अजूनकाही
‘बॉईज’ आणि ‘बॉईज-२’ या सिनेमांतल्या करामती मुलांचा धिंगाणा जर कमी-अधिक फरकानं मुलींनी केला तर काय होईल? त्याचं चित्रण ‘गर्ल्स’मध्ये पाहायला मिळतं. ‘बॉईज’च्या दोन्ही भागाचं दिग्दर्शन ज्यांनी केलं, त्याच विशाल देवरुखकर यांच्या दिग्दर्शनातून तयार झालेला हा सिनेमा आहे. त्यांनी ‘बॉईज’चाच फॉर्मुला ‘गर्ल्स’ला लावला आहे. कथानकानं अधोरेखित केलेला ‘सामाजिक संदेश’ मनोरंजनाला ब्रेक लावतो. परिणामी सिनेमाचा शेवट गोड मानून घ्यावा लागतो.
मती देसाई (अंकिता लांडे) महाविद्यालयीन शिक्षण घेणारी विद्यार्थिनी असते. तिचे वडील वन विभागात काम करतात, तर आई गृहिणी असते. मतीला आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं बिनधास्त जगायचं आहे. मौज-मस्ती करायची आहे. तिला वेगवेगळ्या भागात खूप फिरायचं आहे. नवीन स्वप्नं पाहायची आहेत आणि त्यानुसार जगायचं आहे. पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मतीला मात्र तिच्या मनाप्रमाणे मुक्त जगता येत नाही. मतीची आई तिच्यावर सतत बंधनं घालत असते. समाज काय म्हणेल या भीतीपेक्षाही ‘आमच्या काळात नव्हतं असं काही!’ असं ती म्हणत असते.
मतीचा स्मार्टफोन तपासून बघणं, तिने कुठले कपडे घातले आहेत, दिवसभर फोन करून तिची चौकशी करत राहणं, अशा बंधनांचा मतीला मात्र त्रास व्हायला लागतो. एक दिवस तिच्या वडिलांची बदली कोल्हापूरला होते. तिथल्या नवीन महाविद्यालयात ती प्रवेश घेते. तिथं तिला नवीन मित्र-मैत्रिणी भेटतात. सदाशिव ढोले (पार्थ भालेराव) तिचा जवळचा मित्र बनतो. ती त्याला घरची परिस्थिती सांगते. मग मतीची गोव्याला फिरायला जायची इच्छा पूर्ण करण्यात सदाशिव तिला मदत करतो. गोव्यात फिरायला गेल्यानंतर मतीला मॅगी (केतकी नारायण) आणि रुमी (अन्विता फलटणकर) या दोन मैत्रिणी भेटतात. तिघींची गट्टी जमते. या मुली पारंपरिक समाजव्यवस्थेतील बंधनांना (?) कधी धक्के, तर कधी छेद देत राहतात.
सिनेमाचं दिग्दर्शन चांगलं आहे. मात्र कथानक फारसं प्रभावी ठरत नाही. पूर्वार्ध मतीभोवती फिरतो, तर उत्तरार्ध गोव्याच्या समुद्रकिनाऱ्याभोवती फिरतो. (अर्थात गोवा ज्यांनी पाहिला नाही. अशांना गोव्यातलं पर्यटन मोठ्या पडद्यावर पाहता येईल.) उत्तरार्धात येणारी, ओढून-ताणून आणलेली वळणं जुळून येत नाहीत. ती रहस्याचे धक्के देण्याऐवजी प्रेक्षकांतली उत्सुकता कमी करतात. कारण पुढच्या घटनाक्रमाचा अंदाज त्यातून यायला लागतो.
आणखी एक म्हणजे संधी मिळेल तिथं अंगप्रदर्शन करणाऱ्या नायिका अभिनयाच्या बाबतीत निराश करतात. पार्थ भालेराव ‘बॉईज’च्या धुंदीतून बाहेर पडलेला नाही! संगीत भडक आहे. गाण्यात नवीन काही नाही. जुनीच गाणी नवी करून वाजवली आहेत. द्विअर्थी संवाद सेक्स कॉमेडी प्रकारातले आहेत. मुलींची घुसमट दाखवण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. मात्र ती पडद्यावर आणताना कथानकातला विसंगतपणा उमटून पडतो.
तीनही मुली बंडखोर आहेत, मात्र त्या जेव्हा गोव्यात येतात, त्यानंतर त्यांच्या मौज-मस्तीसाठी पैसे कुठून येतात, याचं उत्तर मिळत नाही. कहर म्हणजे या मुली सिनेमाच्या नायिका असल्यामुळे त्या सतत एकमेकींसोबत वावरतात. एकाही दृश्यात त्या एकट्या दिसत नाहीत. त्या मुलांशी फायटिंग करतात, तर कधी दारू-सिगारेटला स्वातंत्र्याशी जोडतात. गोव्यावरून निघून कोल्हापूरला आणि त्याहीपेक्षा कमी वेळेत परत गोव्याला पोहचतात. विश्वासघात करणाऱ्या बॉयफ्रेंडचं लग्न मोडतात, द्वेषामुळे वेगळ्या झालेल्या कुटुंबाची मनं जुळवतात. अवघ्या विशीतल्या मुलींच्या या चमत्कारिक गोष्टींनी त्या ‘सुपर गर्ल्स’ वाटायला लागतात.
या अतिशयोक्ती आणि भडक कथानकाचा शेवट मात्र पारंपरिक पद्धतीनंच होतो. मती तिच्या आईला एकदा म्हणते – ‘तू ओव्हर रिअॅक्ट होत आहेस.’ सिनेमा पाहून झाल्यावर आपल्यालाही तसंच वाटतं.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment