बिबट्या : बिबट्याचा रूपकात्मक वापर करून दिग्दर्शकाने ‘माणसातल्या बिबट्या’ला अतिशय शिताफीने जेरबंद केले आहे!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
विनायक लष्कर
  • ‘बिबट्या’चं पोस्टर
  • Sat , 14 December 2019
  • कला-संस्कृती चलत्-चित्र बिबट्या Bibtya The Leopard गार्गी कुलकर्णी Gargi Kulkarni नागराज मंजुळे Nagraj Manjule

काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने अविरतपणे सुरू असलेल्या ‘आरभाट शॉर्ट फिल्म क्लब’च्या सहाव्या सीझनच्या उदघाटन प्रसंगी जगप्रसिद्ध अशा ‘कान्स चित्रपट मोहत्सवा’मध्ये दाखवला गेलेला बहुचर्चित ‘बिबट्या’ हा लघुपट पाहण्याची संधी मिळाली. आटपाट निर्मित हा लघुपट गार्गी कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला असून नागराज मंजुळे हे या लघुपटाचे निर्माते आहेत. हा लघुपट पाहिल्यानंतर खूप दिवसांनी एक संवेदनशील कलाकृती पाहिल्याचा आनंद झाला. दिग्दर्शकाने जो विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे, तो अंतर्मुख करणारा आहे.  

लघुपटाची कथा आपल्या आजूबाजूच्याच गावात घडते. एकदा अचानक एका गावामध्ये बिबट्या शिरतो आणि गावातील लोकांची एकच धांदल उडते. बिबट्यापासून गावाला कसं वाचवायचं? बिबट्याला पकडण्यासाठी काय उपाय योजना करायच्या? गावातील लोकांनी काय खबरदारी घ्यायची? जोपर्यंत गावात बिबट्या आहे, तोपर्यंत काय काय अडचणी येऊ शकतील? बिबट्याविषयी असणारं सर्वांचं कुतूहल, शंका-कुशंका, अंदाज, कल्पना, समज-गैरसमज, वेगवेगळी मतं या सर्वच गोष्टी हळूहळू उलगडायला लागतात. शेवटी या बिबट्याचं काय होतं? त्याला पकडताना काय काय घडतं? शेवटी तो पकडला जातो का? का काहीतरी वेगळंच घडतं? हे या २० मिनिटांच्या लघुपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.

प्रथमदर्शनी बिबट्याचीच कहाणी वाटणारा हा लघुपट आपल्याला आपल्याच मनाच्या गुहेतला  लपलेला बिबट्या कधी सापडून देतो, हे लक्षातही येत नाही. या लघुपटातील पात्रांची निवड, कथेचा आशय, अभिनय आणि संवाद अतिशय प्रभावी झाले आहेत. याचबरोबर व्हीएफक्स, प्रकाश योजना आणि ध्वनी यांच्या साहाय्याने अनेक प्रसंग जिवंत करण्यात यश आले आहे.

वास्तवात प्राण्यांच्याही अनेक समस्या आहेत. माणसाच्या विकासाचा वेग निसर्गाला दिवसेंदिवस नष्ट करत चालला आहे. याचाच परिणाम म्हणून आपला प्राण्यांच्या आयुष्यात वाढत जाणारा हस्तक्षेप हिंस्त्र प्राण्यांनाही आपल्या अधिक जवळ घेऊन येत आहे. खरं तर आपणच कळत-नकळत आणि जाणीवपूर्वकाही प्राण्यांच्या विश्वात नको तेवढे अतिक्रमण करत आहोत. या परिस्थितीला आपण कारणीभूत असूनदेखील प्राण्यांनाच दोषी मानतो आणि त्यांनाच नियंत्रणात ठेवण्यासाठी असंवेदनशील-क्रूर अशा असंख्य उपाययोजना करत आहोत.

उदा. सध्याच्या परिस्थितीत बिबट्यांचे मनुष्यवस्तीकडे मोठ्या प्रमाणावर होणारे स्थलांतर. या वाढत्या स्थलांतरामुळे गावांमध्ये व शहरांमध्येही निर्माण झालेली अनामिक भीती. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी गावपातळीवर आणि शासन पातळीवर केले जाणारे उपाय, या व अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर हा लघुपट प्रकाश टाकतो. या लघुपटामध्ये दिग्दर्शकाने भीती, हिंसा आणि सुरक्षा या भोवती असणारे पुरुषप्रधान सांस्कृतिक राजकारण कशा पद्धतीने कार्य करते, हे अतिशय चपखलपणे उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. खरं तर हाच या लघुपटाचा केंद्रीय गाभा आहे.

लघुपटातील बिबट्या हा मला समकालीन पुरुषसत्तेचा एक निदर्शक वाटतो. पुरुषसत्ता ही काही कुठल्याही लिंगापुरती मर्यादित नसते किंवा पुरुषसत्तेला कुठलेही लिंग नसते. त्यामुळे बिबट्याला पुरुषसत्तेचा एक निदर्शक म्हणत असताना सुरुवातीच्या प्रसंगातील घाबरलेल्या बिबट्याच्या डोळ्यातील करुणामय भाव मला पुरुषी देहातील संवेदनशील मनाच्या तळापर्यंत घेऊन जातात. कारण पुरुष आणि स्त्री ही सामाजिक रचितं आहेत. ज्याप्रमाणे स्त्रियांना त्रास देणारे असंख्य पुरुष आहेत, त्याप्रमाणेच स्त्रियांची काळजी घेणारे पुरुषदेखील आहेत. ते माणूस आहेत, प्रेमळ आहेत, स्त्रियांच्या हक्क आणि अधिकार यासाठी लढणारे आहेत, स्त्रियांच्या प्रश्नावर आजही अव्याहतपणे काम करत आहेत, संवेदनशील आहेत आणि पुरुष असूनही जिवंत माणूसदेखील आहेत. परंतु जसं आपण स्त्रियांचं एकसाचीकरण करतो, तसंच आपण पुरुषांचंही एकसाचीकरण करण्याचा जो सपाट लावला आहे. त्यामुळे पुरुषाला चांगला पुरुष म्हणून किंवा माणूस म्हणून वागण्यास परावृत्त करणारंच ठरत आहे.

एकंदर चांगला पुरुष असण्याचे निकष काय आहेत, हे शोधून त्याला सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करून देणं, हेच समताधिष्ठीत समाजनिर्मितीचं मुख्य काम आहे असं वाटतं. खरं तर पुरुष हाच पुरुषसत्तेचा पहिला बळी आहे. कारण तो पुरुष म्हणून घडताना स्वतःचं संवेदनशील मन मारण्याचंच काम करत असतो. म्हणून तर आपल्याला आई प्रेमळ आणि बाप कठोर किंवा बऱ्याचदा क्रूर वाटत असतो. या कठोर पुरुषी देहामुळे व मनामुळे तो अनेकदा व्यथित व हताशही होत असतो. याच कठोर पुरषी देहापलीकडे एक संवेदनशील, करुणामय, प्रेमळ मनदेखील असतं हे आपल्याला नाकारून चालणार नाही. नेमका हाच भाव आपल्याला सुरुवातीला कोंडीत सापडलेल्या बिबट्याच्या डोळ्यात दिसतो आणि हा प्रसंग माझ्यासारख्या पुरुषी देहाला पुन्हा एकदा माणूस म्हणून जन्माला घालण्यास यशस्वी ठरतो. खूपच मार्मिकपणे हा प्रसंग चित्रित करण्यात आला आहे, हे संवेदनशील दिग्दर्शकाचे खरे कसब म्हणावे लागेल.

जंगलातला बिबट्या माणसात आल्यावर जेवढी चर्चा होते, तेवढी चर्चा माणसातल्या बिबट्यांवर कधीच होत नाही. तसेच जंगलातला बिबट्या माणसांत आल्यावर त्याला पकडण्यासाठी लोखंडी पिंजरा तयार केला जातो, परंतु माणसातल्या बिबट्याला कायमच मोकाट सोडले जाते, हे काही प्रसंगातून अतिशय प्रभावीपणे उभे केले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तयार केलेला पिंजरा हा आज माणसातल्या बिबट्यांपासून वाचण्यासाठी माणसालाच कसा सुरक्षित वाटू लागला आहे, याविषयी हा लघुपट अतिशय मार्मिक भाष्य करतो.

बिबट्याच्या या वास्तव कथेचा रूपकात्मक वापर करून दिग्दर्शकाने माणसातल्या बिबट्याला अतिशय शिताफीने जेरबंद केले आहे. समाजातील पितृसत्ताक व्यवस्थेचे अतिशय क्रूर रूप दिग्दर्शकाने पडद्यावर दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या पुरुषप्रधान व्यवस्थेने आपले खाजगी आणि सार्वजनिक अवकाश कशा पद्धतीने व्यापले आहे, याची प्रचिती या लघुपटातील अनेक प्रसंगातून आपल्याला सातत्याने येत राहते. या दमणकारी व्यवस्थेच्या सर्वांत जास्त स्त्रिया कशा बळी आहेत, हे नग्न सत्य आपल्या समोर या लघुपटाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत उलगडत राहते.

या लघुपटाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तो अनेक मूलभूत आणि अनुत्तरीत प्रश्नांना हात घालतो. या लघुपटाने समकालीन विकास मानवाला नेमका कुठे घेऊन जात आहे? या विकासाचे बळी नेमके कोण ठरत आहेत? या यांत्रिक विकासाचे मानवी समाजावर नेमके काय परिणाम होत आहेत? या भौतिक विकासाचे नेमके फायदे कुणाला होत आहेत? हिंसा, नैसर्गिक संसाधने, पुरुषप्रधान भांडवली व्यवस्था, राजकारण याचं समकालीन परिस्थितीमध्ये एकमेकांशी नेमकं काय नातं आहे? या सर्व प्रश्नांना नेमकेपणाने हात घातला आहे. या सर्व कारणांसाठी हा लघुपट पाहायलाच हवा.

.............................................................................................................................................

लेखक विनायक लष्कर बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये समाजशस्त्र विभागाचे विभागप्रमुख व सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vinayak.lashkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख