अजूनकाही
‘पायरेट्स ऑफ कॅरिबिअन’ चित्रपट मालिकेतील समुद्री चाच्यांचं क्रौर्य असो की, ‘लायन किंग’ चित्रपट मालिकेतील जंगलावर ‘राज्य’ करणाऱ्या सिंहांची गोष्ट, ‘डिस्नेकरण’ झालं की अतार्किकतासुद्धा पचायला गोंडस होते! ‘मंगल पांडे’च्या वेळेस जे आमीर खानला जमलं नाही, ते ‘दंगल’च्या वेळेस मात्र चांगलं जमलं आहे! वस्तुतः ‘मंगल पांडे’मध्ये केवळ बेगडी देशप्रेमच विकायचं होतं, परंतु अधिक क्लिष्ट कथानकामुळे तेव्हा सर्वांना खूष करणं जमलं नव्हतं. ‘दंगल’मध्ये मात्र बेगडी देशप्रेमासोबतच, बेगडी स्त्रीमुक्ती आणि श्रमप्रतिष्ठासुद्धा विकता आली!
गेल्या दहा वर्षांमध्ये चित्रपटनिर्मितीचं कौशल्य तर वाढलं आहेच, शिवाय सरधोपट बांधलेल्या कथानकात आक्षेप घ्यायलासुद्धा फारशा जागा सोडलेल्या नाहीत. ‘व्यायामासाठी मांसाहाराची आवश्यकता मांडणं’ आणि ‘मुलींना छोटे कपडे घालणं’ या फुटकळ आरोपांव्यतिरिक्त आक्षेप कोणी घेतलेले दिसत नाहीत. स्वतःला संवेदनशील आणि बुद्धिवान समजणारे प्रेक्षक हा आमीर खानचा मूळ ग्राहकवर्ग आहे. ‘पीके’मुळे ‘हिंदूद्रोही’ आणि चित्रपटबाह्य कारणांनी ‘देशद्रोही’ ठरलेल्या आमीर खानने यावेळेस लोकप्रिय विषय निवडून हे सिद्ध केलं आहे की, त्याचा मूळ उद्देश ‘तिकिटं विकणं’ हाच आहे. अन्यथा पुरोगामी विचारवंत त्याच्याकडे आशेनं बघू लागले होते!
‘दंगल’मधील समानतेची कल्पना बालिश आहे. मुळात लोकशाहीचं मूल्य ‘समता’ (equality) हे आहे, ‘समानता’ (equivalence) नव्हे. समतेचा अर्थच मुळ, ‘मूलतः असमान असलेल्यांना समान सन्मान, संधी, इ. देणं’ असा आहे. स्त्रिया दुर्बळ असल्याचं मान्य करूनच त्यांना समतेची वागणूक ‘द्यावी’ लागते. त्यामुळे ‘मुलगी मुलापेक्षा कमी नाही’ हा दावा मोडीत निघतो. स्त्री समानतेच्या दाव्यांनी हुरळून गेलेल्यांनी याकडे लक्ष द्यावं की, ‘सर्वांत शक्तिमान मुलासोबत सर्वांत शक्तिमान मुलगीसुद्धा हरते’ असंच चित्रपटात दाखवलं आहे. केवळ महिलांसाठीचीच स्पर्धा असल्यामुळे, नायिका हरली असती तरीही एक महिलाच जिंकणार होती! ‘मुलगीसुद्धा यशस्वी होऊ शकते’ हे महिलांसाठीच्या ‘राखीव’ सामन्यातून सिद्धच होत नाही. तरीही महिलांच्या कुस्तीला गर्दी होते, याचं कारण अप्रचलितता (एक्झॉटिसिजम) हे आहे. सिंहासोबत कुस्ती लावण्याहून अधिक ‘गंमत’ मुलाशी मुलीने कुस्ती खेळल्यास वाटेल, असं ‘दंगल’मध्ये सांगितलं आहे. तोच नियम मुलीमुलींच्या कुस्तीलाही लागू होईल. ‘यासुद्धा’ खेळू शकतात याचा अचंबा वाटल्यामुळे गर्दी झाली. स्त्री असूनही ‘इतकं’ करण्याचं कौतुक हे श्रम-कौशल्याचं कौतुक नव्हे!
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिंकल्याचं कथन (‘against all odds’ narrative) हे प्रेक्षकांना सुखवणारं असल्यामुळे आखाड्याबाहेरील जगातील अडचणींविषयी उदासीन राहता येतं. मुलींचं करिअर करणारा बाप, स्वयंपाकाची जबाबदारी पत्नीवर आणि बायल्या पुतण्यावर टाकतो. ‘मनापासून आस असते त्यांना अशा परिस्थितीतसुद्धा यश मिळवता येतं’ असा संदेश दिल्यामुळे, अपुरं अर्थसहाय्य, भ्रष्टाचार, वाईट प्रशिक्षक इ. प्रतिकूल परिस्थितीचं गांभीर्य टोचत नाही. ‘ज्यांना अपयश येईल त्यांची स्वतःचीच चूक असते’ असा ‘उजवा’ संदेश या चित्रपटातून मिळतो.
‘दंगल’मध्ये वीरू सहस्रबुद्धेला विरोध करताना ‘कामयाबी’ऐवजी ‘काबिलियत’ शिकवणारा आमीर मात्र, सुवर्णपदकाच्या यशाचा ध्यास धरतो आणि रौप्य पदकाला लाजिरवाणं मानतो. मुलांना रिअॅलिटी टीव्ही शोच्या आकर्षणापोटी बाराबारा तास राबवण्यावर हल्ली टीका होते. तरीही ‘डिस्नेफाइड’ गोंडसपणाखाली वडिलांचा अतिरेक खपून गेला आहे. ‘बालवधू बनून दु:ख सोसा किंवा स्पार्टन छळ सहन करून आई-वडिलांच्या आकांक्षा पूर्ण करा’ असे दोन टोकाचे वाईट पर्याय (फॉल्स डायकोटॉमी) देऊन अतिरेकाचं समर्थनसुद्धा केलेलं आहे.
जो बेगडीपणा स्त्रीवाद आणि श्रमप्रतिष्ठेविषयी दिसतो, तोच देशप्रेमाविषयीसुद्धा दिसतो! मुळात खेळात जिंकणं हा प्रतीकात्मक विजय असतो, तो असा साजरा करण्यास प्रोत्साहन दिलं की, देशाहंकार (jingoism) वाढतो. परंतु दुष्ट परदेशी प्रतिस्पर्ध्यांना खेळात किंवा सौंदर्यस्पर्धांमध्ये हरवलं की, त्या देशांच्या प्रगतीकडे आणि तिथं खेळांवर होणाऱ्या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करता येतं. चित्रपटगृहात प्रेक्षकांना राष्ट्रगीतासाठी उभं करण्याविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सध्या देशभरात चर्चा होते आहे. त्याउप्पर, ‘दंगल’मध्ये शेवटी डिस्नेशैलीतील एका रोमांचक प्रसंगात पुन्हा ‘राष्ट्रगीत’ आहे. कंटाळलेल्या मुलांना किंवा पॉपकॉर्न सांभाळत असलेल्या प्रेक्षकांना उठवण्यासाठी चित्रपटगृहात भक्कन उजेड केला जातो! देशद्रोहाचा आरोप ऐकून कंटाळलेल्या आमीरने कदाचित सूड म्हणूनच ही योजना केली असावी!
इतर मसाला चित्रपटांच्या यशापेक्षा ‘दंगल’चं वेगळेपण असं की, मसाला चित्रपटांना नाक मुरडून समाजाची अभिरूची जिवंत ठेवण्यात आनंद मानणारा एक छोटासा तरी वर्ग शिल्लक असतो. ‘दंगल’च्या बाबतीत मात्र विचारी प्रेक्षकसुद्धा भारावून गेले आहेत, ही अधिक चिंतेची बाब आहे!
लेखक बुद्धिप्रामाण्यवादाचे अभ्यासक आहेत.
atheist.nikhil@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
pratik jadhav
Sat , 31 December 2016
review देणारे लेखक निखिल जोशी खूप निराशावादी वाटतात...नक्कीच काही प्रसंग melodramatic आहेत चित्रपटात...पण चित्रपट अफलातून झालाय...या परिक्षणातील शब्दांमध्ये एक सुडबुद्धीची लकेर जाणवते
Kiran Kshirsagar
Sat , 31 December 2016
तुम्ही चित्रपट चुकीच्या पध्दतीने पाहता असे वाटते. चित्रपटाच्या परिक्षणात तटस्थता महत्त्वाची! ती येथे नाही. शब्दांबाबतचे भान काही ठिकाणी सुटले आहे. कदाचित तुमची काही निरीक्षणे विचार करण्याजोगी असतील, मात्र ती योग्य आहेत असे म्हणता येणार नाही. येथे अडचण तुमच्या दृष्टीकोनाची आहे. चित्रपटाचा विचार करताना पात्र, त्याचा सभोवताल, परिस्थिती, त्याची मनोस्थिती, त्यावर आधारित त्याचे निर्णय यांचा विचार करणे आवश्यक आहे. तो विचार या लेखात पूर्ण झालेला नाही. त्यातून या बायोपिक असल्यामुळे कर्त्यावर मर्यादा असतात. विचार करावा. लेखनास शुभेच्छा.
Jaydeep Pathakji
Thu , 29 December 2016
शंभरांमधील ९५ लोक एखाद्या गोष्टीबद्दल चांगलं म्हणत असतील, तर पाच लोकांनी ती गोष्ट कशी साफ चुुकीची आहे असं उर बडवून सांगणं, हादेखील एक प्रकारचा बुद्धिप्रामाण्यवादच आहे. व्यावसायिक चौकटी डोळ्यापुढे ठेवून आमिर खानने दंगलची मांडणी केली आहे यात शंका नाहीच; पण म्हणून देशद्रोहाचा आरोप ऐकून कंटाळलेल्या आमीरने कदाचित सूड म्हणूनच ही योजना केली असावी, अशी केलेेली टिप्पणी वैयक्तिक आकसातून आलेली आहे, हे यातून स्पष्ट होतं. दंगलचे समर्थन करण्याचा येथे मुद्दा नाही. मात्र, आशय-विषयाला धरून चित्रपटाची यशस्वी मांडणी करण्यामध्ये लेखक-दिग्दर्शक यशस्वी झाला आहे हे खुल्या दिलाने मान्य करण्याची तयारीही आपण दाखवत नाही याला काय म्हणावं? म्हणजे उगाच विरोधाला विरोध म्हणून फक्त झोडपायचं ही तथाकथित ‘एलिट’ दळभद्री मानसिकता यामध्ये आहे. स्त्रीवाद, श्रमप्रतिष्ठेविषयीचा विचार वरवरचा आणि बेगडी आहे, असं छातीठोकपणे सांगणाऱ्या लेखकाने त्याऐवजी काय दाखवायला हवं होतं याबद्दल अवाक्षरही काढलेलं नाही. असो दंगलचं यश पाहून पोटात दुखलेल्या मूठभरांची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून याकडे पाहवं. असे अगाध आणि तर्क सोडून मांडलेले तत्त्वज्ञान अनुल्लेखाने मारलेले कधीही श्रेयस्करच.
mahesh patil
Wed , 28 December 2016
हॅलो... हे लेखक नक्की बुद्धिप्रामाण्यवादाचे अभ्यासक आहेत ? असतील तर मग बुद्धिप्रमाण्यवादी व्यक्तीने, ‘देशद्रोहाचा आरोप ऐकून कंटाळलेल्या आमीरने कदाचित सूड म्हणूनच ही योजना केली असावी!’ असले आरोप करणं हे धक्कादायक आणि धोकादायकही आहे. सिनेमाची मांडणी, विषय, आमीरचे काम आणि त्याला मिळालेले यश यात लेखक गल्लत का करीत आहेत. मग आमीरने काय दाखवायला हवे होते हेही तपशीलाने मांडायला हवे. तसे मांडलेले नाही. आमीरबद्दलचा पूर्वग्रह या लेखात ठळकपणे दिसतो. आपल्यावरील देशद्रोहाचे आरोप किंवा त्याच्यावर झालेल्या सो कॉल्ड अन्यायाचा बदला घेण्यासाठी तो सिनेमा करीत असावा किंवा त्यातील प्रसंगातून लोकांवर सुड घेत असावा ? हा बुद्धिप्राण्यवादी तर्क झाला ? राहता राहिला प्रश्न ‘ज्यांना अपयश येईल त्यांची स्वतःचीच चूक असते’ असा ‘उजवा’ संदेश या चित्रपटातील संदेशाची. नक्की खात्री आहे का तुम्हाला असा संदेश या सिनेमातून मिळतो म्हणून. की आमीरच्या यशावरच शंका आहे तुम्हाला. फॉल्स डायकोटॉमी वाटते का यात. खात्री करा राव.
Kala Sardar
Wed , 28 December 2016
विचारांच्या स्पार्कवर आणि चिकित्सक विचाराच्या सवयीवर लिहिलेला लेख वाटतो. नीट संपादन केलेले नाही. वीरू सहस्रबुद्धे हे प्राचार्य होते, प्रशिक्षक म्हणणे योग्य नाही. तसेच ‘बायल्या’ शब्द फार सहज वापरलेला आहे. बुद्धीप्रामाण्याचे अभ्यासक असल्याने अनेकदा छिद्रान्वेष साधू शकतो. ‘स्वातंत्र्य हे चुका करण्याचे स्वातंत्र्य असते’ हे म्हणणारा तर्ककठोर सूर इथे थोडा शब्दांच्या फुलोऱ्यात रमलेला आहे. पिक्चर वगैरे वर समीक्षण करून आपले वैचारीकत्व सिद्ध करणाऱ्यांची एक टोळी आहे. थोडे इनसायडर किस्से, थोडे आंतरराष्ट्रीय किस्से आणि पूर्ण चिकित्सा न करता एकदम निष्कर्ष वाटणारी ललित वाक्ये हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. अधिक चिकित्सक लिहू शकणाऱ्या निखीलने त्यात जाऊ नये असे वाटते. अर्थात स्खलनाचे स्वातंत्र्य आहेच
Shrikant Agawane
Wed , 28 December 2016
आमच्या बुद्धिप्रामाण्यवादाच्या अभ्यासकाने किती सहजपणे पुतण्याला 'बायल्या' बनवून टाकलंय? पॉप्युलर मीडियाला इतकं गंभीरपणे फक्त Media Studies वाले पोटार्थी घेतात.