‘चेर्नोबिल’ : सिमेंटची थडगी हजारो वर्षे पुरावा म्हणून काम करणार, अणू नको तिथं फोडण्याची किंमत म्हणून!
कला-संस्कृती - टीव्ही मालिका
समीर शिपूरकर
  • ‘चेर्नोबिल’ मालिकेचे पोस्टर
  • Sat , 10 August 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti टीव्ही मालिका चेर्नोबिल Chernobyl अणुशक्ती Nuclear Power

‘हॉट स्टार’ नावाच्या वेबठिकाणी ‘चेर्नोबिल’ नावाची पाच भागांची मालिका दिसते आहे. ती महत्त्वाचा विषय मांडते आहे. त्यासंदर्भात, त्यानिमित्ताने थोडेसे...

सोव्हिएत रशिया नावाचा देश अस्तित्वात असताना युक्रेन प्रांतातल्या चेर्नोबिल या ठिकाणी (प्रिप्यात शहराजवळ) असलेल्या अणुभट्टीचा स्फोट झाला आणि त्याचे पडसाद जगभर उमटले. आज सोव्हिएत रशिया अस्तित्वात नाही. युक्रेन हा आता एक स्वतंत्र देश आहे. चेर्नोबिल हे ठिकाणसुद्धा अस्तित्वात आहे, पण जवळजवळ निर्मनुष्य. किमान २० हजार वर्षं तिथं मनुष्यवस्ती होऊ शकत नाही. (काही कागदपत्रांमध्ये २० हजारऐवजी ५० हजार वर्षं असं नोंदवलं आहे).

मानवी इतिहासात अशी घटना पहिलंदाच घडली. किरणोत्सर्ग, युरेनियम, त्याचं हाफलाईफ वगैरे गोष्टी डोळ्यांना दिसत नाहीत, लवकर समजत नाहीत; म्हणूनच सामान्य लोकांना यातलं गांभीर्य लवकर कळत नाही. २० हजार ते ५० हजार वर्षांच्या हिशेबात एखादी गोष्ट आपण बोलू शकतो, हेसुद्धा मनाला सहजासहजी कळत नाही. आणि तसं पाहता चेर्नोबिलला आजसुद्धा तशीच स्वच्छ- सुंदर हवा दिसते. तसेच निळेशार ढग दिसतात. इमारती दिसतात, रस्ते दिसतात. पण सगळंच फसवं आहे, मायावी आहे.

२६ एप्रिल १९८६. चेर्नोबिलला चार रिअ‍ॅक्टर्स असलेली एक अणुभट्टी होती. तिथलेच काही तंत्रज्ञ एक चाचणी घेत होते. त्यात गफलत झाली आणि चारपैकी एका रिअ‍ॅक्टरचा स्फोट झाला. परिस्थिती हाताबाहेर जाते, हे कळूनही तंत्रज्ञांना काही करता आलं नाही. अणुभट्टीचं छप्पर कोसळलं. त्यातून बाहेर निघालेली आग, धूर, राख, अणुभट्टीच्या अवयवांचे तुकडे सगळीकडे पसरले. वाऱ्याबरोबर आकाशात पसरले. वाऱ्याला जाती-धर्माच्या, राष्ट्र-राज्याच्या, नैतिकतेच्या, सत्य-असत्याच्या मर्यादा नसतात. वारा पार स्वीडनपर्यंत पसरला. रशियन राज्यकर्ते जो किरणोत्सर्ग दाबू बघत होते, तो पार शत्रूंच्या राज्यापर्यंत जाऊन फितुरी करत वर्दी देता झाला. आता बातमी दडवून ठेवणं शक्य नव्हतं. पण तरीसुद्धा किती गोष्टी उघडपणे मान्य करायच्या आणि किती दुर्लक्षित ठेवायच्या, याचे आडाखे बांधणं चालूच होतं.

अशा परिस्थितीत वेगवेगळे लोक का करत होते?

अणुवैज्ञानिक-संशोधक-शास्त्रज्ञ मोठ्या पेचात होते. कारण खरं नुकसान, खरा धोका त्यांनाच माहिती होता. त्यांचा शब्दनशब्द आता महत्त्वाचा होता. त्यांच्या एका इशाऱ्यानं लाखो लोकांचे प्राण वाचणार किंवा जाणार होते. त्यांच्या मूक राहण्यानं काही राजकारण्यांची मोठी सोय होणार होती. त्यांच्या स्पष्ट बोलण्यानं काही लोक गजाआड जाणार होते. पण त्याचमुळे पुढच्या पिढ्या वाचणार होत. अशा अतिशय आव्हानात्मक प्रसंगात या वैज्ञानिकांनी कसा विचार केला असेल? त्यांची बांधिलकी त्यांनी कुणाशी राखली असेल? त्यांच्या त्या वेळच्या सहकाऱ्यांशी, की राजकारणातल्या बॉसशी? की वर्तमानकाळाशी, की भविष्यकाळाशी? चेर्नोबिल गावातल लोकांशी, की पूर्ण रशियातल्या लोकांशी? की संपूर्ण जगातल्या लोकांशी, मानवतेशी? सगळ्या लोकांचं हित कशात आहे, हे ठरवण्याची जबाबदारी एकाच माणसावर येते, तेव्हा तो ते ओझं कसं पेलत असेल? जो अणूच्या आरपार बघू शकतो, तो शास्त्रज्ञ काळाच्या आरपारसुद्धा बघू शकला पाहिजे; तरच तो स्थळ-काळाच्या भिंती ओलांडणारा खरा मानवी-शास्त्रज्ञ बनू शकेल. तर, चेर्नोबिलच्या प्रकरणात अशा जागल्या वैज्ञानिकांनी आपलं काम चोखपणे केलेलं आहे. त्या वेळी तिथल्या अनेक शास्त्रज्ञांना ‘देशद्रोही’ संबोधण्यात आलं. पण आपल्या प्राणाची किंमत देऊन आपलं मानवजातीसाठीचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं.

आता वेगळाच घटक. खाण कामगार. जमिनीवरच्या लोकांना सूर्य दिसावा म्हणून स्वत: अंधार पत्करून भुयार काढत, खोदत जमिनीखाली पसरत जाणारे कष्टकरी जीव. सोव्हिएत रशियाचा कोळसामंत्री स्वत: या कामगारांना भेटायला खाणीपाशी आला आहे- विनंतीयुक्त आदेश घेऊन. या कामगारांना तातडीनं चेर्नोबिलच्या अणुभट्टीच्या तळाशी घुसून मोठं भुयार करायचं आहे. त्यांनी हे काम नाकारलं तर किरणोत्सर्ग जमिनीत शिरून, संपूर्ण पाण्यात पसरून नदीत शिरेल आणि समुद्रापर्यंतची सगळी जमीन, पाणी विषारी होईल. अवधी फक्त काही दिवसांचा, काही तासांचा आहे. हे खाण कामगार हे आव्हान स्वीकारून भुयार खणाला लागतात. अणुभट्टीच्या उष्णतेमुळे भुयारातलं तापमान ५० अंश सेल्सिअसपर्यंत वाढतं. कामगारांचा नेता रागावून येतो आणि ‘मोठे पंखे हवेत’ अशी मागणी करतो. तिथला अधिकारी शांतपणे सांगतो की, ही धूळ एरवीच्या धुळीपेक्षा वेगळी आहे. भुयारात पंखे लावले तर सगळे कामगार काही तासांत मरून जातील. त्यामुळे काहीच करता येणार नाही. मग कामगार त्याच परिस्थितीत काम सुरू ठेवतात. पुढच्या शॉटमध्ये सगळे कामगार अंगावरचे पूर्ण कपडे काढून संपूर्ण नागड्या अवस्थेत काम करताना दिसतात. कामगार नेता म्हणतो, ‘आमचे बापजादे उष्णतेपासून वाचण्यासाठी याच पद्धतीनं काम करत आलेत. तेच आता आम्ही करतो.’ हे खाणकामगार आणि त्यानंतर मदतीला घेतलेले तब्बल सात लाख लोक यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता तिथलं मदतकार्य केलं आहे. आपल्या बलिदानामुळे काही लाख लोकांचे जीव वाचणार आहेत, हीच काय ती त्यांची प्रेरणा होती.

आणि इकडं सैनिक बंदुका घेऊन गावोगाव, खेड्यापाड्यांत हिंडतात. घरोघरी जातात. सगळी गावं निर्मनुष्य. बेजान. नाही म्हणायला फक्त गावातली कुत्री आणि मांजरं आहेत. या सैनिकांची चाहूल लागली की, माणूस भेटण्याच्या आनंदात, खायला मिळेल अशा आशेनं हे प्राणी त्यांच्याजवळ धावत येतात. या सैनिकांचं हे काम आहे की, या कुत्र्या-मांजरांना थेट गोळ घालून ठार मारणं. कारण हे प्राणी आता किरणोत्सर्गी झाले आहेत. हे नेहमीसारखे दिसत असले तरी आता हे नेहमीचे प्राणी राहिलेले नाहीत. त्यांना नुसतं ठार मारूनही भागत नाही. प्राणी मेले तरी त्यांच्यातून किरणोत्सर्ग पसरत राहतो. म्हणून जमिनीत खोल खड्डा काढून त्यात सगळे प्राणी ओतून त्यावर सिमेंट काँक्रिटचा जाड थर पसरण्यात येतो. किरणोत्सर्गापासून पुढच्या पिढ्या वाचाव्यात म्हणून हे करणं आवश्यक आहे.

हे काम करायला सैनिक कमी पडतात म्हणून विशीतल्या तरुणांना मदतीला घेतलं आहे. कधी बंदूक न चालवलेल्या मुलाच्या हातात आता बंदूक आली. आणि जो प्राणी प्रेमानं आपल्या जवळ येतो, त्याला गोळी घालून ठार मारण्याचं काम करताना हा मुलगा कासावीस होतो. मरणाऱ्या कुत्र्याच्या डोळ्यात बघण्याचा धीर त्याला होत नाही. एकदा तर त्याला कुत्र्याची पिल्लं आईचं दूध पिताना दिसतात. एक अनुभवी सैनिक म्हणतो, ‘पहिल्या दिवशी प्रत्येकाला हाच त्रास होतो.’

जे लोक अणुभट्टीजवळ जाऊन आग विझवण्याचं किंवा इतर मदतीचं काम करतात, त्यांच्या पेशीपेशीत आता किरण शिरले आहेत. आत शिरलेले किरण तातडीनं पेशी आतूनच नष्ट करण्याचं काम सुरू करतात. दोनेक आठवड्यांत पेशी फुटण्याचं काम वेग घेतं आणि माणूस संपूर्ण अंगभर रक्तानं माखून जातो. आतूनच सगळं फुटत- फुटत आल्यानं वेदना सहनशक्तीच्या बाहेर असतात. मॉर्मिनसारखी औषधं काहीच मदत करू शकत नाहीत. या माणसांचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांना कुणी हातसुद्धा लावू शकत नाही. त्यांची शवपेटी जमिनीखाली खोल खड्ड्यात सोडली जाते आणि त्यावर तोच पातळ काँक्रिटचा जाडसर थर पसरवला जातो. सिमेंटची ही थडगी आता हजारो वर्षे पुरावा म्हणून काम करणार असतात- अणू नको तिथं फोडण्याची किंमत म्हणून.

एका खेडेगावात सैनिक माणसांना गोळा करून ट्रकमध्ये घालतात, दूर घेऊन जाण्यासाठी. गावातली एक आडमुठी म्हातारी एका सैनिकाशी वाद घालतीय. ‘तातडीनं ट्रकमध्ये बैस’ म्हणून सैनिक आदेश देतो. आणि म्हातारी शांतपणे गाईची धार काढतीय. सैनिक संतापतो आणि दुधानं भरलेली बादली चिडून ओतून देतो. म्हातारी पुन्हा बादली घेते आणि शांतपणे धार काढायला लागते. सैनिक आता बंदूक रोखतो आणि खटका ओढतो. म्हातारी मेली की काय, असं म्हणता-म्हणता गाय मरून पडलेली दिसते. गाईचे डोळे हळूहळू मिटत जातात. जाताना ती बघत जाते- म्हातारीकडं की सैनिकाकडं? आणि तिचा पान्हा अजून ओथंबून वाहतो. चारी आचळांमधून दूध टपटप करतंय. म्हातारी सुन्न होऊन बघते. तिला माहिती नाही, पण आपल्याला माहिती आहे की, हे दूध विनाशकारी, किरणोत्सर्गी आहे. अमृत आणि विष यांच्यातली सीमारेषा इतकी पुसट क्वचितच झाली असेल.

तर असा हा अवेळी फुटलेला, नको त्या पद्धतीनं सुटलेला, रागावलेला अणू किती उत्पात घडवून आणतो, हे माणसाला स्वत:लाच अजून माहीत नव्हतं.

छोट्या अणूनं नुसतं उग्र रूपच धारण केलं नाही, तर माणसानं स्वत:च्या आत जे जे अमंगल-अपवित्र दडवून ठेवलं होतं, ते सगळं बाहेर उघड्यावर आणून फेकलं. माणूस किती निर्बुद्ध, किती स्वार्थी, किती खोटारडा, किती राजकारणी वागू शकतो, हे माणसालाच दाखवून दिलं.

चेर्नोबिलच्या परिसरातला ३० किमी त्रिज्येचा परिसर १९८६ पासून मनुष्यवस्तीसाठी अयोग्य म्हणून जाहीर झाला आहे. पुढच्या २० हजार ते ५० हजार वर्षांसाठी. त्या मोडक्या, गळक्या इमारतीतून किरणोत्सर्ग कमीत कमी व्हावा यासाठी तिथं सतत नवनवीन उपाय योजून प्रचंड खर्च करण्यात येत आहे. पुढची शेकडो-हजारो वर्षं हे काम सतत चालू ठेवावं लागणार आहे. चेर्नोबिलच्या स्फोटाची तीव्रता हिरोशिमापेक्षा ४०० पटीनं जास्त किरणोत्सर्गी होती. आज जगभरात सुमारे ४५० अणुभट्ट्या आहेत. त्यातल्या भारतात सुमारे २२ आहेत. या अणुभट्ट्या विजेची निर्मिती करतात आणि मानवजातीच्या वाढत्या गरजा भागवतात. या व्यतिरिक्त अणुशक्तीचा उपयोग करून बनवलेली संहारक अस्त्रं अनेक देशांकडं आहेत. हिरोशिमा आणि नागासाकीमध्ये अणुबॉम्बची विध्वंसक ताकद आपल्याला दिसली. चेर्नोबिलनं त्याची भीषणता आणखी तीव्रपणे दाखवली. जपानच्या फुकुयामा अणुभट्टीत २०११मध्ये अपघात झाला (त्सुनामीमुळे). त्याही वेळी अणुऊर्जेचं प्रलयकारी रूप आपल्याला दिसलं आहे.

‘अणुऊर्जा आवश्यक आहे, तिला पर्यायच नाही. लोकांची ऊर्जेची गरज भागवायची तर अणुशक्तीला पर्यायच नाही,’ असं अनेकांचं म्हणणं आहे. मानवजातीची ऊर्जेची भूक वाढत जातीय, हे स्पष्टच आहे.

विकासासाठी वीज किती लागते, ती कुठून येते, त्याची खरी किंमत काय? या प्रश्‍नांशी सर्वसामान्य जनतेला काही देणं-घेणं नसतं. म्हणजे तसा विचारच त्यांच्या मनात येत नाही. ही जाणीव निर्माण होणं आवश्यक आहे, असं चेर्नोबिल मालिका सांगते. ही ऊर्जा मिळवण्याची धडपड किती जीवघेणी आहे, याचं भान असायला पाहिजे, असा आग्रह धरते.

संपूर्ण पृथ्वीवर असे हजारो बॉम्ब टिकटिकत आहेत. आपण किती मोठ्या बॉम्बवर बसलो आहोत, याची थरारक जाणीव सतत होत राहिली पाहिजे, असं चेर्नोबिल मालिकेचे निर्माते आपल्याला त्यांच्या संपूर्ण शक्तिनिशी सांगत आहेत.

अणुशक्ती हा एका अर्थानं तंत्रज्ञानाचा विषय नसून राजकारणाचा विषय आहे. कारण राजसत्ता ठरवते की अणू कोणत्या कारणासाठी कधी, कुठं फोडायचा. या फोडाफोडीभोवती नेहमीच स्वार्थ, संकुचित हेतू, असत्याचा आधार घेणं, जनतेची दिशाभूल करणं, अर्धवट माहिती देणं या गोष्टी घडत असतात. अशा वेळी जे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ या कामाच्या केंद्रस्थानी असतात, त्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्या वेळी ते ‘देशद्रोही’ ठरतात, कारण त्यांनी त्या वेळी खोटारड्या राजसत्तेला विरोध केलेला असतो. सत्य लोकांसमोर मांडलेलं असतं. असे लोक नंतरच्या काळात मानवजातीला आधार देणारे लोक ठरतात, कारण त्यांच्याच त्यागामुळे नंतरच्या अणुभट्ट्या जास्त सुरक्षित व पारदर्शक बनलेल्या असतात. आणि अणुऊर्जा वापरण्याचा फेरविचार अनेक देश आता करू लागलेले असतात.

(‘साधना’ साप्ताहिकाच्या १० ऑगस्ट २०१९च्या अंकातून साभार)

.............................................................................................................................................

लेखक समीर शिपूरकर डॉक्युमेंटरी फिल्ममेकर असून अवकाश निर्मिती या संस्थेतर्फे डॉक्युमेंटरी बनवणे, प्रसार करणे हे काम करतात.

sameership007@gmail.com                  

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......