अजूनकाही
‘वॉर’ हा मूलतः पडद्यावर दोन बड्या अभिनेत्यांमधील रोमांचक (असणं अपेक्षित असलेली) टक्कर दाखवण्यासाठी बनवलेला मारधाडपट आहे. हे दोन अभिनेते म्हणजे हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ. चित्रपटाच्या अगदी सुरुवातीच्या दृश्यापासूनच चित्रपट निर्मात्यांचा हा दृष्टिकोन स्पष्टपणे समोर दिसत राहतो. कबीर लुथ्रा (हृतिक रोशन) हा भारतीय गुप्तचर अधिकारी त्याच्याच मिशनचं नेतृत्व करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला मारतो. अगदीच फिल्मी भाषेत सांगायचं झाल्यास तो ‘गद्दार’ बनला आहे. रात्रीच्या वेळचं हे दृश्य लालसर छटांच्या संगतीनं आपल्याला दिसतं. बेंजामिन जास्परनं केलेलं उत्तम छायाचित्रण इथं दिसून येतं. पुढच्या दर दृश्यागणिक त्याच्या कॅमेऱ्याचं इथं असलेलं महत्त्व वाढत जातं. तो तितकीच चांगली कामगिरीही करतो. मात्र, लेखक-दिग्दर्शकांची अतिमहत्त्वाकांक्षी वृत्ती इथं आडवी येते. त्यांना मारधाडीला रटाळ उपकथानकं आणि निर्बुद्ध ट्विस्ट्सची जोड द्यायची गरज भासते आणि सगळं प्रकरण अधिकाधिक सुमार होत जातं.
खालिद रहमानीला (टायगर श्रॉफ) विश्वासघातकी कबीरला ठार मारण्याची कामगिरी करावी लागणार असते. अशा वेळी पडद्यावर दिसणाऱ्या शारीरिक द्वंद्वासोबतच ‘वॉर’मधील मानसिक द्वंद्व कशातून उद्भवते, तर खालिद कधी काळी कबीरचा पट्टशिष्य होता आणि आता त्याला कबीरलाच ठार मारावं लागणार आहे यातून. सोबतच खालिदची पूर्वकथा पुढे येणाऱ्या कथानकाच्या दृष्टीनं महत्त्वाची ठरते. ज्यातूनच पुढे या पात्राच्या मुस्लीम असण्यावरून मुस्लीम लोकांचं देशप्रेम आणि इतर मुद्दे समोर येत राहतात.
सबंध पूर्वार्धभर खालिदच्या पूर्वकथेच्या निमित्तानं ऐंशी-नव्वदच्या दशकातील सिनेमाच्या थाटात फर्ज, इज्जत, इत्यादी शब्द तोंडावर फेकले जातात. मुस्लीम पात्रांनी हिंदी चित्रपटात आपलं देशप्रेम सिद्ध करावं लागण्याची दृश्यं दिसत राहतात, तर दुसरीकडे कबीर आणि भारतीय राष्ट्रध्वज या दोन्ही गोष्टी एकाच वेळी एकाच दृश्यचौकटीत येतात. (देशप्रेमाचा उसना आव आणल्याखेरीज हल्लीच्या चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड मान्यता देत नाही असा समज चित्रपटसृष्टीत पसरला असण्याची शक्यता आहे. आता या समजाला गैरसमज म्हणावं की, म्हणू नये, हा विचार करण्यालायक मुद्दा आहे.)
अर्धाअधिक उत्तरार्ध कबीरची पूर्वकथा (संक्षिप्तपणे!) सांगण्यात आणि त्याने त्याच्याच वरिष्ठाला का मारलं, तसंच इतरही अधिकाऱ्यांच्या जीवावर का उठला आहे, हे शोधण्यात जातो. ही सगळी उत्तरं अगदी भाकीत करण्यालायक असतात, कारण नानाविध हिंदी-इंग्रजी चित्रपटांमध्ये अशी उपकथानकं आणि ट्विस्ट्स आपण यापूर्वीही पाहिलेले आहेत. अर्थात या सगळ्या गोष्टींच्या भाकीत करण्यालायक असण्या-नसण्यापेक्षा या गोष्टींच्या उथळ आणि निर्बुद्ध असण्यामुळे चित्रपट अधिक रटाळ ठरतो.
इतकं करूनही चित्रपट संपायचं नाव घेत नाही. त्यात ट्विस्ट्स येतच राहतात. दरम्यान चित्रपट दोघांमधील मूळ मारधाडीकडे वळतो. बेंजामिन जास्परचा कॅमेरा अशा वेळी त्याच्या कामगिरीच्या सर्वोच्च बिंदूवर असतो. देशी-विदेशी चित्रपटांपासून प्रेरित असलेल्या, मात्र उत्तमरीत्या समोर आणलेल्या अॅक्शन आणि चेस सीक्वेन्सेसमुळे हा लांबलेला चित्रपट किमान सहन करावासा ठरतो. त्यात बेंजामिनचा कॅमेरा आणि चित्रपटाच्या अॅक्शन दिग्दर्शकांचा महत्त्वाचा वाटा आहे. नसता ढिसाळ कथानक, निर्बुद्ध ट्विस्ट्स आणि काही प्रमाणात कर्कश्श पार्श्वसंगीतामुळे चित्रपटाचा बहुतांशी भाग सुमार ठरतो.
टायगर श्रॉफ नामक अभिनेता अभिनयाच्या नावाखाली त्याला अवगत असलेल्या सगळ्या शारीरिक कसरती करतो. रणवीर सिंगपेक्षा जरा कमी उच्छाद मांडणं, मात्र सात-आठ चित्रपट करून झाल्यानंतरही हा जणू आपला पहिलाच चित्रपट आहे, असा अतिउत्साह-अधिक-भक्तीभाव चेहऱ्यावर आणत पडद्यावर वावरणं, ही हल्ली अभिनयाची व्याख्या झाली असावी. अशा वेळी हृतिक रोशन अतिशयोक्तीपूर्ण करामती आणि मारधाड करतानाही टायगरपेक्षा अधिक संयत वाटतो. त्याच्या पडद्यावरील वावरात किमान एक उपजत मोहकता आहे. ‘जय जय शिवशंकर’ नामक भुक्कड गाण्यातही या दोन अभिनेत्यांमधील जुगलबंदी सुरू असताना हा फरक स्पष्टपणे दिसून येतो. बाकी संगीत-पार्श्वसंगीताकडे न वळलेलं बरं. कारण त्याबाबत चांगलं बोलावंसं फार काही नाही.
दरम्यान चित्रपटात अभिनेत्यांची पीळदार शरीरयष्टी ते बिकिनीमधील अभिनेत्री असं सगळं काही दिसत राहून स्त्री-पुरुष दोन्ही चाहत्यांचं समाधान होईल हे पाहिलं जातं. वानी कपूर हृतिकसमोर नायिका म्हणून उभी राहत असली तरी दोन नायकांच्या टक्करीदरम्यान तिला फार महत्त्व मिळेल, अशी अपेक्षा हिंदी चित्रपटाकडून बाळगणं म्हणजे जरा अधिकच आशावादी असणं झालं म्हणा! तर, वानी कपूर तिला मिळालेल्या तोकड्या कपड्यांमध्ये मावत, तिला जमणारा कामचलाऊ अभिनय करत तिच्या कपड्यांहून तोकडे संवाद म्हणते. बाकी - घट्ट (नि साहजिकच उत्तान) अशा शर्ट्समधील टायगर-हृतिक आणि साधारणतः तीन चतुर्थांश नग्न वानी कपूर - या घटकांवर दिलेला भर पाहता निव्वळ या बाबींसाठी तो कुणाला पहायचा असल्यास या बाबींचा आवर्जून समावेश करण्यामागील चित्रपटकर्त्यांचा उद्देश सफल झाला आहे, असं मानता येईल.
अॅक्शनबाबत ‘वॉर’चा ट्रेलर सदर चित्रपट कुणाला आवडेल की नाही, यासाठीचं एक चांगलं परिमाण ठरू शकेल. चित्रपटाला अॅक्शन-थ्रिलर म्हटलं जात असलं तरी त्यात तितकाच थिल्लरपणाही आहे. त्याला चांगले अॅक्शन सीक्वेन्सेस असलेला अॅक्शन-थिल्लर म्हटल्यास फारसं काही चूक ठरणार नाही.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment