‘कॉपी’ : बाजारू शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा चित्रपट
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘कॉपी’चं पोस्टर
  • Sat , 09 November 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie कॉपी Copy अंशुमन विचारे Anshuman Vichare मिलिंद शिंदे Milind Shinde

चित्रपट सुरू होते, तेव्हा पहिल्याच दृश्यात शाळा दिसते आणि सोबत एका शिक्षिकेचा आवाज येतो, ‘विद्यार्थ्यांनो, ‘कॉपी’चं स्पेलिंग काय?’ विद्यार्थी म्हणतात, ‘C o p i.’ आणि तेवढ्यात हातावर छडी बसते, तिचा आवाज पार्श्वभूमीला घुमत राहतो. विद्यार्थी पुन्हा ‘कॉपी’चं स्पेलिंग सांगू लागतात, ‘C o p y’.

परीक्षेत कॉपी करून शंभर टक्के निकाल लावणाऱ्या शाळेची ही गोष्ट आहे. शिक्षणव्यवस्थेच्या प्रत्येक टप्प्यावर चाललेल्या अनागोंदी घटनेवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. 

पुढे पूर्वार्ध संपेपर्यत सिनेमाची प्रेक्षकांवरची पकड सैल होत नाही. प्रत्येक दृश्यात पटकथेला साजेसा अभिनय पहायला मिळतो. त्यामुळे लयबद्ध मांडणीची परिणामकारकता टिकून राहते. उत्तरार्धात येणारी गाणी पटकथेच्या लयबद्धतेला थोडी अडचण निर्माण करतात. परिणामी सिनेमाची प्रेक्षकांवरची पकड कमी होते आणि इथेच गावातली शाळा काही तासात बंद होणं असो, किंवा शिक्षण अधिकाऱ्याची झालेली बदली असो, यासारख्या घटना इतक्या वेगानं घडत जातात की, त्यामुळे उत्तरार्ध परिणामकारक वाटत नाही. पण शेवट मात्र अंगावर येणारा आहे. त्यातलं वास्तव दर्शवणारा आहे. 

‘कॉपीची परवानगी दिली आहे, मग लिहा गुपचूप, आवाज काय करताय!’ असं म्हणत शिंदे गुरुजी (मिलिंद शिंदे) परीक्षा सुरू असतानाच झोपी जातात, वर्गात बाई मोबाईलवर कँडीक्रश गेम खेळत बसतात. तर दुसरीकडे कर्तव्याशी प्रामाणिक असणारे दोन शिक्षक म्हणजे विचारे (अंशुमन विचारे) आणि निवंगुणे (जगन्नाथ निवंगुणे) अगदी शिस्तीत विद्यार्थ्यांवर नजर ठेवून असतात. अशा परस्पर विरोधी दृश्यातून व्यवस्थेच्या मानसिकतेवर भाष्य अत्यंत संयमानं वास्तवचित्र उभं केलं आहे. 

सरकारी अनुदानीत शाळेभोवती फिरणारी कथा हळूहळू संपूर्ण व्यवस्थेकडे वळते, तेव्हा त्यातला प्रभावीपणा किंचित कमी होत जातो. मात्र त्याचा तोल सांभाळण्याचा दिग्दर्शकानं पुरेपूर प्रयत्न केला आहे. शिक्षण अधिकारी शाळेला भेट देतात आणि तिथला बोगस प्रकार लक्षात येताच त्याच दिवशी शाळा बंद करतात. त्यामुळे शिक्षणसंस्थेचा अवखळ कारभार पुढे येतो. एका छोट्या घटनेवरून पुढे जे काही होत राहतं, त्यातला मोठा भाग कथेला पूरक ठरतो. एका दृश्यात जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर उपोषणासाठी बसलेली दोन शिक्षक आणि मुलं दिसतात. त्याअगोदर शिक्षक आणि शिक्षण अधिकारी यांच्यातला संवाद शिक्षणव्यवस्थेच्या मर्मावर बोट ठेवणारा आहे.

वर्गापेक्षा शाळेनंतर जादाचे वर्ग (ट्यूशन) घेऊन पैसे कमवणारे शिक्षक, वेळेवर पगार न मिळणारे शिक्षक, सरकारी अनुदान घेऊन स्वतःच्या खिशात घालणारे संस्थाचालक, बेजबाबदार पालक आणि विद्यार्थी, होतकरू विद्यार्थ्यांची होरपळ, शिक्षणाच्या बाबतीत कौटुंबिक स्तरावर चालणारा मुलगा-मुलगी असा भेद आणि ‘व्यवस्था भ्रष्ट आहे’ म्हणणारा परिघावरचा मोठा वर्ग, अशा अनेक बाजूंची उभी-आडवी मांडणी सिनेमात आहे. त्याचा प्रभाव काही प्रसंगात कमी-जास्त होत राहतो. मात्र मूळ गाभ्यापासून सिनेमा फारकत घेत नाही. शिक्षण घेऊन नोकरीसाठी संस्थाचालकाला पैसे देऊनही पगार वेळेवर होत नाहीत, म्हणून हताश झालेला शिक्षक जुगारात पैसे लावतो. तेव्हा दोन शिक्षकांमधला संवाद अंगावर येतो. दिग्दर्शक हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे यांनी या सिनेमातून शिक्षण व्यवस्थेवर गंभीरपणे भाष्य करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.  

अंशुमन विचारे, मिलिंद शिंदे, जगन्नाथ निवंगुणे, प्रतीक लाड, श्रद्धा सावंत, अज्ञेश मुडशिंगकर, अनिल नगरकर, कमलेश सावंत, यांनी अभिनयाची धुरा उत्तम सांभाळली आहे. अंशुमनची गंभीर शिक्षकाची भूमिका प्रभावी ठरली आहे, मिलिंद शिंदे यांनीही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. परिणामी सिनेमाचं अभिनयाचं पारडं जड ठरलं आहे. त्याचबरोबर दिग्दर्शन, संवाद, पटकथा आणि तांत्रिक बाबीत सिनेमा चांगला आहे. मात्र संगीताची बाजू फारशी प्रभावी नाही.

जमेची बाजू म्हणजे शिक्षणव्यवस्थेतील अनेक पदर उलगडून दाखवताना सिनेमा कुठल्याही ठाम निष्कर्षाप्रत पोहचत नाही. परिणामी शेवट प्रभावी ठरतो. त्यामुळे सिनेमा अस्वस्थ करणारे प्रश्न निर्माण करून संपतो. ते प्रश्न मात्र मनात रेंगाळत राहतात!

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख