अजूनकाही
संजय मेमाणे यांनी दिग्दर्शित केलेला ‘मन उधाण वारा’ हा उत्तम दिग्दर्शन आणि तेवढ्याच ताकदीची पटकथा यांनी बहरलेला मराठीतला अभिनव प्रयोग आहे. एका स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या समस्या मांडताना त्याला दिलेली वास्तवाची जोड अत्यंत संयमी पद्धतीनं दिग्दर्शकानं पडद्यावर मांडली आहे.
सिनेमाची सुरुवात एका हादरवून टाकणाऱ्या घटनेनं होते. नायिकेवर बलात्कार होतो. त्यानंतर या पीडित स्त्रीला येणारे अनुभव दिग्दर्शकानं अत्यंत बारकाईनं उभे केले आहेत. समाज बलात्कारी पुरुषापेक्षा पीडित स्त्रीकडे कुठल्या नजरेनं पाहतो, याची मांडणी करताना शहरी आणि ग्रामीण भागाचं चित्रण सिनेमात येतं. तीच या सिनेमाची जमेची बाजू आहे. त्यामुळे स्त्रीच्या आयुष्याचा परीघ समाजानं किती संकुचित केला आहे, याचं विदारक सत्य प्रेक्षकांसमोर येत राहतं.
सुनीता देवरुखकर (मोनल गज्जर) ही आई-वडिलांसोबत मुंबईत राहत असते. एक दिवस काही गुंड तिच्यावर बलात्कार करतात. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. पण ती त्याविरुद्ध न्यायालात गुंडांविरुद्ध खटला चालवते. न्यायालयात दररोज तिला तेच तेच प्रश्न विचारले जातात. शेवटी गुंडांना शिक्षा ठोठावली जाते. सुनीताला न्याय मिळतो. मात्र ती मनानं खचून जाते. समाजाची दहशत तिच्या मनावर निर्माण होते. अशा वेळी नैराश्यामुळे ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते, पण तिच्या कुटुंबियांच्या आधारामुळे तिला आत्महत्या करणं हा चुकीचा निर्णय वाटतो. ती पुन्हा उभी राहते. तिचे सुदामकाका (किशोर कदम) कोकणात असतात. ती त्यांच्याकडे काही दिवस विश्रांतीसाठी जाते आणि तिच्या आयुष्याला नवीन वळण मिळतं. ते सिनेमात मांडण्याचं आव्हान संजय मेमाणे यांनी बखूबी पेललं आहे.
‘तुझ्या भूतकाळातील काही क्षण उदध्वस्त झाले आहेत. तुझा वर्तमान, भविष्य नाही.’ असं बलात्कार पीडित स्त्रीचे वडील तिला म्हणतात आणि तिच्या पाठीशी खंबीरपणे तिचं कुटुंब उभं राहतं. त्या वेळी कथेतली सकारात्मकता प्रेक्षकांच्या संवेदनांना आपलंसं करते. काही वेळा कॅमेरा इतका स्पष्ट बोलतो की, संवादाची गरजच उरत नाही. सिनेमाचं शूटिंग कोकणात झाल्यामुळे पडद्यावर नवनवीन दृश्यं पाहायला मिळतात. कोकणातल्या निसर्गाचा पुरेपूर वापर दिग्दर्शकानं करून घेतला आहे. संजय मेमाणे यांनी सिनेमॅटोग्रफीचा खुबीनं वापर केला आहे. त्यामुळे सिनेमा अधिक परिणामकारक ठरतो.
सिनेमाचं संगीतदेखील प्रभावी आहे. कोकणातली नाट्यसंस्कृती समोर ठेवून गायलेली गाणी श्रवणीय आहेत. सिनेमाची पटकथा सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिली आहे. तगड्या पटकथेमुळे सिनेमाला लयबद्ध ठेवण्यात मदत झाली आहे.
सिनेमाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध एकमेकांना पूरक आहेत. सुनीता कोकणात जाते, तो भाग पूर्वार्धात येतो. त्याची लयबद्धता असली तरी गती टिकून राहत नाही. कोकणात गेल्यानंतरचा भाग पूर्वार्धापासून शेवटापर्यंत सलगपणे पण संथगतीनं पडद्यावर उलगडत राहतो. असं असलं तरी त्याचा नकारात्मक परिणाम सिनेमाच्या गाभ्यावर होत नाही. त्यामुळे प्रत्येक दृश्याची मांडणी मनमोहक वाटते.
सिनेमाचा सूर तसा गंभीर आहे. त्यातला कोकणी भाषेचा वापर किंवा अभिनयातला अकृत्रिमपणा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. सागर कारंडे, ऋत्विज वैद्य, उतरा बावकर, शर्वरी लोहकरे यांनी अभिनयाची धुरा नुसती सांभाळली नाही, तर त्याला चार चांद लावले आहेत.
‘मन उधाण वारा’ हे स्त्री मनाचं अंतरंग समजून सांगतानाचं समपर्क असं नाव आहे. त्याचा अर्थ सिनेमाच्या गाभ्याला अनुसरून लावतो येतो. दिग्दर्शकाला त्याच गाभ्याचा उल्लेख करायचा असावा. म्हणून ‘मन उधाण वारा’ उत्तम पटकथेचा परिपाक आहे, असं नि:संकोचपणे म्हणता येतं.
.............................................................................................................................................
लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.
dhananjaysanap1@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment