पा रंजित  : ‘आंबेडकरवादा’ला सिनेमात आणणारा कलाकार
कला-संस्कृती - चलत्-चित्र
मिलिंद कांबळे
  • पा रंजित 
  • Mon , 09 December 2019
  • कला-संस्कृती चलत्-चित्र पा रंजित Pa. Ranjith अत्तकाठी Attakathi काला Kaala कबाली Kabali

परवा, सहा डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘महापरिनिर्वाण दिन’ साजरा झाला. डॉ. आंबेडकर मानवी जगाच्या इतिहासात सर्वांत मोठा ठसा उमटवणाऱ्यांपैकी होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित-शोषित वर्गातील अनेकांनी लोकांनी यश मिळवले. आजही त्यांच्यापासून प्रेरणा घेत अनेक जण पुढे येत आहेत. असाच एक मनस्वी कलाकार ‘माणूस’ आणि अवलिया म्हणजे ‘अत्तकाठी’, ‘काला’, ‘कबाली’फेम ‘पा रंजित’. काल, ८ डिसेंबर रोजी त्याने वयाची ३६ वर्षे पूर्ण केली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्यात विविध माध्यमांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अगोदर मुद्रित माध्यमातून हे विचार पसरवले, जसजसे सिनेमा क्षेत्र वाढले तसतसे हे विचार याही माध्यमाद्वारे पसरू लागले. पण जाणीव-नेणिवेमुळे डॉ. आंबेडकर फक्त पोलीस स्टेशनमध्ये भिंतीवर लटकून राहिले. त्यांचे विचार वा शोषित वर्गाचे प्रतिबिंब अगदी मागच्या १०-१५ वर्षांत सिनेमांद्वारे समोर यायला सुरुवात झाली. ‘फॅन्ड्री’, ‘मसान’, ‘आर्टिकल १५’ ही त्याची काही उदाहरणे. (अर्थात अगोदरसुद्धा आले आहेत चित्रपट, पण इतक्या ठसठशीतपणे विचार मांडणे आत्ताच सुरू झाले आहे!)

तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये सध्या खूप गुणवान आणि कल्पक तरुण दिग्दर्शकांची फळी कार्यरत आहे. मुख्य म्हणजे तिथले प्रस्थापित अभिनेते नवीन दिग्दर्शकांसोबत काम करायला उत्सुक आहेत. त्यातले एक आघाडीचे नाव म्हणजे पा रंजित. साधारणतः आपल्याकडचा अभिजात वर्ग दक्षिणेकडच्या चित्रपटांना फालतू किंवा नित्कृष्ट दर्जाचं समजतो (हिंदी डब बघून तशी धारणा झाली असावी बहुतेक!), पण प्रत्यक्षात तसं नाही. काही चित्रपट असतात वाईट, पण सगळेच नाही. असो. पा रंजितने आतापर्यंत फक्त सहा चित्रपट बनवले आहेत, तरी त्याची दखल घेणं खूप महत्त्वाचं आहे. किंबहुना त्याच्याशिवाय तमिळ फिल्म इंडस्ट्री पूर्ण वाटणार नाही. फक्त एक कलाकार म्हणून नाही तर माणुसकीची जाण असणारा हा दिग्दर्शक न्यायासाठी कायम उभा राहणारा मनस्वी कलाकार आहे. 

पा रंजितचा जन्म चेन्नईपासून ३५ किलोमीटरवर असणाऱ्या अवनी या गावात झाला. त्याचे वडील एका कारखान्यात ऑफिस बॉय/असिस्टंस म्हणून कामाला होते. लहानपणापासून पा रंजितला तीन गोष्टींची आवड होती- वाचन, चित्रं काढणं आणि बॅटबॉल. दिवसभर झाडाखाली बसून चित्रं काढणं हा त्याचा आवडत छंद होता. रणजितला वाचनाची ओळख करून दिली ती त्याच्या मोठ्या भावानं, पा प्रभूने. लहानपणी त्यानं बरंच अवांतर वाचन केलं. 

पुढे त्याने चेन्नईच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फाईन आर्टसमधून ग्रॅज्युएशन केलं. कॉलेजला असताना तो रोज ३० ते ३५ किलोमीटर अप-डाऊन करायचा. त्यावेळेस ट्रेनमध्ये त्याला रेल्वे डब्बा साफ करणारी, स्टेशनवर काम करणारी लहान मुलं भेटायची. त्यांना तो शिक्षणाचं महत्त्व समजावून सांगायचा, कधी कधी त्यांची चित्रं काढायचा. कॉलेजला असतानाच त्यानं मॅक्सिम गॉर्की, अल्बर्ट काम्यू आणि शोभा शक्ती यांची पुस्तकं वाचली. त्याला वाचनातून समता आणि स्वाभिमान समजला. माणसानं माणसाला समतेनं का वागवावं याची समज आली. 

पा रंजितकडे दोन दृष्टिकोनांतून पहावं लागेल- सर्वांत आधी कलाकार म्हणून आणि नंतर चळवळ्या माणूस म्हणून. कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याने असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक वेंकट प्रभूनकडे त्यानं काम सुरू केलं. त्यानंतर त्याने एका मित्राच्या मदतीनं सिव्ही कुमार या प्रसिद्ध तामिळ निर्माता आणि दिग्दर्शकाची भेट घेतली. त्यांनी त्याला सिनेमा बनवण्याची संधी दिली आणि त्याने ‘अत्तकाठी’ बनवला. चित्रपट हिट झाला (ब्रेकअप झालेल्या आणि ब्रेकअप झाल्यावर लगेच नव्यानं प्रेम होणाऱ्या लोकांसाठी, ब्रेकअप झाल्यावर आयुष्य बरबाद असं समजणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे, हा सिनेमा).

त्यानंतर त्याने कार्तीला घेऊन ‘मद्रास’ बनवला. त्याला व्यावसायिक यश मिळालं. ‘मद्रास’पासून त्याने त्याची विचारधारा सिनेमात अजून प्रभावीपणे मांडायला सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या ‘कबाली’ने तर त्याला तामिळ चित्रपट सृष्टीत मोठं स्थान मिळवून दिलं. ‘कबाली’नंतर त्याने ‘काला’ बनवला. हे चित्रपट रजनीकांतचे जरी असले तरी त्यात सर्वत्र पा रंजितला जे दाखवायचं आहे, तेच दिसत राहतं. रजनीकांतसारख्या सुपरस्टारचा इतका भारी उपयोग क्वचितच केला गेला असेल. (‘काला’ आला, त्या वेळी मी त्या ‘अक्षरनामा’मध्ये लिहिलं होतं.) आता तो ‘बिरसा मुंडा’च्या जीवनावर आधारित हिंदी बायोपिक बनवत आहे. 

पा रंजितचा सिनेमात आपल्या आयुष्यात आजूबाजूला जे आहे तेच दिसतं. (हिंदी सिनेमामध्ये दाखवतात तशी महागडी कार घेऊन आम्ही कॉलेजात गेलो नाही, बसने जाणे आणि येणे). 

त्याच्या सिनेमाचं प्रत्येक दृश्य खणखणीत राजकीय आणि सामाजिक संदेश देणारं असतं. ‘कबाली’चा रजनीकांतचा एंट्री सीन बघा, त्यात तो ‘माय फादर बलेया’ वाचत बसलेला आहे. ‘काला’मध्ये आपल्या कम्युनिस्ट विचारधारेच्या मुलाला खडसावताना ‘‘क्रांती करने के लिये हम हीं मिले क्या?’ त्यानंतर त्याचा आयटीमध्ये काम करणारा मुलगा धारावी सोडायचे म्हणतो, त्या वेळी काला त्याला सांगतो ‘बदलाना हैं तो यहा रहकर बदलो. वो भी घर छोडकर चला गया था, लेकिन धारावी नहीं छोडी. उसके और मेरे बीच में हजार मतभेद हैं लेकिन उसके उपर जराभी शक नहीं है.” (भारतात कम्युनिस्ट आणि आंबेडकरवादी कायम भांडत असतात, त्यांच्यासाठी हा संदेश होता). आंबेडकरवाद, स्त्रीवाद, समाजवाद हे त्याच्या सिनेमांमधून दिसत राहतात. ६०च्या दशकात दलित पँथर सुरू झाली. तिने साहित्यिक क्रांती केली. आज पा रंजित तामिळमध्ये तीच सांस्कृतिक क्रांती सिनेमामध्ये आणत आहे.

आपण ज्या समाजत राहतो, त्याचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून पा रंजित त्याच्या सिनेमात कायम नवीन कलाकारांना संधी देतो. जे कलाकार शोषित, दलित समाजातून येतात, त्यांना संधी देतो. त्यासाठी त्याने निलम प्रॉडक्शन म्हणून चित्रपट कंपनी काढली आहे. त्याद्वारे त्याने दोन चित्रपट बनवले. मारी सेल्वराजला संधी देऊन ‘पेरियेरम पेरुमल’ बनवला. तो दक्षिण भारतात तुफान हिट झाला आणि आता आलेला ‘गुंडू’ धुमाकूळ घालत आहे. ‘गुंडू’साठी टेंमानं संगीत दिलं आहे. ‘कास्टलेस कलेक्टिव्ह’ म्हणून एक उपक्रम आहे. त्यातून पुढे आलेला हा गुणी संगीतकार आहे.

बहुजन समाज्यातील कलाकारांना प्लॅटफॉर्म मिळावा म्हणून पा रंजितने नीलम पणपट्टू मेयम अर्थात नीलम सांस्कृतिक केंद्र उभारलं आहे. याद्वारे तो फिल्म फेस्टिवल, चळवळीत काम करणाऱ्या लोकांना एक्नॉलेज करणं, युवा दिग्दर्शकांना शॉर्ट फिल्सम बनवण्याकरिता साहाय्य करणं, अशी विविध सकारात्मक प्रभाव पाडणारी कामं करत असतो. (आपल्या पूर्ण सिनेमासृष्टीमध्ये जिथं तैमूर अली खानसाठी आतापासून स्क्रिप्ट लिहायला सुरुवात झाली आहे, इतकी घराणेशाही आहे, तिथं पा रंजितचं हे काम अभिनंदनीय आहे!).  

‘कास्टलेस कलेक्टिव्ह’ हे पा रंजितचं सर्वांत महत्त्वाचं योगदान आहे असं मी मानतो. अमेरिकेत जी क्रांती झाली, तिथं संगीतानं महत्त्वाचा रोल निभावला. आपल्या महाराष्ट्रातही तेच झालं. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी, समतेची गाणी यामुळे बरंच प्रबोधन झालं आहे.) तामिळनाडूमध्ये कास्टलेस कलेक्टिव्ह या मुसिकल बँड तयार झाला. हे नाव तामिळनाडूमधल्या एका जुन्या जातीविरहित चळवळ ‘जाती इलाधा तामीझारगल’पासून प्रेरित आहे. या चळवळीत दलितांना त्याची नोंदणी करताना जात काढून टाकायचं आवाहन करण्यात आलं होतं. त्याचीच पुढची आवृत्ती म्हणजे कास्टलेस कलेक्टिव्ह! या वर्षी जानेवारीमध्ये त्याचा एक पॉवरपॅक शो झाला. जबरदस्त प्रतिसाद होता त्यासाठी. काल-परवा एका पुरस्कार सोहळ्यामध्येसुद्धा त्यांनी परफॉर्म केलं. या उपक्रमातील कलाकार उत्तर मद्रासमधील कष्टकरी, कामगार शोषित, दलित अशा वर्गातून आलेले आहेत. ‘कास्टलेस कलेक्टिव्ह’ पुढे जाऊन खूप मोठा उपक्रम होणार आहे, यात वाद नाही.

पा रंजित फक्त सिनेमा आणि सिनेमाच करत नाही, न्यायासाठी तो कायम मैदानात उतरत असतो. मागे नीटच्या परीक्षेत अपयश आलं म्हणून तामिळनाडूची १२ वीची टॉपर अनिताने आत्महत्या केली. त्याने स्टॅन्ड घेऊन आंदोलन केलं. तामिळ समाज तामिळ म्हणून एकत्र आहे, पण तो जातीवर विभागलेला आहे, हे त्याने ठासून सांगितलं. तामिळ दिग्दर्शक आमिर सोबत यावर वाद झाला. त्यावेळी सांगितलं की, ‘अजून गावात दलित समाज मागास आहे. त्याला घाणीची कामं करावी लागतात आणि आपण हे दुर्लक्षित करू शकत नाही.’ तो अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात कायम उभा असतो. एक कलाकार म्हणून तो यशस्वी आहे, तरीसुद्धा तो राजकीय-सामाजिक गोष्टी प्रखरपणे मांडतो. (मला तामिळ समजत नाही तरी मी त्याचे सगळे ट्विट्स गुगलवर जाऊन भाषांतर करून वाचत असतो!) भारतात मी-टू चळवळ सुरू झाल्यावर चिन्मयी श्रीपदाने तामिळमध्ये आवाज उठवला, त्या वेळी के राजनने चिन्मयीला धमकी दिली होती. त्या वेळी पा रंजित तिच्या बाजूने उभा राहिला.

सिनेमा हे माध्यम फक्त प्रेमकथा दाखवण्यासाठी नाही, तर त्याचा उपयोग समाजातील उणिवा दूर करण्यासाठी होऊ शकतो, हे पा रंजितने दाखवून दिलं आहे. जे नामदेव ढसाळांच्या कवितांनी केलं, तेच काम पा रंजितचे सिनेमे करतात. 

पा रंजितच्या जवळ जवळ सगळ्या सिनेमांना पुरस्कार मिळाले आहेत. बेस्ट डायरेक्टर, कथालेखक इत्यादी. मागच्या वर्षी जिक्यूने त्याची निवड सर्वांत प्रभावी १०० व्यक्तींमध्ये केली होती. पा रंजित चेन्नईमध्ये त्याची पत्नी आणि लहान मुलगी यांच्या समवेत राहतो, तिकडेच नीलम सांस्कृतिक केंद्र आहे. घरात बाबासाहेब, मार्क्स आणि पेरियार आहेत.

इनमिन १०-१२ वर्षांच्या कारकिर्दीत एवढं यश, त्याचबरोबर सामाजिक चळवळींसोबत राहणं, हे खूप अवघड काम पा रंजितने अगदी लीलया पेललं आहे आणि तो पुढे जाऊन अजून मोठं काम काम करणार आहे यात शंकाच नाही.

माझ्याकडून आणि ‘अक्षरनामा परिवारा’कडून त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

.............................................................................................................................................

लेखक मिलिंद कांबळे स्मार्ट सिटी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये प्रोजेक्ट कॉऑर्डिनेटर आहेत.

milindkamble.rd@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख