अजूनकाही
गेल्या काही वर्षांमध्ये ड्रीमवर्क्स अॅनिमेशन स्टुडिओनं ‘कुंग फू पांडा’ चित्रत्रयीपासून ते ‘मेगामाइंड’पर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या अॅनिमेटेड चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. या स्टुडिओचे आधीचे चित्रपट पाहता ‘अॅबॉमिनेबल’ हा रूढ अर्थानं वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांच्या प्रकारात मोडत नाही. कारण, सदर चित्रपट संकल्पनात्मक पातळीवर त्यांची स्वतःचीच निर्मिती असलेल्या ‘हाऊ टू ट्रेन युअर ड्रॅगन’ चित्रत्रयीपासून ते त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या ‘डिस्नी-पिक्सार’च्या ‘अप’पर्यंत बऱ्याच चित्रपटांकडून काही विशिष्ट घटक उसने घेतो. अर्थात या घटकांचं प्रत्यक्ष चित्रपटातील उपयोजन नक्कीच प्रभावी ठरणारं आहे.
‘अॅबॉमिनेबल’ची कथा साधी सोपी आहे. शांघाईमध्ये राहणारी यि (क्लोई बेनेट) ही कुमारवयीन मुलगी इथल्या कथेच्या केंद्रस्थानी आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ती स्वतःच्या कोषात गेलेली आहे. आई (मिशेल वाँग) आणि आजीशी (त्साई चिन) असलेल्या नात्यातदेखील अनेक मर्यादा आहेत. जिन (टेन्झिंग नॉर्गे ट्रेनर) हा मित्र आणि त्याचा धाकटा भाऊ पेंगदेखील (अल्बर्ट त्साई) तिच्या या मानसिक-भावनिक परिस्थितीत काही मदत करू शकतील अशातला भाग नाही.
अशातच हिमालयातील गूढ प्राण्यांपैकी एक असलेल्या एका यतीला (जोसेफ इझो) शहरामध्ये आणण्यात आलेलं आहे. बर्निश (एडी इझार्ड) हा पूर्वाश्रमीचा एक्स्प्लोरर हा यती जगासमोर आणण्याची स्वप्नं पाहत आहे, तर डॉ. झारा (सारा पॉल्सन) ही जीवशास्त्रज्ञ या यतीला पकडण्याच्या कामात त्याची मदत करत आहे. चित्रपटाला सुरुवात होताच हा यती त्यांच्या प्रयोगशाळेतून निसटतो आणि शहराच्या दिशेनं धाव घेतो. साहजिकच तो यिपर्यंत पोचतो, नि मग एकीकडे तिची स्वतःच्या आयुष्यातील समस्या सोडवण्याची, तर दुसरीकडे या यतीला त्याच्या घरी, एव्हरेस्टला पोचवण्याची तिची धडपड सुरू होते. पुढे या यतीचं नामकरणही ‘एव्हरेस्ट’ असं केलं जातं.
परिणामी ‘अॅबॉमिनेबल’ पौगंडावस्थेतील पात्राचं त्याच्या आयुष्यातील समस्यांशी लढा देत मानसिक-भावनिक पातळीवर जबाबदार बनून प्रौढावस्थेत होत असलेलं पदार्पण रेखाटणाऱ्या ‘कमिंग ऑफ एज’ प्रकारातील चित्रपट म्हणून पुढे वाटचाल करू लागतो. यिचे वडील एक उत्तम व्हायोलिन वादक असतात. तिला त्यांच्याकडूनच व्हायोलिन वाजवण्याचे धडे मिळालेले असतात. वडिलांच्या मृत्यूनंतर तिने चारचौघांत व्हायोलिन वाजवणं सोडलेलं असलं तरी एकांतात मात्र ती त्यांच्या आणि तिच्या एकत्र छायाचित्रासमोर अजूनही व्हायोलिन वाजवत असते. तिच्या या वडिलांवरील आणि संगीतावरील प्रेमातूनच चित्रपटाला एक हृद्य सांगीतिक किनार प्राप्त होते. एव्हरेस्टचं निसर्गाशी असलेलं नातं आणि यिचं संगीताशी असलेलं नातं यांतून एका सुमधुर अशा दृकश्राव्य अनुभवाची निर्मिती होते. जे काहीसं डिस्नी-पिक्सारच्या ‘कोको’मधून दिसलेल्या स्वप्नवत अनुभूतीशी समांतर असं आहे. या काही दृश्यांसाठी तरी सदर चित्रपट नक्की पहावासा बनतो.
‘अॅबॉमिनेबल’च्या निमित्तानं ड्रीमवर्क्स अॅनिमेशन स्टुडिओ आणि चीनमधील पर्ल स्टुडिओने ‘कुंग फू पांडा ३’नंतर पुन्हा एकदा एकत्र येऊन चित्रपटाची निर्मिती केली आहे. यापूर्वी बऱ्याच अॅनिमेटेड चित्रपटांवर काम केलेल्या जिल कल्टनने लिहिलेला सदर चित्रपट कथेच्या पातळीवर सर्वस्वी नावीन्यपूर्ण नसला तरी हा अडथळा त्याला प्रभावी असण्यापासून थांबवत नाही. ‘अॅबॉमिनेबल’मध्ये ‘किंग कॉंग’मधील अतिप्रसिद्ध अशा दृश्यचौकटींचं पुनर्निर्माण करत संकल्पनात्मक पातळीवर सदर चित्रपटाशी असलेल्या साम्याचा विचार करत मानवंदना दिली जाते. त्याचं ड्रीमवर्क्सच्या चित्रपटाला शोभणारं नितांतसुंदर अॅनिमेशन आणि भावनिक पातळीवर गुंतवून ठेवणारी पटकथा या दोन्ही गोष्टी त्याला परिणामकारक आणि रंजक बनवतात. चित्रपटाचं कथानकाच्या पातळीवर भाकीत करण्यालायक ठरणं इथं महत्त्वाचं ठरणारं नाही.
‘अॅबॉमिनेबल’ कथेच्या पातळीवर प्रेक्षकाला काही नवीन देऊ पाहतो का, तर नाही. मात्र दृकश्राव्य पातळीवर तो ड्रीमवर्क्स अॅनिमेशन स्टुडिओच्या आणि एकूणच अॅनिमेटेड चित्रपटांच्या चाहत्यांना आवडेल असं बरंच काही दाखवतो, ऐकवतो. ज्यामुळे तो नक्कीच प्रेक्षणीय ठरतो.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment