‘ये रे ये रे पैसा-२’ : तडजोडीचा जुळून न आलेला अपरिणामकारक प्रयोग
कला-संस्कृती - मराठी सिनेमा
धनंजय श्रीराम सानप
  • ‘ये रे ये रे पैसा-२’चं पोस्टर
  • Sat , 10 August 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti मराठी सिनेमा Marathi Movie ये रे ये रे पैसा-२ Ye Re Ye Re Paisa 2

मराठी सिनेमा आपल्या पठडीबद्ध चौकटीतून कधी मुक्त होणार? तेच तेच विषय (प्रेमकथा) आणि बॉलिवूडचा प्रचंड प्रभाव, यांपासून कधी फारकत घेणार? हे सनातन म्हणावे असे प्रश्न आहेत. त्यांची उत्तरं कधी मिळतील माहीत नाही. मात्र यातील दुसऱ्या प्रश्नाचा पूर्वार्ध हेमंत ढोमे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ये रे ये रे पैसा-२’ या सिनेमात पाहायला दिसतो.

सिनेमाचा विषय अभिनव, वेगळा आहे, मात्र त्याला कथेची योग्य साथ नसल्यामुळे अपेक्षाभंग होतो. सिनेमातलं प्रत्येक पात्र हे पैसा मिळवण्यासाठी धडपड करतं. ही कथा एकाच वेळी अनेक गृहीतकं घेऊन पुढे जाते. मात्र त्यातलं पहिलं गृहीतक सिद्ध करताना आणखी एक गृहीतक जोडलं जातं. त्यामुळे कथा भरकटत राहते. त्यात भर म्हणजे विनोदाच्या नावाखाली चालणारा अतार्किक घटनांचा भडीमार.

संवाद विनोदी असले तरी त्यात निखळपणा नाही. खरं तर सिनेमाचा मोठा भाग विनोदी संवादानं व्यापलेला आहे. मात्र संवादलेखनातील गडदपणा लपून राहत नाही. एखाद्या टॉलिवूड सिनेमातले विनोद जसे घडवून आणले जातात, तसंच काही इथं केलं गेलं आहे.

सिनेमाची कथा पाच वेगवेगळ्या पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची आहे. त्यांना एकत्र करते ती त्यांची भौतिक सुखसमाधानाची अपेक्षा. या पाचही व्यक्ती आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना एका अडचणीत सापडतात. (हे सगळं विनोदी पद्धतीनं घडत असताना त्यातला भावनिक कोरडेपणा आणि अतार्किकपणा कंटाळा आणतो.) ती अडचण सोडवण्यासाठी ते एक योजना आखतात. म्हणजे त्यांना एक उद्धारकर्ता भेटतो.

मात्र इथून पुढे त्यांची अडचण एका बाजूला राहते आणि कथा आपला मूळ धागा सोडून नवीन काहीतरी उभं करते. त्यामुळे एकमेकांवर अवलंबून असलेल्या या गोष्टी सिनेमालाच अडचणीत आणत जातात. त्यात भर म्हणजे रोमांचक वाटेल, असा शेवट करण्याच्या प्रयत्नात सिनेमा भरकट जातो.

संथ सिनेमा मध्येच गती पकडतो. एखादा प्रवासी फलाटावरून सुटलेली गाडी पकडण्याची जोरदार धडपड करतो, मात्र त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी होतात. तसंच काहीसं या सिनेमाचं झालं आहे.

सिनेमाच्या पूर्वार्धातला एक एक घटक उत्तरार्धात गळून पडतो. त्यामुळे विनाकारण सिनेमा लांबला आहे. पूर्वार्ध संथ आहे, तर उत्तरार्ध त्यापेक्षाही जास्त संथ आहे. दोन्हीतला मध्य साधताना दिग्दर्शक आणि एडिटिंग टीमची धावपळ उडालेली दिसते. त्याचा सिनेमावर नकारात्मक परिणाम घडला आहे.

भूमिका करणाऱ्या कलाकारांचा अभिनय कृत्रिम वाटतो. संजय नार्वेकर, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक, मृण्मयी कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, आनंद इंगळे, स्मिता गोंदकर अशी कलाकारांची तगडी टीम असली तरी त्यांची कामगिरी मात्र निराशाजनक आहे.

अभिनय, पटकथा, संवाद यासारख्या बाबीही परिणामकारक ठरत नाहीत. कॅमेऱ्याचा वापर मात्र अत्यंत अचूक पद्धतीनं केलेला आहे. सिनेमा अ‍ॅक्शनपट, कॉमेडी, रोमांचक आणि ड्रामा यातल्या प्रत्येक वर्तुळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यामुळे कथेच्या गाभ्याकडे दुर्लक्ष होतं. थोडक्यात तडजोडीचा जुळून न आलेला अपरिणामकारक प्रयोग म्हणजे ‘येरे येरे पैसा-२’ हा सिनेमा!

.............................................................................................................................................

‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.

dhananjaysanap1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख