अजूनकाही
क्वेंटिन टॅरेंटिनो या लेखक-दिग्दर्शकाने वेळोवेळी एकाहून एक सरस अशा चित्रपटांची निर्मिती करत मला आणि माझ्यासारख्या इतर अनेक चित्रपटप्रेमींना, अभ्यासकांना ‘सिनेमा’ या माध्यमाच्या प्रेमात पाडण्याचं काम केलेलं आहे. सदर चित्रपटाच्या निमित्ताने अनेकांना पुनःपुन्हा ‘सिनेमा’च्या प्रेमात पाडणाऱ्या टॅरेंटिनोने ‘सिनेमा’ या माध्यमाला एकप्रकारचं प्रेमपत्र लिहिलं, आणि मोठ्या पडद्यावर आणलं आहे. त्याची विशिष्ट अशी दिग्दर्शकीय शैली, चित्रपटात येणारे इतर अनेकविध चित्रपटांचे नि चित्रपटकर्त्यांचे, साहित्याचे संदर्भ, नितांतसुंदर दृश्यचौकटी, अप्रतिम असा साऊंड ट्रॅक, मुबलक हिंसा अशा एक अन् अनेक गोष्टींनी नटलेला ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ सर्वार्थाने एक ‘टॅरेंटिनो फिल्म’ आहे.
‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’ला सुरुवात होते, ती आपली दोन प्रमुख पात्रं, म्हणजे प्रख्यात चित्रपट अभिनेता रिक डाल्टन (लिओनार्डो डिकॅप्रिओ) आणि त्याचा स्टंट डबल, क्लिफ बूथ (ब्रॅड पिट) हे दोघेही आपल्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना. दशक आहे पन्नासचं. एका संक्षिप्त दृश्यात टॅरेंटिनो आपल्याला या रुपेरी भूतकाळाची, हेव्यादाव्यांची गडद सावली नसलेल्या त्यांच्यातील घट्ट मैत्रीची झलक दाखवतो. पण, हा त्यांचा भूतकाळ असतो. आता वर्तमानात परिस्थिती पूर्वीसारखी नसते.
आता वर्ष आहे १९६९. अभिनेता नि त्याच्या स्टंट डबलच्या या एकेकाळच्या प्रसिद्ध असलेल्या जोडीने आता काळाच्या ओघात पूर्वीइतकी प्रसिद्ध राहिलेली नाही. वेस्टर्न मालिकांच्या पुढे जात ‘हॉलिवुड’ चित्रपट करावेत या आकर्षणापोटी रिकने कधीकाळी त्याची प्रसिद्ध टीव्ही मालिका यशाचे नवनवीन विक्रम गाठत असताना सोडून दिली होती. त्यानंतर त्याला अपवाद वगळता चित्रपटही मिळाले नाहीत, नि मालिकाही. त्यामुळे ‘तेलही गेलं, तूपही गेलं…’ अशी त्याची अवस्था झाली आहे. आता त्याची नि परिणामी त्याच्याशी एकनिष्ठ असलेल्या क्लिफचीही आर्थिक, सामाजिक परिस्थिती बिकट आहे.
टॅरेंटिनोला या मूलभूत समस्यांच्या पलीकडे जाऊन जगात, चित्रपटसृष्टीत घडणारे बदल, आणि ते बदल रिक-क्लिफसारख्या लोकांवर कसे परिणाम करतात, याचा आढावा घेण्यात अधिक रस असावा. त्याने ‘डेथ प्रूफ’मध्ये (२००७) काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे काहीशा लुप्त होत असलेल्या स्टंटमॅन या जमातीकडे काहीशा गडद, हिंसक चष्म्यातून पाहिलं होतं. तर इथेही तो केवळ दोन कलाकारांना काम न मिळणं, या मूलभूत समस्येच्या पलीकडे जातो. तो त्याहून अधिक क्लेशकारक आणि दुःखदायक मानाव्याशा पद्धतीने त्यांची होणारी मानसिक, शारीरिक हानी चितारतो. अगदी सुरुवातीच्याच दृश्यांमध्ये रिक क्लिफच्या अंगावर डोकं ठेवून त्याची आंतरिक घुसमट बाहेर काढत रडताना दिसतो. त्यावेळी त्यात केवळ ‘एक धडधाकट पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या खांद्यावर डोकं ठेवत रडतो आहे’ इतक्या ढोबळ विनोदनिर्मितीचा उद्देश नसतो. त्यात एक विलक्षण प्रकारचं कारुण्य असतं. एकेकाळी पडद्यावर जेत्याची, नायकाची भूमिका साकारणारी व्यक्ती आता पंचविशी-तिशीतील तरुणांसमोर त्याच पडद्यावर हारते, या भावनेतून निर्माण होणारं कारुण्य त्यात असतं.
शिवाय, या कारुण्यालाही खास टॅरेंटिनो शैलीच्या गडद छटा असलेल्या विनोदाची जोड आहेच. हा विनोदही निरनिराळ्या तऱ्हेचा आहे. कधी तो कारुण्यपूर्ण दृश्यांमधील टॅरेंटिनोच्या वैशिष्ट्यपूर्ण संवादांमधून उद्भवणारा आहे, तर कधी हिंसेतून उद्भवणारा आहे. ब्रॅड पिट आणि मार्गारेट क्वॅली यांचं एक दृश्य तर नको तितकं उपहासात्मक आणि कमालीचं विनोदी आहे. काहीही असो, हा विनोद कमालीचा परिणामकारक आहे. अलीकडील काळामध्ये कुठलाही चित्रपट पाहताना मी इतकं हसल्याचं आठवत नाही.
अर्थात हे झालं कथानकातील एक मुख्य उपकथानक. ज्यात कधी रिक आणि क्लिफचं कथानक एकत्र पुढे सरकतं, तर कधी दोघांची उपकथानकं समांतरपणे पुढे सरकतात. याखेरीज, या कथेतील तिसरं अंग म्हणजे हॉलिवुडमधील त्याकाळातील प्रसिद्ध जोडपं असलेल्या शॅरन टेट (मार्गोट रॉबी) आणि रोमन पोलन्स्की या दोघांचं. ऑगस्ट १९६९ मध्ये लॉस अँजेलिस या स्वप्नवत जगामध्ये एक दुर्घटना घडली होती. ज्यात चार्ल्स मॅन्सन (डेमन हेरिमन) या कुख्यात गुन्हेगाराच्या अनुयायांनी अगदी विकृतपणे (आठेक महिन्यांची गरोदर असलेल्या) शॅरनचा खून केला होता.
टॅरेंटिनोला सिनेमाच्या इतर अंगांसोबत हिंसा आणि इतिहास या दोन घटकांशी खेळण्याची सवय आहे. त्यामुळे त्याने (करियरच्या सर्वोच्च शिखरावर असताना) आपल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटामधील एक उपकथानक म्हणून हॉलिवुडच्या इतिहासामधील एक रक्ताळलेलं पान का निवडलं, यामागील कारण साहजिक आहे. टॅरेंटिनोला ‘अल्टरनेट हिस्टरी’ निर्माण करत इतिहास, काळ यांच्याशी मजा करणं आवडतं. तो इथंही हेच करतो. आणि मग शेवटी आपल्या त्याच्याकडून आणि या चित्रपटाकडून असलेल्या अपेक्षा सकारात्मक पद्धतीने उलटवून टाकतो. जे त्याने ‘इनग्लोरियस बास्टर्ड्स’मध्येही (२००९) केलं होतं. ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवुड’चा उत्तरार्धही असाच परिणामकारक असा आहे. तो टॅरेंटिनोच्या ख्यातीप्रमाणे हिंसेने ओतप्रोत भरलेला आहे. सोबतच तो त्याच्या शैलीला जागत उपरोधिक, विनोदीही आहे. टॅरेंटिनो आधी कधीतरी नकळत पेरलेली उत्प्रेरकं इथं नको तितक्या परिणामकारकपणे वापरत एका जबरदस्त सिनेमॅटिक दृश्याची निर्मिती करतो.
टॅरेंटिनो त्याच्या चित्रपटांमध्ये अभिनेत्यांकडून ज्या पद्धतीने (आणि पद्धतीचं) काम करवून घेतो ते पाहण्यालायक असतं. इथे डिकॅप्रिओ आणि पिट ही जोडी कमाल करते. दिलेल्या पात्रांच्या आयुष्यामधील कारुण्य, परस्परसंबंध ते कशा प्रकारे पडद्यावर आणतात हे उल्लेखनीय आहे. हेच रॉबीबाबत. त्यामानाने काहीशा कमी लांबीच्या शॅरनची भूमिकाही ती प्रभावीपणे साकारते. तिचं निखालस सौंदर्य टॅरेंटिनोच्या नजरेतून काही औरच खास दिसतं. याखेरीज, कॅमिओमध्ये अल पचिनो, डकोटा फॅनिंगपासून ते टॅरेंटिनोच्या इतर फ्रिक्वेंट कोलॅबरेटर्सपैकी अनेक जण इथं येतात. (ज्यांची नावं घेऊन मी कुणाचा रसभंग करू इच्छित नाही. शेवटी कॅमिओची मजा ती सुखद धक्क्यामध्येच असते.)
सदर चित्रपट म्हणजे टॅरेंटिनोच्या सिनेमा या माध्यमावरील प्रेमाचा, त्याच्या कौशल्याचा जिवंत नमुना आहे. तो आणि छायाचित्रकार रॉबर्ट रिचर्डसन मिळून नितांतसुंदर अशा दृश्यचौकटी आपल्यापुढे मांडत जातात. व्हीएफएक्सपेक्षा प्रत्यक्ष उभारलेल्या तपशीलवार सेट्सच्या, कला दिग्दर्शनाच्या माध्यमातून साठच्या दशकातील लॉस अँजेलिसचं एक देखणं रूप आपल्यासमोर उभं करतो. ज्यात चित्रपटगृहं, नाइट क्लब्स, चित्रपटामध्ये घडणारे चित्रपट नि मालिका, त्या चित्रपट-मालिकांचे सेट्स अशा कित्येक गोष्टी चित्रपटात येतात. चित्रपटातील पात्रं घरी, थिएटरमध्ये निरनिराळ्या तऱ्हेचे चित्रपट पाहताना दिसतात. ज्याच्या निमित्ताने टॅरेंटिनो एक प्रकारे चित्रपट या माध्यमाच्या, त्यातील तंत्रज्ञांच्या कामगिरीचा उत्सव साजरा करतो. ब्रॅड पिटचं पात्र व्हिंटेज गाडीतून शहरात फिरत असताना रिचर्डसनचा कॅमेरा, टॅरेंटिनोची दृष्टी आणि त्याने निवडलेली गाणी यांचा एकत्रित परिणाम तर निव्वळ अनुभवावा असा आहे.
टॅरेंटिनोच्या कामाशी ओळख असलेल्या लोकांना तो का पाहावा, हे सांगण्याची गरज पडेल असं वाटत नाही. मात्र, त्याच्या कामाशी परिचय नसणाऱ्या लोकांनी समकालीन जागतिक चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण चित्रकर्त्याचं हे (किंबहुना इतरही) काम आवर्जून पहावं, इतकं मी आवर्जून सांगेन.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार हिंदी चित्रपटांचे अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment