अजूनकाही
What We know is a drop
What we don’t know is an Ocean
या ओळींना तंतोतंत पाळणारी, पाहणाऱ्याला ‘काळ’ आणि ‘अवकाश’ यांनी तयार होणाऱ्या धारणांमध्ये भोवळ येईपर्यंत फिरवणारी कथा म्हणजे ‘डार्क’. आपली सगळी नीती धसास लावणाऱ्या तर्काचा चोळामोळा करून फेकून देणाऱ्या, आता समजलं असं म्हणता म्हणताच ज्ञान आणि अज्ञानाच्या दोन शिळांमध्ये दम कोंडेपर्यंत चेंगराचेंगरी करणाऱ्या आणि तरीही एका गूढ धुनेनं, आवेगानं खेचणाऱ्या ‘डार्क’च्या गुहेच्या विवरात एकदा जायलाच हवं.
‘डार्क’ ही नेटफ्लिक्सवरची जर्मन वेबसिरिज आहे. ती सायन्स फिक्शन थ्रिलर स्वरूपाची आहे. Baran boOdar आणि Jantje Friese यांनी या सिरीजची निर्मिती केली आहे. लेखन दोघांनी मिळून केलं आहे आणि आणि दिग्दर्शन Baran boOdar यांनी केलं आहे. १ डिसेंबर २०१७ रोजी या सिरिजचा पहिला सिझन नेटफ्लिक्सवर आला. चाहत्यांना ताटकळत ठेवत शेवटी २१ जून २०१९ रोजी दुसरा सीझन आला आणि आता तिसऱ्या सीझनची तहान लागली आहे.
जर्मनीमधील विंडन नावाच्या काल्पनिक शहरात घडणारी ही गोष्ट आहे. अजिबात वर्दळ नसलेल्या या शांत शहरातून दोन मुलं नाहीशी झाली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. त्यांच्या नाहीसे होण्याचे परिणाम सगळ्यांवर थोड्याअधिक प्रमाणात झाले आहेत. ज्यांच्यावर हे परिणाम अधिक गडद होत जातात, अशी चार कुटुंबं आहेत. त्यांच्यातील नाती या शोधात उलगडत जातात. विशेष म्हणजे ती प्रेक्षक म्हणून जशी आपल्याही कळत जातात, तशी त्यांनाही. त्यामुळे सतत आता पुढे काय, याची धाकधूक निर्माण होत राहते.
असं म्हणतात, घर सोडून आपण प्रवासाला निघालो आणि घरी परतलो की, आपण जसे आधी होतो तसे राहत नाही. आपल्याला माणूस म्हणून बदलून टाकण्याची ताकद देशाटनात असते. अर्थात असं होण्यासाठी प्रवासात स्वत:ला मोकळं सोडावं लागतं. हीच गोष्ट ‘डार्क’ या सिरिजलादेखील लागू होते. ती बघितल्यावर तुम्ही आधी होता तसे राहत नाही. ती पाहता तेव्हा तुम्ही आतून बदलता आणि हो, त्यासाठी घरदेखील सोडण्याची गरज नाही!
‘डार्क’चं वेगळेपण
‘डार्क’वर नेमकेपणानं बोलायचं तर ‘कालप्रवास’ (Time Travel) हा त्याचा गाभा आहे. खरं तर यावर आधारित कितीतरी गोष्टी साहित्यातून, सिनेमांमधून, नाटकांमधून इत्यादी विविध कला प्रकारांतून आपण आधी पाहिलेल्या आहेत. अगदी अलीकडेच उत्पनाचे विक्रम पटापट मोडणाऱ्या ‘Avengers End Game’मध्ये मार्व्हलच्या सुपरहिरोजना जिंकण्यासाठी याच ‘कालप्रवासा’नं मदत केली होती. ‘Back to the future’ आठवणं तर अपरिहार्य. त्यात पुन्हा ‘डार्क’ची नेटफ्लिक्सच्याच लोकप्रियतेचे उच्चांक गाठणाऱ्या ‘Stranger Things’ या वेबसिरिजशी झालेली तुलना. मग ‘डार्क’चं वैशिष्ट्य काय? ही जरी आधी पाहिलेल्या संकल्पना किंवा काही गोष्टींशी मिळतीजुळती वाटत असली तरी तिचा अस्सलपणा तिच्या मांडणीत आहे.
आपल्याकडे आजही (काही अपवाद वगळता) एकूणच ऊर्मी आल्यावरच स्क्रिप्ट लिहायला होतं. उर्मीला नको तितकं ‘ग्लोरिफाय’ केलं जातं. संहितेचं एक शास्त्र असत, त्याची रचना, त्यातील टप्पे शिकायचे असतात. साक्षर आहेत म्हणून सगळे लिहू शकत नाहीत. असो आपल्याकडे हळूहळू बदल होतो आहे. लेखनाला गांभीर्यानं घेतलं जातं आहे, पण बाहेरील देशात असं होतं नाही. ते स्क्रिप्टच्या क्राफ्टवर इतकं काम करतात. त्यांचं लिखाण इतकं बांधीव असतं, ते इतकी मेहनत घेतात की, ते अगदी ‘उर्मी’ आल्यावर जे होतं तसं effortless वाटतं.
‘डार्क’नं निवेदनाचा (Narrative) मुख्य धागा - Everything is connected कितीही काचला तरीही अजिबात न सोडता केलेले प्रयोग अभ्यासण्यासारखे आहेत. सतत काळच्या पुढे-मागे होणारी कथा आणि त्यातील पात्रं सांभाळत आणि तरीही प्रेक्षकांना ते धरून ठेवेल असं लिखाण करणं अतिशय कठीण आहे, पण ते या सिरीजनं करून दाखवलं आहे. थेट आईनस्टाईन, भौतिकशास्त्र, तत्त्वज्ञान यातील कोट (quote) एपिसोडच्या सुरुवातीलाच कळल्यामुळे आज आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय हे कळतं.
यातील संवाद अक्षरशः मेंदूवर कोरले जातात. या सिरीजचं कॅमरा वर्क तर स्वतंत्र लेखाचा विषय आहे. विंडन शहरातले सर्व ऋतू आपल्याला बघताना त्वचेला जाणवतात. ही कॅमराची आणि दिग्दर्शकाची कमाल आहे. प्रत्येक कालानुरूप तिथल्या जागांचं तपशीलवार काम यात केलं आहे. सिरिज सुरू होते, तेव्हा सुरुवातीला येणारा title track skip करण्याची सोय असते. पण या सिरिजचा ट्रॅक अजिबातच सोडावासा वाटत नाही. ते संगीत तुम्हाला खेचून आत घेतं, आपण मंतरल्यासारखे होऊन जातो.
दृष्ट लागावी असं कास्टिंग
वेगवेगळ्या काळांमध्ये फिरणारी चार कुटुंबांमधली कितीतरी माणसं, त्या प्रत्येक माणसाचं लहानपण, तारुण्य, वार्धक्य हुबेहूब जुळेल अशी माणसं शोधून काढली गेली आहेत. बरं नुसतं ते दिसण्यातलं सारखेपण नाही, तर त्यांची देहबोली, संवाद फेक अगदी सारं काही बरोबर त्याच माणसासारखं आहे. ही कास्टिंग फारच भाव खाऊन जाते. यातील चारही कुटुंबाचा Family Tree पुन्हा पुन्हा नेटवर जाऊन समजेपर्यंत चेक केला नाही, असा ‘डार्क’चा प्रेक्षक सापडणं शक्य नाही. जोनस या तरुण मुलापासून सुरू होणारी ही गोष्ट. चारही कुटुंबातील पिढ्यान पिढ्या सिक्रेट चेंबरमध्ये दडवून ठेवलेली रहस्यं कशी खणत राहते, याची पाहताना सतत धाकधूक वाटत राहते. त्या अंधाऱ्या गुहेत एकवेळ आक्राळविक्राळ भूत आलं तरी चालेल, पण आपलंच भूतकाळातलं किंवा भविष्यातलं रूप समोर येऊन उभं राहिलं तर, या कल्पनेनं थरथरायला होतं!
संदर्भांचं घायपात
‘डार्क’मध्ये भौतिकशास्त्र, तत्त्वज्ञान, बायबल यामधील ‘काळ’ आणि ‘अवकाश’ यांना धरून येणाऱ्या संकल्पना, तत्त्वं, मिथकं यांची इतकी गुंतागुंत आहे की, हा संदर्भ आपल्याला समजला पाहिजेच म्हणून आपण ते नेटवर का असेना शोधू लागतो. चाहत्यांनी यू-ट्यूबवर ‘डार्क’ समजण्यासाठी भरमसाठ व्हिडिओजदेखील बनवले आहेत. एखादी गोष्ट समजावी म्हणून आपण पुस्तकात त्याचा संदर्भ शोधत असू तर ही मोठीच गोष्ट म्हणायला हवी. विचार करून भंजाळून सोडणारी आणि पुरेपूर बौद्धिक आनंद देणारी अशी ही सिरिज आहे.
कळल्यावरचा त्रास
साधरणपणे रहस्य कळल्यावर फार काही राहत नाही, पण इथच मेख आहे. ‘डार्क’ तुम्हाला सहजासहजी सोडत नाही. तुम्हाला एकदा का रहस्य कळलं की, मग तर ते तुमच्या मानगुटीवरच येऊन बसतं, जिथं जाऊ तिथं आपल्यासोबत. कळल्यावर आपण काय विचार करतो आणि काय वागतो, हे सगळ्यात महत्त्वाचं होऊन बसतं.
एकसलग आठवणींमुळे आपल्याला सारं काही शाश्वत वाटू लागतं. सारं काही द्वैतात बघण्याची सवय लागते आणि इथं आपण स्वत:हूनच स्वत:साठी निसरडी वाट तयार करू लागतो. सजीव, निर्जीव सारं काही स्वतंत्र बघण्याच्या सवयीमुळे खरं तर सगळं काही एकमेकांशी अदृश्य धाग्यानं जोडलेलं आहे, याचा आपल्याला विसर पडतो आणि त्या निसरड्या वाटेवर शेवाळ येऊ लागतं. समोर दिसणारं जे काही आपल्या समोर उभं आहे, ते आपण एकसंध पाहत राहतो. ही झापड आयुष्यभर राहते आणि आपल्याला घसरण्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. आपल्याला आपल्यापासून कोणीही वाचवू शकत नाही. आपणच आपल्या पतनाला जबाबदार असतो. ही जबाबदारी डार्क आपल्याला समजून सांगतं. ‘काळ’ आपला काय खेळखंडोबा करून टाकू शकतो याचं भेसूर चित्र दाखवतो.
काळाला प्रश्न नेमकेपणाने विचारायचा असतो .... The question is not how, it’s WHEN
पण मग प्रश्न तयार करता येऊ लागल्यावर तोच काळ दरडावून सांगतो
The question isn’t from what time …. but from what world?
या ‘डार्क’च्या पुढे काही ‘उजेड’ असेल का? त्यासाठी तिसऱ्या सीझनची वाट पाहणं जीव घेणं आहे. पण खरं तर मुद्दा तोच आहे. ‘तयार उत्तरं’ मागण्याचा आळस आणि निष्क्रियता आता सोडायला हवी. काळानं कसंही वाकवलं तरीही सजगतेची साधना करणाऱ्या ‘अर्हत’ मनाची विलक्षण आस मात्र आता लागून राहिली आहे.
.............................................................................................................................................
लेखिका माधवी वागेश्वरी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत.
madhavi.wageshwari@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment