अजूनकाही
खरं तर जयदेव यांना ‘अपयशी’ संगीतकार म्हणणं तितकंसं योग्य नव्हे, कारण त्यांनी तसं स्वत: कधी म्हटल्याचं मी तरी वाचलेलं/ऐकलेलं नाही. त्यांनी आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा साहाय्यक म्हणून काम केलं. त्यामुळे सतत त्यांच्या सावलीतच त्यांचं जीवन व्यतीत झालं, असं म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात जेव्हा केव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेव्हा मात्र त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला.
त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातच मुळी ‘साहाय्यक’ म्हणून झाली आणि त्यातच त्यांची बरीचशी कारकीर्द झाकोळली गेली. अगदी सुरुवातीला उस्ताद अली अकबर खान यांच्यासमवेत देव आनंदच्या ‘आंधिया’ या चित्रपटाला संगीत देताना साहाय्यकाची भूमिका स्वीकारली आणि नंतर सचिन देव बर्मन यांच्या समवेत ऐन भरातला काळ!
जयदेव यांचं खरं नाव झालं ते ‘हम दोनो’ या चित्रपटामुळे! पण दुर्दैवानं या लोकप्रियतेचा फायदा त्यांना अजिबात झाला नाही. एकदा देव आनंद म्हणाला होता, ‘जयदेव, सोपी चाल अवघड करायचा!’ अजब तर्कशास्त्र! एक खरं की, जयदेव यांच्या चाली अवघड असायच्या, पण तो त्यांच्या शैलीचा भाग होता. त्याला कोण काय करणार! पण मग मदन मोहन तरी काय फारसं वेगळं करायचे!! अर्थात मदन मोहन अपयशी संगीतकार म्हणूनच आयुष्यभर वावरले! एखाद्या संगीतकाराची शैली जर रूढ मार्गानं न जाता, वेगळ्या वाटेनं जात असेल, तर तो दोष मानायचा का? त्या अर्थानं मराठीतील श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर, हेदेखील त्याच मार्गाचे वाटसरू म्हणायला हवेत!
जयदेव यांना ‘हम दोनो’ व्यतिरिक्त कधीही, कुठल्याही चित्रपटानं लौकिकार्थानं यश दिलं नाही. अगदी ‘अंजली’पासून ते शेवटचा ‘हीर रांझा’पर्यंतचा इतिहास हेच उत्तर सांगतो. हा नशिबाचा खेळ म्हणायचा की, आपल्या तत्त्वांना आयुष्यभर चिकटून राहण्याची किमत म्हणायची? संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पाया पक्का असूनदेखील, केवळ स्वत:ची वेगळी ओळख ठेवण्याच्या नादापायी जयदेव यांनी आपल्या सांगीतिक आयुष्याची फार मोठी किंमत मोजली. त्यांना इतर संगीतकारांच्या मानानं फारच तुरळक चित्रपट केले, पण त्यातील बहुतांशी केवळ अविस्मरणीय असेच होते. अगदी, बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीच्या साहाय्यानं सांगोपांग चिकित्सा केली तरीही!
जयदेव यांची स्वत:ची अशी शैली होती. आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्यं आवश्यक असतील तितकीच आपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वादकांचा ताफा पदरी बाळगण्याचा अविचारी हव्यास ठेवला नाही. एखादी बासरीची लकेर, संतूरचा नाजूक तुकडा, यातूनच त्यांच्या रचनेचं स्वरूप स्पष्ट होई. त्यामागे त्यांचा हा विचार असायचा की, चार-पाच व्हायोलीन वादक पुरेसे असतील तर, उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची काहीच गरज नाही. असला अव्यवहारी विचारांचा संगीतकार होता हा!
आधी शब्द की चाल, हा भावगीत/चित्रपट गीतांतील एक कधीही न संपणारा वाद आहे. अर्थात, आपल्यासारख्या रसिकांच्या दृष्टीनं बघायचं झाल्यास, जे गाणं सादर होतं, ते महत्त्वाचं; मग कुणी कुठली का पद्धत स्वीकारेना! हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. जेव्हा आपल्यासमोर एखादं गाणं येतं, तेव्हा ते गाणं कविता, संगीत रचना आणि गायन, या तीनच घटकांतून ऐकायचं, इतकाच भाग आपण स्वीकारू शकतो. अर्थात हे तिन्हीही घटक वाटतात तितके सहज व सोपे नाहीत. इथं मी केवळ ‘अर्थपूर्ण’ गाण्यांचाच विचार करत आहे. कारण आजही आपल्या समाजात असाच विचार प्रचलित आहे की, तीन मिनिटांचं गाणं हे ‘संगीत’ नव्हेच! अर्थात हादेखील एक खुळचट विचार आहे. प्रत्येक गाण्यात वरील तिन्हीही घटक आवश्यक असतातच. यातील एक जरी घटक ‘दुबळा’ राहिला तर, सगळी रचना ‘फोफशी’ होते.
जयदेव यांच्या गाण्यांत ही जाणीव प्रखरपणे जाणवते. त्यांचं कुठलंही गाणं घ्या, शब्द हा घटक त्यात आवर्जूनपणे ठळकरीत्या जाणवतो. अर्थात, जयदेव यांनी बहुतेक वेळा साहिरची साथ घेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी! खरं तर हादेखील एक अत्यंत निष्फळ वाद आहे की, गीतकार हा कवी असतो की नाही? जेव्हा आपण साहीर, शकील यांच्यासारखे किंवा मराठीतील ग.दि. माडगूळकर घेतले तर, हेच आपल्या लक्षात येईल की, हे गीतकार मुळात प्रतिभावंत कवी आहेत. त्यांच्या कविता मूलत: अतिशय गेयबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर्ण असतील तर संगीतकाराला एक वेगळाच हुरूप येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत या विचाराचं नेहमीच भान असल्याचं दिसून येतं. अर्थात या संदर्भात खूप काही लिहिता येईल, पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
‘हम दोनो’मधील गाणी आपण वानगीदाखल बघूया. ‘अल्ला तेरो नाम’पासून ते ‘कभी खुद पे’सारख्या गझलसदृश गाण्यांवर जरा नजर टाकली तर, माझा मुद्दा ध्यानात येईल. ‘अल्ला तेरो नाम’ हे गाणं अप्रतिम आहे यात वादच नाही, पण मोठ्या झाडाच्या सावलीत आजूबाजूच्या झाडांची वाढ जशी खुटते, तसा प्रकार दुसऱ्या गाण्याबाबत झाला आहे. ‘अल्ला तेरो नाम’ची लोकप्रियता प्रचंडच आहे. आणि आता तर ते लताचं एक क्लासिक गाणं म्हणून ओळखलं जातं, पण याच चित्रपटातील ‘प्रभू तेरो नाम’ हे भजनदेखील तितकंच सुश्राव्य आहे, हे फारसं कुणी ध्यानात घेत नाही. या गाण्यावर थोडासा अन्यायच झाला आहे!
जयदेवनं फक्त लताकडूनच अफलातून रचना गाऊन घेतल्या आहेत असं नव्हे, तर हरिहरन, सुरेश वाडकर, येशुदास आणि रुना लैला यांच्या गळ्यातून तितक्याच अप्रतिम रचना सादर केलेल्या आहेत. रुना लैलाचं ‘बोलो बोलो कान्हा’ हे गाणं कधी ऐकलं आहे का? आवर्जून ऐकण्यासारखं आहे. सुरेश वाडकर तर ‘सीने में जलन’ या गाण्यातूनच लोकांच्या पुढे आला. जयदेवची खासीयत अशी आहे की, त्यांची गाणी ऐकताना गोड वाटतात, पण प्रत्यक्ष ऐकताना त्यातील ‘अवघड’ लयीचा अनुभव येतो. वानगीदाखल लताचंच ‘ये दिल और उनकी’ हे पहाडी रागातलं प्रसिद्ध गाणं ऐकावं! गाणं लयबद्ध, पण गायला तितकंच अवघड!
असाच प्रकार ‘तू चंदा मैं चांदनी’ आणि ‘मैं आज पवन बन जाऊ’ या गाण्यांच्या बाबतीत झाला आहे. ‘मैं आज पवन’ हे तर खास जयदेवच्या सगळ्या रचनाचा अर्कच आहे. त्यात वापरलेला राजस्थानी मांड राग खास जयदेव यांची मुद्रा घेऊनच प्रकट होतो. ‘रात भी हैं कुछ भिगी’सारखी रचना आणि त्यात वापरलेला कोरस सगळंच इतकं विलोभनीय आहे की, बस्स!
अशी त्यांच्या गाण्यांची अनेक उदाहरणं देता येतील, पण गाण्यांतील वाद्यमेळ, त्यांचा कवितेशी जोडलेला बंध आणि गायकीतून सादर केलेली रचना, हा केवळ शांतपणे ऐकण्याचा (आणि तोही फक्त आपण एकट्यानेच) वा अनुभवण्याचा भाग आहे!
कुठलंही संगीत हे फक्त आपण आणि ती रचना, इतकाच संवादाचा संदर्भ असतो. तिथं तिसरं कुणीही उपरंच असतं. प्रत्येक गाणं हे फक्त तुमच्याशीच संवाद साधत असतं आणि त्यातून तुम्ही त्या गाण्याला प्रतिसाद देता. निदान माझी तरी गाणं ऐकण्याची अशीच रीत आहे.
रात्र बरीच झालेली असते, आजूबाजूला कसलाच आवाज नसतो. आपणही क्लान्तपणे आपल्या खोलीत बसलेलो असतो. अशा वेळी दूरवरून लताचं ‘किस किसको दीपक प्यार करे’ हे सूर ऐकायला येतात आणि आपण कधी अंतर्मुख व्हायला लागतो, हे कळतही नाही!
.............................................................................................................................................
लेखक अनिल गोविलकर शास्त्रीय आणि चित्रपट संगीताचे अभ्यासक आहेत.
govilkaranil@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment