‘बाला’ : सौंदर्याच्या खऱ्या व्याख्येचा विचार करण्याची गरज अधोरेखित करणारा प्रभावी चित्रपट
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘बाला’ची पोस्टर्स
  • Sat , 09 November 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie बाला Bala आयुष्मान खुराना Ayushmann Khurrana यामी गौतम Yami Gautam भूमी पेडणेकर Bhumi Pednekar

‘बाला’मधील एका दृश्यात मुख्य पात्र म्हणतं की, ‘कम, फॉल इन लव्ह विद युवरसेल्फ’. ही ओळ खरं तर सदर चित्रपटाची टॅगलाइन म्हणूनही शोभली असती. आपल्याकडे ‘कम, फॉल इन लव्ह’ अशी टॅगलाइन असलेला ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ (१९९५) हा चित्रपट इतकी वर्षं प्रेमाचं आद्य उदाहरण मानला गेलेला आहे. अशा वेळी समाजानं दोष म्हणून घोषित केलेली स्वतःमधील तथाकथित कमतरता स्वीकारणारं पात्र, आणि ते असलेल्या चित्रपटाकडेही अशाच रीतीनं पाहिलं जायला हवं. याखेरीज तुमच्यातील तथाकथित कमतरता या कमतरता नाहीतच, हे स्वीकारणं चित्रपटातील पात्रासोबतच एक समाज म्हणून आपल्यालाही जमायला हवं. आणि स्वतःच्या प्रेमात पडता यायला हवं.

‘बाला’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ ऊर्फ ‘डीडीएलजे’तील संबंध इथेच संपत नाही. खुद्द चित्रपटातही ‘डीडीएलजे’चा उल्लेख येतो. शिवाय, बालमुकुंद शुक्ला ऊर्फ बाला (आयुष्मान खुराना) या पात्राचं मिमिक्री आर्टिस्ट-कम-कमेडियन असणंदेखील इथं महत्त्वाचं आहे. ज्यामुळे तो शाहरुख खानची नक्कल करताना दिसतो. शाहरुखची एक विशिष्ट अशी ‘रोमँटिक हिरो’ ही प्रतिमा आणि बालाची शालेय जीवनातील लोकप्रियता यांचं घनिष्ठ नातं आहे. लहानपणी बालमुकुंदला ‘बाला’ हे नाव त्याच्या रेशमी केसांमुळे लाभलेलं असतं. म्हणजे शब्दशः होतं, कारण आता पंचविशीच्या आसपास रेंगाळत असणाऱ्या बालाचे घनदाट केस भूतकाळात जमा झाले आहेत. काळाच्या ओघात विरळ होत गेलेल्या केसांची जागा आता टक्कलानं घेतली आहे. त्याच्याच शब्दांचं स्वैर भाषांतर करत सांगायचं झाल्यास ‘एकेकाळच्या शालेय जीवनातील नायकावर आता (टक्कलामुळे) चरित्र अभिनेता बनायची वेळ आली आहे’. साहजिकच शाहरुख खान ते अनुपम खेर असा हा बदल… त्याचीच चिंता बालाला सतावत आहे.

अशात मग त्याला बच्चन दुबेच्या (जावेद जाफरी) रूपात या समस्येवरील नानाविध उपाय सुचवणारा मार्गदर्शक लाभतो. निरनिराळ्या तेलांपासून ते गायीचं शेण आणि बैलाचं वीर्य यांचं मिश्रण डोक्यावर लावण्यापर्यंत अनेक इलाज त्याला सुचवले जातात. दोनेक वेळा तर तो केश प्रत्यारोपण करता करता थांबतो. त्याच्या डोक्यावर होत असलेल्या सगळ्या प्रयोगांची जबाबदारी विहान (धीरेंद्र कुमार गौतम) या त्याच्या लहान भावावर पडते. शेण अधिक वीर्य प्रकरणानंतर तर हा लहान भाऊही या प्रकाराला त्रासून बालाला खडे बोल सुनावणारं भलंमोठं स्वगत म्हणतो.

काही केल्या केस उगवत नसल्यानं बाला त्याच्या पित्याच्या (सौरभ शुक्ला) शुक्राणू नि जनुकांना दोष देण्यात धन्यता मानतो! विनोदांची सततची रीघ लागलेली असताना त्यादरम्यान कुठेतरी भावनिक क्षोभ येईल, असं पाहणं लेखक-दिग्दर्शकांना बरोबर साध्य होतं. इथं विजय राजच्या आवाजात ऐकू येणारं कथन, बाला, त्याचं कुटुंब, त्याचे मित्र नि समोर उद्भवलेल्या (तथाकथित) समस्येला तो ज्या प्रकारे सोडवू पाहतो आहे, तो दृष्टिकोन यांतून शाब्दिक आणि प्रासंगिक दोन्ही तऱ्हेचा विनोद निर्माण होतो. पित्याच्या जनुकांना दोष देण्याच्या दृश्यात शाहरुख खान अभिनित ‘झीरो’मधील (२०१८) अशाच एका दृश्याची आठवण येते. आधी उल्लेख केल्याप्रमाणे शाहरुख खान ही व्यक्ती, त्याचे चित्रपट आणि इथल्या प्रसंगांचा संबंध तसा स्वाभाविक आहे.

व्यावसायिक कारणांमुळे बालाचा संबंध परी शर्मा (यामी गौतम) या स्थानिक मॉडेलशी येतो. सौंदर्यप्रसाधनांची जाहिरात करणारी परी आणि ती विकणारा बाला, हे दोघेही कुठेतरी सौंदर्याच्या बाह्यरूपाशी निगडीत असण्याच्या पारंपरिक व्याख्येत अडकलेले आहेत. काहीशा उपरोधिक प्रकारे त्यांच्यात निर्माण होणारा परस्परविरोध आणि एकुणातच बालाच्या आयुष्यातील समस्या सौंदर्याच्या याच व्याख्येशी निगडीत असणाऱ्या आहेत. परीच्या भूमिकेतील यामी गौतमचं प्रत्यक्ष आयुष्यातही सौंदर्यप्रसाधनांची जाहिरात आणि त्यांचं समर्थन करणं, हे पुन्हा एकदा ‘झीरो’मधील कतरिना कैफच्या स्वतःच्या खऱ्या आयुष्यातील आणि पडद्यावरील भूमिकेतील अंतर कमी होत जाण्याच्या प्रकाराच्या जवळ जाणारं आहे. एका दृश्यात परी स्पष्टपणे तिचं सुंदर असणं तिच्या शैक्षणिक-सामाजिक अपयशावर पांघरूण टाकण्याच्या दृष्टीनं कसं उपयोगी पडतं, हे आणि एकुणातच सौंदर्याची व्याख्या बाह्यरूपावर अवलंबून असणं तिच्या दृष्टीनं का महत्त्वाचं आहे, हे स्पष्ट करते. हे दृश्य चित्रपटाच्या केंद्रस्थानी असलेल्या संकल्पनांच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं.

बालाची लहानपणापासूनची मैत्रीण लतिका (भूमी पेडणेकर) म्हणजे याच्या अगदी उलट, स्वतःच्या सावळ्या रंगाचा गंड न बाळगणारी, त्याला फार महत्त्व न देणारी आहे. त्यांच्या निमित्तानं बाला आणि लतिका यांच्यात घडत गेलेल्या परस्परविरोधी बदलांचं दर्शन घडतं. शाळेत असताना ज्याचे केस वाऱ्यावर उडत आहेत, असा आत्मविश्वास नि अहंकारानं भरलेला बाला आणि आपल्या सावळेपणामुळे बुजून गेलेली लतिका, या दोन व्यक्तिमत्त्वांच्या छटा आपल्याला दिसतात. तर, मोठेपणी याच्या अगदी उलट, न्यूनगंडानं पछाडलेला बाला आणि स्वतःच्या बाह्यरूपाची तमा न बाळगणारी लतिका, अशा त्यांच्या लहानपणीच्या स्वभावाहून सर्वस्वी भिन्न अशा दोन व्यक्तींचं दर्शन घडतं. या मानवी स्वभावाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन ध्रुवांमध्ये असलेलं अंतर कमी करण्याची गरज अधोरेखित करणं, म्हणजे सदर चित्रपटाचा उद्देश मानता येईल.

अर्थात लतिकाच्या भूमिकेतील भूमी पेडणेकरच्या चेहऱ्यावर कृत्रिम रंग लावत तिला कृष्णवर्णीय मुलगी म्हणून समोर उभं करणं मुळातच चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेच्या विरुद्ध जाणारं भासतं. हे म्हणजे एकीकडे ‘सर्वांना आंतरिक सौंदर्य ते खरं सौंदर्य’; ‘समाजानं तुमच्या रूपाला चांगलं वा वाईट ठरवणं महत्त्वाचं ठरत नाही, तुम्ही स्वतःच्या रूपाचा स्वीकार करणं महत्त्वाचं’ असे संदेश देऊ पाहणं, तर दुसरीकडे गोरी दिसणारी अभिनेत्रीच हवी म्हणत तिची रंगरंगोटी करत तिलाच सावळी म्हणून समोर उभी करणं, असा विरोधाभासी मामला इथं घडतो.

गेल्या आठवड्यात आलेल्या आणि यासारख्याच संकल्पना हाताळणाऱ्या ‘उजडा चमन’मध्ये त्याच्या दिग्दर्शकाची सुमार हाताळणी त्या चित्रपटाला मारक ठरली होती. इथं मात्र अपेक्षेप्रमाणे दिग्दर्शक अमर कौशिक लेखक निरेन भटच्या कथानकाला आणि विनोदांना त्याच्या दिग्दर्शकीय शैलीतील सहजतेनं अधिक उंचावून ठेवतो. अशा वेळी एका दृश्यात तो त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेल्या ‘स्त्री’मधील सांगीतिक तुकडा कसा वाजवत, किंवा इतरही अनेक प्रसंगांत देशीविदेशी चित्रपटांचे संदर्भ पेरत कशी विनोदनिर्मिती करतो हे पहावं! आयुष्मान खुराना आणि इतर मुख्य कलाकारांसोबतच सौरभ शुक्ला, सीमा पाहवा, अभिषेक बनर्जी, जावेद जाफरी या लोकांचाही कसा उपयोग करून घेतो, हेही पाहण्यालायक ठरतं.

बाकी मूलभूत मध्यवर्ती संकल्पना सोडल्यास ‘उजडा चमन’च्या निर्मात्यांनी केलेल्या आरोपासारखा कुठलाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध या दोन चित्रपटांमध्ये आढळत नाही. अगदी मुख्य पात्रांचे स्वभावविशेषही दोन्ही ठिकाणी सर्वस्वी भिन्न आहेत. मुख्य म्हणजे तुलनात्मकरीत्या ‘बाला’ हा सर्वच स्तरांवर ‘उजडा चमन’हून अधिक उत्तम चित्रपट आहे.

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख