‘पानिपत’ : इतिहास आणि पलायनवाद यांचा सुवर्णमध्य साधणारा प्रभावी चित्रपट 
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘पानिपत’चं पोस्टर
  • Sat , 07 December 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie पानिपत Panipat आशुतोष गोवारीकर Ashutosh Gowariker क्रिती सेनन Kriti Sanon अर्जुन कपूर Arjun Kapoor संजय दत्त Sanjay Dutt

‘पानिपत’ एका अर्थी (लेखक-दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरच्या इतरही चित्रपटांप्रमाणे) महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. म्हणजे निर्मितीमूल्यं, भव्यता या गोष्टी झाल्याच, पण कथेच्या पातळीवर सदर चित्रपट पराभूत बाजूची कथा सांगत असल्याने त्या दृष्टीनेही काही प्रमाणात महत्त्वाकांक्षी मानता येईल. घडलेल्या कथेचं कथन करत असताना क्रिती सेननचं पात्र म्हणतं त्याप्रमाणे युद्धात दोन बाजू असतात, एक विजेत्यांची आणि एक पराभूतांची. साहजिकच इथली कथा पराभूत बाजूची आहे. असं असलं तरी या बाजूचं शौर्य, पानिपतच्या तिसऱ्या लढाईत विश्वासघातकी कारवायांनी मराठ्यांना आलेलं अपयश या घटनांनी संपन्न असं हे इतिहासातील प्रकरण नक्कीच रंजक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या संजय लीला भन्साळीपेक्षा जरा कमी कलात्मक स्वातंत्र्य घेणाऱ्या नि जरा अधिक अचूक असणाऱ्या आशुतोष गोवारीकरने हेच प्रकरण दृकश्राव्यरूपात समोर आणलं आहे. असं करताना त्याने इतिहास आणि पलायनवाद यांचं एक उत्तम मिश्रण निर्माण केलं आहे, जे नक्कीच प्रेक्षणीय आहे. 

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात दिल्ली सोडता बहुतेक ‘हिंदुस्तान’ काबीज केलेल्या मराठा साम्राज्यावर कायमच धोका देणाऱ्या काही मित्र पक्षातील राजेरजवाड्यांमुळे, नवनवीन गडकिल्ले काबीज करण्याच्या मोहिमांत लढल्या जात असलेल्या युद्धांमुळे आर्थिक भार पडला होता. अशातच अफगाणहून दिल्ली काबीज करण्यासाठी कूच करत असलेला अहमदशाह अब्दाली (संजय दत्त) आणि त्याला मदत करणारा (किंबहुना आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याच्या उद्देशाने त्याचा वापर करून घेऊ पाहणारा) नजीब-उद-दौला (मंत्रा) यांच्यामुळे मराठ्यांनाही दिल्लीच्या दिशेनं प्रवास करावा लागतो. मराठ्यांचे नेतृत्व करणारा सदाशिवभाऊ पेशवा (अर्जुन कपूर), शमशेर बहादूर (साहिल सलठिया), विश्वास राव भाऊ पेशवा (अभिषेक निगम), इब्राहिम खान गारदी (नवाब शाह) हे सगळे लोक अवघ्या चाळीस हजारांच्या सैन्यासह दिल्लीच्या दिशेनं कूच करत, वाटेत मिळेल त्याची आर्थिक-मनुष्यबळाची मदत घेत अब्दालीला रोखण्याची मोहीम सुरू ठेवतात. जिचा शेवट पानिपतमध्ये मराठा विरुद्ध अब्दालीचं अफगाणी सैन्य, अशी लढाई होण्यात होतो. 

हे मूलभूत कथानक आणि प्रवास, त्यादरम्यान घडलेल्या बऱ्याच लढाया, फिस्कटलेले तह, राजकारण अशा घटनांनी भरलेला आहे. हा सगळा पट समोर मांडताना मात्र चंद्रशेखर ढवळीकर, आदित्य रावल, रणजीत बहादूर नि आशुतोष गोवारीकर यांनी लिहिलेली पटकथा काहीशी विस्कळीत झाली आहे. अनेक गोष्टी अस्पष्ट वा पुरेशा स्पष्टीकरणाशिवाय घडतात, अनेक समस्याही सोयीस्कररीत्या सुटतात असं घडत राहतं. असं असलं तरी महाभारत ते विदेशी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ अशा सर्वच सत्यासत्य महागाथांची आठवण येईलशा प्रभावी रूपात सगळं समोर उभं केलं जातं. सदाशिवराव भाऊ पेशवा आणि त्याची पत्नी पार्वतीबाई (क्रिती सेनन) यांच्यातील नातं इथला बराच भाग व्यापत असला तरी त्यानिमित्तानं कथानकाला गरजेचा असा भावनिक आलेख निर्माण होण्यात मदत होते. क्रिती सेनन त्या दोघांच्या नात्यातील अलवारपणा, नजाकत आणि अनेक बाबतीत पुढाकार घेणारा स्वभाव दाखवणारी पार्वतीबाई सुरेखपणे साकारते. 

खरं तर गोवारीकरच्या चित्रपटात नेहमी घडतं, त्याप्रमाणे एकूणच भूमिका त्या त्या कलाकारांनी उत्तमरीत्या निभावल्या आहेत. अगदी अर्जुन कपूरही इथं बऱ्यापैकी चांगला वाटतो. नानासाहेब पेशव्याच्या भूमिकेतील मोहनीश बहलपासून ते मल्हारराव होळकरच्या भूमिकेतील रवींद्र महाजनीपर्यंत सर्वच संक्षिप्त ते विस्तृत भूमिकांतील कलाकारांची कामं उत्तम आहेत. अर्थात चित्रपटात सर्वस्वी प्रभावी असं कुणी असेल तर तो म्हणजे अब्दालीच्या भूमिकेतील संजय दत्त. त्याच्या अगदी पहिल्याच दृश्यात अब्दालीचं अंगावर येणारं क्रौर्य टिपलं जातं. कोहिनूरजडित मुकुटानं त्याला दगा देणाऱ्या व्यक्तीचं डोकं ठेचणारा अब्दाली ते सदाशिवराव भाऊच्या शौर्याबाबत त्याची किंमत असणारा अब्दाली दोन टोकाच्या घटना नि असीम क्रौर्य ते संयत नेतृत्व, अशा टोकाच्या भूमिका इथं दिसून येतात. 

गोवारीकरच्या या बऱ्याच त्रुटी असलेल्या, कलात्मक स्वातंत्र्य घेणाऱ्या, पराभूत योद्ध्यांच्या कथेलाही शौर्यगाथा म्हणून पेश करणाऱ्या कलाकृतीत या सर्व गोष्टींची खात्री पटवून देण्याची, भावनिक, मानसिक पातळीवर खिळवून ठेवण्याची विलक्षण क्षमता आहे. त्यामुळेच सदर चित्रपट वेळोवेळी भरपूर नाट्यमयता, भव्यता आणि या चित्रपटाशी समांतर नायक नि खलपात्र असलेल्या भन्साळीच्या ‘पद्मावत’पेक्षा (२०१८) अधिक प्रभावी वाटतो. अर्थात चित्रपटातील काही उत्तम दृश्यांसाठी गोवारीकरला ‘बाजीराव मस्तानी’कडे (२०१५) वळत पुन्हा भन्साळीकडून प्रेरणा घ्यावी लागते, हा भाग वेगळा. 

अजय-अतुलची गाणी अगदीच सुरेख आणि श्रवणीय आहेत. गोवारीकर ती ज्या पद्धतीनं पडद्यावर आणतो, त्यात त्याचं खरं दिग्दर्शकीय कौशल्य दिसून येतं. त्याने ऐतिहासिकपटांतून बाहेर पडत एखादी नेटकी सांगीतिका बनवायला हवी असं राहून राहून वाटतं. नितीन चंद्रकांत देसाईचं कला दिग्दर्शन या वेळी काहीसं कृत्रिम वाटतं. यात भर म्हणून की काय अगदीच कामचलाऊ असे व्हिज्युअल इफेक्ट्स इथं दिसत राहतात. 

‘पानिपत’बाबत घडतं असं की, हा चित्रपट निर्माण करणारा गोवारीकर, त्याचा समकालीन असलेला भन्साळी आणि या दोघांच्या प्रभावातून ऐतिहासिकपट बनवणारे इतर लेखक, दिग्दर्शक, चित्रपटकर्ते यांनी स्वतःच निर्माण केलेल्या साच्यामध्ये हा चित्रपट अडकतो. समोर जे आहे ते सुरेख आणि प्रभावी असूनही, “अरेच्चा! हे तर आधीही (आणि काही प्रमाणात याहून प्रभावी रूपात) पाहिलं आहे!” अशी भावना मनात निर्माण होते. ही भावना मनात निर्माण होणं, हेच खरं तर सदर चित्रपटाला अधिक मारक ठरणारं असेल. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......