अजूनकाही
१९९३ साली व्यक्तीस्वातंत्र्याला महत्त्व देणाऱ्या आणि भांडवलशाहीनं ज्याला ‘सुखसुविधा’ म्हटलं आहे, त्या संपन्न अशा अमेरिकेमध्ये एक गुन्हा घडला.
एका रात्री लोरेना बॉबेट नावाच्या बाईनं घरातल्या आठ इंच चाकूनं झोपेत असलेल्या तिच्या नवऱ्याचं, जॉनचं, लिंग छाटून टाकलं. ते घेऊन ती बाहेर पडली, तिनं ते कुठंतरी फेकून दिलं. तिच्या या कृतीमुळे केवळ तिचंच नाही तर अमेरिकेच्या प्रत्येक बाईचं आयुष्य बदललं!
‘लोरेना’ ही अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवरची ओरिजनल डॉक्यु-सीरिज आहे. चार भागांची ही सीरिज १५ फेब्रुवारी २०१९ रोजी रिलीज झाली. जगभरातील प्रायोगिक सिनेमांना बळ देणारा फेस्टिव्हल असा ज्याचा लौकिक, अशा ‘सनडान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या वर्षीच्या फेस्टिव्हलमध्ये स्पेशल सेक्शनमध्ये या सीरिजचं स्क्रीनिंग करण्यात आलं होतं.
OTT platform वर फक्त लैंगिकता आणि हिंसाचार यांचा ट्रेंड आहे. अशा परिस्थितीत ‘लोरेना’ ही सीरिज फक्त वेगळी नाही तर महत्त्वाची ठरते. आशय बघून प्रेक्षकांनी अस्वस्थ व्हावं हाच हेतू ठेवून वेबसीरिज लिहिल्या जात असाव्यात, पण या हेतूबरोबरच प्रेक्षकांनी विचार करण्यासाठी प्रवृत्त व्हावं, स्वत:ला प्रश्न विचारावेत, असं फार कमी वेळा होतं, जे ‘लोरेना’ नक्कीच करते.
सतत लैंगिक अत्याचार आणि घरगुती हिंसाचार सहन करणाऱ्या बाईचा काय कडेलोट होऊ शकतो, याचं भेदक चित्रण या सीरिजमध्ये आहे. हा गुन्हा घडल्यानंतर लोरेनाला अटक करण्यात आली. हा गुन्हाच असा होता, ज्यात मीडियानं रस घेतला नसता तर व्यावसायिकदृष्ट्या ते फारच बुद्ध ठरले असते! हा काळ असा होता, जेव्हा अमेरिकेमध्ये २४ तास बातम्यांचा रतीब घालण्याची नुकतीच सुरुवात झाली होती. गरम तव्यावर मग सगळ्यांनीच पोळी भाजायला सुरुवात केली! ज्या अत्याचारामुळे लोरेनाचा जीव तळतळून निघाला, त्याच्या बातम्या पेज थ्रीवर वाचल्या गेल्या. भडक आणि बटबटीत पद्धतीनं ते छापलं गेलं. जॉन आणि लोरेना दोघांचीही बाजू घेऊन बातम्या केल्या जाऊ लागल्या. न्यायाची चाड कोणालाही नव्हती, सत्य काय आहे, हे जाणून घेण्यात कोणालाही रस नव्हता. शेवटी सत्य तरी काय असतं? ज्याला त्याला स्वत:चं खरं वाटत राहतं. शारीरिक सुखासाठी बायकोला बेदम मारहाण करणारा जॉन न्यायालयातून सुटला आणि बळी ठरलेल्या लोरेनाला दहा वर्षं तुरुगांत काढावी लागली.
प्रत्यक्ष गुन्हा लोरेनाकडून घडला होताच, पण तिला तिथपर्यंत नेणारा जॉन, परिस्थिती यांच्या अघोरी, अप्रत्यक्ष गुन्ह्याला काहीच शिक्षा सुरुवातीला झाली नाही. त्यात या केसची सुनावणी जी न्यायालयात झाली त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. या केसमध्ये काम केलेले सर्व पोलीस कर्मचारी, जॉनचं ऑपरेशन केलेले डॉक्टर, दोघांचेही वकील आणि लोरेना-जॉन यांच्या मुलाखती आहेत. गुन्हा घडला, त्या जागा दाखवल्या गेल्या आहेत.
त्या काळी अमेरिकन टीव्हीवर लोकप्रिय असलेया standup comedy show मध्ये लोरेनाच्या कृतीची खिल्ली उडवली गेली. जाहीर कार्यक्रमातून तिची बदनाम करण्यात आली. यातून समाज एखाद्या गुन्ह्याकडे किती थिल्लरपणाने पाहू शकतो, याचं केलेलं चित्रण धक्कादायक आहे. आजकाल खाजगी जगण्याचा बाजार मांडला जातोय. जॉननं तर ‘लिंग कापलं गेलेल्या बायकोचा बिचारा नवरा’ म्हणून सहानुभूती मिळवली, अमाप पैसा मिळवला, बायकोला पायाखाली आणि कायम अंगाखाली ठेवलं पाहिजे, ही क्षुद्र विचारसरणी बाळगणाऱ्या जॉनला तत्कालीन अमेरिकन समाजानं डोक्यावर घेतलं गेलं. त्यानं पोर्नफिल्म्समध्ये काम केलं. ते सगळं पाहून तर कोण कोणाला विकतंय, कोण कोणाची चेष्टा करतंय, तेच कळत नाही.
लोरेनाच्या वकिलानं केलेला युक्तीवाद असा- तुम्हाला इतकं कोंडलं जातं की, एका क्षणाला तुम्हाला तुमच्यावर कुठलाच कंट्रोल राहत नाही. लोरेनची साक्ष टीव्हीवर दाखवली गेली होती. सगळी अमेरिका टीव्हीला चिटकून बसली होती. स्वत:वर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल जेव्हा ती सांगते, ते ऐकून, तिला बघताना पोटात गोळा येतो. मन सुन्न होऊन जातं, सगळं बधीर होऊन जातं.
या केसमुळे लोरेनाची बाजू ऐकून घेऊन त्यात तथ्य वाटून न्यायालयानं तिला न्याय दिला. अमेरिकन सरकारला Violence Against Women Act, in 1994 या कायद्यात बदल करावा लागला. घरगुती हिंसाचार झालेल्या बायकांसाठी फंड ठेवावा लागला. त्याची रक्कम वाढवण्यात आली. समाजव्यवस्था आणि सरकार बायकांच्या घरगुती हिंसाचार या प्रश्नाकडे किती निर्दयपणे पाहतात, याबद्दल या सीरिजमध्ये स्त्रीवादी चळवळीमधल्या बायका जे बोलल्या आहेत, ते ऐकून तर पुरुषसत्ताक व्यवस्थेचा हा अविरत हव्यास कधी संपणार, असा प्रश्न तयार होतो. कारण जॉननं या सगळ्या प्रकरणानंतर दुसरी लोरेना शोधून काढली, ती एक सेक्स वर्कर होती, प्रेमाचं नाटक करून त्यानं तिच्यावरही बलात्कार केले.
लोरेनानं स्वत:ला सावरलं, जे काही घडलं त्यातही अनेकांनी तिचा उपयोग करून घेतला, तिला फसवलं तर काहींनी तिला मनापासून मदत केली. तिनंही चुका केल्या, पण ती स्वत:ला दुरुस्त करत गेली. जे आपल्यासोबत झालं, ते इतर बायकांसोबत होऊ नये, यासाठी ती आज काम करते आहे.
आपल्या घराच्या आजूबाजूला अशा किती लोरेना असतील! कोणी कोणी तर नवऱ्याची दहशत आणि मार खात खात मरूनही गेल्या आहेत, मरून जात आहेत. हा अन्याय, ही हिंसा हे शोषण आपण माणूस म्हणून जोपर्यंत थांबवणार नाही, तोपर्यंत आपण कोणीही सुखी होऊ शकणार नाही! कोणालाही शांत झोप लागणार नाही.
कधी कधी वाटतं आपल्याला प्रेम करायला कोणीतरी लागतं, तसं शोषण करायलादेखील कोणीतरी लागतं की काय? कारण कोणावर तरी ओरडल्याशिवाय, कोणाला तरी धाकात ठेवल्याशिवाय, कोणाला तरी आपल्या अंगात किती जोर आहे दाखवल्याशिवाय, सत्ता गाजवल्याशिवाय आपलं असणंच सिद्ध होत नाही, अशी अत्यंत चुकीची ‘belief system’ तयार झाली आहे. आणि आपल्या प्रत्येकामधली ही ‘belief system’ कॉम्प्युटरमधल्या ‘operating system’सारखी काम करते. ती बदलण्याची प्रचंड गरज आहे.
मी कोणावरही सत्ता गाजवणार नाही आणि कोणालाही माझ्यावर सत्ता गाजवू देणार नाही, हा जगण्याचा केंद्रबिंदू करण्याची गरज आहे. स्पर्धा (Competition) नाही तर सहअस्तित्व (Co- existence) या मुद्द्याला जगण्याची धारणा करण्याची नितांत निकड आहे.
प्रत्येक काळाची स्वत:ची अशी नीती असते. उत्क्रांत होत जाण्याच्या प्रक्रियेत आज अन्न मिळवण्यासाठी वणवण करावी लागत नाही (काहींना करावी लागते आहे तो मुद्दा आहेच). त्यामुळे केवळ जिवंत राहण्याच्या विचाराच्या पुढे जात जगण्याची गुणवत्ता (survival quality) महत्त्वाची ठरते आहे. जगण्यासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, करुणा या मानवी मूल्यांची आस लागावी, अशी कुठलीच व्यवस्था आणि परिस्थिती आपण तयार करू शकलेलो नाही. ‘लोरेना’ ही वेबसीरिज आपल्यातल्या नैतिकतेला दरडावून असे काही प्रश्न विचारते.
.............................................................................................................................................
लेखिका माधवी वागेश्वरी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.
madhavi.wageshwari@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment