अजूनकाही
मुंबईत सध्या पृथ्वी थिएटरच्या वार्षिक नाट्यमहोत्सवाची धामधुम सुरू आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात संपन्न होणाऱ्या या महोत्सवाचे यंदाचे ३०वे वर्ष आहे. या वर्षी मुंबईतील १५ ठिकाणी २८ विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात नाटकांचे प्रयोग आहेत, रंगभूमीबद्दल चर्चा आहे, नाट्यकर्मींबरोबर गप्पा आहेत. मला या नाट्यमहोत्सवात युजिन आयानेस्कोची ‘द लेसन’ ही एकांकिका बघण्याची संधी मिळाली.
विसाव्या शतकातील जागतिक रंगभूमीवरील एक आदरणीय नाव म्हणजे रूमेनियन-फ्रेंच नाटककार युजिन आयानेस्को (१९०९-१९९४). त्यांनी फ्रेंच भाषेत लेखन केलं. त्यांच्या एकुणच लेखनात, खासकरून नाटकांत मानवी जीवनाला तसा फारसा अर्थ नाही, सर्व जीवनच अॅब्सर्ड, असंगत भावनांनी भरलेलं असतं वगैरे आशयसूत्रं आढळतात. मराठी रसिकांना एका नकारात्मक कारणांमुळे आयानेस्को माहिती असण्याची शक्यता आहे. पु.ल. देशपांडे यांनी आयानेस्कोच्या ‘द चेअर्स’ या गाजलेल्या नाटकाचे ‘खुर्च्या, पण भाड्याने आणलेल्या’ असं विडंबनात्मक रूपांतर केलेलं आहे.
१९५० सालच्या ‘द बॉल्डसोप्रॅनो’ या नाटकानं आयानेस्कोच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्याचं अतिशय गाजलेलं नाटक म्हणजे ‘द हायनोशियर्स’ (१९५९). त्याची ‘द लेसन’ ही एकांकिका १९५१ सालची. एक व्यक्तिगत स्वरूपाची माहिती द्यायची म्हणजे माझ्या जीवनात ‘आयानेस्को’ हे नाव मालतीबाई बेडेकरांचं एक भाषण ऐकताना आलं. त्यांनी त्या भाषणात आयानेस्कोच्या ‘द हायनोशिअर्स’ या नाटकाचा उल्लेख केला होता. नंतर समजलं की, मालतीबाईंनी या नाटकाचं मराठीत भाषांतर केलं आहे. असो.
‘द लेसन’ या एकांकिकेत एकुण तीन पात्रं आहेत. पन्नाशीच्या आसपास आलेला व एकटा असलेला एक प्राध्यापक, त्याच्याकडे शिकायला येत असलेली १८-२० वर्षांची विद्यार्थिनी आणि प्राध्यापकाकडे घरकाम करणारी चाळीशीच्या आसपासची एक मोलकरीण. एकांकिका सुरू होते तेव्हा मोलकरीण घराची साफसफाई करताना दिसते. थोड्याच वेळात एक तरुण विद्यार्थिनी येते व नंतर प्राध्यापक हजर होतात. नाटक सुरू झाल्यानंतर तीन-चार मिनिटांतच आपल्या लक्षात येतं की, रंगमंचावर जे घडत आहे, ते सर्व प्रसंग तसे आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनातील, आपल्या पाहण्यातील आहेत; मात्र आता रंगमंचावर ते प्रसंग बघताना हे सर्व किती विचित्र आणि असंगत वाटतात! ही असंगत रंगभूमीची खरी ताकद आहे. या प्रसंगांतून आणि एकुण जगण्यातूनच मानवी जीवन किती निरर्थक आहे, असं वाटायला लागतं. सुमारे एक तास चालणारी ही एकांकिका इंग्रजीत सादर केली गेली.
या एकांकिकेला तसं जबरदस्त म्हणता येईल असं कथानक नाही. प्राध्यापक-विद्यार्थिनी यांच्यातील संवाद व अधूनमधून रंगमंचावर या ना त्या कारणानं येणारी ती मोलकरीण, या पलीकडे एकांकिकेत काही भव्यदिव्य घडत नाही. जसं प्रत्येक तरुण-तरुणीला आपण खूप खूप शिकावं, मोठं व्हावं, नाव कमवावं असं वाटत असतं, तसंच एकांकिकेतील तरुणीलाही वाटतं असतं. तिच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी नाटकातील प्राध्यापक तिला अगदी साधे प्रश्न विचारतो. उदाहरणार्थ १ + १ किती होतील, नंतर १ + २ किती होतील वगैरे. ती जसं जसं या प्रश्नांची बिनचूक उत्तरं देते, तसं तसे प्राध्यापक अधिकच उत्तेजित होत तिला आणखी प्रश्न विचारत जातात.
बेरजेचं ज्ञान तपासल्यानंतर ते तिला वजाबाकीचं गणित घालतात. उदाहरणार्थ चारातून तीन उणे केले तर किती उरतील? आता मात्र ती विद्यार्थिनी धादान्त चुकीची उत्तरं द्यायला लागते. प्राध्यापक हळूहळू चिडायला लागतो. शिवाय त्या विद्यार्थिनीची तब्येत बिघडायला लागते. सुरुवातीला तिला दातदुखीचा त्रास सुरू होतो, नंतर तर सर्व शरीरच दुखायला लागतं. यामुळे प्राध्यापक अधिकच चिडतो. त्याचा राग वाढत जातो. रागाच्या भरात अंगावरचा एकेक कपडा काढत जातो. शेवटी त्याला राग असह्य होतो.
या दरम्यान एकदा घर कामवालीबाई येते व प्राध्यापकाला ‘रागावर ताबा ठेवा. तुमच्या तब्येतीसाठी हे चांगलं नाही’ वगैरे सांगून विंगेत जाते. प्राध्यापकाचा रागावरचा ताबा सुटतो व तो विद्यार्थिनीला भोसकून मारतो. या सर्व घटना शेवटच्या १०-१५ मिनिटांत घडतात. या घटनांचा वेग एवढा आहे की, आपण हे सर्व बघून सुन्न होतो. जणू काही खून कधी होतो याची विंगेत वाट पाहत असलेली बाई चटकन रंगमंचावर येते आणि साफसफाई करते. तिच्या क्रियेत एक प्रकारची व्यावसायिक सफाई असते. इथं आपण जरा सावध होतो. प्राध्यापकाच्या घरात खून झाला आहे, नव्हे तो खून प्राध्यापकानंच केलेला आहे; याची खात्री असूनही ती कामवाली शांतपणे साफसफाई कशी करू शकते?
तेवढ्यात दारावर थाप ऐकू येते, एक नवीन विद्यार्थिनी रंगमंचावर येते. ती बाई कुत्सित हास्य करत तिला आत घेते आणि प्राध्यापकाला मुलीबद्दल सांगायला आत जाते. या प्राध्यापकाने अशा प्रकारे जवळपास ४० मुलींचा बळी घेतलेला असतो.
आयानेस्कोची ‘द लेसन’ ही एकांकिका ‘असंगत रंगभूमी’चा (थिएटर ऑफअॅब्सर्ड) उत्तम आविष्कार समजला जातो. यातून नाटककारानं हुकूमशाही शासनव्यवस्था, भाषेचं राजकारण वगैरेंवर जोरदार टीका केली आहे. ‘द लेसन’ बघताना जॉर्ज ऑर्वेलच्या ‘लँग्वेज अँड पॉलिटिक्स’ या अजरामर वैचारिक लेखाची सतत आठवण होते. तेव्हाच्या अनेक लेखक/विचारवंतांप्रमाणेच आयानेस्कोलासुद्धा माणसांना गुलाम करणाऱ्या सर्व प्रकारच्या शासन व्यवस्थांबद्दल तिटकारा होता. त्यात हिटलरशाही, स्टालिनशाही वगैरे सर्व प्रकारच्या शासन व्यवस्थांचा अंतर्भाव करता येतो. नाटकाच्या अगदी शेवटी कामवाली प्राध्यापकाला दंडाला बांधण्यासाठी एक पट्टा देते. या छोट्याशा कृतीतून ते पात्र नाझी राजवटीबद्दलचा राग व्यक्त करतं. नाझी समर्थक दंडावर असे पट्टे बांधत असत.
या नाटकाचा प्रयोग महालक्ष्मी येथील ‘जी 5 ए’ या ब्लॅक बॉक्स थिएटरमध्ये झाला. हे थिएटर प्रायोगिक नाटकांसाठी अगदी आदर्श आहे. इथं दिग्दर्शक हवा तसा रंगमंच उभारू शकतो, हवी तशी प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था करू शकतो. या नाटकासाठीसुद्धा दिग्दर्शक सुकांत गोयल यांनी प्रेक्षकांच्या मधोमध एक आयताकृती रंगमंच उभारला होता. परिणामी दोन बाजूला प्रेक्षक व मध्ये रंगमंच, अशी जरा अनोखी मांडणी केली होती. रंगमंचावर सर्वत्र, मोठ्या प्रमाणात समुद्र किनारी असते, तशी वाळू पसरून ठेवली होती. दोन कोपऱ्यात दोन खुर्च्या आणि जमिनीवर पसरलेली जुन्या बांधणीची पुस्तकं. एका कोपऱ्यात पडदा टाकून तयार केलेली विंग. यातून प्राध्यापक व कामवालीबाई ये-जा करत असतात.
नाटकाच्या असंगत आशयाला साजेसं हे नेपथ्य आहे, हे प्रथमदर्शनीच समजतं. त्यातील अनेक वस्तू प्रतीकात्मक आहेत. उदाहरणार्थ अस्ताव्यस्त पसरलेली जुन्या पद्धतीची पुस्तकं. जेव्हा प्राध्यापक त्या विद्यार्थिनीला भाषाशास्त्र शिकवतो, तेव्हा तो स्पॅनिश, निओ-स्पॅनिश वगैरे भाषांचा उल्लेख करतो. जमिनीवर अस्ताव्यस्त पसरलेली पुस्तकं म्हणजे मातीमोल असलेलं ज्ञान असू शकतं किंवा प्राध्यापकानं एवढी वर्षं पुस्तकं वाचून मिळवलेलं तथाकथित ज्ञान कसं त्या वाळूसारखं किरकोळ आहे, असंही अभिप्रेत असू शकतं… असे अनेक अर्थतरंग उमटवणारी ती सर्वत्र पसरलेली वाळू नाटकाचा आशय धारदार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
संहितेबद्दल तर बोलायलाच नको. एका जागतिक कीर्तीच्या नाटककाराचं हे नाटक आहे. त्याचं दिग्दर्शन सुकांत गोयल यांनी केले आहे. हे नाटक म्हणजे नटांच्या क्षमतेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणारी संहिता आहे. अतुल कुमार (प्राध्यापक), जयाविर्ली (विद्यार्थीनी) व अॅना अडोर (कामवाली बार्इ) या तीन पात्रांचं हे नाटक आहे. या तिन्ही नटांनी कमालीचा सहजसुंदर अभिनय केला आहे. अतुल कुमार यांनी सतत बडबड करत राहणारा व आतून अतिशय हिंस्त्र असलेला प्राध्यापक फार सहजपणे सादर केला आहे. या भूमिकेसाठी त्यांना किती पाठांतर करावं लागलं असेल, या विचारानंच छाती दडपल्यासारखी होते. अतुल कुमारच्या अभिनयाला तितक्याच ताकदीनं साथ दिली आहे, ती विद्यार्थिनीच्या भूमिकेतल्या जयाविर्ली या तरुणीनं आणि कामवालीच्या छोटयाशा पण महत्त्वाच्या भूमिकेतील अॅना अडोर या महिलेनं. या तिघांच्या अभिनय क्षमतेमुळे आयानेस्कोच्या या असंगत नाटकातील न सांगितलेला आशय प्रेक्षकांपर्यंत त्यातील सर्व कळांनिशी पोहोचतो.
युजिन आयानेस्को, युजिन ओ’नील, एडवर्ड आल्बी वगैरे नाटककारांशी माझं नातं काय? काय म्हणून हजारो मैल दूर राहून लिहिलेली, पाच/पन्नास वर्षांपूर्वी सादर झालेली नाटकं, आज २०१९ सालीसुद्धा मला मुंबई महानगरात बघताना एक वेगळेच नाते आयानेस्को आणि माझ्यात निर्माण झालेले वाटते? या आणि अशा प्रश्नांची उत्तरं मिळतील तो सुदिन!
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
लेखक प्रा. अविनाश कोल्हे समीक्षक व कादंबरीकार आहेत.
nashkohl@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment