‘व्हीआयपी गाढव’ : रटाळ संवादशैली, नीरस अभिनय, अतार्किक कथा आणि भरकटलेलं दिग्दर्शन
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘व्हीआयपी गाढव’चं पोस्टर
  • Sat , 14 September 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie व्हीआयपी गाढव VIP Gadhav भाऊ कदम Bhau Kadam भारत गणेशपुरे BHARAT GANESHPURE

सर्वसामान्यांना समजायला अवघड जातील असे विनोद, त्याला दिलेली अतार्किक कथेची जोड, आणि मनोरंजनाऐवजी डोक्याला ताप होईल असा सावळागोंधळ, असंच ‘व्हीआयपी गाढव’ या सिनेमाचं वर्णन करावं लागेल.

एका गावात माती वाहून रोजीरोटी कमावणारं जोडपं असतं, गंगाराम (भाऊ कदम) आणि त्याची बायको काशी (शीतल अहिरराव). त्यांच्याकडे एक मुरली नावाचं गाढव असतं. एके दिवशी त्या गाढवाचा पाय मोडतो. मात्र त्याच्यावर उपचार करण्याची गंगारामची आर्थिक कुवत नसते. म्हणून तो त्या गाढवाला बांधून ठेवतो. अचानक एके दिवशी गावात पशुखात्याच्या एक अधिकारी बाई येतात. त्यांना बांधून ठेवलेलं गाढव दिसतं. त्या बाई त्याबद्दल थेट केंद्रात तक्रार करतात आणि मग त्याची चौकशी वगैरे सुरू होते.

यापुढे जो काही सिनेमा आहे, तो निव्वळ एखाद्या गोंधळासारखा आहे. थोडक्यात गाढवाबरोबरच सिनेमात आणखी काही पात्रं आहेत.

सिनेमाचा मोठा भाग विनोदी आहे, म्हणून साधारण वाटतील अशा बाबींकडे दुर्लक्ष केलं तरीही सिनेमाचा गाभा लक्षात येत नाही. प्रचंड विसंगतीनं भरलेल्या या सिनेमात पोलीस यंत्रणा, केंद्रातील उच्च अधिकारी, राजकीय नेते मंडळी आणि एकूण व्यवस्था कशी गाढव आहे, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्यातील विनोद तर ‘कॉमेडी’ या शब्दालाही लाजवतील असे आहेत.

भाऊ कदम आणि भारत गणेशपुरे यांचे संवाद आशयहीन आहेत. दोघांची जुगलबंदी पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकवर्गाला यातून आनंद मिळणार नाही. काशीची भूमिका साकारणाऱ्या बाईचा मेकअप पाहून कोणालाही वाटणार नाही की, ही बाई माती उचलण्याचं काम करते. रंगानं गोरी असलेली ही बाई सतत मेकअपमध्ये दिसते.

जिथं संधी मिळेल तिथं विनोद करण्याच्या नादात सिनेमा अंगावर येतो. मुळात कथेत ‘कॉमेडी शो’चे गुण अधिक आहेत. कॅमेरा आणि एडिटिंग सोडलं तर सिनेमाकडून विशेष काही हाती लागत नाही. कथा अनेक ठिकाणी ब्रेक होते. कथा एका गावाची, त्याचं (गाढवाचंसुद्धा)  विशेष असं कर्तृत्व नाही. मात्र एका गाढवामुळे अचानक गावातले सगळे लोक एकत्र येतात. त्यात भर म्हणजे सगळी यंत्रणा इतर सर्व कामं सोडून फक्त गाढवामागे लागते. आणि हे सगळं उथळ पद्धतीनं येत राहतं.

सिनेमात येणारी पात्र विसंगत आहेत. राजकीय व्यवस्थेवर टीका करणारे संवाद बोजड आहेत. सर्वसामान्य वाटणारा गंगाराम अचानक चलाख होतो. झोपडीत राहणारी काशी मेकअप उतरू देत नाही. त्यामुळे व्यवस्थेविरुद्ध विडंबनात्मक स्वरूपात बनवलेला हा प्रयोग गाढवाच्या पलीकडे जाण्यात यशस्वी होत नाही.

गाणी कथेला पूरक ठरत नाहीत. ग्रामीण कथानक असलेले मराठी सिनेमे रंगीबेरंगी प्रकाशातल्या आयटम साँग आणि लावणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. इथंही हा प्रकार आहेच. त्यामुळे सिनेमातला परस्पर विरोध अधिक ठळक होतो.

भारत गणेशपुरे, विजय पाटकर यांच्या अभिनयात पुनरावृत्ती जाणवत राहते. भाऊ कदम आणि शीतल अहिरराव ही जोडी कॉमेडीचा लहेजा टिकून ठेवत नाही. रटाळ संवादशैली, नीरस अभिनय, अतार्किक कथा आणि भरकटलेलं दिग्दर्शन यांचं मिश्रण सिनेमाला पांढऱ्या रंगाच्या गाढवापलीकडे जाऊ देत नाही.

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख