अजूनकाही
मुदस्सर अझीझ दिग्दर्शित ‘पती, पत्नी और वो’ हा चित्रपट विनोदी आहे का, तर हो, आहे. त्यातील काही विनोद चतुराईने पेरलेले आणि उत्तमही आहेत. पण तो एक रिमेक म्हणून इतर रिमेक्स असतात तितकाच अनावश्यकही आहे. कारण, कथेच्या किंवा आशयाच्या पातळीवर तो फारसं काही वेगळं देत नाही. नि तीसेक वर्षांपूर्वी बऱ्यापैकी उत्तमरीत्या सांगून झालेल्या कथेचं पुनर्कथन करण्यातच धन्यता मानतो. आता तीस वर्षांनंतर आपल्या सामाजिक परिस्थितीत घडलेले बदल पाहता त्याकडून जराशा परिपक्वतेची अपेक्षा ठेवण्यात तसं फारसं चूक नाही. बाकी मूळ ‘पती, पत्नी और वो’मधील (१९७८) संजीव कुमार आणि आताच्या चित्रपटातील कार्तिक आर्यन यांची तुलना करण्याचं पातक करू इच्छित नसल्याने सदर चित्रपटांची तुलनाही टाळतो आहे.
गोष्ट साधी आहे. तीन वर्षांपूर्वी अभिनव त्यागी ऊर्फ चिंटूने (कार्तिक आर्यन) या श्रावणबाळ-वजा इसमाने पालकांच्या दबावामुळे वेदिका त्रिपाठीशी (भूमी पेडणेकर) लग्न केलं होतं. मात्र, आता लग्नाच्या तीन वर्षांनंतर त्याच्या आयुष्यात रोमान्स असला तरी रोमांच नसल्याने तो त्रस्त (?) झालेला आहे. अशातच तपस्या सिंगच्या (अनन्या पांडे) रूपात त्याच्या आयुष्यात मंद हवेची झुळूक वगैरे भासणारी स्त्री येते. तिच्या जवळ येण्यासाठी आपल्या पत्नीचे कुणा व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध आहेत, अशी थाप मारण्याची अभिनव कल्पना अभिनवच्या डोक्यात येते (कोटी करायचा मोह आवरला नाही). दोन स्त्रियांच्या मध्ये अडकलेला पुरुष, त्याला मदत करणारा त्याचा मित्र - फहीम रिज्वी (अपारशक्ती खुराना) नि यातून निर्माण होणारा विनोद, या इथल्या मूलभूत संकल्पना आहेत. ज्यात अर्थातच फारसं नावीन्य नाही. सदर चित्रपट ज्या चित्रपटावर आहे त्या मूळ ‘पती, पत्नी और वो’पासून ते गोविंदाच्या काही चित्रपटांपर्यंत अनेक ठिकाणी हा ठराविक साचा वापरून झालेला आहे. इथे जे काही नावीन्य आहे ते मुदस्सर अझीझच्या काही रंजक नि चाणाक्ष संदर्भांनी परिपूर्ण अशा विनोदांत नि कालसुसंगत मांडणीत. अर्थात हा कालसुसंगतपणा दृश्यपातळीवर असला तरी कथात्म पातळीवर तसा नाहीच.
लेखक-दिग्दर्शक मुदस्सर अझीझ कथनासाठी जिमी शेरगिलचा आवाज वापरतो. उत्तर प्रदेशमधील कथा आणि शेरगिलने आजवर बऱ्याच चित्रपटांत उत्तर प्रदेशातील आशिकांच्या बजावलेल्या भूमिका यांतील संदर्भाचा इथं चतुराईनं वापर केला जातो. असे चाणाक्ष म्हणावेसे संदर्भ चित्रपटभर वापरले जातात. पोलिसांच्या प्रकरणात ‘दबंग’ची (२०१०) थीम ट्यून वाजवली जाते. यात पुन्हा दोन्ही चित्रपटांतील उत्तर प्रदेशचं साहजिक साम्य आहेच. पोलिसांच्याच एका प्रसंगात येणारा ‘भाग मिल्खा भाग’चा (२०१३) संदर्भ असो किंवा ट्युशनमध्ये शिक्षिका असलेल्या वेदिकावर भाळलेल्या तिच्या एका विद्यार्थ्याच्या अनुषंगाने वापरण्यात येणारा ‘मैं हू ना’चा (२००४) संदर्भ या बाबी पाहता अझीझच्या कार्यक्षमतेबाबत खचितही शंका उरत नाही. मात्र, हेच चातुर्य किंवा याचं सातत्य सबंध चित्रपटभर राहत नाही. केवळ त्याची झलक दिसत राहते. उदाहरणार्थ, आणखी एका दृश्यात पार्श्वभूमीवर ‘ठंडे ठंडे पानी में नहाना चाहिए’ हे मूळ ‘पती, पत्नी और वो’मधील गाणं वाजतं. मूळ कलाकृतीला एक प्रकारे मानवंदना देण्याची ही कृती चांगली नि प्रशंसनीय वाटते.
कार्तिक आर्यनला ‘प्यार का पंचनामा’ चित्रपट द्वयीनंतर लेखक-दिग्दर्शक लव रंजनच्या चित्रपटांत हक्काने मिळणाऱ्या स्वगतांसारखं एक स्वगत इथंही आहे. आर्यन नि अनन्या पांडे अपेक्षित तशी कामगिरी करतात. मात्र, चित्रपटाला खऱ्या अर्थानं प्रभावी बनवण्यात भूमी पेडणेकर, अपारशक्ती खुराना नि अगदी संक्षिप्त भूमिकांतील राजेश शर्मा, नीरज सूद, के. के. रैना, नवनी परिहारसारख्या कलाकारांचा महत्त्वाचा वाटा आहे.
‘पती, पत्नी और वो’ हा एक रंजक पलायनवादी चित्रपट असला तरी त्याच्या केंद्रस्थानी असलेला विषय आणि तो ज्या काळात बनवला जात आहे, त्याचा विचार केल्यास सदर चित्रपटाकडून परिपक्वतेची अपेक्षा ठेवण्यात काहीच गैर नाही. सदर चित्रपट मात्र विवाहबाह्य संबंध या संकल्पनेचं अतिसुलभीकरण करण्यात आणि अगदी सोयीस्कर, ट्विस्ट असलेला शेवट करण्यातच धन्यता मानतो. ज्यामुळे तो केवळ केंद्रस्थानी असलेल्या पुरुषाच्या चुकीच्या कृतींचं समर्थन करत चित्रपटातील दोन्ही स्त्रीपात्रांची नि एक प्रकारे ती पाहून हसणाऱ्या प्रेक्षकांची खिल्ली उडवतो. सोयीस्कर रस्ता न निवडता निवडलेला अनपेक्षित मार्गही अशा वेळी सदर चित्रपटाला अधिक प्रशंसनीय बनवण्यात सहाय्यक ठरला असता. अर्थात मुख्य प्रवाहातील बॉलिवुड चित्रपटांकडून अशा अपेक्षा ठेवण्यापलीकडे आपण करूच काय शकतो म्हणा!
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment