अजूनकाही
अमेरिकी पॉप कल्चरचा विचार करायचा झाल्यास ‘झॉम्बी अपॉकलिप्स’ या चित्रपट प्रकाराला एक महत्त्वाचं स्थान आहे. आणि नानाविध तऱ्हेच्या कलाकृतींची निर्मिती झालेल्या आणि अजूनही होत असलेल्या या चित्रपट प्रकारात ‘झॉम्बीलॅन्ड’ला (२००९) मानाचं स्थान आहे. त्याच्या चित्रपटकर्त्यांनी आपल्या फिल्मी असण्याची जाणीव ठेवत (आधीच बऱ्यापैकी अतिशयोक्तीपूर्ण असलेल्या या चित्रपट प्रकारात) एका अतिशयोक्तीपूर्ण विश्वाची निर्मिती केली होती. म्हणजे, एडगर राईट दिग्दर्शित ‘शॉन ऑफ द डेड’ (२००४) जसा ‘झॉम्बी अपॉकलिप्स’च्या निमित्तानं वैचित्र्यपूर्ण हॉरर-कॉमेडी निर्माण करतो, तसं ‘झॉम्बीलॅन्ड’ डार्क कॉमेडी आणि मुबलक हिंसा हाताशी धरून करतो. परिणामी चित्रपटाचा नायक त्याच्या कथनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधतो, चित्रपटात प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-कलाकार हजेरी लावून जातात (त्यांच्यावर मुबलक प्रमाणात विनोद केले जातात), स्लो-मोशन हिंसक दृश्यांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय गाणी, उत्साहपूर्ण संगीत वाजवत मारधाड केली जाते, असं सगळं सुरू असतं.
‘झॉम्बीलॅन्ड : डबल टॅप’ म्हणजे ‘झॉम्बीलॅन्ड’च्या सीक्वेलनं असायला हवं असं सगळं काही आहे. तो गडद छटा असलेला आहे, हिंसक आहे आणि साहजिकच आपल्या अतिशयोक्तीपूर्ण असल्याची जाणीव असल्यानं चातुर्यपूर्णरीत्या रंजकही.
कोलंबस (जेसी आयझेनबर्ग), टॅलाहासी (वुडी हॅरलसन), विचिता (एमा स्टोन) आणि लिट्ल रॉक (अॅबिगेल ब्रेस्लिन) हे पहिल्या चित्रपटातील चारही लोक इथं कथेच्या केंद्रस्थानी आहेत. ‘झॉम्बीलॅन्ड’ ऊर्फ ‘झी-लँड’ला सुरुवात होऊन सात वर्षं उलटली आहेत. या चौघांनी एकत्र राहायला लागूनही बराच काळ उलटून गेला आहे. इथलं कथानक झॉम्बींपासून वाचणं, त्यांचा सामना करणं यापेक्षा चौघांच्या नात्यातील, स्वभावातील बदल स्वीकारणं यावर अधिक लक्ष केंद्रित करणारं आहे.
एकीकडे कोलंबस आणि विचितामधील नातं तुटण्याच्या मार्गावर आहे, तर दुसरीकडे दगडाचं काळीज असणारा टॅलाहासी लिट्ल रॉकबाबत अधिकच भावूक आहे. तो तिला अजूनही लहान मुलीप्रमाणे वागणूक देत तिची मुलीसारखी काळजी घेतो. साहजिकच त्याची परिणती या दोघी बहिणींनी या दोघांपासून दूर जाण्याचा होते. सर्वनाश घडत असण्याच्या काळानंतरचे मानवी नातेसंबंध इथं हाताळले जातात, अर्थात विनोदाच्या आणि तर्कविसंगतीच्या माध्यमातून.
याखेरीज सात वर्षांत इथल्या भोवतलात फारसे नसले तरी काही बदल घडले आहेत. झॉम्बींचे काही नवीन प्रकार अस्तित्वात येऊ लागले आहेत. मारण्याची गरज नाही इतके बाळबोध झॉम्बी ते मारायला अशक्य झॉम्बी असे टोकाचे प्रकार इथं पाहायला मिळतात. ज्यातून खास शाब्दिक आणि शारीरिक दोन्ही तऱ्हेच्या द्वंद्वातून इथल्या विनोदाची व्युत्पत्ती होते. चित्रपटाची सुरुवातच मुळी मध्यवर्ती पात्रांनी स्लो-मोशनमध्ये गोळीबार करण्यापासून होते.
हिंसाचार आणि उपहासात्मक विनोद या दोन्हींबाबत चित्रपट कुठेही कमी पडणारा नाही. हे करताना इतर चित्रपट-कलाकृतींचा उल्लेख करत विनोद्युत्पत्ती करण्याचे चतुर प्रकार होतात. एका दृश्यात जेसी ‘झॉम्बी अपॉकलिप्स’वर आधारलेलं ‘द वॉकिंग डेड’ हे कॉमिक बुक वाचताना दिसतो, आणखी एका दृश्यात एक पात्र जॉर्ज रोमिरोच्या ‘डॉन ऑफ द डेड’ (१९७८) या प्रसिद्ध झॉम्बी चित्रपटाचा उल्लेख करतं. मारायला अवघड अशा झॉम्बीला ‘टर्मिनेटर’ म्हटलं जातं. संदर्भांबाबत ‘झॉम्बीलॅन्ड : डबल टॅप’ अजिबातच मागे हटणारा नाही. खुद्द चित्रपटाचं शीर्षकच आधीच्या चित्रपटातील संदर्भ घेऊन समोर येणारं आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शेवटी घडणारा विक्षिप्त विनोद त्याच्या शैलीला शोभणारा आहे. (रसभंग होऊ नये म्हणून वर्णन टाळत असलेला हा प्रसंग चुकूनही चुकवू नये असा आहे.) चित्रपटाच्या निर्मात्या कंपनीचा लोगोही यातून सुटत नाही. ‘कोलम्बिया पिक्चर्स’च्या लोगोमधील मशाल हाती घेऊन उभी असलेली स्त्रीदेखील (जेनिफर जोसेफ) स्क्रीनवर आलेले झॉम्बी मारत सुटताना दिसते.
आयझेनबर्ग, स्टोन, हॅरलसन आणि ब्रेस्लिनसोबत इथं हजेरी लावणारे इतर कलाकारही चित्रपटाच्या अतिशयोक्तीपूर्ण विश्वाच्या निर्मितीत भर घालतात. हा चित्रपट अनेक बऱ्या-वाईट अर्थांनी पहिल्याच चित्रपटाच्या वळणावर जाणारा आहे. कथानकातील अनेक गोष्टी जुन्याच नियमांनुसार जाणाऱ्या आहेत. पण म्हणून चित्रपट रेंगाळतो किंवा कंटाळवाणा ठरत नाही. कारण, इथं समोर वावरणारे कलाकार, आणि घडणारे विनोद हे तितके परिणामकारक आणि रंजक आहेत. या सगळ्याचा परिणाम असा की ‘झॉम्बीलॅन्ड : डबल टॅप’च्या निमित्तानं दिग्दर्शक रुबेन फ्लेशर ‘झॉम्बीलॅन्ड’च्या चाहत्याला आवडेल, असा एक चित्रपट निर्माण करण्यात यश मिळवतो. तो पलायनवादी असेलही, पण रंजकही आहे, हे महत्त्वाचं.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment