‘खिचिक’ : विनोद आहे, ड्रामा आहे, मात्र त्याची लयबद्ध मांडणी किंचित कमी पडते!
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘खिचिक’चं एक पोस्टर
  • Sat , 21 September 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie खिचिक Khichik प्रथमेश परब Prathamesh Parab सिद्धार्थ जाधव Siddharth Jadhav

विदर्भातल्या एका गावातील पारधी समाजातील एक कुटुंब. आबा (अनिल धकाते) आणि त्याची सून (रसिका चव्हाण) आणि तिचा मुलगा फटफटी (यश खोंड). हे गाव अत्यंत दुर्गम भागातलं असतं. गावाचा आणि त्यातला लोकांचा सहसा शहराशी संबंध येत नाही. त्यातल्या मिथून (सिद्धार्थ जाधव) शिवाय कोणीही शहर पाहिलेलं नसतं. अशा या डोंगरात वसलेल्या गावात अचानक एक दिवस फोटोशूटसाठी एक विदेशी टीम येते. त्या टीममधील एक बाई फटफटीचा फोटो टिपते. तो फोटो फटफटीला बघायचा असतो, पण तेवढ्यात ती विदेशी बाई निघून जाते. फोटो बघायची इच्छा अपूर्ण राहिलेल्या फटफटीला ताप चढतो. आणि मग त्याचा ताप कमी करण्यासाठी सुरू झालेला प्रवास, त्या बाईचा शोध घेत शहरापर्यंत येऊन थांबतो. या सर्व प्रवासात विनोद आहे, ड्रामा आहे, मात्र त्याची लयबद्ध मांडणी किंचित कमी पडली आहे.

फटफटीला आणि गावकऱ्यांना कॅमेराला काय म्हणतात, हे माहीत नसतं, म्हणून ते फोटो घेताना येणाऱ्या ‘खिचिक’ या आवाजाशी त्याचा संबंध जोडतात. या ‘खिचिक’च्या भोवती फिरणारी कथा अनेक वळणं घेत सिनेमाला पुढे घेऊन जाते.

सिद्धार्थ जाधव आणि प्रथमेश परब ही दोन विनोदी पात्रं मोजक्याच ठिकाणी पडद्यावर येतात. पण त्यांचा अभिनय नेहमीच्या अभिनय शैलीपलीकडे जात नाही. सिद्धार्थच्या अभिनयात तोच-तोचपणा जाणवतो. मुळात त्याचं पात्र विदर्भातलं आहे, पण त्याचे संवाद त्याला पात्रावर पकड घेऊ देत नाहीत. प्रथमेश आपल्या नेहमीच्या ‘टाइमपास’ भूमिकेतून बाहेर येत नाही. त्याचा अवखळ अभिनय सिनेमातल्या विनोदाला मरगळ चढवतो. अनिल धकाते या दोघांपेक्षा वरचढ ठरतात. त्यांचा अभिनय त्यांच्या भूमिकेला साजेसा आहे. त्याचबरोबर यश खोंड या चिमुरड्यानं चांगला अभिनय केला आहे. रसिका चव्हाणने खंबीर स्त्री साकारली आहे.

सिनेमाची कथा दमदार आहे. त्यातला पूरक असलेला भाग नावीन्यपूर्ण शैलीत प्रेक्षकांसमोर येतो. विदर्भाचा भाषिक लहेजा हुबेहूब उतरला आहे. पूर्वार्धात अस्सल ग्रामीण विदर्भी बोली भाषेतील संवाद आहेत. ‘आई म्हणत्या पुडी खाल्यास लग्न होत नाही!’ असे बोलीभाषेतील संवाद परिणामकारक ठरतात. मात्र त्यांची पकड टिकून राहिलेली नाही. पारधी समाज आणि त्याच्या रूढी, प्रथा, समज-गैरसमज यांचं संयमी चित्रण केलं आहे. त्याला वास्तवतेची जोड आहे. पण हे सगळं तुकड्या-तुकड्यात विखुरलेलं आहे.

सिनेमाचा संथपणा उत्तरार्धात अंगावर येतो. त्यात भर म्हणजे प्रथमेश परबची साधारण अभिनय शैली नीरस करते. त्याचे भोळसट विनोद सिनेमाला संथ करतात. काही आशयहीन दृश्यं मध्येच येतात. चोरी करणाऱ्या एका तरुणाची भूमिका साकारणारा लक्झरी (प्रथमेश) एका ठिकाणी चोरी करायला जातो. तिथं अचानक एका महिलेचा खून होतो. या खुनाचा आणि सिनेमाच्या कथेचा संबंध शेवटपर्यत उलगडत नाही.

त्याचबरोबर उत्तरार्धात येणारे रोमँटिक दृश्यंही अनरोमँटिक वाटतात. सिनेमाला समग्र एका साच्यात बसवण्याच्या प्रयत्नात सिनेमाची दोन भाग होतात. गावातून कथा शहराकडे येते आणि शेवट शहरात होतो. त्यामुळे पार्श्वभूमीसाठी उभ्या केलेल्या घटना अचानक अर्थशून्य होऊन जातात.

याचा नकारात्मक परिणाम होतो. गाणी धागडधिंगा घालणारी आहेत. त्यात आयटम साँगचा तडका दिलेला आहेच. दिग्दर्शक प्रीतम पाटील यांचा प्रयत्न चांगला आहे. खिळून ठेवणारी कथा आणि सुरुवातीला बहरलेल्या चित्रीकरणाचा मनोरंजनात्मक भाग सोडता ‘खिचिक’ म्हणजे उत्तम कथा आणि अभिनय, संवाद व चित्रीकरणाचा काही अंशी जुळून आलेला प्रयोग आहे. शेवटी ‘खिचिक’ म्हणावं आणि थांबावं इतकंच!

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख