अजूनकाही
शहरात राहणाऱ्या अविनाश देशपांडे (निखिल रत्नपारखी) आणि जया देशपांडे (सई ताम्हणकर) या जोडप्याला एक आठ वर्षांचा मुलगा असतो. अविनाश पूर्वजांच्या कमाईवर चैन करणारा पुरुष, तर जया प्रचंड महत्त्वाकांक्षी स्त्री. शिक्षणासाठी मुलाला वसतीगृहात ठेवलं जातं. जयाला मात्र अविनाशचं असं बसून राहणं पसंत नसतं. म्हणून त्यांच्यात सतत वाद होतात. जया कंटाळून आईकडे निघून जाते. पतीकडून लैंगिकसुख मिळत नाही, असं आईला (नीना कुलकर्णी) स्पष्ट सांगते. पुढे घटस्फोट घेऊन स्वतंत्र जगू पाहते. पण आयुष्यात पुरुष असावा म्हणून सतीश कुलकर्णी (राजेश शृंगारपुरे)च्या प्रेमात पडते. त्याचाही घटस्फोट झालेला असतो आणि तो त्याच्या मुलासोबत राहत असतो. म्हणजे दोघांची गरज सारखीच असते. याच परिस्थितीला कथानकाच्या मध्यस्थी ठेवून जे काही रंगवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यातून ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ हा सिनेमा उभा राहतो.
‘बेडवर पुरुष हवाच’ या वाक्याने सुरू झालेला सिनेमा हळूहळू निरस करत जातो. त्यातली लयबद्धता, मांडणी आणि आशय यांचा बिंदू कुठेही एकरूप होत नाही. त्यामुळे सिनेमाची परिणामकारकता टिकून राहत नाही. अभिनयाची शैली इतकी विसंगत आहे की, सिनेमात जणू एक वेगळंच विश्व अवतरलं आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांभोवती कथानक फिरत राहतं. या शहरातील सांस्कृतिक वेगळेपण दाखवण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शकानं अतिशयोक्तीच्या सीमापार केल्या आहेत.
सिनेमातली मुलं प्रचंड प्रगल्भ दाखवली आहेत. त्यांच्या तोंडातून येणारी इंग्रजी वाक्यं आश्चर्याचे धक्के देत राहतात. इंग्लिश सिनेमात एक-दोन मराठी वाक्यं यावीत असा हा खेळ. त्यात भर म्हणजे पूर्वार्ध लडाखच्या सुंदर दृश्यानं भरलेला आहे. सहलीसाठी लडाखला गेलेल्या लहान मुलाला तेथील थंड रात्रीत आई-वडिलांच्या काळजीपोटी झोप लागत नाही आणि तो चिंतेनं कडाक्याच्या थंडीत रात्रभर बाहेर बसून राहतो. आई-वडील मात्र निवांत झोपलेले असतात.
या गोंधळातही दिग्दर्शकानं जाहिरातीची संधी मात्र सोडलेली नाही. महाभृंगराज तेलाची जाहिरात दाखवली आहे. कहर म्हणजे म्हणजे नात्यातील तत्त्वज्ञानाचे अखंड आणि तितकेच कंटाळवाणे संवाद ऐकून आपल्या सहनशीलतेचा अंत पाहिला जातो. एक-दोन गाणी सोडली तर संगीतामधील भडकपणा अंगावर येतो.
एका दृश्यात अविनाश देशपांडे एका स्त्रीला खोलीत बंद करतो. पुढे त्या दृश्याचा सिनेमात चुकूनही उल्लेख येत नाही. त्याचबरोबर जया तिच्या खास मैत्रिणीशी नवऱ्यासंबंधी बोलत असते. त्यात सलग पाच मिनिटं ती मैत्रीण एकाच जागेवर उभी असल्याचं दाखवलं आहे. ती एक शब्दही बोलत नाही. कथानकाला पुढे ढकलण्यासाठी अशा अनेक दृश्यांची केलेली जुळवा-जुळव सहज दिसून येते. सई ताम्हणकर, राजेश शृंगारपुरे आणि नीना कुलकर्णी यांच्या भूमिका पुरेशा उठावदार वा उत्कट झालेल्या नाहीत. निखिल रत्नपारखीचा विनोदी अभिनय मात्र अधूनमधून हसवतो.
उत्सुकता निर्माण करणारी दृश्यं पारंपरिक पद्धतीनं रंगवलेली आहेत. कथानकात स्त्रीच्या लैंगिकसुखाला मध्यवर्ती ठेवूनही सिनेमा तेवढ्या प्रभावीपणे त्यावर भाष्य करत नाही. या उलट अभिजनवर्गाचं काल्पनिक चित्रण विसंगत वाटावं इतकं गडद दाखवलं आहे. स्त्रियांची मानसिक आणि लैंगिक कुंठीत अवस्था दाखवताना पुरुषांच्या पुरुषीपणावर दिग्दर्शकानं बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र सिनेमा आडनावावरून चालणाऱ्या गोंधळाकडे जेव्हा वळतो, तेव्हा मात्र कथानकाची लयबद्धता राहत नाही.
एकीकडे पारंपरिक समाजव्यवस्था तर दुसरीकडे आधुनिक समाज यांच्यात गुंतून गेलेली स्त्री सगळी बंधनं झुगारून स्वतःचं आणि येणाऱ्या पिढीचं अस्तित्व निर्माण करू पाहते. अशा वेळी तिचं जगणं एखाद्या खेळण्याप्रमाणे होतं. याच रेषेला धरून शेवटाकडे जाणारा, मात्र पूर्णतः विसंगतीनं भरलेला ‘कुलकर्णी चौकतला देशपांडे’ आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यात कमी पडतो.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment