‘दंगल’ फेमिनिस्ट सिनेमा का नाही?
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
यश एनएस
  • ‘दंगल’मधील काही दृश्यं
  • Sat , 31 December 2016
  • हिंदी सिनेमा बॉलिवुड Bollywood दंगल Dangal आमीर खान Aamir Khan साक्षी तन्वर Sakshi Tanwar फातिमा सना शेख Fatima Sana Shaikh सन्या मल्होत्रा Sanya Malhotra

मागच्या आठवड्यात 'दंगल'बद्दल लिहिल्यावर अजून काही तरी लिहायचं राहून गेलं आहे असंच वाटत होतं. पण त्याबद्दलचे विचार ठोस रूपात आकार घेत नव्हते. विचारांच्या या अस्थिरतेत ‘दंगल’विषयी दोन्ही बाजूंनी येणाऱ्या लेखांची भर पडत होती. त्यातील प्रमुख मुद्दा हाच होता की, महावीर फोगट यांच्या कार्याला पुरोगामी मानायचं की, नेहमीचंच पण छुप्या पद्धतीनं मांडलेलं पुरुषप्रधान संस्कृतीचं अजून एक उदाहरण मानायचं? ‘दंगल’ बघितल्यापासून मनात एक अर्धवट विचार लपून बसला होता, पण काही केल्या सापडत नव्हता. त्याला जबरदस्तीनं बाहेर न खेचता परत एकदा 'दंगल' बघायला गेलो.

बऱ्याच महिन्यांपूर्वी म्हणजे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी 'दंगल' हा फेमिनिस्ट चित्रपट आहे अशी त्याची प्रतिमा बनली होती. तशी खात्री सुरुवातीच्या काही परीक्षणांनीही दिली होती. फेमिनिझमचा खरा अर्थ आणि झगडा एवढाच की, स्त्रियांना कुठल्याही लैंगिक भूमिकेत न डांबता त्यांना एक व्यक्ती म्हणून मुक्तपणे जगण्याचा अधिकार असला पाहिजे. हुशार आणि संवेदनशील वाचकांना फेमिनिझमची ही मागणी सहजच पटण्यासारखी आहे. तपशीलात गेलो तर कुठल्याही अफाट व्याप्ती असलेल्या बिकट विषयाप्रमाणे फेमिनिझमलाही बरेच फाटे फुटतात. तरी मुख्य मुद्दा हाच राहतो - स्त्रियांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्याबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार असला पाहिजे.     

सुरुवातीलाच हे स्पष्ट करू इच्छितो की, मी या पुढे महावीर, गीता आणि बबिता या ‘दंगल’मधील पात्रांविषयी बोलत आहे. मला त्यांची खरी गोष्ट माहीत नाही आणि ती या चित्रपटात पण फारशी दाखवलेली नाही आहे. महावीरला खोलीत बंद केलं गेलं नव्हतं, गीता फायनल सहजपणे जिंकली होती, कॉमनवेल्थ गेम्सच्या आधी तिने आंतरराष्ट्रीय मेडल जिंकलं होतं, प्रमोद कदम हे पात्र काल्पनिक आहे आणि महावीर त्याच्या मुलींना खूप मारायचा, या त्यांच्या खऱ्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी चित्रपटातून वगळल्या असल्याचं सांगितलं जातं.  

चित्रपटाच्या सुरुवातीला आपण तरुण महावीर फोगटला त्याच्या ऑफिसमध्ये पाहतो. तिथं त्याची एका नव्यानेच आलेल्या सहकाऱ्याशी बाचाबाची होते. ते दोघं भर ऑफिसात, कामं थांबवून, शर्ट काढून, आपलं वर्चस्व साबित करण्यासाठी फरशीवर कुस्ती करतात. एकमेकाला दणादण आपटतात. महावीर ही लढाई सहजच जिंकून त्याचं पौरुष्य गाजवतो. इथं खरं तर त्यानं विरोधकाच्या छातीवर पाय ठेवून डरकाळी फोडली असती तरी चाललं असतं, पण तसं न करता तो त्याला आठवण करून देतो की, तो नॅशनल चॅम्पियन आहे. इथंच कळतं की, कुस्तीतून मिळणारा गौरव हा महावीरच्या अस्तित्वाचा खूप मोठा भाग आहे. त्याचबरोबर त्याला कुस्ती सोडून नोकरी करावी लागली याची खूप मोठी खंत आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे त्याला त्याच्या वडिलांनी कुस्तीपासून परावृत्त केलं होतं.

महावीरला भारताला गोल्ड मेडल नाही मिळालं या पेक्षा तो ते स्वतः मिळवू शकला नाही, याचं जास्त दुखः होत असतं. त्याने सहजच, तो ज्या आखाड्यात जातो तिथल्या, एखाद्या तरुणाला ट्रेनिंग देऊन तयार केलं असतं. तसा तो एका मुलाची प्रशंसा करताना म्हणतो, "पेहलवाणी खून में होती है". पण तसं न करता तो त्याला कधी मुलगा होईल याची वाट बघायचं ठरवतो. या अजून न जन्मलेल्या मुलाचं आयुष्य तो आधीच ठरवून टाकतो. पहिला श्वास घेण्याआधीच त्या भावी मुलाच्या स्वतंत्र व्यक्तित्वाला धोका निर्माण होतो.  

स्त्रियांच्या कुस्तीची सुरुवात तशी अलीकडचीच आहे. पहिली स्पर्धा ही १९८७ मध्ये नॉर्वेमध्ये झाली आणि ऑलिंपिक्समध्ये स्त्रियांच्या कुस्तीची स्थापना २००४ मध्ये झाली. त्यामुळे जेव्हा गीता फोगटचा १९८८ मध्ये जन्म झाला तेव्हा मुलींना कुस्तीचं प्रशिक्षण देता येतं, हे महावीरच्या जाणीवेचा भाग नसणं साहजिक होतं. पण मुलगा न होता जेव्हा महावीरला चार मुली होतात, तेव्हा त्याचं दु:ख टोकाला पोचतं. तो त्याच्या स्वप्नाला कुलूप लावून बंद करतो. तो स्वतःला कुस्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो, पण गोल्ड मेडल मिळवण्याचा विचार पूर्णपणे विसरू शकत नाही. जेव्हा त्याच्या मुली दोन मुलांना खूप बदडतात, तेव्हा महावीरच्या मनातल्या गोल्ड मेडलच्या इच्छेला एक आशेचा किरण दिसतो. (हे दाखवताना, त्या दोन मुलांचा बाप कमजोर आणि भित्रा का दाखवला असेल बरं?) महावीर लगेचच त्यांना कुस्तीसाठी तयार करायचा निर्णय घेतो.

महावीरची बायको त्याला बरेच परंपरागत अडथळे दाखवून थांबवायचा प्रयत्न करते, पण तो चमकदार उत्तरं देत तिच्याकडून एका वर्षाची मुदत मागतो. महावीरच्या हुकूमशाहीत मुलं आणि मुली समान! या आधी मुलींच्या जन्माबाबतीत दु:खी असलेला महावीर आता त्यांच्या आयुष्याचा पूर्ण ताबा घेतो. मुलींचं ट्रेनिंग सुरू होतं आणि त्याचबरोबर 'हानिकारक बापू' हे गाणं. या गाण्यातील काही शब्द - "...डिसिप्लीन इतना, खुदखुशी के लायक है...तेरी नजरों में क्या हम इतने नालायक हैं?"

ठुमकेदार चालीवर रचलेल्या या गाण्यात कुठल्याही लहान मुलांना वाटतील अशा गंभीर वेदना आहेत, पण त्या बहुतांश प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत. इच्छेप्रमाणे न वागल्यास अस्तित्वालाच मान्यता न देणं, ही महावीरची पद्धत भारतीय समाजात सर्वत्रच अढळते. आणि लहान मुलांची इतकी मूलभूत गरज न पुरवल्यामुळे त्यांची होणारी घुसमटसुद्धा या गाण्यासारखीच, आपल्या समाजात कानावर पडून दुर्लक्षित केली जाते.

गीता-बबिता त्यांच्या परीने यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात. पहिल्यांदा जेव्हा त्या सांगायचा प्रयत्न करतात की, त्यांना कुस्तीत रस नाही तेव्हा त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे केस कापले जातात. हे अनुभवल्यानंतर त्या राग येऊन अन्य लबाड उपाय वापरून, रोजच्या व्यायामातून सुटण्याचा प्रयत्न करतात. हे चालू असताना मागून गोंडस आवाजात आपल्याला सांगितलं जातं की, 'आजादी की एक छोटीसी लढाई लढी गयी.' हे कथन आणि यातील 'हानिकारक बापू' हे गाणं, हे दर्शवतात की हा चित्रपट बनवणाऱ्यांना त्यांच्या शोधात गीता आणि बबिताचं होणारं शोषण साफ दिसलं होतं. पण ते झाकून त्यांनी आधीच ठरवलेल्या स्त्रीशक्ती आणि देशप्रेमाच्या रुळावरच गाडी आणून सोडली. दोघी मग त्यांच्या मैत्रिणीच्या मेहंदीला लपून जातात. त्यावर महावीर चिडून येतो. आल्या-आल्या विनाकारण त्याच्या भाच्याला जोरात कानाखाली मारतो. 'सर्फरोश'मध्ये आमिर खान नवाजउद्दीनच्या मित्राच्या कानाजवळ जेव्हा गोळी मारतो, तेव्हा तो लगेच घाबरून सगळं सांगू लागतो. इथं महावीर मुलींना मारत नाही, पण हे दहशतीचं आणि हिंसेचं वातावरण पुरेसं नाही का?

त्यानंतर कृत्रिमरीत्या ‘दंगल’ची कथा वळते आणि गीता-बबिता त्यांच्या मैत्रिणीची दशा बघून 'मार्गी लागतात'. मैत्रिणीच्या दशेचं कारण? तिच्या वडिलांनी तिच्या इच्छेविरुद्ध लावलेलं तिचं लग्न. मैत्रिणीच्या आणि गीता-बबिताच्या परिस्थितीत त्यांच्या वडिलांनी त्यांच्यावर केलेली जबरदस्ती हा सारखेपणा नाही का? चारही मुलींना त्यांचं भविष्य निवडायचं स्वातंत्र्य नाही आणि त्या पुरुषांच्या हाताखालीच जगत आहेत, ही विसंगती नाही का? इथं गीता-बबिता या 'फॉल्स फेमिनिझम' आणि सेंटिमेंटॅलिटीच्या शिकार होऊन त्यांच्या बापाच्या इच्छेपुढे पूर्णपणे मान तुकवतात.

आता थोडं फास्ट-फोरवर्ड करूयात. दोघींचं ट्रेनिंग जोरात सुरू होतं. त्या (स्थानिक कुस्तीच्या स्पर्धा) दंगलीमध्ये सक्षम मुलांना हरवू लागतात. गीता नॅशनल चॅम्पियन होते, पण तिला महावीरकडून मान्यता मिळत नाही. तो लगेचच तिच्या विजयाच्या आनंदाची ज्योत विजवून तिला देशासाठी गोल्ड मेडल जिंकायला सांगतो. म्हणजे ती त्याचं स्वप्न पूर्ण करू शकेल.

इथं देशप्रेमाशी कथेचं पहिलं खरं, थेट आणि अटळ कनेक्शन जोडलं जातं. त्या रात्री गीता महावीरला घाबरत सांगते की, तिला या पुढच्या ट्रेनिंगसाठी नॅशनल स्पोर्टस अकॅडमीमध्ये जावं लागेल. गीता तिथं पोचताच तिची भेट प्रमोद कदम (गिरीश कुलकर्णी) या खलनायकाशी होते. प्रमोद कदम हा एखाद्या कार्टूनमध्ये खलनायक म्हणून शोभला असता, कारण प्रमुख पात्रांसाठी ताण निर्माण करून चित्रपट रोमांचक बनवणं एवढंच त्याच्या ढोबळ अस्तित्वाचं कारण आहे! प्रमोद कदम हे पात्र एखाद्या चांगल्या अभिनेत्याच्या सहभागाचा कसा अजिबात उपयोग करू नये याचं उत्तम उदाहरण आहे. प्रमोदला गीताला त्याच्याच पद्धतीप्रमाणे शिकवायचं आणि घडवायचं असतं आणि यामुळे त्याला खलनायक ठरवलं जातं. बारकाईने पाहिलं तर प्रमोद आणि महावीरमध्ये साम्य आहे. दोघंपण त्यांच्या अहंकाराचे शिकार आहेत आणि त्यामुळे त्यांना मुलींना काबूत ठेवणं महत्त्वाचं वाटतं. दोघांमध्ये फरक हाच की ,महावीर हा त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाकांक्षी आणि जिद्दी आहे.

जेव्हा महावीरला दिसू लागतं की, गीता तिचं नवीन ट्रेनिंग प्रामाणिकपणे शिकत आहे, तेव्हा तो तिच्यावर चिडतो आणि तिच्यापासून दूर जाऊ लागतो. त्याचं हे ठाम मत असतं की, तिने त्याने शिकवलेल्या पद्धतीनेच कुस्ती केली पाहिजे. या प्रकारच्या 'ऑल ओर नथिंग' विचारसरणीमुळे त्याची मुलगी हरत असतानाही तो तिला किंचितसुद्धा आधार देत नाही. नेहमीप्रमाणे ‘त्याची मुलगी’ म्हणून (त्या मान्यतेसाठी दोन्ही मुली झगडत असतात) गीताला धारेवर धरलं जातं. एवढंच नाही तर त्यावरून दोन्ही बहिणींमध्ये फूट पडते. शेवटी व्याकूळ होऊन गीता महावीरची माफी मागते आणि तिला परत त्याचा आधार मिळतो. यातील इमोशल ब्लॅकमेलिंग प्रयत्न करूनही निर्मात्यांना लपवता आलेलं नाही. अ‍कॅडमीमध्ये असताना गीता स्वतःच्या इच्छा आणि आवडी परत अनुभवू लागते आणि तेव्हा तिला परत पटवून दिलं जातं की, असं करणं चुकीचं आहे. तिने तिला आखून दिलेल्या रेषेवरच चालण्याची गरज आहे.

मग महावीरच्या 'मदतीने' गीता २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलपर्यंत पोचते. तिथं पोचता पोचता मध्ये ती एका नायजेरिअन कुस्तीपटूला हरवते. दोन्ही वेळेस 'दंगल' पाहताना सिनेमागृहातील काही प्रेक्षक त्या आफ्रिकी मुलीच्या रंग-रूपावरून तिची चेष्टा करून जोरात हसले. भारताच्या मातीत फेमिनिझमची मुळं किती खोल रुजतील याची शंका वाटते. चित्रपटातल्या सततच्या वर्षावामुळे फायनल मॅचपर्यंत वातावरण पूर्ण देशप्रेमानं व्यापलेलं असतं आणि मॅच जिंकल्यावर जेव्हा राष्ट्रगीत वाजू लागतं, तेव्हा 'दंगल'ने पुरुषी अहंकार ते देशाहंकार हा प्रवास पूर्ण केलेला असतो.

आणि शेवटी गीताला तिच्या बापाकडून तिला कधीच न मिळालेली मान्यता मिळते. तो तिला गोल्ड मेडल बघून शाबासकी देतो. बबिताने अजून इंटरनॅनल मेडल न जिंकल्यामुळे तिला अजून काही महिने तरी थांबावं लागेल.

'तारे जमिन पर'सारखा चित्रपट करणारा आमिर खान असा घातक संदेश या देशातल्या पालकांना कसा काय देऊ शकतो हे कोडंच आहे. 'सत्यमेव जयते'सारख्या उत्तम कार्यक्रमात लहान मुलांच्या बाबतीत संवेदनशीलता जपणारा आणि जोपासणारा आमिर खान 'दंगल'मध्ये कुठेच दिसत नाही. महावीर म्हणतो की, तो गीता-बबिताचा बाप होऊ शकतो किंवा कोच, दोन्हीही नाही. तो कोच होणार हे ठरवण्याच्या बाबतीत त्याने मुलींना विचारलेलं नसतं. त्यांना वडिलांची गरज भासणार नव्हती का? मुलं लहान असली म्हणजे त्यांच्या इच्छांना आणि मतांना किंमत नसते का? दुर्दैवी गोष्ट ही आहे की, भारतात महावीरसारखे अनेक बाप आहेत. महावीर त्याच्या बापाने त्याचा केलेला अनादर, मेडल जिंकून भरून काढण्यासाठी व्याकूळ असतो आणि तो त्यापायी त्याच्या मुलींशी त्याच्या बापासारखाच वागतो, ही गोष्ट जास्त खरी वाटली असती. 

या पालकी बेजबाबदारपणाच्या गोष्टीत फेमिनिझमचा एक अंशही नाही.

फ्रेंच फेमिनिस्ट सिमोन ड् बोव्हुआ यांनी म्हटलं आहे की, 'कोणीही स्त्री म्हणून जन्माला येत नाही. काहींना स्त्रिया बनवलं जातं'. आपला समाज अजून लिंग आणि त्याबद्दलच्या संशोधनाबाबतीत अपरिचित असला तरी फेमिनिझम नीट समजून घेणं त्याला भाग आहे. 'दंगल'मधल्या पात्रांनी जे निर्णय घेतले, त्याबद्दल माझे काही आक्षेप नाहीत. आक्षेप आहेत कथेच्या सादरीकरणाबाबत. पात्रं जितकी मनोरंजक, तितका चित्रपट प्रभावी होतो. पण त्याच पात्रांच्या संघर्षांकडे जेव्हा चित्रपट, त्याच्या निर्मात्यांच्या सोयीसाठी, दुर्लक्ष करू लागतो, तेव्हा ती पात्रं खोटी होत जातात. चित्रपट एक पोकळ जाहीरात बनतो. असं म्हणतात की, एखादं पात्र त्याच्या दिसण्यावरून, बोलण्यावरून किंवा पोषाखावरून नव्हे तर त्याच्या निवडींमुळे परिभाषित होतं. त्याच प्रकारचे कपडे घालणारे हजारो लोकं असतात, पण त्यांचं आयुष्य त्यांच्या निवडींमुळे वेगळं असतं. 'दंगल'मधील महावीर फोगटच्या निवडी एक वेगळीच गोष्ट सांगतात!

लेखक लघुपट दिग्दर्शक आहेत.

yashsk@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......