‘छमछम आणि शुभम’मधील तिरकसपणा व्यक्तीच्या आतल्या दुखावलेपणातून येणाऱ्या सिनिकल हुरहुरीसारखा आहे!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
श्रीराम मोहिते
  • ‘छमछम आणि शुभम’चं पोस्टर
  • Sat , 07 September 2019
  • कला-संस्कृती चलत्-चित्र छमछम आणि शुभम Chhamchham aani Shubham रोहित पाटील Rohit Patil

रोहित पाटील दिग्दर्शित ‘छमछम आणि शुभम’ हा २३ मिनिटांचा लघुपट वरवर आलबेल भासणाऱ्या दृश्यस्तराखाली एखाद्या सुरुंगासारख्या दबा धरून असणाऱ्या मनाच्या प्रच्छन्न ताणांचं आपल्या तिरकस शैलीतून तटस्थतेनं पण भेदक चित्रण करतो.

सामाजिक संकेतांच्या दबावांमधून निर्माण होणाऱ्या नात्यांच्या, भावबंधाच्या या विरूपाला भिडण्यासाठी दिग्दर्शकानं निवडलेली तिरकस उपहासात्मक शैली आणि त्यातून उसळत राहणारा ब्लॅक ह्युमर (अधिक नेमकं सांगायचं तर ग्रे ह्युमर) या अगतिक, अस्वस्थ आशयाला गहिरा परिमाण देतो.

हा लघुपट स्त्री-पुरुष नात्याचं तारुण्यातलं नवथर, स्वप्नाळू भावविश्व आणि त्याला सतत एका रूढीकठोर व्यवस्थेच्या जमिनीवर खेचणारं वास्तव यांच्यातील विलक्षण गुंतागुंतीचा छुपा संघर्ष उभा करतो. जगण्यातल्या निखळतेवर संस्कृती, परंपरा, सभ्यता यांची साचलेली पुटं खरवडतो.

शुभमचं ग्रामीण भवतालातून उमललेलं आणि नव्या शहरी पर्यावरणात स्थिरावू पाहणारं काहीसं अनघड भावविश्व, हे या लघुपटाच्या केंद्रस्थानी आहे. आधुनिक ग्रामव्यवस्थेतलं प्रचंड स्थितीशील जगणं आणि दुसरीकडे भौतिक सुबत्तेकडे धावत राहणारं नवं शहरी पर्यावरण, यांनी निर्माण केलेल्या कोंडीचा पदरही हा लघुपट प्रभावीपणे उभा करतो.

ग्रामीण भवतालातली अदृश्य तरीही अत्यंत घट्ट आणि पारंपरिक सांस्कृतिक संकेतव्यवस्था आणि शहराची आवाहक, बोलघेवडी संपन्नता, यांच्या कचाट्यातून वाट काढत चाललेल्या त्याच्या व्यक्तित्वाच्या मानसिक, भावनिक, सामाजिक, लैंगिक जाणिवांच्या प्रवासाचा एक तुकडा दिग्दर्शक पुरेशा प्रगल्भ तटस्थतेनं मांडतो. हा प्रवास केवळ शुभमचाच ‘मोनोलॉग’ वाटावा असं ‘कथन’ निवडताना अगदी शेवटी ‘छमछम’च्या ‘पॉइंट ऑफ व्ह्यू’पाशी नेऊन दिग्दर्शक या ‘गोष्टी’ला खूप व्यापक पातळीवर घेऊन जातो.

कारण हे संतुलन सभ्यतेच्या उत्क्रांत गुंतवळीत अडकलेल्या मानवी प्रेरणांचा प्रगल्भ वेध घेतं. म्हणूनच फिल्मसाठी दिग्दर्शकानं निवडलेलं ‘छमछम आणि शुभम’ हे शीर्षक केवळ त्याच्या व्यक्तित्वाचा पोतच व्यक्त करत नाही, तर मानवी आयुष्याला व्यापून असणारी स्वप्नाळू अप्राप्यता, तिच्यातून झरणारी हुरहूर आणि त्यांच्या चिमटीत सापडलेली संवेदनशीलता यांचंही सूचन करते. लोकप्रिय वळणानं वाहणाऱ्या स्त्री स्वातंत्र्याच्या ढोबळ चित्रणाच्या मोहापेक्षा अधिक समंजसपणे या मूल्याची चिकित्सा करण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न अभिनव वाटतो.

या लघुपटाचं मोठं बलस्थान म्हणजे त्याची पटकथा आणि संवाद. वरवर मनोहर भासणारं नटवं वास्तव आणि त्याला जणू शह देऊ पाहणारं, मुक्ततेची आस धरणारं स्वप्नवास्तव यांची सरमिसळ, हे दुहेरी आव्हान पटकथेनं समर्थपणे पेललं आहे. अतिशय गुंतागुंतीनं भरलेला मनोव्यापार, त्यातून उमलू पाहणाऱ्या स्वप्नाळू विश्वावर निरंकुश सत्ता गाजवणाऱ्या मूल्यपरंपरांच्या भोंगळपणावर सिनिकल भाष्य करणारे संवाद या झटापटीला अधिक भेदक बनवतात.

मराठीत तिरकसपणा म्हटलं की, सहजपणे श्याम मनोहरांची आठवण काढली जाते. अशी सोपी समीकरणं डोक्यात ठेवून पाहिल्यास या लघुपटावर श्याम मनोहरांचा प्रभाव आहे, असं वाटणं सहज शक्य आहे. पण ‘छमछम आणि शुभम’मधील तिरकसपणा व्यक्तीच्या आतल्या दुखावलेपणातून येणाऱ्या सिनिकल हुरहुरीसारखा आहे. मनोहरांसारखा मुरलेला नाहीये. तो ताजा आहे आणि प्रसंगी बोचरासुद्धा. हा सूक्ष्म पण महत्त्वाचा फरक लक्षात घेतल्यास या लघुपटाकडे अधिक मोकळेपणानं पाहता येईल.

‘छमछम आणि शुभम’ एकाच वेळी लैंगिक जाणिवांमधून उफाळत राहणाऱ्या सहजप्रेरणा आणि आदिम ऊर्मी, त्यातून निर्माण केलेले व्यक्तीच्या भावविश्वातील अस्वस्थ कल्लोळ उभे करतो. सत्ता, संपत्ती, मालकीहक्क आणि विवाहसंस्था यांनी निर्बंधित केलेल्या भावविश्वावर अत्यंत सूचकपणे बोट ठेवतो.

.............................................................................................................................................

हा लघुपट पाहण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखक श्रीराम मोहिते साहित्य आणि चित्रपट अभ्यासक आहेत.

shrirammohite@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......