या या लाटेपासून काही लवकर सुटका मिळेल असं दिसत नाही.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......