अजूनकाही
‘जबरिया जोडी’ बिहारमध्ये घडतो. तो तिथल्या राजकीय, धार्मिक, सामाजिक परिस्थितीचे संदर्भ आपल्या कथानकाच्या केंद्रस्थानी आणतो. त्यातील दृश्यचौकटींमध्ये भगवे झेंडे, बंदुका; तर संवादांमध्ये अमुक संघटन ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला प्रेमीयुगुलांना धमकावत असल्याचे संदर्भ आणि दृश्यं आहेत. हे सगळं केवळ ‘आहे’. या बाबींचं अस्तित्व आहे, पण अपेक्षित असलेला परिणाम नाही. कारण, इथलं मध्यवर्ती कथानक आणि त्याची मांडणी, हाताळणीच उथळ आणि अपरिणामकारक आहे.
अजूनही अस्तित्वात असलेली हुंडा संस्कृती आणि त्यावर बिहारमध्ये शोधला गेलेला उपाय (म्हणजे ‘पकडवा शादी’) इथल्या कथानकाचा पाया आहे. जीन्स नि क्रॉप टॉप्स घालून पटणामध्ये फिरणारी, जिला आपण ‘सुशिक्षित आणि शहरी’ समजावं अशी बबली (परिणीती चोप्रा) नामक मुलगी इथली नायिका आहे. ती पात्र असू शकत नाही. ती थेट ‘नायिका’ आहे. भरपूर मस्करा नि मेक-अपमुळे तिचा संपूर्ण चेहरा सूर्याहूनही अधिक चमकतो. चित्रपटातील पहिल्याच दृश्यात तिच्यासोबत पळून जाऊन लग्न करणं अपेक्षित असलेला प्रियकर तिला भेटायला स्टेशनवर येत नाही. अशा वेळी रात्रभर रेल्वे स्टेशनवर झोपून सकाळी उठलेली ती तेव्हाही तितकीच प्रसन्न नि चकाकणारी असते. सांगायचा मुद्दा इतकाच की, ती चित्रपटाची नायिका आहे. हुंडा वगैरे संकल्पना चित्रपटात असल्या तरी या मुद्द्यांना अपेक्षित असलेलं गांभीर्य, वास्तववाद वगैरे गोष्टी इथं नाहीत. मुळात ही नायिका त्या सभोवतालातील वाटतच नाही. तिचा पेहराव म्हणजे याचं निव्वळ एक अंग झालं. तिचा बिहारी लहेजात बोलण्याचा प्रयत्न म्हणजे याचं दुसरं अंग आहे.
हेच नायकाबाबत. अभय सिंग (सिद्धार्थ मल्होत्रा) हा इथला ‘नायक’. हुकूम देव सिंग (जावेद जाफरी) या स्थानिक गुंड-वजा-नेत्याचा (की नेता-वजा-गुंड?) तो मुलगा. पित्याच्या छत्रछायेखाली (आणि आदेशानुसार) तो हुंडा मागणाऱ्या मुलांची उचलबांगडी करत त्यांना लग्नाच्या मंडपात आणण्याचं काम करतो. पान खात, बंदुका चालवत, शर्टाची वरची दोन बटणं उघडी ठेवत वावरणारा हा सिक्स-पॅकवाला ‘हिरो’ आहे. तो इतरांना सुधारण्याचं काम करतो. अर्थात हा ‘दिव्याखाली अंधार’ म्हणावासा प्रकार झाला. मग अर्थातच या दिव्याला सुधारण्याची जबाबदारी ज्योतीकडे, माफ करा, आपली नायिका - बबलीकडे येते. मग आपल्याला कळतं, अभय आणि बबलीचं लहानपणी एकमेकांवर प्रेम असतं. पण वडिलांमुळे ते दूर गेलेले असतात. आता मोठे झाल्यावर हे अपघातानं (किंवा पटकथेच्या अट्टाहासानंही म्हणता येईल) एकमेकांसमोर येतात नि त्यांच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात होते. पण, प्रकरण इथं संपणारं नसतं. अभय त्याच्या वडिलांची भीती आणि स्वतःची निवडणुकांत उभं रहायची महत्त्वाकांक्षा (?!) यामुळे तिच्याशी लग्न करू इच्छित नसतो. मग या दोघांनी एकमेकांना उचलून आणत एकमेकांशी किंवा काही वेळा तर इतरही कुणाशी तरी जबरदस्तीनं लग्न करण्या/लावण्याचं थकवा आणणारी कृती चित्रपटभर घडत राहते. या रटाळ नि दर दुसऱ्या दृश्यात पुनरावृत्ती घडून येणाऱ्या प्रकरणानं मात्र चित्रपट पाहणाऱ्याच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाते. (व्यावसायिक चित्रपट तसेही समीक्षकांची सत्त्वपरीक्षा पाहण्याचंच काम करतात!)
मग मधल्या काळात अभयनं ‘बजरंग दला’सारख्या स्वघोषित संस्कृतीरक्षक संघटनांप्रमाणे ‘व्हॅलेंटाइन्स डे’ला प्रेमीयुगुलांना धमकावणं नि थिएटरमध्ये बबलीला पाहून तिच्यासोबत स्वतःच चित्रपट पाहत बसण्यासारख्या गोष्टीही चित्रपटात घडतात. इथं समकालीन राजकीय-सामाजिक परिस्थितीचे संदर्भ येतात खरे, पण ते बोथट असतात. कारण, चित्रपटकर्त्यांना आपल्या रटाळ कथानकाच्या तितक्याच रटाळ विश्वात ते नीट पेरता येत नाहीत.
असाच प्रकार या वर्षाच्या सुरुवातीला आलेल्या ‘लुका छुपी’ या आणखी एका चित्रपटामध्ये झाला होता. तिथंही उत्तर प्रदेशातील मथुरेच्या पार्श्वभूमीवर अशा स्वयंघोषित संघटना आणि इतर लोक परस्परसंमतीने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या जोडप्यांना विरोध करताना दिसत होत्या. इथं शहर आणि काही प्रमाणात समस्या बदलतात. मात्र, समाज किंवा समाजातील वर्चस्ववादी गटानं कुणाच्या तरी नात्याला विरोध, किंवा कुणावर तरी नात्याची (वा लग्नाची) जबरदस्ती करणं, हा मुद्दा तसाच राहतो.
त्यामुळे इथं समकालीन सामाजिक-राजकीय परिस्थिती आणि समस्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न दिसतो, असं म्हणता येऊ शकतं. पण, इथं हे भाष्य मुळातच फार वरवरचं आहे. त्यात संदेश देण्याचा उसना आव आहे. लेखक संजीव झाला यांना समकालीन परिस्थितीचे संदर्भ आणि (त्यांचा जिच्यावर भर आहे) त्या प्रेमकथेची गुंफण करता आलेली नाही. अर्थात हे झालं लिखाणाच्या स्तरावर. आधीच कमकुवत आणि नको तितकं दोषपूर्ण असलेलं हे लिखाण पडद्यावर आणताना दिग्दर्शक प्रशांत सिंग त्याला अधिक उबग आणणारं बनवतो. उत्तरार्धात घटनांची पुनरावृत्ती घडत जाते नि चित्रपटाला लांबण लागत जाते. जो पसारा ना लेखकाला आवरता येतो, ना दिग्दर्शकाला चित्रपट किमान सहनीय बनेल अशा प्रकारे हाताळता येतो.
या सगळ्या प्रकरणात संजय मिश्रा, नीरज सूद, चंदन रॉय सन्याल, गोपाल दत्त हे अगदी सुमार दर्जाच्या विनोदांनाही (विनोदी नाही, पण) किमान सहनीय बनवतात. नसता प्रमुख भूमिकेतील परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रामध्ये तर कोण अजिबातच अभिनय करणार नाही, अशी स्पर्धा लागल्याचं दिसतं. बाकी अपारशक्ती खुराना आणि शीबा चढ्ढा साचेबद्ध भूमिकांमध्ये वावरतात. खुराना ‘लुका छुपी’मध्येही अशाच तऱ्हेच्या भूमिकेत होता, हे त्याला किती साचेबद्ध आणि एकसारख्या भूमिका मिळत आहेत याचं द्योतक मानता येईल.
‘लुका छुपी’प्रमाणेच इथंही उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या कथेतील पात्रं अधूनमधून पंजाबी गाणी गाताना दिसतात. मुख्य भूमिकेतील अभिनेते उत्तर प्रदेशातील लोकांच्या लहेजात बोलण्याचे अपरिणामकारक प्रयत्न करताना दिसतात. ‘जबरिया जोडी’ आणि ‘लुका छुपी’मधील नकारात्मक अर्थाची साम्यस्थळं काही संपता संपत नाहीत.
इतक्या सगळ्या नकारात्मक बाबी कमी आहेत की, काय म्हणून चित्रपटात नानाविध उत्पादनांच्या नानाविध जाहिराती केल्या जातात. एक पात्र (?!) थेट कॅमेऱ्यात बोलत संजय मिश्राला ‘गॅस-ओ-फास्ट’चं महत्त्व आणि फायदे सांगत अॅसिडिटीवरील उपायाची जाहिरात करतं. पुढे कधीतरी एका दृश्यात एका ब्रँडचा लालभडक फ्लेक्स अर्धीअधिक दृश्यचौकट व्यापतो. हल्ली चित्रपटांत लग्नं लावायची असली की, ‘मान्यवर’ शिवाय पर्याय नसतो. मग कॅमेरा या ब्रँडच्या पिशव्यांवर रेंगाळत राहतो. अर्थात चित्रपटांमध्ये अशा जाहिराती करण्याचं रेकॉर्ड अजूनही करण जोहरनं निर्मिती केलेल्या चित्रपटांकडे असल्याचं कळतं.
सामाजिक अंगावर भाष्य करण्याचा आव आणणाऱ्या ‘जबरिया जोडी’ला त्यात काही यश येत नाही. याखेरीज त्याला किमान मनोरंजक ठरण्यातही यश येत नाही. त्यामुळे कशातच न मिळणाऱ्या यशामुळे चित्रपटगृहांत प्रेक्षक मिळवण्यातही अपयश येणार असेल, तर किमान निर्मात्यांचं आर्थिक नुकसान भरून काढावं या उदात्त उद्देशानं या सगळ्या जाहिराती चित्रपटात असाव्यात. ‘जबरिया’ म्हणजे ‘जबरदस्ती’. चित्रपटाचं नाव ‘जबरिया विज्ञापन’ असलं असतं तरीही चाललं असतं.
.............................................................................................................................................
लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.
shelar.a.b.mrp4765@gmail.com
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment