अजूनकाही
२००८ मधील ‘बाटला हाऊस’ एन्काउंटर प्रकरणावर सदर चित्रपट आधारलेला आहे. मात्र, तो प्रत्यक्ष एन्काउंटरच्या घटनेपेक्षा तिच्या पश्चात घडणाऱ्या घटनांवर अधिक लक्ष केंद्रित करणारा आहे. त्यामुळे तो ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ (२००७) किंवा ‘शूटआउट अॅट वडाला’सारख्या (२०१३) चित्रपटांहून ठळकपणे वेगळा ठरतो.
चित्रपट सुरू होतो तोच मुळी प्रत्यक्ष एन्काउंटरची घटना घडण्याच्या काही मिनिटं आधी. त्यामुळे त्याची पूर्वतयारी वगैरे बाबींकडे न जाता आपल्याला प्रत्यक्ष घटनास्थळी नेलं जातं. एन्काउंटर खरोखर घडत आहे की बनावट आहे, हे संदिग्ध राहील अशा तऱ्हेनं या सुरुवातीच्या दृश्यांची रचना केली जाते. सुरुवातीचं अतिशय कौशल्यपूर्णरीत्या रचलेलं आणि दिग्दर्शित केलेलं चकमकीचं दृश्य संपतं, तेव्हा दोन दहशतवादी मारले गेलेले असतात. तर, एसीपी संजय कुमारच्या (जॉन अब्राहम) टीममधील दोन अधिकारी घायाळ झालेले असतात. लवकरच त्यातील एकाचा, किशन कुमार वर्मा (रवी किशन) मृत्यूही होतो. याखेरीज एक दहशतवादी जिवंत पकडला गेलेला असतो. मात्र, लागलीच दिल्ली पोलिसांवर बनावट चकमकीचे आरोप व्हायला सुरुवात होते. त्यानंतर एकीकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीचं प्रकरण, तर दुसरीकडे त्यांची फरार आरोपींना पकडण्याचे प्रयत्न, या दोन्ही गोष्टी समांतरपणे सुरू होतात.
या सगळ्या प्रकरणामध्ये सदर चकमक बनावट आहे की नाही, या इतकंच महत्त्व त्यातील धार्मिक-सामाजिक दृष्टिकोनाला आणि अशा संवेदनशील मुद्द्यांकडे पाहण्याच्या माध्यमांच्या दृष्टिकोनालाही आहे. ‘पिंक’ (२०१६), ‘रेड’ (२०१८) यांसारखे चित्रपट लिहिणारा रितेश शाह अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये घडू शकतं, त्याप्रमाणे मुस्लीमविरोधी सूर लागू न देता दिलेल्या कथानकाला पुरेपूर गांभीर्य आणि संवेदनशीलतेनं हाताळतो. मुख्य म्हणजे शेवटचा न्यायालयीन चौकशीदरम्यानचा भाग सोडल्यास ‘बाटला हाऊस’ला ‘फिल्मी’ बाज येत नाही.
संजय आणि त्याची पत्नी, नंदिता (मृणाल ठाकूर) यांच्यातील नातं तितक्याशा परिणामकारकतेनं पडद्यावर उतरत नाही. तिच्या पत्रकार असण्यालादेखील कथानकाच्या स्तरावर पोलिसांच्या बाजूचं तोकडं समर्थन करण्यापलीकडे फारसं महत्त्व नाही. संजयची अस्वस्थता, झक्या प्रकरणाबाबत त्याचं स्वतःला दोषी मानून चालणं, या गोष्टी पडद्यावर दिसत असल्या तरी नंदिताचं पात्र त्याचा अपेक्षित तो भावनिक-मानसिक परिणाम पाडण्यात अयशस्वी ठरतं. परिणामी इतर ठिकाणी प्रभावी असणारा ‘बाटला हाऊस’ नंदिता-संजयच्या प्रसंगांमध्ये रेंगाळू लागतो.
असं असलं तरी एकूणच कथानकाचा विचार करायची वेळ येते, तेव्हा चित्रपट काही महत्त्वाच्या संकल्पना प्रभावीपणे हाताळताना दिसतो. पहिलं म्हणजे, दहशतवाद्यांचं मुस्लीम असणं-नसणं किंवा मुळातच त्यांचा धर्म कुठला, हा मुद्दा इथं गौण असल्याचं ठळकपणे स्पष्ट केलं जातं. आणि दुसरं म्हणजे, चित्रपटकर्ते काही प्रमाणात पोलिसांच्या नि त्यांच्या नायकाच्या (संभाव्य) सत्याच्या बाजूकडे झुकलेले असले तरी ते (म्हणजे चकमक बनावट असल्याचे) प्रतिवादही तितक्याच गांभीर्यानं मांडतात. काहीशी ‘राशोमॉन’-वजा (१९५०) मांडणी करत सत्याची निरनिराळी रूपं समोर मांडली जातात. अर्थात इथं निष्कर्ष काढला जातो हा भाग वेगळा. पण किमान समोरची गंभीर बाबही तितक्याच गांभीर्यानं मंडळी जाते, हेही नसे थोडके!
जॉन अब्राहम इथं एरवीपेक्षा अधिक प्रभावी भासतो. तो या पात्राला आणि चित्रपटाला आवश्यक असलेला एक संयत सूर प्राप्त करून देतो. मनीष चौधरी, रवी किशन, राजेश शर्मा, उत्कर्ष राय हे सहाय्यक भूमिकांमधील कलाकारही तितकीच परिणामकारक कामगिरी करतात. मृणाल ठाकूरला लिखाणाच्या स्तरावर फारसा वाव नसला तरी तीही चांगली कामगिरी करते.
छायाचित्रकार सौमिक मुखर्जी आणि दिग्दर्शक निखिल अडवाणी सदर चित्रपटाला दृश्यपातळीवर रंजक बनवतात. ज्यात अपवाद वगळता दृश्य आणि लिखाणाच्या पातळीवर पूर्ण चित्रपटभर कायम ठेवलेला एक गंभीर बाज; अगदी वेगवान घडामोडी घडणारी अॅक्शन दृश्यं ते संवादांवर भर असलेली न्यायालयातील दृश्यं, यामध्ये त्या त्या प्रसंगांना साजेशा कॅमेऱ्याच्या हालचाली आणि या सर्व बाबींना पूरक ठरणारं पार्श्वसंगीत ही ‘बाटला हाऊस’ची वैशिष्ट्यं आहेत. (दृश्यपातळीवर तो ‘दिल्ली क्राइम’ या नेटफ्लिक्स मालिकेची आठवण करून देतो.) ज्यामुळे ‘बाटला हाऊस’ मांडणीच्या पातळीवर खिळवून ठेवणारा आणि प्रभावी ठरतो.
लिखाणाच्या पातळीवर ‘बाटला हाऊस’ अधिक चांगला होऊ शकला असता का, तर हो. पण, म्हणून काही तो आता सर्वस्वी वाईट ठरतो अशातला भाग नाही. तो उत्तमरीत्या चित्रित आणि दिग्दर्शित केलेला एक परिणामकारक चित्रपट आहे. खासकरून ‘मिशन मंगल’सारखं सुमार यान अवकाशात झेपावलेलं असताना समकालीन चित्रपटांचा विचार करता तो नक्कीच उत्तम आहे.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment