अजूनकाही
‘आयुष्मान खुराना’ ब्रँडच्या निषिद्ध मानल्या गेलेल्या विषयांना हाताळण्याच्या अगदीच लोकप्रिय अशा साच्यातून ‘ड्रीम गर्ल’ निर्माण झालेला आहे. यासाठी आवश्यक अशा सगळ्या गोष्टी इथं आहेत. एक- आयुष्मान खुराना साकारत असलेलं ‘दिल्ली’तील बेरोजगार युवकाचं पात्र. दोन- आयुष्मानसमोर चांगली दिसेल अशी नायिका - नुश्रत भरुचा. तीन- विजय राज, अन्नू कपूर, इत्यादी नावाजलेले ‘विनोदी’ अभिनेते. चार- (आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे) एक निषिद्ध मानला गेलेला विषय. मात्र, इथं हे सगळे घटक केवळ ‘आहेत’. त्यांना जोडणाऱ्या एकसंध कथा-पटकथेचा इथं अभाव आहे. त्यामुळे साधारण सव्वादोन तासांच्या या चित्रपटात जे काही घडतं ते अनेकदा ‘ना आगा, ना पीछा’ थाटात, अगदीच असंबद्धरीत्या घडणारं आहे. हे सारं काही प्रमाणात रंजक असेलही, पण ते एकुणातच रटाळ प्रकारात मोडणारं आहे.
इथल्या तरुणाचं, करम सिंगचं (आयुष्मान खुराना) कौशल्य म्हणजे तो स्त्रियांचा आवाज काढू शकतो. नोकरीच्या शोधात असताना तो एका फोन-सेक्ससाठीच्या कॉल सेंटरमध्ये ऑपरेटर म्हणून रुजू होतो. साहजिकच त्याचं एकल पालकत्व निभावणाऱ्या वडिलांना (अन्नू कपूर) या नोकरीविषयी कळवता येणार नसतं. आणि स्वाभाविकपणे इतका देखणा नायक दहा-पंधरा मिनिटांत प्रेमात पडून मुलीचा, माहीचा (नुश्रत भरुचा) होकार मिळवण्यात यश मिळणार असतो. आता इतक्या साऱ्या स्वाभाविक गोष्टी घडत असताना त्यानं आपलं काम या दोघांपासून लपवणं आलं नि त्याला मदत करणारा परमप्रिय मित्र, स्माइलीही (मनजोत सिंग) आला. त्यापाठोपाठ उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ यांतून व्युत्पत्ती होणारा विनोद येतो.
कथानक जरा ऐकल्यासारखं, पाहिल्यासारखं वाटतंय? आयुष्मानच्याच ‘विकी डोनर’ (२०१२) नामक चित्रपटाला समांतर जाणारं असं हे कथानक आहे. आता इथं अपरिपक्वता अधिक आहे, हा भाग वेगळा.
करम फोन-सेक्स करण्यासाठी ग्राहकांशी पूजा या नावानं संवाद साधतो. मग पूजाशी संवाद साधणाऱ्या लोकांची छोटेखानी फौज येते. ही पात्रंही साचेबद्ध आहेत. महेंदर (अभिषेक बॅनर्जी) हा बालब्रह्मचारी, विवाहित पोलीस हवालदार राजपाल (विजय राज), टोटो (राज भन्साळी) हा जाट मुलगा या लोकांसोबत आणि स्त्री वर्गाचं प्रतिनिधित्व म्हणून रोमा (निधी बिष्ट) ही स्त्रीदेखील पूजाच्या प्रेमात पडल्याचं चित्र निर्माण होतं. आता हे सगळं करताना लेखक-दिग्दर्शक राज शांडिल्यचा पुरता गोंधळ उडालेला आहे.
कारण मुळातच चित्रपट गैरसमजांतून निर्माण होणाऱ्या गोंधळावर आणि विनोदांवर अवलंबून राहणारा आहे. ज्यात द्विअर्थी विनोदही मुबलक प्रमाणात समोर येतात. यातील बहुतांशी विनोद ‘विनोदी’ बनतात ते त्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमुळे, आणि आयुष्मानमुळे. मात्र, जेव्हा एकसंध कथानकाचा विचार करायची वेळ येते, तेव्हा ही स्वतंत्रपणे पाहता विनोदी वाटणारी दृश्यं, उपकथानकं विस्कळीत आणि अनेकदा तर निरर्थक भासतात. चित्रपटभर धर्म, लिंग यांवरील सुमार ते स्वीकारार्ह यांदरम्यान कुठेतरी रेंगाळणाऱ्या विनोदांची रेलचेल आहे. निरनिराळी पात्रं समोर येत राहतात, त्यांना नेमून दिलेली कामं करतात आणि उत्तरार्धात चित्रपटातील गोंधळ अधिकाधिक वाढत जातो.
दरम्यानच्या काळात एक खलपात्रही उभं केलेलं असतं, त्याचाही निकाल लावला जातो. करमची प्रेयसी, जी पुढे जाऊन ‘भावी पत्नी’ हे बिरुद घेऊन वावरते, तिला भावही मिळत नाही. त्यांची तथाकथित प्रेमकथा सदर चित्रपटातील बऱ्याचशा अर्ध/अपरिपक्व उपकथानकांपैकी एक आहे. इथं लेखकाच्या सोयीनुसार सारं काही घडत-बिघडत राहतं. समस्या निर्माण होतात आणि तितक्याच सहजतेनं त्यांचं निराकरणही होतं. बाकी आपलं देखणं पुरुष पात्र तर अगदी सुरुवातीपासूनच नायक असतं. चित्रपटाला सामाजिक संदेश द्यायचा अट्टाहास असल्याने शेवटाकडे जाताना नायकाचं स्वगत येतं.
‘ड्रीम गर्ल’ काही प्रमाणात आपल्या ‘फिल्मी’ असण्याबाबत जागरूकदेखील आहे. त्यामुळेच चित्रपटातील पात्रं अनेकदा फिल्मी ढंगात बोलताना दिसतात. उदाहरणार्थ, एक पात्र शाहरुखच्या थाटात राहुल बनत ‘कुछ कुछ होता हैं’मधील कपड्यांत समोर येतं. चित्रपटात तर विनोदनिर्मितीच्या उद्देशानं असंख्य गाणी वाजतात. कधीतरी एखादं पात्र प्रेमभंगामुळे दुःखात असताना ‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रही’ वाजतं. चित्रपट विनोदी नाही असं नाही, पण तो बराच सदोष आहे. त्याच्या मांडणीचा विचार करता विस्कळीत आहे. आपल्या फिल्मी असण्याच्या जागरूकतेच्या नादात चित्रपट रटाळ होतो याचा विसर चित्रपटकर्त्यांना पडतो.
आयुष्यमान, विजय राज, अन्नू कपूर आपल्या नेहमीच्या ढंगात तुफान धमाल करतात. या तिघांचा समावेश असलेली दृश्यं बहुतांशी वेळा कमालीच्या अचूक अशा शारीर अभिनयातून उत्पन्न होणाऱ्या विनोदानं प्रभावी ठरतात. अभिषेक बॅनर्जी आणि मनजोत सिंगही यात बऱ्यापैकी सहाय्यक ठरतात. नुसरत भरूचा आणि निधी बिष्ट फक्त नावापुरत्या आहेत. भरूचा केवळ सुंदर दिसण्यासाठी आणि बिष्ट अगदीच रटाळ अशा उपकथानकातील (तथाकथित) विनोदी दृश्यांच्या निमित्तानं समोर येते. वाईट असण्याबाबत चित्रपटातील सुमार विनोद आणि तितक्याच उथळ गाण्यांमध्ये तर जणू स्पर्धा लागलेली आहे.
दरम्यान हल्लीच्या हिंदी चित्रपटांमध्ये जणू अनिवार्य असल्याच्या थाटात मान्यवरचे विवाहाचे पोशाख आणि रेनॉल्टच्या एका गाडीची जाहिरात होते.
आयुष्मान एके ठिकाणी म्हणतो, “टाइम ऐसा चल रहा हैं कि कुत्ता भौंकता हैं, तो लगता हैं अॅडव्हाइस दे रहा हैं”. हल्ली चित्रपटगृहाकडे जात असताना समीक्षकांकडे पाहून भुंकणारी कुत्री अशाच रीतीनं (वाईट चित्रपटांच्या रूपात समोर येऊन ठाकणाऱ्या) धोक्याची सूचना देत असावीत.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment