‘त्रिज्या’ झळकणार युरोपातल्या ‘ब्लॅक नाइटस्’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
टीम अक्षरनामा
  • ‘त्रिज्या’चं पोस्टर
  • Sat , 23 November 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie त्रिज्या Trijya अक्षय इंडीकर Akshay Indikar

अक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’ या सिनेमाची निवड, इस्टोनिया, टॅलिन येथे होणाऱ्या ‘ब्लॅक नाइटस्’ या अतिशय मानाच्या फिल्म फेस्टिव्हलसाठी करण्यात आली आहे. इस्टोनिया देशातल्या टॅलिन या शहरात १५ नोव्हेंबर २०१९ ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीत हा फेस्टिवल संपन्न होणार आहे. जगातल्या फक्त १४ ‘अ’ दर्जाच्या फिल्म फेस्टिव्हलपैकी ‘ब्लॅक नाइटस्’ हा एक अतिशय महत्त्वाचा फिल्म फेस्टिवल आहे. जगभरातल्या ७८ देशांमधून येणाऱ्या विविध सिनेमांपैकी २५० सिनेमे या सोहळ्यात दाखवले जातात. साधारण ८०,००० सिनेरसिक जगभरातून या फेस्टिव्हलला हजेरी लावतात.

या फेस्टिव्हलमध्ये झळकणारा ‘त्रिज्या’ हा पहिला मराठी सिनेमा असणार आहे. या आधी चीन देशात संपन्न झालेल्या ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’ या अतिशय मानच्या समजल्या जाणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये ‘त्रिज्या’ प्रदर्शित करण्यात आला होता. त्या वेळी जगातल्या अतिशय नामांकित अशा ‘द हॉलिवुड रिपोर्टर’ या ८८ वर्षं जुन्या आणि ‘स्क्रीन इंटरनॅशनल’ या १२२ वर्ष जुन्या मासिकात ‘त्रिज्या’चे वेगळेपण दर्शवणारे परीक्षणात्मक लेख झळकले. ‘त्रिज्या’वर जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. टॅलिनमध्ये जगभरातून आलेल्या विविध भाषांमधल्या, विविध देशांमधल्या हजारो सिनेमांमधून ‘त्रिज्या’ या एकमेव व पहिल्या मराठी सिनेमाची निवड ही मराठी सिनेमाच्या इतिहासातील विलक्षण अशी घटना आहे. मराठी सिनेमासाठी व सिनेरसिकांसाठीही ही बाब नक्कीच कौतुकाची ठरणार आहे.

यापूर्वी ज्येष्ठ मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनावर आधारलेल्या मराठीतल्या पहिल्या Docu-Fiction सिनेमामुळे अक्षय इंडीकर यांचे नाव चर्चेत आले होते. तसेच या सिनेमाचा वेगळा बाज अनेकांच्या पसंतीसही उतरला होता. त्यामुळे अक्षय इंडीकर यांच्या आगामी सिनेमाची वाट अनेक सिनेरसिक आवर्जून पाहत होते. कान्स येथे झालेल्या फिल्म फेस्टिवलमध्ये ‘त्रिज्या’चा ट्रेलर दाखवण्यात आला होता. चित्रकथी निर्मितीचे अरविंद पाखले तसेच फिरता सिनेमा आणि बॉम्बे बर्लिन फिल्म प्रोडक्शन्सचे अर्फी लांबा व कॅथरीना झुकाले यांनी ‘त्रिज्या’ या सिनेमाच्या निर्मितीस हातभार लावला. बॉम्बे बर्लिन फिल्म्स हे इंडो-जर्मन प्रोडक्शन हाऊस आहे. भारत आणि जर्मनी या दोन देशांची निर्मिती असलेला ‘त्रिज्या’ हा मराठीतला अद्वितीय सिनेमा असणार आहे. या सिनेमाच्या लेखनाची, दिग्दर्शनाची आणि संकलनाची जबाबदारी २७ वर्षीय अक्षय यांनी पेलली आहे. सिनेमातली प्रमूख भूमिका अभय महाजन यांनी साकारली असून त्यांच्यासोबत श्रीकांत यादव, गजानन परांजपे, चंदू धुमाळ, सोमनाथ लिंबरकर, वर्षा मालवडकर आणि गिरीष कुलकर्णी प्रमूख भूमिकेत आहेत. सिनेमाचे छायांकन स्वप्नील शेटे आणि अक्षय इंडीकर या दोघांनी मिळून केले आहे. 

आजच्या काळात एक चांगला सिनेमा तयार करणे या गोष्टीइतकीच तो सिनेमा व्यवस्थित पद्धतीने लोकांपर्यत, जाणकार रसिकांपर्यंत घेऊन जाणे ही गोष्ट महत्त्वाची होऊन बसली आहे. त्यासाठी ‘त्रिज्या’ची संपूर्ण टीम सातत्याने झटते आहे. शांघाय येथे झालेल्या, ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्यात प्रदर्शित झालेला ‘त्रिज्या’ अनेकांच्या कौतुकाचा विषय ठरला होता. त्या सोहळ्याला उपस्थित जगभरातल्या अनेक प्रसिद्ध दिग्दर्शकांनी अक्षय इंडीकर यांची पाठ थोपटली होती. ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’नंतर ‘ब्लॅक नाइटस्’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये झालेल्या निवडीने ‘त्रिज्याचा’ आणि त्या अनुषंगाने मराठी सिनेमाचा आलेख उंचावत गेल्याचे दिसून येत आहे. भारतभरातल्या सिनेरसिकांसाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे.

अक्षय इंडीकर मूळचे सोलापूर येथील असून त्यांचा जन्म एका लोककलावंताच्या घरात झाला. लहानपणापासून कुटुंबाच्या एकसारख्या होणाऱ्या स्थलांतरामुळे, स्थलांतरांचा दीर्घ परिणाम त्यांच्या मनावर उमटत गेला. त्याच वेळी त्रिज्याचं बीज त्यांच्यामनात खोलवर रुजलं. सिनेमाची आवड निर्माण झाल्यानंतर पुण्यात स्थलांतरित झालेल्या तरुणांच्या मनातील कोलाहल रेखाटणारा चित्रपट करण्याचे त्यांनी ठरवले. “FTI मध्ये शिक्षण घेत असताना डोक्यात अनेक विषय होते. जगाविषयी काही बोलण्यापेक्षा स्वत:विषयी काही वेगळं देता येईल का? हा विचार डोक्यात घोळत होता. जगाला संदेश देण्याएवढे आपण मोठे नसतो. आणि होतही नाही. आयुष्यभर आपण स्वत:लाच समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सिनेमाचं कथानक लिहीत असताना आपण स्वत:च्याच आयुष्याची गोष्ट मांडावी का? असा विचार डोक्यात आला. त्यातूनच या सिनेमाची निर्मिती झाली”, असे अक्षय इंडीकर यांनी सांगितले. तसेच “हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यावरील बायोग्राफी नाही. तर हा सिनेऑटोबायोग्राफी म्हणायला हरकत नाही. कोणतीही चांगली कलाकृती आत दडलेल्या भावना. इच्छा, आकांशा, आठवणी किंवा स्वप्नांमधूनच बाहेर येते. ‘त्रिज्या’चाही प्रवास तसाच सुरू झाला.” हेही अक्षय यांनी नमुद केले.

आशियातील एका महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवापासून सुरू झालेला ‘त्रिज्या’चा प्रवास, पुण्यामुंबईच्या पलीकडे जाऊन अक्षय इंडीकर यांच्यासारख्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या तरुण दिग्दर्शकांना प्रेरणा देत आहे. मराठी सिनेमाचं स्वरूप केवळ नाचगाणी आणि क्षणिक मनोरंजनाचं साधन यातच कुठेतरी घुसमटलेलं असल्याने, त्यातून बाहेर पडून स्वतःला हवा तसा सिनेमा करणे, कलात्मक तडजोड न करताही, प्रेक्षकांना काय आवडेल याची सांगड घालणे आणि ही तारेवरची कसरत करत मराठी सिनेमा मानवी जीवनाचा वास्तववादी आरसा म्हणून जगासमोर आणणे गरजेचे आहे. मराठी सिनेमाची ‘त्रिज्या’ सतत विस्तारित राहावी यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहूच असं अक्षय यांनी सांगितलं.

‘त्रिज्या’सारखा नव्या ऊर्जेचा, नव्या चित्रपटीय भाषेचा, नव्या भौगोलिक स्थानांचा सिनेमा जेव्हा मराठीत सातत्याने तयार होत राहिल तेव्हा मराठी चित्रपटाची त्रिज्या सर्वार्थाने विस्तारली असे म्हणता येईल.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......