‘मिशन मंगल’ला इतर असंबद्ध आणि निरर्थक बाबी दाखवण्यातच अधिक रस आहे!
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
अक्षय शेलार
  • ‘मिशन मंगल’चं पोस्टर
  • Mon , 19 August 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti हिंदी सिनेमा Hindi Movie मिशन मंगल Mission Mangal विद्या बालन Vidya Balan अक्षय कुमार Akshay Kumar

अंतराळ विज्ञान किंवा एकुणातच विज्ञान, वैज्ञानिक संशोधन इत्यादींवर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये त्यातील क्लिष्ट वैज्ञानिक अंगाचं काही प्रमाणात सुलभीकरण करणं साहजिक असतं. खासकरून जेव्हा तो चित्रपट एका मोठ्या प्रेक्षकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून, व्यावसायिक दृष्टिकोनातून बनवलेला असतो, तेव्हा हे अपेक्षितही असतं. मात्र ‘मिशन मंगल’ केवळ वैज्ञानिक संज्ञा वगैरेच नव्हे, तर एकुणात सर्वच गोष्टींचं अतिसुलभीकरण करतो. ज्यात तो समोर उभी केलेली पात्रं, त्यांची उपकथानकं, त्यांच्या समस्या या सर्वच गोष्टी उथळपणे समोर आणतो. आणि केवळ काही फुटकळ विनोद आणि सर्वसमावेशक, स्त्रीवादी असण्याचा उसना आव, यावर तो अधिक भर देतो. 

‘मिशन मंगल’ सुरू होतो तो राकेश धवनच्या (अक्षय कुमार) देखरेखीखाली पार पडणाऱ्या एका मोहिमेच्या अपयशी ठरण्याच्या घटनेनं. ज्याच्या अपयशी ठरण्याचं कारण असते तारा शिंदेची (विद्या बालन) एक लहानशी चूक. साहजिकच धवनच्या भूमिकेतील अक्षय कुमार या अपयशाची जबाबदारी स्वतःवर घेतो नि त्याला मंगळ मोहिमेची तयारी करण्याचा अशक्यप्राय प्रकल्पावर काम करण्यास सांगितलं जातं. 

दरम्यान रुपर्ट देसाई (दलिप ताहिल) हा अमेरिकेच्या ‘नासा’मध्ये काम केलेला शास्त्रज्ञ ‘इस्त्रो’मध्ये दाखल होतो. तो भारताची हेटाळणी करण्याची आणि चित्रपटातील मध्यवर्ती पात्रांना विरोध करण्याची कामगिरी पार पाडतो. त्याच्या रूपात चित्रपटाला एक अगदीच उथळ, ठोकळेबाज तऱ्हेचं खलपात्र लाभतं. उदाहरणार्थ, खुद्द ‘इस्त्रो’च्या संचालकांनी (विक्रम गोखले) सांगूनही रुपर्ट धवनला सहकार्य करत नाही. तो अपेक्षित असलेली कामगिरी करतील अशा माणसांना धवनच्या प्रकल्पावर काम करण्यास संमती देत नाही. थोडक्यात, ‘नासा’, ‘इस्त्रो’मध्ये काम करणारी ही व्यक्ती एखाद्या शेंबड्या पोराप्रमाणे वागत राहते. 

रुपर्ट धवनला अकार्यक्षम अशा लोकांचा समूह देऊ करतो. ज्यात मानवी भावभावना असलेली पात्रं कमी नि चित्रपटकर्त्यांचा उदारमतवादी दृष्टिकोन दाखवणारे पोकळ साचे अधिक आहेत. परिणामी एक घटस्फोटित मुस्लीम स्त्री - नेहा सिद्दीकी (कीर्ती कुल्हारी), एका जवानाची पत्नी - कृतिका अगरवाल (तापसी पन्नू), सिगारेट ओढणारी एक सर्वस्वी स्वतंत्र (नि महत्त्वाकांक्षी?) तरुणी - एका गांधी (सोनाक्षी सिन्हा), एक अंधश्रद्धाळू अविवाहित तरुण - परमेश्वर (शर्मन जोशी) आणि एक वृद्ध व्यक्ती (एच. जी. दत्तात्रय) अशी अगदी मोजूनमापून भारतातील विविधतेचं प्रतिनिधित्व करणारी पात्रं आपल्यासमोर येतात. त्यांची उपकथानकं आणि वैयक्तिक आयुष्याचा समावेश चित्रपटकर्त्यांना कथेत करावासा वाटतो. मात्र, हे संदर्भ इतके संक्षिप्त आणि विक्षिप्त (शिवाय ठोकळेबाज) आहेत, की खुद्द चित्रपटकर्त्यांनाही एखाददुसऱ्या पात्राचा विसर पडतो. नि मग, एखाद्या पात्राने, “अरे, कृतिका किधर हैं, दिखाई नहीं दी!” म्हणेपर्यंत ते पात्र कथानकातून गायब होतं. 

त्यातल्या त्यात विद्या बालनचं तारा हे गृहिणीचं पात्र अधिक सविस्तर आणि रंजक आहे. पण, तिथंही तिच्या काम करण्यावर नाखूष असणारा नवरा - सुनिल (संजय कपूर), बापाचं न ऐकणारी मुलं नि सुनेची बाजू घेणारा सासरा अशी पात्रं येतातच. कारण, ‘मिशन मंगल’ला मुळातच प्रत्यक्ष प्रकल्पाची कामगिरी सोडून इतर असंबद्ध आणि निरर्थक बाबी दाखवण्यात अधिक रस आहे. इथं खरीखुरी भासणारी पात्रं कमी आणि एखाद्या प्रदर्शनात मांडल्याच्या थाटात समोर आणलेले व्यक्तिमत्त्वांचे नमुनेच अधिक आहेत. इथं शास्त्रज्ञ गाणी गाताना, कुठल्याही बैठकीत मध्येच घुसत भलत्या ठिकाणी भलत्याच प्रकल्पाची माहिती थेट ‘इस्त्रो’च्या संचालकांना देताना दिसतात. अक्षय कुमार ‘अक्षय कुमार’च्या थाटात वावरतो. फुटकळ विनोद करत भटकत, मध्यवर्ती पात्रांना आणि स्त्रियांना ‘प्रेरित’ करत राहतो. याखेरीज इथली पात्रं विज्ञानापेक्षा चमत्कारावर अधिक अवलंबून राहतात. 

‘मिशन मंगल’चा लेखक-निर्माता आर. बाल्की मूळ घटना आणि कथेला नको तितकं काल्पनिक आणि अपरिणामकारक बनवण्यात यशस्वी ठरतो, तर दिग्दर्शक जगन शर्मा चित्रपटाच्या ‘ब्रँड पार्टनर्स’ असलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांचा समावेश चित्रपटात करण्यात धन्यता मानतो. तरीही विद्या बालन-अक्षय कुमार ही जोडगोळी चित्रपटातील रटाळ कथेला सावरण्याचा प्रयत्न करते. पण, मुळातच अपरिपक्व असलेल्या या कथानकाला ते किंवा इतर कुणीही एका विशिष्ट मर्यादेपलीकडे रंजक बनवू शकलं नसतं. ‘मिशन मंगल’मधील व्हिज्युअल इफेक्ट्स वाईट ते स्वीकारार्ह या दोन टोकांदरम्यान वावरतात. शेवटाकडे जाताना ते किती वाईट बनतात, याची तर विचारणाच नको! 

असं असलं तरी, छायाचित्रकार रवी वर्मन मात्र चित्रपटातील एकूण एक दृश्यचौकटीला नितांतसुंदर बनवतो. केवळ त्याची कामगिरी आणि काही प्रमाणात बालन-कुमार जोडीमुळे बऱ्यापैकी लांबलेला हा चित्रपट सहनीय ठरतो. नसता ‘मिशन मंगल’ हा कमालीचा विस्मरणीय आणि अपरिणामकारक चित्रपट आहे. इतका की, तो अगदी अमित त्रिवेदी या उत्तम संगीतकाराकडूनही विस्मरणीय कामगिरी करवून घेण्यात यशस्वी ठरतो! 

खरं सांगायचं झाल्यास ‘मिशन मंगल’ला खऱ्या शास्त्रज्ञांची कथा सांगण्यापेक्षा अंतराळात फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहावरील राष्ट्रध्वज दाखवणं किंवा चित्रपटाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण दाखवण्यात अधिक रस आहे. तसाही एका रटाळ कथेचा, याहून अधिक रटाळ शेवट होऊच शकत नाही. 

.............................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार  चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......